https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

मोजक्यांचे मोजके खेळ!

मोजक्यांचे मोजके खेळ!

आयपीएल क्रिकेट सामन्यांत क्रिकेट खेळाडूंचा लिलाव होतो. त्यांच्यावर गडगंज पैसा जवळ असणारे श्रीमंत अर्थसम्राट करोडो रूपयांची बोली लावतात आणि त्या बोलीवर या खेळाडूंचे खेळ मूल्य ठरते. हा प्रकार म्हणजे बुद्धिमान माणसाची भन्नाट कल्पना. या कल्पनेच्या खोलात गेले की कळते की खेळाडूच काय पण कलाकार, राजकारणी वगैरे सर्व सेलिब्रिटी मंडळी मूठभर अर्थसम्राट लोकांकडून वापराच्या वस्तू झाल्या आहेत. सर्वसामान्यांचे हित वगैरे या सर्व फेक आश्वासनांच्या गोष्टी आहेत. हे सर्व मोजक्या मर्जीतल्या लोकांचे (कंपूगिरी) आपसातले मोजके खेळ आहेत जे सर्वसामान्य लोकांनी फक्त बघत रहायचे व त्यावर फक्त टाळ्या वाजवायचे काम करायचे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

जगातील डिजिटल क्रांतीने भाषिक मर्यादांच्या भिंती ओलांडून सर्व भाषिकांना जवळ आणण्याचे काम सुरू केले आहे. भाषिणी नावाचे ॲप एका सेकंदात एका भाषेचे भाषांतर दुसऱ्या भाषेत करते असे माझ्या दिनांक २३.१२.२०२३ च्या लोकसत्ता वृत्तपत्रात वाचण्यात आले व मी खूप आश्चर्यचकित झालो.

वेगाने प्रगत होत चाललेल्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा भाषिणी हा एक छोटा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा तर आणखी पुढचा भाग. नशीब अजून तरी कृत्रिम भावना हा प्रकार निर्माण झाला नाही. भावना अजून तरी नैसर्गिक पातळीवरच स्थिर आहे. तिला कृत्रिमतेचा स्पर्श अजून तरी झाला नाही.

ई काॕमर्स, आॕनलाईन बँकिंग हे शब्द अंगवळणी पडल्यानंतर आॕनलाईन निवडणूक सुद्धा पुढे आली आहे. या आॕनलाईन निवडणूक यंत्रणेचे एक तांत्रिक मोड्युल बाजारात आलेय. तसेच न्यायालयांतून आॕनलाईन दावे व खटले दाखल करण्याची यंत्रणा उभी राहिलीय. नशीब अजून तरी आॕनलाईन जस्टिस देणारे कृत्रिम तंत्रज्ञान निर्माण झाले नाही. जोपर्यंत मानवी भावना नैसर्गिक राहतील तोपर्यंत मानवी न्याय सुद्धा वकील व न्यायाधीश यांच्या स्वतंत्र माध्यमातून नैसर्गिकच राहील असे मला वाटते. आमच्या सारखी जुन्या काळातील माणसे मात्र या डिजिटल क्रांतीने हळूहळू कालबाह्य होत चालली आहेत हे मात्र खरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

अमर कलाकार!

अमर कलाकार!

पूर्वीच्या मराठी चित्रपटातील जयश्री गडकर, उषा चव्हाण यासारख्या मराठी अभिनेत्री यांनी त्यांची कला खऱ्या अर्थाने जपली होती. किती ते त्यांचे शालीन सौंदर्य. तमाशातील फडावर लावणी नृत्य करताना सुद्धा अंग उघडे राहणार नाही याची दक्षता घेतली जायची. त्यांच्या शालीन आविष्कारातून तमाशा शब्दाविषयी आदर वाटायचा. उच्च पातळीवरील कला, संस्कृतीची एक छाप पाडून गेलेत हे जुने कलाकार. ते हे जग सोडून गेलेच नाहीत. त्यांच्या उच्च कलेच्या ठेव्यातून ते अमर आहेत. आताच्या धांगड धिंगाणा कला, संगीताशी त्यांच्या जुन्या कला, संगीताची तुलनाच करता येणार नाही. त्या कलाकारांना रसिक म्हणून माझे वंदन!

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

चाबऱ्या फ्रेंड रिक्वेस्टस!

चाबऱ्या फ्रेंड रिक्वेस्टस!

माझ्या या नवीन फेसबुक खात्यावर माझा मिशीवाला चेहरा बघून नवीन फ्रेंड रिक्वेस्टस पाठवणाऱ्या हौसी लोकांना हे माहित नाही की हे माझे पाचवे फेसबुक खाते आहे व फालतू टाईमपास करण्यासाठी मी हे नवीन खाते उघडले नाही. काही चाबऱ्या होमोसेक्सुअल लोकांनी (ज्यात चाबरे म्हातारेही होते) त्यांचा तो अंतःस्थ चाबरा हेतू दाखवून मला या नवीन खात्यावर फ्रेंड रिक्वेस्टस पाठवल्या. अशा लोकांना लगेच ब्लॉक करण्याशिवाय पर्याय रहात नाही. तसेच काही नवोदित मित्रांना माझ्या वैचारिक पोस्टस सोडून इनबाॕक्स मध्ये येऊन माझ्याशी हितगुज करण्यात रस दिसतो. या सर्वांना पुन्हा सावध करून सांगतो की माझे फेसबुक खाते हे टाईमपास खाते नाही! 

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१२.२०२३

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसाचा जन्म झाला रे झाला की त्याच्या जैविक गरजांचे रडगाणे सुरू होते. जन्मल्याबरोबर आईच्या दुधासाठी बाळाचे रडणे हा हळूहळू वाढत जाणाऱ्या या रडगाण्याचा पहिला भाग. बाळाचे स्तनपान करून दूध पाजणारी बाळाची आई हे जैविक गरजा भागविण्यासाठी बाळाला मिळालेले पहिले साधन.

जैविक गरजा एकीकडे व त्या गरजा भागविण्यासाठी निसर्ग व समाजात असलेली साधने दुसरीकडे अशी परिस्थिती असते. अर्थात एकीकडे  भूक तर दुसरीकडे भूक भागविणारे अन्न यांच्या कचाट्यात माणूस सापडतो. साधनप्राप्ती सहज शक्य होत नाही. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट करावे लागतात. अर्थात जैविक गरजा व जैविक साधने यांच्यामध्ये कष्ट असते. जैविक गरजा व जैविक साधने यांच्यात नैसर्गिक आकर्षण निर्माण करून गरजा व साधनांना एकत्र आणायचे काम निसर्गाचा कायदा करतो तर जैविक साधनांच्या  स्पर्धात्मक कष्टाला सामाजिक शिस्त व वळण लावण्याचे काम सामाजिक कायदा करतो.

परमेश्वराची नुसती आध्यात्मिक भक्ती करीत राहिल्याने जैविक भूक नष्ट होत नाही व भुकेचे समाधान करणारी जैविक साधने हातात येत नाहीत. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट  करावेच लागते. देवधर्म केल्याने अशा कष्टाला बळ मिळते का व  असे कष्ट सुसह्य होते का हा वादाचा मुद्दा आहे. देवधर्माने कदाचित अशा कष्टाला एक काल्पनिक मानसिक आधार मिळत असेल. पण तो किती हे देवधर्म करणाऱ्या लोकांना माहित असेल. पण सामाजिक कायद्याने स्पर्धात्मक कष्टाला एक सामाजिक शिस्त व वळण लागते हे मात्र खरे आहे.

माणसांवर राज्य कुणाचे या प्रश्नाचे उत्तर काय तर जैविक गरजा व जैविक साधने निर्माण करून त्यांना जोडणाऱ्या नैसर्गिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या निसर्गाचे एक राज्य आणि साधनांसाठी कराव्या लागणाऱ्या स्पर्धात्मक कष्टाला शिस्त व वळण लावणाऱ्या सामाजिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या समाजाचे दुसरे राज्य. म्हणजे माणसांसाठी दोन राज्ये आहेत व ती म्हणजे एक निसर्गाचे राज्य व दुसरे समाजाचे राज्य. यात परमेश्वराचा भाग किती हे त्या परमेश्वरालाच माहित!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

जरा जपून समाजकार्य करा!

जरा जपून समाजकार्य करा!

ज्या मानव समाजात आपण माणूस म्हणून राहतो त्या समाजाच्या हितासाठी समाजकार्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्हाला चांगले समाजकार्य करायचे असेल तर समाज विघातक काम करणाऱ्या लोकांविरूद्ध तुम्हाला लढावे लागेल म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला पंगा घ्यावा लागेल. मग त्यातून तुमचे हितशत्रू निर्माण होणार ही गोष्ट निश्चित. तुमच्या चांगल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक करणारे तुमचे हितचिंतक समाज हिताच्या अशा आरपार लढाईत तुमच्या पाठीमागे किती उभे राहतात यावर समाज योद्धा म्हणून तुमचे यश अवलंबून आहे. तुमचे हितशत्रू तुम्हाला तुमच्याच हितचिंतकांच्या मनात तुमच्या विरूद्ध विष पेरू शकतात. त्यासाठी ९९% चांगली कामे करणाऱ्या तुमची १% चूक पुरेशी आहे. त्या १% चुकीचा तुमचे हितशत्रू एवढा मोठा बाऊ करतील की तुमचे हितचिंतकच तुमचे शत्रू बनतील व तुम्हाला संपवण्यात पुढाकार घेतील. हा घाबरवण्याचा प्रयत्न नाही तर अशा गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत व पुढेही घडत राहतील म्हणून सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. घाबरून कोणी समाजकारण (राजकारण हा आणखी मोठा विषय) करण्याचे सोडून देणार नाही पण ते करताना तुमच्या हितशत्रूंपासूनच नव्हे तर पलटी खाणाऱ्या हितचिंतकांपासून सुद्धा सावध राहिले पाहिजे हे सरळ स्पष्ट शब्दांत सांगण्याचा प्रामाणिक हेतू या लेखामागे आहे हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. जरा जपून समाजकार्य करा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

मनाचे स्वातंत्र्य!

मेंदूमनाचा स्वयंनिर्णयाचा अधिकार अर्थात मनाचे स्वातंत्र्य!

सजीवांचे मेंदूमन खरंच स्वतंत्र आहे काय? मनुष्य हाही सजीव प्राणी असल्याने त्याच्या मेंदूमनालाही हा प्रश्न लागू आहे. माझ्या मते मनुष्याचे मेंदूमन निसर्गाचे निसर्गमन व मानव समाजाचे समाजमन या दोन बाह्य मनांच्या कचाट्यात सापडलेले आहे. तसे पाहिले तर समाजमन हाही निसर्गमनाचाच एक भाग पण त्याचा एक वेगळाच प्रभाव मानवी मेंदूवर असल्याने सोयीसाठी समाजमनाला निसर्गमनापासून थोडे वेगळे धरले आहे.

मूलभूत नैसर्गिक गरजांपुरत्या मर्यादित असलेल्या आवश्यक गोष्टी कोणत्या हे निसर्गमन मानवी मेंदूला शिकवत असते तर या आवश्यक गोष्टींच्या पलिकडे जाऊन उपभोगता येणाऱ्या सुखकर व अतीसुखकर अशा चैनीच्या गोष्टी कोणत्या व त्यासाठी नैसर्गिक मूलभूत गोष्टींचा विकास कसा करायचा हे समाजमन मानवी मेंदूला शिकवत असते.

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या म्हणजे आवश्यकतेपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी (नेसेसिटीज) व विकासाच्या अत्युच्च पातळीवर असलेल्या श्रीमंती थाटाच्या चैनीच्या गोष्टी (लक्झरीज) यांच्या बरोबर मध्ये शरीर, मनाला सुखसमाधानी, सोयीस्कर, आरामशीर ठेवणाऱ्या गोष्टी (कम्फर्टस) असतात. या कम्फर्ट झोन मध्ये मानवी मन स्थिर राहिले तर ते आनंदी व शांत राहते. यालाच मानवी मेंदूमनाचा मध्यम मार्ग असे म्हणता येईल. मानवी मेंदूमनाचे एक जैविक घड्याळ आहे. या जैविक घड्याळाच्या सेकंद काट्याला गरज, मिनिट काट्याला आराम व तास काट्याला चैन असे म्हणता येईल का? मला वाटते वेळेचे हे वर्गीकरण गरज, आराम व चैन या अनुक्रमे तीन गोष्टींना लागू होणार नाही कारण त्यांचा संदर्भ वेगळा आहे. पण गरज, आराम व चैन या तीन गोष्टींचे चक्र मेंदूमनात सतत गोल फिरत असते एवढे मात्र नक्की. माझ्या मते मानवी शरीर, मनाला सुख व शांती मध्यम म्हणजे आराम अवस्थेत लाभू शकते व या अवस्थेतच मेंदूमन स्थिर रहायला हवे. निसर्ग व समाज या दोन्हींमध्ये परमेश्वर असेल तर त्यालाही गरज व चैन यांच्या बरोबर मधल्या म्हणजे स्थिर अशा आराम अवस्थेत सुख व शांती लाभत असेल. म्हणून या मध्यम अवस्थेतच मानवी मनाचा परमेश्वर मनाशी (परमात्म्याशी) सुसंवाद निर्माण होऊन दोन्ही मने एकजीव होऊ शकतात असे मला वाटते.

प्रश्न हा आहे की, निसर्गमन व समाजमन या दोन बाह्य मनांच्या प्रभावाखाली सतत असणाऱ्या मानवी मनाला स्वयंनिर्णयाचा अधिकार किती? कधीकधी मनाच्या चैनीचा प्रश्नच नसतो. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी जर आवश्यक म्हणून न करता त्या चैनीच्या गोष्टी म्हणून केल्या म्हणजे आवश्यक गोष्टींचा (गरजांचा) मर्यादेपलिकडे, प्रमाणाच्या बाहेर अतिरेक केला तर गरजांचे रूपांतर चैनीत होऊन गरजाच त्रासदायक होऊ शकतात. शेवटी विचारपूर्वक स्वयंनिर्णय घेण्याचा मानवी मनाला मर्यादित का असेना पण अधिकार आहेच. याबाबतीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनाला पटतात. त्यांच्या मते, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य व मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१२.२०२३