https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

परमेश्वराचा आधार!

परमेश्वराचा आधार!

निसर्गाची विविधता म्हणजे निसर्गातील विविध प्रकारचे सजीव व निर्जीव पदार्थ. त्यांचे विविध प्रकारचे गुणधर्म. त्यांचे विविध प्रकारचे कलागुण. त्यांच्यातील विविध प्रकारची शक्ती व त्यांची विविध प्रकारची हालचाल व विविध प्रकारच्या पदार्थांंची विविध प्रकारची हालचाल नियंत्रित करणारे विविध प्रकारचे निसर्गनियम (कायदे).

निसर्गाची ही विविधता विखुरलेली आहे. या विविधतेचा, विखुरलेल्या निसर्गाचा समुच्चय व एकवटलेली शक्ती जर कुठे बघायची असेल तर ती फक्त परमेश्वरातच बघता येते. म्हणून निसर्ग नावाच्या निर्मिती पुढे नव्हे तर त्या निर्मितीच्या निर्मात्यापुढे अर्थात परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन हात जोडले जातात कारण ज्याला महान परमेश्वराचा आधार त्याला निसर्ग कठीण न वाटता सोपा वाटतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.२.२०२४

विज्ञानातले देवत्व?

चाकोरीबद्ध भौतिक विज्ञानातील देवत्व?

विश्वातील ग्रह, ताऱ्यांची व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीची हालचाल चाकोरीबद्ध भौतिक नियमांनुसार होत असल्याचे दिसून येते. चाकोरी आली की त्यात रटाळपणा आला. मनुष्याचे जीवनही जीवनचक्रानुसार चाकोरीबद्ध आहे. परंतु या ठराविक चाकोरीत राहूनही मनुष्याने त्याच्या नैसर्गिक बुद्धी व निर्णयक्षमतेचा वापर करून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानातील तांत्रिक व सामाजिक स्वातंत्र्य शोधले व अनुक्रमे तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याच्या जोरावर मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न पिढ्यानपिढ्या चालू ठेवला आहे. तरीही सूर्यमालेचे नियंत्रण करणारा सूर्य, स्वतःभोवती फिरत सूर्यप्रदक्षिणा घालणारी पृथ्वी, पृथ्वी भोवती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीवरील सागर, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, माणसे यांची भौतिक हालचाल चाकोरीबद्धच आहे व त्यामुळे जीवनात हळूहळू ही चाकोरीबद्ध भौतिक हालचाल रटाळ, कंटाळवाणी होत जाते. या हालचालीत सगळेच आलबेल नसते. जगण्यासाठीचा संघर्ष व भीती या गोष्टी तर आयुष्यभर साथ करीत असतात. त्यातून क्षणिक सुख व शांतीचा अनुभव हा दुर्मिळ असतो. सुख व दुःख, शांती व अशांती यांचा सतत लपंडाव सुरू असतो. अशा परिस्थितीत माणूस माणसांतच देव शोधतो कारण आकाशातला अदृश्य देव प्रत्यक्षात संगतीला नसतो व तो खरंच कुठे असला तर तो नेहमी मदतीला धावून येत नाही. पण माणूस हा अदृश्य देवाला पर्याय होऊ शकत नाही. फक्त स्वतःपुरते बघणारी संकुचित मनाची स्वार्थी माणसे वाटेत येणाऱ्या दुसऱ्या माणसांना तुडवून पुढे जातात. त्यामुळे जनावरांपेक्षा माणसांचीच माणसांना भीती वाटत राहते. या वास्तव भीतीपोटीच सामाजिक कायद्याची निर्मिती माणसांनी केली. पण या कायद्याला त्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत मनात भीती घेऊनच जगत असतो. तरीही अशा भयानक परिस्थितीतही काही मोठी माणसे समाजासाठी वरदान ठरतात. अशा थोर माणसांत लोकांचे कल्याण साधणारे, लोकांना सुरक्षित करणारे व लोकांना आधार देणारे राजे, नेते, जनकल्याण, जनसुरक्षा व जनाधार या त्रिसूत्रीवर विराजमान होऊन कार्यरत राहतात. अशा काही थोर माणसांना लोकांनी परमेश्वराचा अवतार मानले तर त्यात त्यांची चूक काय? परंतु अशा महामानवांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांच्या प्रतिमा, मूर्ती मंदिरात ठेवून त्यांची पूजा अर्चा करणे, त्यांच्या कडून चमत्काराची अपेक्षा करणे हे अंधश्रद्ध वर्तन असल्याने ते मात्र चुकीचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

दुरून डोंगर साजरे!

दुरून डोंगर साजरे!

विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की त्याचा अंदाज सुद्धा नीट करता येत नाही. विश्व म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गातील विविधता लांबून सुंदर भासली तरी आपण तिच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ती किचकट, कठीण होत जाऊन तापदायक होते. कुतूहलाचे समाधान म्हणून विश्वाचे लांबून दर्शन घेणे म्हणजे त्याचे सामान्य ज्ञान घेणे वेगळे आणि त्याच्या एकदम जवळ जाऊन त्याचे विशेष ज्ञान घेऊन त्याच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे. उदाहरणार्थ, सूर्याला लांबून बघणे, त्याच्या उष्णतेचा, प्रकाशाचा लांबून फायदा घेणे वेगळे व त्याच्या जवळ जाऊन त्याच्या उर्जा कार्यात प्रत्यक्षात सहभागी होणे वेगळे.

विश्व पसाऱ्याच्या व निसर्गाच्या विविधतेच्या जेवढे जवळ जावे तेवढया गोष्टी अधिकाधिक कठीण होत जातात. निसर्गाने एकीकडून माणसाला प्रचंड मोठी बुद्धिमत्ता व निर्णयक्षमता दिली आहे तर दुसरीकडून निसर्गाचा पसारा प्रचंड  वाढवून व त्यातील विविधता कठीण  करून माणसाचे जीवन प्रचंड  आव्हानात्मक व संघर्षमय करून ठेवले आहे.

आकाशात असंख्य चांदण्या, ग्रह, तारे असतात. पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध व त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? अगदी तसेच या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रदेशात असंख्य माणसे जगत असतात पण त्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संपर्क, प्रत्यक्ष संबंध, तसेच त्यांच्या हालचालीतील प्रत्यक्ष सहभाग किती असतो? माध्यमातून त्यांच्या बातम्या बघणे, वाचणे वेगळे व त्यांच्याशी प्रत्यक्षात व्यावहारिक संबंध असणे वेगळे.

आपल्या जवळचे कोण, आपल्या समोर परिस्थितीने काय मांडून ठेवलेय व आपल्यासाठी व्यवहार्य गोष्ट कोणती याकडेच प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्याशी संबंध नसलेल्या बाकीच्या गोष्टींकडे एक विरंगुळा (टाईम पास) म्हणूनच बघितले पाहिजे. थोडक्यात, दुरून डोंगर साजरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

अध्यात्माची व्यवहार्यता?

अध्यात्माची व्यवहार्यता?

निसर्गाच्या भौतिक विज्ञानात परमेश्वराच्या आध्यात्मिक धर्माची व्यवहार्यता मानवी बुद्धीला नगण्य वाटली तरी शेवटी मानवी बुद्धीला चांगुलपणाची उदात्त भावना चिकटलेली असल्याने या भावनेतून देवश्रद्धा निर्माण होते हे मान्य करावे लागेल. मानवी बुद्धीला ही उदात्त भावना चिकटली तेव्हाच निसर्गाच्या भौतिक विज्ञानाला परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म चिकटला. असे भावनिक अध्यात्म ही मुळातच व्यवहाराची गोष्ट नसल्याने भौतिक विज्ञानातील आध्यात्मिक धर्माच्या  व्यवहार्यतेविषयी बुद्धीने वाद घालणे हे चुकीचे. परंतु भावनाविवश होणे जसे चुकीचे तसे देवभोळे होणे हेही चुकीचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.२.२०२४

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

अर्धज्ञानी लोक व स्वार्थाचा बाजार!

अर्धज्ञानी लोक आणि स्वार्थाचा बाजार!

निसर्गाच्या विविधतेत त्याचे विविध ज्ञान शाखांत विखुरलेले विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या वास्तवाचे ज्ञान. निसर्गात जोपर्यंत हे विज्ञान आहे व त्या विज्ञानाचा भाग असलेली माणसे आहेत तोपर्यंत माणसे त्या विज्ञानाशी झोंबाझोंबी करीत राहणार व त्या झोंबाझोंबीतून विज्ञानाच्या विविध ज्ञान शाखांत विशेष ज्ञान व प्रावीण्य मिळवून त्या अर्धवट ज्ञानाच्या व प्रावीण्याच्या जोरावर ही अर्धवट ज्ञानी माणसे निसर्ग पदार्थांच्या तुकड्यांवर सत्ता गाजवत एकमेकांना एकमेकांवर अवलंबून ठेवणार. कोणताही एक मनुष्य त्याच्या मर्यादित आयुष्यात संपूर्ण विज्ञानाचे ज्ञान मिळवू शकत नाही मग संपूर्ण विज्ञानात प्रावीण्य मिळविण्याची तर गोष्टच सोडा.

त्यामुळे प्रत्येक माणसाला कोणत्या तरी विज्ञान शाखेत (समाजशास्त्र व सामाजिक कायदा हाही निसर्ग विज्ञानाचाच एक भाग) ज्ञानसंपन्न व प्रवीण होऊन विविध वस्तू, सेवांच्या देवाणघेवाणीच्या बाजारात स्वतःचे वैशिष्ट्य विकण्याचा प्रयत्न करावाच लागतो. या बाजारात परावलंबीत्व असते तसा नफ्या तोट्याचा हिशोब असतो, व्यावहारिक शहाणपणा असतो तसा अती स्वार्थातून निर्माण होणारा अप्रामाणिकपणा, संशय, अविश्वास, विश्वासघात, भ्रष्टाचार असतो.

स्वार्थाच्या बाजारातील अर्धज्ञानी माणसे स्वतःजवळ असलेल्या अर्धवट ज्ञानाचे व मर्यादित पदार्थ संपत्तीचे मोल ग्राहकांना (गरजूंना) एवढ्याचे तेवढे करून सांगतात व परावलंबी ग्राहकांना जास्तीतजास्त कसे लुटता येईल याचाच स्वार्थी (बहुधा महास्वार्थी) विचार करीत असतात व या स्वार्थी, व्यापारी वृत्तीतून एकमेकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत राहतात.

स्वार्थाच्या अशा बाजारात माणसा माणसांमध्ये माणुसकी रहात नाही. माणसे एकमेकांना माया प्रेमाने बघत नाहीत. स्वार्थाचे काम संपले की ओळख देत नाहीत. बाजारात स्वार्थ बोकाळला की मग लोक कायद्याला जुमानत नाहीत. अशा बाजारात कायद्याविषयीचा आदर व वचक कमी होतो. त्यामुळे बाजारू सामाजिक व्यवहारात भ्रष्टाचार वाढतो. हळूहळू विज्ञानाच्या बोकांडी तंत्रज्ञान बसते आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो. देवाच्या धर्मात ढोंग घुसते आणि अध्यात्मातला देव निष्क्रिय होतो. तरीही असहाय्य झालेली देवश्रद्ध आस्तिक माणसे कठीण विज्ञानात व माणसांच्या स्वार्थी बाजारात देवाने मदत करावी म्हणून देवाला साकडे घालीत राहतात.

या लेखाचा सार एवढाच की, स्वार्थी व्यवहारी जगात, व्यापारी बाजारात माणुसकी, माया प्रेम शोधत फिरणे हा शुद्ध वेडपटपणा होय. मायाप्रेम हे स्वतःच्या कुटुंबापुरतेच मर्यादित असते, बाहेर नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.२.२०२४

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!

निसर्गाने किंवा निसर्गातील त्या महान परमेश्वराने मानवी शरीर हे काय अजब यंत्र बनविले आहे त्याचा फाॕर्म्युला त्या परमेश्वरालाच ठाऊक. मेंदू, हृदय, किडनी, छाती, पोट, डोळे, नाक, कान अशा अनेक अवयवांचे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ शरीराच्या ठराविक भागाविषयीच्या त्यांच्या विशेष पण तरीही मर्यादित वैद्यकीय ज्ञानाने रूग्णांच्या शरीरावर निरनिराळे प्रयोग करीत असतात. गंमत ही की त्यांच्या या प्रयोगांनी शरीराचा एक अवयव सुधारला तर दुसरा अवयव बिघडतो. मग जा त्या दुसऱ्या अवयवाच्या तज्ज्ञाकडे.

माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या हृदयात ६७ वयात कसला तो २:१ ए.व्ही. ब्लॉक निर्माण झालाय व त्याने माझ्या हृदयाचे इलेक्ट्रिक सर्किटच बिघडवून टाकले. आता  इलेक्ट्रिक करंटच अनियमित झाला तर हृदयाचे पंप बिघडून हृदयातून संपूर्ण शरीराला होणारा रक्तप्रवाह पण अनियमित होणार ही नैसर्गिक वैज्ञानिक गोष्ट आहे ज्यावर देवाचे अध्यात्म काय करणार? माझ्या मेंदूत जगाच्या विचाराचा किडा सारखा वळवळत असतो. त्यामुळे माझा मेंदू हृदयाकडून जास्तीतजास्त रक्ताची मागणी करतो. ६७ वर्षे रक्ताचे पंपिंग करून करून माझे हृदय बिच्चारे थकले. आता ते माझ्या मेंदूला जुमानत नाही. माझ्या  हृदयाच्या या असहकारामुळे माझा मेंदू हल्ली संभ्रमित व घाबरट झाला आहे. तो त्याचा आत्मविश्वास गमावत चाललाय आणि ही सर्व परिस्थिती हृदयाच्या ब्लॉकमुळे निर्माण झालीय. इथे हृदय मेंदूवर वरचढ ठरलेय.

त्यामुळे झालेय काय की अंघोळ ही साधी गोष्ट सुद्धा मला कठीण होऊन बसलीय. शरीराच्या खांद्याखालील भागाला कितीही साबण लावा त्याने त्रास होत नाही. पण एकदा का डोक्याला व तोंडाला साबण लावला की कधी डोक्यावरून पाणी घेतोय व डोक्याचा, तोंडाचा तो फेस धुवून काढतोय असे होऊन जाते. नेमके याच वेळी हृदयाला मस्ती येऊन ते मेंदूचा रक्त पुरवठा कमी करते आणि मग मेंदूला काय करावे हे सुचतच नाही. तो घाबरून जातो व मेंदू घाबरला की जीव गुदमरून जातो. हा क्षण म्हणजे धड जीवन नाही व धड मरण नाही असा मधल्या मध्ये लटकण्याचा क्षण. या क्षणात देवाचे कसले ते अध्यात्म सुचतच नाही. इतक्या देवदेवता आहेत व इतके साधुसंत आहेत पण एकाचेही नाव घेता येत नाही मग त्यांचा धावा कसला करणार? त्यावेळी कोणीच वाचवायला येत नाही. मग स्वतःच स्वतःला सावरून डोक्यावर पाणी घेऊन त्या भयंकर क्षणातून बाहेर यावे लागते.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर हार्ट ब्लॉक नंतर आता माझ्या मेंदूत  मेंटल ब्लॉक झालाय. याचे कारण हृदय व मेंदू हे शरीराचे दोन प्रमुख अवयव एकमेकांशी निगडीत आहेत.  एक अवयव बिघडला की दुसरा अवयव बिघडतो. कॉर्डिओलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सुचवलेय तर माझ्या हृदयाजवळ पेसमेकर म्हणजे  हातातील घड्याळाची आकाराची बॕटरी बसवा. त्यांना हृदयाच्या पलिकडे काही कळतच नाही. ती कृत्रिम बॕटरी छातीत घातली तर माझ्या हृदयाची टिकटिक वाढेल म्हणे. पण त्याने माझा मेंदू बिघडेल त्याचे काय? यावर कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे काय उपाय आहे? या बॕटरीने माझा मेंदू शंभर टक्के बिघडणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझा मेंदू या असल्या कृत्रिम उपकरणांवर जगायला तयारच नाही.

होऊन होऊन काय होईल? माझ्या हृदयाची हळूहळू चालू असलेली टिकटिक बंद पडेल आणि मी मरेल एवढेच ना! त्याला तर माझा मेंदू केंव्हाच तयार झालाय. कदाचित मी बाथरूम मध्ये अंघोळ करतानाच मरून पडेल असे वाटतेय. कारण अंघोळ करताना माझा हार्ट ब्लॉक माझ्या मेंदूत मेंटल ब्लॉक तयार करतो. यावर तात्पुरता इलाज म्हणून आता मी काय करणार तर अंगाला भरपूर साबण लावला तरी डोके व तोंड या भागांना अगदी थोडा साबण लावणार म्हणजे तिथे जास्त फेस होणार नाही आणि मग तो मेंटल ब्लॉक तयार व्हायच्या आत पटकन डोक्यावरून पाणी घेऊन मोकळे होणार. उगाच लोचा व्हायला नको. पण हॉस्पिटलमध्ये मरण्यापेक्षा घरात मरणे ही तशी चांगलीच गोष्ट आहे मग त्यासाठी बाथरूम तर बाथरूम.

मी बायकोला व मुलीला सांगूनच टाकलेय की मला हृदयविकाराचा झटका आला की लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यायची बिलकुल घाई करायची नाही. मी बेशुद्ध असलो तर मला न विचारता तिथे माझ्या छातीची चिरफाड करून तो पेसमेकर बसवला तर? माझ्या हृदयाचे मिटर बंद झाले तरी चालेल पण त्या डॉक्टरांच्या जबरदस्त फी चे मिटर चालू व्हायला नको. तसे तर हार्ट अटॕकने पटकन मृत्यू यायला माणूस पुण्यवान असावा लागतो. मी तसा पुण्यवान माणूस आहे हे सिद्ध करण्याची मला देवाने दिलेली संधी मी का दवडू?

अंगाला विशेष करून डोक्याला व तोंडाला जास्त साबण लावला की त्रास होतो व देवाचे अध्यात्म जास्त केले की नैराश्य येते हा तसा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझे वडील जास्त देवदेव करीत नव्हते पण ते ७९ वर्षे जगून शांतपणे हार्ट अटॕकने गेले. याउलट माझी आई देवाची खूप पूजा अर्चा करायची पण तिला कमी वयात मधुमेह झाला आणि त्या साखर आजाराने तिला भयंकर त्रास दिला. पायाला मधुमेहामुळे गँगरीन झाले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये पायाची बरीच आॕपरेशन्स झाली. शेवटी कमी वयातच जे.जे. रूग्णालयातच तिने प्राण सोडले. हा कसला देवाचा उलटा न्याय? इतरांचे अनुभव मला माहित नाहीत व त्यांच्याशी माझे काही घेणे देणे नाही. मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून बोलतो व लिहितो. निसर्गाचे विज्ञान काय किंवा परमेश्वराचे अध्यात्म काय, या दोन्ही गोष्टी मी जेवढ्यास तेवढ्या करतो. माझ्या हार्ट व मेंटल ब्लॉकसनी माझे ज्ञान आणखी वाढवले एवढे मात्र नक्की!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

निसर्गाचे साचेबंद विज्ञान!

साचेबंद निसर्ग व त्याचे विज्ञान!

पृथ्वीच्या अनेक बिळांतून जशी अनेक उंदरे जन्माला येतात तशी पृथ्वीवरील अनेक घरांतून अनेक माणसे जन्माला येतात. उंदरे असोत नाहीतर माणसे सर्वच सजीवांचे जीवन तसे साचेबंदच. निर्जीव पदार्थांचे अस्तित्व तर एकदम कडक गणिती साचेबंद. फक्त प्रत्येक गटाचे साचे वेगळे एवढेच. मनुष्याचा साचा थोडा हटकेच. निसर्गाकडून मनुष्य प्राण्याला लाभलेली बुद्धी एकदम उच्च पातळीची. याच बुद्धीच्या जोरावर मनुष्याने विज्ञानाचे रूपांतर आधुनिक तंत्रज्ञानात केले व मानवी जीवनाला तंत्रज्ञान निर्मित सुखसोयी व जीवनविषयक तत्वज्ञान यांच्यात बद्ध केले. हा मानवनिर्मित साचा तसा कृत्रिम पण तो नैसर्गिक बुद्धीने निर्माण केला असल्याने या कृत्रिम साच्यालाही नैसर्गिक साचा म्हणावे लागेल. मनुष्याच्या तांत्रिक साच्यात वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी इ. गोष्टी तर मनुष्याच्या तात्विक साच्यात अर्थकारण, राजकारण, धर्म इ. गोष्टी अशा बऱ्याच मानवनिर्मित कृत्रिम गोष्टी समाविष्ट आहेत. याच साच्यात निर्माण होतात कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षक, वकील, धर्मपंडित, श्रीमंत उद्योजक (अर्थकारणी), बलवान राजकारणी व सर्वसामान्य माणसे. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. या सर्व गोष्टींच्या मुळाशी परमेश्वर आहे असे मानावे तर परमेश्वराच्या धार्मिक अध्यात्माचा निसर्गाच्या वैज्ञानिक भौतिकतेवर खरंच प्रभाव आहे का व असलाच तर तो किती आहे हे कळायला मार्ग नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४