https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

वास्तव!

विज्ञान तंत्रज्ञानाचे नैसर्गिक वास्तव व सामाजिक कायद्यातील नैतिक, आध्यात्मिक परमार्थ!

निर्जीव पदार्थांचे पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र, अर्धसजीव वनस्पतींचे वनस्पती शास्त्र, सजीव पशुपक्षी, माणसांचे प्राणी शास्त्र (वनस्पती शास्त्र व प्राणी शास्त्र मिळून बनते जीवशास्त्र) अशी पृथ्वीवरील सजीव, निर्जीव पदार्थांची व त्यांच्या निसर्ग शास्त्रे/विज्ञानांची सर्वसाधारण विभागणी पृथ्वीवर आढळून येते. यात माणसे व त्यांचे प्राणी शास्त्र थोडे हटके आहे कारण माणूस सर्व प्राण्यांत जास्त बुद्धिमान प्राणी आहे.

निसर्ग शास्त्रे/निसर्ग विज्ञाने ही विविध पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीची शास्त्रे/विज्ञाने होत. म्हणून या सर्वांना भौतिक शास्त्रे/भौतिक विज्ञाने असेही म्हणता येईल. परंतु निर्जीव पदार्थांमधील भौतिक/नैसर्गिक देवाणघेवाणीचे पदार्थ विज्ञान हेच तेवढे भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान ही व्याख्या चुकीची आहे. भौतिक शास्त्र/भौतिक विज्ञान व्यापक आहे. भौतिक विज्ञानात पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र ही सर्व शास्त्रे/विज्ञाने येतात.

पृथ्वीवरील सर्व सजीव, निर्जीव भौतिक पदार्थ व त्यांची सर्व भौतिक विज्ञाने (ज्यात स्त्री पुरूष लैंगिकता व माणसांचे पुनरूत्पादन यासारख्या मानवी प्राणी शास्त्राचाही भाग आला) यांची माणसा माणसांतील (आंतरमानवी) देवाणघेवाण हा खास वेगळा विषय आहे ज्याला समाजशास्त्र असे म्हणतात. हे आंतरमानवी समाजशास्त्र भौतिक विज्ञानाला जोडला गेलेला एक विशेष पूरक पर्यावरणीय भाग आहे. पण या पूरक पर्यावरणीय भागाला भौतिक विज्ञान म्हणणे चुकीचे होईल. पण मानवी समाजशास्त्राचा हा पूरक पर्यावरणीय भाग जैविक उत्क्रांतीच्या अगदी शेवटाला किंवा  टोकाला असल्याने कदाचित तो भौतिक विज्ञानापासून वेगळा वाटू शकतो. परंतु समाजशास्त्र हे काही फक्त माणसांपुरतेच मर्यादित नाही. सिंहासारखे प्राणी सुद्धा कळपाने राहतात व त्यांचे ही समाजशास्त्र असते व त्यांचाही सामाजिक कायदा असतो. फरक इतकाच की इतर प्राण्यांतील सामाजिक कायदा हा बळी तो कानपिळी या नियमावर आधारित असतो तर आंतरमानवी सामाजिक कायद्यात नैतिक भावना व विवेकबुद्धीचा संगम असतो.

भौतिक पदार्थ व त्यांच्या भौतिक विज्ञानांची आंतरमानवी/सामाजिक देवाणघेवाण नियंत्रित करणाऱ्या कायद्याला सामाजिक कायदा असे म्हणतात. भौतिक विज्ञानांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही तांत्रिक असते म्हणून त्याला तंत्रज्ञान म्हणतात. पण भौतिक पदार्थ, त्यांचे भौतिक विज्ञान व त्या भौतिक विज्ञानाचे तंत्रज्ञान या सर्वांच्या आंतरमानवी सामाजिक देवाणघेवाणीला तंत्रज्ञान म्हणणे चुकीचे होईल. ही सामाजिक देवाणघेवाण पूरक समाजशास्त्र व सामाजिक कायद्याचा विशेष भाग आहे. भौतिक विज्ञानाची प्रैक्टिस (अंमलबजावणी) तंत्रज्ञानाने केली जाते तर समाजशास्त्राची प्रैक्टिस  (अंमलबजावणी) सामाजिक कायद्याने केली जाते. मानवी मनाची नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम म्हणजे सामाजिक कायदा.

समाजशास्त्र व सामाजिक कायद्यात  माणुसकी म्हणजे मानवी मनाचा चांगुलपणा, मानवी नैतिकता, उदात्त भावना, सुसंस्कृतपणा यांचा काही प्रमाणात तरी समावेश होतो. पण भौतिक विज्ञान-तंत्रज्ञानात कसली माणुसकी, कसली नैतिकता? तिथे फार तर पर्यावरणीय संतुलनाचा विचार म्हणजे शेवटी तांत्रिक भागच येतो. या तांत्रिक भागाला नैतिकतेचा मुलामा देणे चुकीचे.

माणसाला भोगावी लागणारी आजार, वृध्दत्व, मृत्यू यासारखी दुःखे हा तर भौतिक विज्ञानाचा भाग आहे. गौतम बुद्धांना या तीन गोष्टी दिसल्या व त्या त्यांच्या चिंतनाच्या कारण बनल्या. या गोष्टी हे नैसर्गिक वास्तव आहे जे कितीही परमेश्वर भक्ती, देव प्रार्थना केली तरी टाळता येत नाही. मानवी स्वार्थ हेही मानवी दुःखाचे कारण आहे. गौतम बुद्धांना त्यांच्या चिंतनातून मानवी दुःखाचे हे कारण कळले जे कारण माणसाला टाळता येत नाही. फार तर नैतिक भावना व विवेकबुद्धी यांचा सुरेख संगम असलेल्या सामाजिक कायद्याने ते नियंत्रित करता येते.

भौतिक स्वार्थ व नैतिक परमार्थ या दोन्ही गोष्टी सामाजिक कायद्याच्या माध्यमातून माणसाला साध्य करता येतात. नैतिक परमार्थाला परमेश्वर जोडून नैतिक परमार्थाचे रूपांतर आध्यात्मिक परमार्थात होऊ शकते. याचा अर्थ सामाजिक कायद्यातून आध्यात्मिक परमार्थही साधता येऊ शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.२.२०२४

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

दैव जाणिले कुणी!

दैव जाणिले कुणी?

पृथ्वीवरील सर्व पदार्थ-प्राणीमात्रांवर पृथ्वीच्या सर्व भागात सारखाच प्रभाव टाकणाऱ्या विज्ञानातून व या प्राणीमात्रांतील सर्वात बुद्धिमान असलेल्या माणसांवर पृथ्वीच्या सर्व प्रदेशात जवळजवळ सारखाच प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक कायद्यातून एखाद्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या वाट्यास अगदी सहज, न मागता आलेले विशेष अकल्पित वास्तव जे दैवी आधार देणारे असेल किंवा दुर्दैवी निराधार करणारे असेल अशा विशेष वास्तवाला दैव/दुर्दैव, देवाचा आशीर्वाद/देवाचा शाप, प्रारब्ध, नशीब, नियतीचा फेरा वगैरे म्हणतात.

दैव सुखकारक, आनंद देणारे असते तर दुर्दैव दुःखकारक, पीडा देणारे असते. नशीब फळफळल्याने जे यश मिळते ते प्रयत्नवादी कर्तुत्वाचे यश नसते. त्यामुळे अशा यशाची उगाच फुशारकी मारणे चुकीचे. अविरत प्रयत्नाने, स्वकर्तुत्वावर मिळविलेले यश किंवा स्वतःच्या फालतू मस्तीने अंगावर ओढवून घेतलेले संकट हा नशिबाचा भाग नसतो. तो तुमच्या कर्माचा भाग असतो.

दैव किंवा दुर्दैव ही ठरवून प्रयत्न करता सहज, न मागता, योगायोगाने मिळणारी फायद्याची किंवा सहज, न मागता, योगायोगाने अंगाशी येणारी गोष्ट होय. परंतु ठरवून प्रयत्न केलेल्या कर्मातही नशिबाचा भाग असू शकतो. काहींना थोडा प्रयत्न केला तरी दैवाने सहज मोठे यश मिळते तर काहींना सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही मार्गात अडथळ्यांचे दुर्दैव सतत आडवे आल्याने फार थोडे यश मिळते.

प्रश्न हा आहे की, कोणाच्या नशिबी चांगले दैव तर कोणाच्या नशिबी वाईट दुर्दैव या गोष्टी परमेश्वराने जर अगोदरच ठरवून टाकल्या असतील तर मग देवाच्या आर्त प्रार्थनेला व प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीला काय अर्थ राहतो? शेवटी काय, तर दैव जाणिले कुणी!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४

स्वार्थाचे कामापुरते संबंध!

ही माझ्या मेंदूमनाची समस्या, इतरांच्या नव्हे!

स्वार्थी जगात लोकांना असलेली माझी उपयुक्तता जर संपली असेल तर माझ्या सादाला लोकांकडून प्रतिसाद मिळण्याची माझी अपेक्षा मुळातच चुकीची होय. याचाच दुसरा अर्थ असा की, आता इतर लोकांची उपयुक्तता सुद्धा माझ्यासाठी संपली. अशा परिस्थितीत, माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे करणारे, असून नसून सारखे असलेले बिनकामाचे व बिनफायद्याचे लोक माझ्यासाठी निरूपयोगी. अशा लोकांशी आता मी तरी संबंध का ठेवावेत? नुसती माणुसकी म्हणून, नुसता चांगुलपणा म्हणून, नुसता सुसंस्कृतपणा म्हणून का मी असे पोकळ संबंध ठेवावेत? परंतु असा सुसंस्कृतपणा एकतर्फी नसतो? त्याची जबाबदारी फक्त मी एकट्यानेच खांद्यावर का घ्यावी? आता असे संबंध संपले हे माझ्या भावनिक मनाला मीच पटवून दिले पाहिजे व असे संबंध संपवून टाकले पाहिजेत. कारण उगाच डोक्यात ठेवलेले असे बिनकामाचे संबंध मनाला ताप, त्रास देतात व उपद्रवी ठरतात. अशा संबंधाकडे जेवढ्यास तेवढे किरकोळ लक्ष देणे हेच आता माझ्या मनःशांती साठी आवश्यक आहे. असा ठाम निश्चय करून तसे वागता येत नसेल तर ती माझ्या मेंदूमनाची समस्या आहे, इतरांच्या नव्हे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.२.२०२४

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

मानवी गरजांचा शोध!

मानवी गरजांचा शोध!

आपल्या जन्माचा संबंध आपल्या आईवडिलांच्या लैंगिक संबंधाशी असतो म्हणून आपल्या जन्मासाठी आपण आपल्या आईवडिलांवर अवलंबून. जन्मानंतर जगण्यासाठी आपण हवा, पाणी व अन्न या तीन गोष्टींवर अवलंबून व त्या गरजांसाठी आपण निसर्ग व माणसांवर अवलंबून. वस्त्र व निवारा या पुढे वाढलेल्या गरजांसाठीही आपण निसर्ग व माणसांवर अवलंबून. पण लैंगिकता, हवा, पाणी, अन्न, वस्त्र व निवारा या गरजांबरोबर औषध व शस्त्र या मानवी गरजा पुढे का व कधी वाढल्या व त्यांचा माणसांना फायदा किती व उपद्रव किती हे कळायला मार्ग नाही. वीज, रेडिओ, दूरदर्शन, फोन, संगणक, इंटरनेट, मोबाईल, जहाजे, मोटार गाड्या, रेल्वे, विमाने, अवकाश याने इत्यादी  गोष्टी चैनी आहेत की गरजा यावर वादविवाद होऊ शकतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.२.२०२४

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

परमेश्वराचा आधार!

परमेश्वराचा आधार!

निसर्गाची विविधता म्हणजे निसर्गातील विविध प्रकारचे सजीव व निर्जीव पदार्थ. त्यांचे विविध प्रकारचे गुणधर्म. त्यांचे विविध प्रकारचे कलागुण. त्यांच्यातील विविध प्रकारची शक्ती व त्यांची विविध प्रकारची हालचाल व विविध प्रकारच्या पदार्थांंची विविध प्रकारची हालचाल नियंत्रित करणारे विविध प्रकारचे निसर्गनियम (कायदे).

निसर्गाची ही विविधता विखुरलेली आहे. या विविधतेचा, विखुरलेल्या निसर्गाचा समुच्चय व एकवटलेली शक्ती जर कुठे बघायची असेल तर ती फक्त परमेश्वरातच बघता येते. म्हणून निसर्ग नावाच्या निर्मिती पुढे नव्हे तर त्या निर्मितीच्या निर्मात्यापुढे अर्थात परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन हात जोडले जातात कारण ज्याला महान परमेश्वराचा आधार त्याला निसर्ग कठीण न वाटता सोपा वाटतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.२.२०२४

विज्ञानातले देवत्व?

चाकोरीबद्ध भौतिक विज्ञानातील देवत्व?

विश्वातील ग्रह, ताऱ्यांची व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीची हालचाल चाकोरीबद्ध भौतिक नियमांनुसार होत असल्याचे दिसून येते. चाकोरी आली की त्यात रटाळपणा आला. मनुष्याचे जीवनही जीवनचक्रानुसार चाकोरीबद्ध आहे. परंतु या ठराविक चाकोरीत राहूनही मनुष्याने त्याच्या नैसर्गिक बुद्धी व निर्णयक्षमतेचा वापर करून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानातील तांत्रिक व सामाजिक स्वातंत्र्य शोधले व अनुक्रमे तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याच्या जोरावर मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न पिढ्यानपिढ्या चालू ठेवला आहे. तरीही सूर्यमालेचे नियंत्रण करणारा सूर्य, स्वतःभोवती फिरत सूर्यप्रदक्षिणा घालणारी पृथ्वी, पृथ्वी भोवती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीवरील सागर, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, माणसे यांची भौतिक हालचाल चाकोरीबद्धच आहे व त्यामुळे जीवनात हळूहळू ही चाकोरीबद्ध भौतिक हालचाल रटाळ, कंटाळवाणी होत जाते. या हालचालीत सगळेच आलबेल नसते. जगण्यासाठीचा संघर्ष व भीती या गोष्टी तर आयुष्यभर साथ करीत असतात. त्यातून क्षणिक सुख व शांतीचा अनुभव हा दुर्मिळ असतो. सुख व दुःख, शांती व अशांती यांचा सतत लपंडाव सुरू असतो. अशा परिस्थितीत माणूस माणसांतच देव शोधतो कारण आकाशातला अदृश्य देव प्रत्यक्षात संगतीला नसतो व तो खरंच कुठे असला तर तो नेहमी मदतीला धावून येत नाही. पण माणूस हा अदृश्य देवाला पर्याय होऊ शकत नाही. फक्त स्वतःपुरते बघणारी संकुचित मनाची स्वार्थी माणसे वाटेत येणाऱ्या दुसऱ्या माणसांना तुडवून पुढे जातात. त्यामुळे जनावरांपेक्षा माणसांचीच माणसांना भीती वाटत राहते. या वास्तव भीतीपोटीच सामाजिक कायद्याची निर्मिती माणसांनी केली. पण या कायद्याला त्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत मनात भीती घेऊनच जगत असतो. तरीही अशा भयानक परिस्थितीतही काही मोठी माणसे समाजासाठी वरदान ठरतात. अशा थोर माणसांत लोकांचे कल्याण साधणारे, लोकांना सुरक्षित करणारे व लोकांना आधार देणारे राजे, नेते, जनकल्याण, जनसुरक्षा व जनाधार या त्रिसूत्रीवर विराजमान होऊन कार्यरत राहतात. अशा काही थोर माणसांना लोकांनी परमेश्वराचा अवतार मानले तर त्यात त्यांची चूक काय? परंतु अशा महामानवांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांच्या प्रतिमा, मूर्ती मंदिरात ठेवून त्यांची पूजा अर्चा करणे, त्यांच्या कडून चमत्काराची अपेक्षा करणे हे अंधश्रद्ध वर्तन असल्याने ते मात्र चुकीचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

दुरून डोंगर साजरे!

दुरून डोंगर साजरे!

विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्याचा अंदाज सुद्धा नीट करता येत नाही. विश्व म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गातील विविधता लांबून सुंदर भासली तरी आपण तिच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ती किचकट, कठीण होत जाऊन तापदायक होते. कुतूहलाचे समाधान म्हणून विश्वाचे लांबून दर्शन घेणे म्हणजे त्याचे सामान्य ज्ञान घेणे वेगळे आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन त्याचे विशेष ज्ञान घेऊन त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे. उदाहरणार्थ, सूर्याला लांबून बघणे, त्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा लांबून फायदा घेणे वेगळे व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या उर्जा कार्यात प्रत्यक्षात सहभागी होणे वेगळे.

विश्व पसाऱ्याच्या व निसर्गाच्या विविधतेच्या जेवढे जवळ जावे तेवढया गोष्टी अधिकाधिक कठीण होत जातात. निसर्गाने एकीकडून माणसाला प्रचंड मोठी बुद्धिमत्ता व निर्णयक्षमता दिली आहे तर दुसरीकडून निसर्गाचा पसारा प्रचंड  वाढवून व त्यातील विविधता कठीण  करून माणसाचे जीवन प्रचंड  आव्हानात्मक व संघर्षमय करून ठेवले आहे.

आकाशात असंख्य चांदण्या, ग्रह, तारे असतात. पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध व त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? अगदी तसेच या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रदेशात असंख्य माणसे जगत असतात पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध, तसेच त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? माध्यमातून त्यांच्या बातम्या बघणे, वाचणे वेगळे व त्यांच्याशी प्रत्यक्षात व्यावहारिक संबंध असणे वेगळे.

आपल्या जवळचे कोण, आपल्या समोर परिस्थितीने काय मांडून ठेवलेय व आपल्यासाठी व्यवहार्य गोष्ट कोणती याकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्याशी संबंध नसलेल्या बाकीच्या गोष्टींकडे एक विरंगुळा (टाईम पास) म्हणूनच बघितले पाहिजे. थोडक्यात, दुरून डोंगर साजरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४