भूमिका, भौतिक व आध्यात्मिकही!
निसर्गाकडे नुसत्या भौतिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे किंवा नुसत्या आध्यात्मिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे की दोन्हीच्या संमिश्र दृष्टीने बघायचे व वागायचे हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. मी मात्र परमेश्वर नामक निर्मिका शिवाय निसर्ग नामक निर्मिती नाही अशा तार्किक विचाराने निसर्गाच्या बुडाशी परमेश्वर आहे असे मानतो (मानतो असे म्हणतो कारण निसर्गाच्या बुडाशी असलेल्या सर्वोच्च शक्तीचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व मला वैज्ञानिक पुराव्याने सप्रमाण सिद्ध करता येत नाही).
माझ्या तर्कातला परमेश्वर मला निसर्गात व निसर्गाचाच एक भाग असलेल्या मानव समाजात विविध रूपांत व विविध गुणधर्मी क्रियांत दिसतो. तसाच तो निरनिराळ्या धर्मांनी वर्णिलेल्या विविध रूपांतही दिसतो. पण परमेश्वराची ही विविध रूपे आठवत, आळवत, त्याच्या विविध रूपांच्या विविध जपमाळा ओढत बसायचे की या सगळ्या रूपांत एकाच परमेश्वराला बघायचे हाही ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. त्याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यात कोणी लुडबूड करणे टाळावे.
निसर्गात व मानव समाजात संतुलन साधण्याच्या निसर्गातील सर्वोच्च शक्तीच्या (परमेश्वराच्या) अनेक पद्धती आहेत. त्यावर बौद्धिक विचारमंथन तरी किती करायचे? जंगलात तृणभक्षी प्राण्यांना हिंस्त्र मांसभक्षी प्राणी क्रूरपणे शिकार करून खातात हीही निसर्गातील त्या परमेश्वराची बळी तो कानपिळी या जंगली नियमावर आधारित जंगलात संतुलन साधण्याची पद्धत आहे.
पण मनुष्य प्राण्याला परमेश्वराने उदात्त भावना व श्रेष्ठ बुद्धी दिल्याने मानव जगतात हा जंगली नियम अंमलात आणणे अमानवी होय. मनुष्य म्हणून आयुष्य जगताना दोन प्रमुख पर्याय परमेश्वराने मनुष्याच्या बौद्धिक विचारांसाठी ठेवले आहेत. ते म्हणजे सुज्ञ, समंजस, विवेकी (रॕशनल) वैचारिक धोरणाने चांगल्या आर्थिक सहकार्यातून शांततामय सहजीवन (पिसफुल कोएक्झीस्टंस) स्वीकारायचे की आर्थिक, राजकीय दोन्ही स्तरावर प्रचंड मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तारवादी, आक्रमक, अविवेकी, हुकूमशाही वैचारिक धोरणाने जंगलातील "बळी तो कानपिळी" हा कनिष्ठ नियम स्वीकारून राजकीय संघर्षातून विध्वंसक भूमिका घेत अशांत जीवन जगायचे, हे दोन्ही पर्याय मानवापुढे आहेत. मानव समाजाच्या माध्यमातून निसर्गात व समाजात संतुलन साधण्याची परमेश्वराची उच्च पातळीवरील हीही एक पद्धत आहे. सुसंस्कृत मानव समाजाकडून परमेश्वराच्या या पद्धतीचा सुज्ञपणे विचार केला जाऊन शांततामय सहजीवनाचा श्रेष्ठ पर्याय स्वीकारला गेलाय. पण या चांगल्या निर्णयात खोडा घालणारे काही विघ्नसंतोषी लोक असतात व त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुसंस्कृत समाज कायद्याला पार पाडावे लागते. हे काम चोखपणे पार पाडण्यासाठी मानव समाजातील कायदा रक्षक आस्तिक बनून परमेश्वराचे नाव घेतील किंवा परमेश्वराचे अस्तित्व नाकारून नास्तिक बनून परमेश्वराचे नाव घेणारही नाहीत. ते स्वातंत्र्य त्या सर्वोच्च निर्मिक शक्तीने मानवाला दिले आहे.
मी मात्र परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून निसर्गाकडे व त्याचाच भाग असलेल्या मानव समाजाकडे व त्यातील घटनांकडे, घडामोडींकडे परमेश्वराची लीला म्हणून बघतो व याच लीलेचा भाग म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला माझ्या बौद्धिक कुवतीनुसार व वैयक्तिक ताकदीनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ती भूमिका पार पाडताना परमेश्वर हा माझा आधार, सोबती, सांगाती असा आध्यात्मिक विचार करतो. तसा विचार करताना या जगातील प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याची बौद्धिक कुवत व प्रत्येक प्रश्न सोडविण्याची ताकद माझ्याकडे नाही हे वास्तव स्वीकारून बऱ्याच गोष्टी जगावर व जगाचा कर्ता व करविता असलेल्या परमेश्वरावर टाकून/सोडून मोकळा होतो. छोट्या गोष्टी मोठ्या करण्याचा व मोठ्या गोष्टी छोट्या करण्याचा जेंव्हा जेंव्हा माझ्या मनाला मोह होतो तेंव्हा तेंव्हा त्यातून सावरण्यासाठी मी माझ्या बुद्धीची सांगड परमेश्वराच्या सोबत, आधाराशी घालतो. माझी भूमिका अशाप्रकारे भौतिक आहे तशी ती आध्यात्मिकही आहे. निसर्गात अधूनमधून नैसर्गिक आपत्ती येत असतात तशा मानव समाजातही अधूनमधून विकृत, समाज विघातक व विध्वंसक घटना घडतच असतात. पण केवळ त्यावरून निसर्गातील परमेश्वराचे अस्तित्व नाकारायचे हे मला मान्य नाही. कारण या वाईट, भीतीदायक घडामोडी, घटना कायम नसतात. त्या तात्पुरत्या असतात. सर्वोच्च परमेश्वरी शक्तीकडून पुन्हा संतुलन साधले जाते अशी माझी वैयक्तिक आध्यात्मिक श्रद्धा आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.११.२०२३