प्रयत्नांती परमेश्वर!
फळाची अपेक्षा न करता कर्म करीत रहा हा गीतेचा सिद्धांत नीट समजून घेतला पाहिजे. याचा गर्भितार्थ असा आहे की योग्य ठिकाणी प्रयत्न केले नाहीत तर ते वाया जातात, मग त्या प्रयत्नांचे फळ कसले मिळणार व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीची तरी कशी प्रचिती येणार?
हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. तसेही मी इतरांचे अनुभव स्वतःचे ज्ञान म्हणून सांगायला भितो व स्वतःच्या अनुभवातूनच बोलतो, लिहितो. आता प्रयत्नांविषयी नीट सांगतो. गरीब, अशक्त, असहाय्य माणसांसाठी प्रयत्नांचे पर्याय खूप कमी असतात. अशी माणसे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांतच चाचपडत असतात. एक सामान्य माणूस म्हणून असाच चाचपडणारा मीही एक.
धनिक, महाधनिक लोकांचे प्रयत्न भराभर फळाला कारण त्यांना पर्याय भरपूर असतात. पैसा व सत्ता या दोन गोष्टी हातात हात घालून प्रयत्नांचा धुव्वा उडवून देतात आणि मग काय घ्या फळेच फळे! आमच्या सारख्या गरीब माणसांच्या हातात त्या महान परमेश्वराने दोनच गोष्टी ठेवल्यात. एक म्हणजे आहे त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांत जीव ओतून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत चाचपडत बसायचे व या फाटक्या प्रयत्नांना यश दे, फळ दे म्हणून देवाची प्रार्थना करायची.
आम्ही गरीब तुपाच्या गाडग्यात हात घालायचे सोडा करंगळी बुडवायला पण घाबरतो. हे वाक्य गरिबांसाठी चालवलेल्या माझ्या कायदा सहाय्य केंद्रात येऊन मला एकाने बोलून दाखवले व अहो तुपाच्या गाडग्यात निदान करंगळी तरी बुडवा म्हणून सल्ला दिला. पण मला शेवटपर्यंत ती करंगळी काही तुपाच्या गाडग्यात बुडवता आली नाही. त्यातून मी किती मूर्ख वकील आहे हे सिद्ध केले. अहो माझ्या रक्तातच ती वकिली नाही. तसेही आम्हाला लबाडी, भ्रष्टाचार किंवा दांडगाई जमत नाही त्याला आम्ही काय करणार? ही कामे भ्रष्टाचारी व गुंडपुंड लोकांसाठी राखीव आहेत. आम्ही या दोन्ही गोष्टीं पासून फार लांब आहोत. त्या तुटक्या, फाटक्या पर्यायांशी चाचपडत आम्ही जे काही प्रयत्न करतो ते प्रामाणिक असतात व त्यातून त्या महान परमेश्वर शक्ती कडून आम्हाला जे काही थोडेफार, तुटपुंजे फळ मिळते त्यात देवाचे नाव घेऊन आम्ही समाधानी असतो.
आता माझ्या वकिलीचेच उदाहरण घ्या ना. कायद्याचे ज्ञान सखोल घेतले. म्हणून तर मोठे उद्योगपती, मोठे व्यापारी यांनी मला कायदा सल्लागार पद बहाल करून जवळ केले. पण फी मात्र ते ठरवतील ती तुटपुंजी. शेवटी जगणे व वकिलीत टिकणे हे मला महत्त्वाचे असल्याने खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी हा अट्टाहास सोडून दिला व म्हणून समाधानी राहिलो. अहो पण, तसे समाधानी राहण्याशिवाय पर्यायच नव्हता ना मला!
आता उतार वयातही तीच समाधानी वकिली करतोय. हृदयविकार घेऊन डोंबिवलीहून मुंबईला दररोज प्रवास करतोय व जरी वयाने, ज्ञानाने ज्येष्ठ वकील झालो तरी त्या पूर्वीच्याच कमी फी मध्ये संध्याकाळची एका तासाची वकिली करतोय. त्यात समाधानी राहतोय. मोठ्या कंपनीचा कायदा सल्लागार असून तरी काय मोठा दिवा लावतोय? आमच्या त्या म्हाडा गिरणी कामगार लॉटरी घराचे साधे काम मला तडीला नेता येईना. आम्हा गरीब वारसांच्या छोट्या व लांबच्या घराला कर्ज देऊन धनिक लोक कशाला त्यांचे पैसे गुंतवतील?
पण मी मात्र चिकट आहे व म्हणून अधूनमधून नेटाने प्रयत्न करतो ज्या प्रयत्नांकडे मोठ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. याचे कारण काय तर असल्या छोट्या व्यवहारात त्या मोठ्या धनिक लोकांना काही रस नसतो कारण त्यात त्यांचा मोठा फायदा नसतो. असो, तरीही प्रयत्न करीत राहणार कारण प्रयत्नांती परमेश्वर!
-©ॲड.बी.एस.मोरे, १.३.२०२४