https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

आरक्षण!

सामाजिक समानतेचा मूलभूत हक्क!

भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन योग्य होय. गुरूवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२३ च्या लोकसत्तेत ही बातमी वाचली व हिंदू समाजात स्वागतार्ह बदल होत आहेत याची ही झलक बघायला मिळाली. भारतीयत्व म्हणजे सनातन हिंदुत्व (आदिम भारतीय जीवनशैली) याचा स्वीकार होण्यासाठी व त्यातून भेदभाव नसलेला अखंड भारत निर्माण होण्यासाठी "जातीपाती तोडो, भारत समाज जोडो" अशी प्रतिज्ञा सर्व भारतीयांनी केली पाहिजे असे मला वाटते.

भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे. असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.

ते म्हणाले "आरक्षण हा विषय आर्थिक समानता आणण्यापुरता मर्यादित नाही. सामाजिक समानता आणणे आवश्यक आहे. सामाजिक समानता आल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे आरक्षण कधी पर्यंत राहील असा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांनी हा विचार करावा की, काही लोकांनी दोन हजार वर्षे अन्याय, त्रास सहन केला, मग आम्ही दोनशे वर्षे कष्ट भोगले तर काय बिघडणार आहे"?

याचा अर्थ आणखी दोनशे वर्षे तरी भारतीय समाजमनाच्या मानगुटीवर बसलेले जातीपातीचे भूत खाली उतरणार नाही. दोन हजार वर्षाचे हे जुने भूत पुढील दोनशे वर्षात खाली उतरेल का व संपूर्ण सामाजिक क्रांती होऊन भारतात सामाजिक समानता प्रस्थापित होईल का हा प्रश्नच आहे. म्हणजे भारतातून जातीपातीचा पूर्ण अंत होत नाही तोपर्यंत भारतात संविधानाने मागास जातीवर्गांना दिलेले आरक्षण चालूच राहणार. सामाजिक समानतेचा मूलभूत हक्क आरक्षणात समाविष्ट आहे हा अर्थ यातून निघतो.

डॉ. मोहन भागवत म्हणतात की महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. एकलव्य व कर्ण ही तर या जातीपातीची ठळक उदाहरणे. विशेष म्हणजे आपण ज्या श्रीकृष्णाला परमेश्वराचा अवतार मानतो त्या श्रीकृष्णालाही त्याच्या दैवी शक्तीने समाजातील ही जातीची कीड नष्ट करता आली नाही. याचा अर्थ जातीपातीवर आधारित सामाजिक असमानता हा भारतीय समाजाला लागलेला फार जुनाट रोग आहे. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध चुलत भावंडांमध्ये राज्य वाटणीच्या अर्थात आर्थिक व राजकीय मुद्यांवर लढले गेले आणि याच युद्धाच्या युद्धभूमीवर अवतारी श्रीकृष्णाने मानवी जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सांगणारी गीता अर्जुनाला सांगितली आहे.

वरील अभ्यासातून मला एवढेच कळते की, देवावर श्रद्धा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जातीपाती देवाने निर्माण केल्या नाहीत तर त्या माणसांनीच निर्माण केल्या व म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीपातीचे भूत डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या अत्यंत संकुचित मनाच्या माणसांबरोबर तीव्र संघर्ष करावा लागला. खरं तर देव अन्याय करीत नाही तर संकुचित मनाची माणसेच माणसांवर अन्याय करतात व देवाच्या नावाने काहीही खपवण्याचा प्रयत्न करतात.

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२३

उथळ मनाचा थयथयाट फार!

जसा उथळ पाण्याला खळखळाट फार तसा उथळ मनाचा थयथयाट फार!

मानवी मनाला बाजारी आकर्षणाने बाजारी  बनविणारे तीन प्रमुख बाजार मला या जगात दिसतात. पहिला बाजार वस्तूंचा ज्यात अनेक वस्तू व सेवा मानवी मनाला आकर्षित करीत असतात. दुसरा बाजार सत्तेचा ज्यात अनेक राजकीय पक्ष लोकांना न झेपणारी आश्वासने देत त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा व त्यातून सत्ता मिळविण्याचा व ती टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. तिसरा बाजार देवाचा ज्यात अनेक धर्म व पंथ देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक कर्मकांडे सांगत निसर्गातील देवाला तुकड्या तुकड्यांत वाटून लोकांचे धार्मिक विभाजन करीत असतात. या धार्मिक तुकड्यांनी जगात अनेक धार्मिक प्रार्थनास्थळे, तिर्थस्थळे निर्माण केली आहेत.

या बाजारांत फिरून का कुठे मानवी मनाला शांती लाभत असते? लोकांना काम हवे म्हणे! अहो काम कसले तर या तीन बाजारांत व्यस्त राहण्याचे काम! कर्म करीत रहायचे म्हणजे काय तर या तीन बाजारांत सतत फेरफटका मारून बाजारी जीवन जगत रहायचे. यासाठीच का मानवी जीवनाचा ध्यास किंवा अट्टाहास? या बाजारांत मनाला जेवढे जास्त गुंतवत जावे तेवढे मनाला अधिकाधिक अशांत करीत जावे.

नश्वर असलेल्या एवढ्याशा मानवी शरीराच्या गरजा किती? पण मानवी मनाला मात्र वरील तीन बाजारांत फिरून फिरून सारखे हिंडावे वाटते. हा कसला मानवी मनाचा वेडपटपणा?
जगाला उष्णता व प्रकाश देणाऱ्या सूर्याचा लांबून आनंद घ्यायचा सोडून त्या सूर्यालाच गिळायला जाणे म्हणजे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची भयंकर इच्छा मनात बाळगणे हा मानवी मनाचा महामूर्खपणा नव्हे काय?

विश्वाची निर्मिती एका सूक्ष्म पदार्थाच्या मोठ्या  स्फोटातून झाली असे काही शास्त्रज्ञ त्यांच्या बिग बँग थिअरीनुसार म्हणतात. म्हणजे प्रचंड पसरलेले विश्व हे सूक्ष्मातून निर्माण झाले हे मानायला या शास्त्रज्ञांनी थोडी जागा ठेवलीय. आता ही जागा जर ठेवलीय तर या जागेचा उपयोग करून घेत मनाला सूक्ष्मात ठेवायचे म्हणजे मर्यादेत ठेवायचे की जगाच्या बाजारी पसाऱ्यात भरकटत ठेवायचे या प्रश्नाचे उत्तर उथळ मनाला काय मिळणार? कारण जसा उथळ पाण्याला खळखळाट फार तसा उथळ मनाचा थयथयाट फार!

-ॲड.बी.एस.मोरे©४.१२.२०२१

मानवी व्यवहार कायदा!

निसर्ग विज्ञान, तंत्रज्ञान व मानवी व्यवहार कायदा!

माया, प्रेम, करूणा (दया, सहानुभूती), लज्जा, परोपकार, कृतज्ञता, विश्वास (देवाचे म्हणजेच निसर्गातील सर्वोच्च शक्तीचे अस्तित्व मान्य करून त्या शक्तीवर भावनिक श्रद्धेने विश्वास ठेवणे हाही विश्वासाचा भाग) या सकारात्मक उदात्त भावना मानवी आयुष्यातून वजा केल्या तर बाकी शिल्लक राहतो तो फक्त पदार्थांचा कोरडा तांत्रिक व्यवहार! निर्जीव पदार्थांचे भौतिक-रासायनिक गुणधर्म व त्यांचा कोरडा तांत्रिक व्यवहार इथपर्यंत कोरडेपणा ठीक आहे पण पुढे अर्धसजीव वनस्पती, सजीव पक्षी व प्राणी आणि शेवटी माणूस यांच्याकडे फक्त याच तांत्रिक कोरडेपणाने बघून त्यांच्याशी याच तांत्रिक कोरडेपणाने व्यवहार करायचा का? 

वनस्पती व मानवेतर पक्षी व प्राणी यांना वर उल्लेखित उदात्त भावना नसतात व काहींना  असल्या तरी खूप कमी प्रमाणात असतात. त्यांचे जीवन हे जैविक वासनाप्रधान असते. म्हणून त्यांच्याशी तसा कोरडा तांत्रिक व्यवहार करणे हेही मान्य होण्यासारखे आहे. पण एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याबरोबरचा व्यवहार हा फक्त तांत्रिक कोरडा असू शकत नाही. कारण वर उल्लेखित सकारात्मक उदात्त भावना या सर्व माणसांत असतात. परिस्थितीनुसार त्यांचे प्रमाण थोडे कमीजास्त होऊ शकते. पण या भावनांशिवाय माणूस असूच शकत नाही. या उदात्त भावना नसलेला माणूस हा पशू होय. 

म्हणून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानाचे वर्गीकरण दोन प्रकारात करावे लागेल. एक मानवेतर कोरडा तांत्रिक प्रकार व दोन मानव संबंधी निम कोरडा (तांत्रिक) व निम ओला (भावनिक) प्रकार. निसर्ग विज्ञानाची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी (प्रॕक्टिस) करताना विज्ञानाचे हे दोन मूलभूत प्रकार लक्षात घेऊनच वैज्ञानिक व्यवहार करावा लागतो. हे व्यवहारज्ञान प्रत्येक मनुष्याला असायलाच हवे! 

या व्यवहारज्ञानाचे अर्थात तंत्रज्ञानाचे मानवेतर कोरडे तंत्रज्ञान व मानव संबंधी निम कोरडे (तांत्रिक) व निम ओले (भावनिक) संमिश्र तंत्रज्ञान अशा दोन वर्गात वर्गीकरण करता येईल. मानवी व्यवहाराचे नियंत्रण करण्यासाठी जो कायदा निर्माण करण्यात आला आहे त्याचा वैज्ञानिक आधार हे व्यावहारिक (प्रॕक्टिकल) वर्गीकरण आहे. मानवी व्यवहार कायदा फक्त आंतरमानवी सामाजिक व्यवहाराचेच नियंत्रण करीत नाही. तो मानवेतर कोरड्या तांत्रिक व आंतरमानवी निम कोरड्या तांत्रिक व्यवहाराचे सुद्धा नियंत्रण करतो. कारण कोरड्या तांत्रिक व्यवहारज्ञानाचा वापर मानवेतर पक्षी, प्राणी जसे करतात तसा माणसेही करतात व जिथे माणसे तिथे मानवी व्यवहार कायद्याचे नियंत्रण  हे आलेच! 

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१२.२०२१

दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

माणूस देव नाही पण तो देवाच्या फार जवळ आहे कारण माणूस ही देवाची विशेष निर्मिती आहे. त्यामुळे जास्तीतजास्त देवगुणात राहणे यातच मनुष्य जीवनाचे हित आहे. त्यासाठी देवाची अनेक धार्मिक कर्मकांडे करण्याची काही गरज नाही. "हे परमेश्वरा, सुख शांती" या प्रार्थनेत सगळे आले.

माणूस ही विशेष निर्मिती दोन वैशिष्ट्यांनी पूर्ण आहे. एक सर्वसाधारण विशेषतः व दोन असामान्य विशेषतः! प्रत्येक मनुष्याला देवाने काहीना काही तरी विशेष गुण दिलेला असतो. तो असामान्य विशेष गुण वेळीच ओळखून त्यात प्रावीण्य मिळवून त्या असामान्य विशेष गुणाच्या जोरावर मर्यादित क्षेत्रातला राजा म्हणून जगायचे असते. परिस्थिती कशी का असेना या विशेष गुणाच्या जोरावर राजा म्हणून जगता आले पाहिजे. लोक या विशेष गुणाच्या  मर्यादित प्रमाणात का होईना पण मागे लागले व योग्य मोबदला देऊन अवलंबून राहू लागले की तुम्ही जिंकलात व ठराविक क्षेत्रातले राजे झालात. दुसऱ्याची श्रीमंती बघून स्वतःची श्रीमंती कमी लेखू नका. तसे केल्यास उगाच दुःखी व्हाल! न्यूनगंडी वृत्ती सोडा! दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१२.२०२१

नाती!

बोला की बाळूमामा!

काही नाती जन्माने चिकटली, काही लग्नाने बनली, काही अशीच योगायोगाने जमली, काही जुळली, काही परिस्थिती, प्रसंगाने डळमळीत होऊन तुटली. हवामान बदलते तशी माणसे बदलतात व मग नातीही बदलतात.

व्यावहारिक नाती ही व्यवहारापुरती मर्यादित राहतात. व्यवहार संपला की नाते संपले. जर व्यवहार दीर्घकाळ टिकले तर व्यावहारिक नाती सुद्धा दीर्घकाळ टिकतात. व्यवहार नाही पण भावनिक जवळीक आहे अशी नाती भावनिक आधारावर टिकतात. भावनिक जवळीकेला वैचारिक जवळीकेची जोड मिळाली म्हणजे विचार जुळले की नाती अधिक घट्ट होतात.

व्यवहार कशाला म्हणतात तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या देवाणघेवाणीला व्यवहार म्हणतात. व्यवहारात स्वार्थ असतो. स्वार्थाचे समाधान दोन्ही बाजूने झाले पाहिजे. पण स्वार्थाला महास्वार्थ चिकटला की मग तो व्यवहार राहत नाही. मीच एकटा सगळं खाईन तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल असा विचार जेंव्हा बुद्धी करते तेंव्हा ती महास्वार्थी झालेली असते. 

नाती जर नुसती व्यावहारिक असतील तर ती व्यवहारापुरती कोरडी असतात. अशा नात्यात भावनेचा ओलावा नसतो. बुद्धीची खरी कसोटी तेंव्हाच लागते जेंव्हा नात्यात भावनाही असते व स्वार्थी व्यवहारही असतो. पण काही नाती ही भावनिक जवळीक व वैचारिक सुसंवादावर आधारित असतात. अशा नात्यांत स्वार्थ नसतो व स्वार्थ नसल्याने व्यवहारही नसतो.

माझीही अशी काही भावनिक नाती आहेत की जिथे व्यवहार नसल्याने व विचार सरळस्पष्ट असल्याने वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भामाताई ही तर माझी मावस मावस बहीण होती. पण तिच्याबरोबरचे माझे नाते हे मनमोकळे होते. कारण त्या नात्यात फक्त भावनिक जवळीक होती. व्यवहार बिलकुल नव्हता. हल्लीच ती बहीण हे जग सोडून गेली. त्यामुळे ते निर्मळ माया प्रेमाचे भावनिक नाते नैसर्गिक रीत्या संपले. पण तिचा मुलगा शिवा हा तिच्या स्वभावासारखाच आहे व त्यामुळे त्याच्याशी बोलताना भामाताईचा तो फिल येतो. परवा त्याला असाच फोन केला तर तिकडून त्याचा नेहमीचाच गोड आवाज आला "बोला की बाळूमामा"! आवाजात तोच गोडवा व तीच निर्मळ भावना जी भामाताईत होती. कसले व्यावहारिक देणे नाही की घेणे नाही. नुसती भावनिक जवळीक. अशी नाती दुर्मिळ असतात. 

-बाळू, २५.१२.२०२१

बोनस लाईफ!

मृत्यूला कवटाळताना!

मी बघता बघता वयाची पासष्टी गाठली. म्हणजे भरपूर आयुष्य जगलो. जीवनाचे सगळे कटू, गोड अनुभव घेतले. विविध विषयांचा अभ्यास करून भरपूर ज्ञानसाधना केली. मनाला ज्ञानाने प्रगल्भता व वयाने परिपक्वता आली. एकुलती एक मुलगी तिच्या कमी वयातच करियर मध्ये यशस्वी झाली व तसेच तिला योग्य असलेल्या जोडीदाराशी विवाह करून सुखाने संसार करू लागली. आता मला कसलीही चिंता की आशा राहिली नाही. जीवनात पूर्ण तृप्त आहे मी! म्हणून तर मला कधीही मृत्यू आला तरी त्याला मिठीत घ्यायला मी तयार आहे. माझे यापुढील आयुष्य हे माझे बोनस आयुष्य असणार आहे. बघूया तो निसर्ग किंवा निसर्गातील ती अलौकिक शक्ती मला किती बोनस देतेय ते!

सद्या मी माझ्या जीवनात मी काय कमावले व काय गमावले याचा हिसाब किताब चालू ठेवला आहे. हेच काय तर मी मेल्यावर माझ्या मृत देहाचे माझी नातेवाईक मंडळी काय करणार याचे चित्र डोळ्यासमोर आणून मी माझ्याच मयताची गंमत बघत असतो. हे चित्र समोर उभे करण्यासाठी मला खालील दोन कव्वालींची फार मदत होते.

(१) चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा!

मौत सबको आनी है कौन इससे छूटा है
तू फ़ना नही होगा ये खयाल झूठा है
साँस टूटते ही सब रिश्ते टूट जायेंगे
बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जायेंगे
तेरे जितने हैं भाई वक़तका चलन देंगे
छीनकर तेरी दौलत दोही गज़ कफ़न देंगे
जिनको अपना कहता है सब ये तेरे साथी हैं
कब्र है तेरी मंज़िल और ये बराती हैं
ला के कब्र में तुझको मुरदा बक डालेंगे
अपने हाथोंसे तेरे मुँह पे खाक डालेंगे
तेरी सारी उल्फ़त को खाक में मिला देंगे
तेरे चाहनेवाले कल तुझे भुला देंगे
इस लिये ये कहता हूँ खूब सोचले दिल में
क्यूँ फंसाये बैठा है जान अपनी मुश्किल में
कर गुनाहों पे तौबा आके बस सम्भल जायें
दम का क्या भरोसा है जाने कब निकल जाये
मुट्ठी बाँधके आनेवाले मुट्ठी बाँधके आनेवाले हाथ पसारे जायेगा
धन दौलत जागीर से तूने क्या पाया क्या पायेगा
चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा.

गायकः अजीज नाझा

(२) उड जायेगा एक दिन पंछी!

ये मंजिल आख़िरी है,
कब्र ही तेरा ठिकाना है,
ये रिश्ते तोड़ने हैं,
और ये दुनियाँ छोड़ जाना है,
जिंदगी उसकी अमानत है,
सभी को एक ना दिन,
मौत का कर्जा चुकाना है।
तू लाख इफाजत कर ले,
तू लाख़ करे रखवाली,
उड़ जायेगा एक दिन पंछी,
रहेगा पिंजरा खाली।

ना कोई अंजुमन होगी,
ना जिक्र-ए-अंजुमन होगा,
जो दौलत आज है तेरी,
वो कल गैरों का धन होगा,
दोशाले काम आएंगे,
ना रंगी पहरन होगा,
लीबाजे आखिरी तो बस,
वही दो गज कफ़न होगा,
जब उड़ जाएगा पंछी,
रूह का, बेजान तन होगा,
दबा देंगे तुझे सब ख़ाक में,
मैला बदन होगा,
तू लाख इफाजत कर ले,
तू लाख़ करे रखवाली,
उड़ जायेगा एक दिन पंछी,
रहेगा पिंजरा खाली।

आ गई जिसकी उसे,
जाना पड़ेगा,
कोई जाता यहाँ से,
कोई आता यहाँ,
एक दिखावा एक तमाशा,
एक मेला है यहाँ,
जिसको ताका है मौत ने,
फिर वो बचता है कहाँ,
कोई आगे कोई पीछे,
सबको जाना है वहां,
तू लाख इफाजत कर ले,
तू लाख करे रखवाली,
उड़ जायेगा एक दिन पंछी,
रहेगा पिंजरा खाली

ना काम आयेंगे,
रोजे हश्र ये लबरेज़ पैमाने,
धरा रह जाएगा सब ठाट,
तेरा देख दीवाने,
बिछड़ जाएंगे तेरे दोस्त,
और रहबाज सारे,
सुबह होते ही जैसे,
कुच कर जाते हैं बंजारे,
यहाँ हरेक को एक दिन,
फ़ना का जाम पीना है,
तू लाख इफाजत कर ले,
तू लाख करे रखवाली,
उड़ जायेगा एक दिन पंछी,
रहेगा पिंजरा खाली

गायकः प्रल्हाद शिंदे

मी काही लोकांच्या अंत्ययात्रांना हजेरी लावली आहे. माझे आईवडील व धाकटा भाऊ यांची अंत्ययात्रा तर आमच्या कुटुंबाच्या घरातूनच निघाली होती. मेलेल्या माणसाच्या मृत देहाला कवटाळून दुःखाने धाय मोकलून कोण रडतात तर ज्यांनी जन्म दिला ते मेलेल्याचे आईवडील, ज्यांना मेलेल्याने जन्म दिला ती त्याची अपत्ये व ज्याच्याबरोबर किंवा जिच्याबरोबर खूप मोठा काळ आयुष्य काढले व पुढेही काढायचे होते ती मेलेल्या पतीची विधवा पत्नी किंवा मेलेल्या  पत्नीचा विधुर पती. मग बाकीचे नातेवाईक व मित्रमंडळी मृत देहाजवळ काय करतात?

मेलेल्या माणसावर हृदयातून प्रेम करणारी माणसे हृदयातून दुःखी होऊन हृदयातून रडत असतात व डोळ्यांतील अश्रू दाबून निःशब्द उभी असतात. त्यांच्या देहबोलीवरून हे खरंच जाणवते. पण हे काही दुर्मिळ अपवाद सोडले तर एकंदरीत सर्व नातेवाईक व मित्रमंडळी कोरडे पाषाण असतात.

पण त्यांचीही एक वेगळीच लगबग सुरू असते. मयताचे सामान आणायचे (तिथेही पैसे कोणी भरायचे हा प्रश्न निर्माण होतो, कारण मृत देहाजवळ रडणारी मृत व्यक्तीला अत्यंत जवळची असलेली माया, प्रेमाची माणसे दुःखात असतात). मग लांबची नातेवाईक मंडळी काय करतात तर आपसात वर्गणी काढून मयताचे सामान आणतात व मग मयत कधी हलवायचे हे जवळच्या मंडळींना हळूच विचारतात. कारण त्यानुसार त्यांना पुढचे प्लानिंग करता येत नाही.

प्लानिंग कसले असते हो! तो मेला किंवा ती मेली तर मयताची तिरडी बांधणे, पांढऱ्या कापडाने मयताचा मृतदेह बांधून तो तिरडीवर झोपवणे, त्यावर हारफुले घालणे, मयताचे तोंड वाकडे बसले तर ते सरळ करणे. कोरडेपणाने या क्रिया पार पाडल्या जात असताना चार खांदेकरी शोधणे (हल्ली मयताची तिरडी सरळ अॕम्ब्युलन्स मध्ये घालून त्याला स्मशानभूमीत नेतात), तिरडीला खांद्यावर घेऊन खांदेपालट करीत स्मशानभूमीत आणून तिथे रचलेल्या चितेवर झोपवणे, मयताच्या मुलाने किंवा मुलीने (मेलेल्याला एकुलती एक मुलगी असेल तर तिने) चितेवर झोपवलेल्या मयताला अग्नी देणे इत्यादी.

तर हे असे होते आपण मेल्यावर आपल्या मयताचे. या गोष्टी समोर ठेऊन वरील कव्वाल्या गुणगुणत मी माझे बोनस आयुष्य जगत आहे.

-बाळू,२७.१२.२०२१











गोव्याचे पवार भाऊजी!

गोव्याचे पवार भाऊजी!

पवार भाऊजीच्या (बी.एन.पवार) व माझ्या वयात जवळजवळ बारा वर्षांचे अंतर, म्हणजे मी ६५ वयाचा तर भाऊजी ७७ वयाचे. पण आमच्या संबंधात वयातील या अंतरामुळे कधी अंतर पडलेच नाही. आम्ही सतत मित्र म्हणूनच राहिलो. ताईला (हिराबाई भैरवनाथ पवार) बघायला भाऊजी एक मित्र व धर्मा भाऊजींना घेऊन वरळी बी.डी.डी. चाळीतील घरात आले होते तेंव्हा आईने गोडेतेल घालून शिरा केला होता. त्यावेळी घरात डालडा म्हणजे वनस्पती तूप नव्हते, मग गाई, म्हशीच्या दुधाचे अस्सल तूप कुठून असणार घरात? भाऊजी गेल्यावर आई सारखी मला म्हणत होती "बाळू, शिरा नीट झाला होता ना"!

ताई बरोबर भाऊजींचा विवाह झाला. त्यांना चार मुले झाली, म्हणजे दोन मुली व दोन मुले. या सर्वांचा भार पवार भाऊजीने एकट्याने खूप कष्टाने झेलला. खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये मॕनेजर म्हणून काम करीत असताना पवार भाऊजींचा मोठा रूबाब होता. मॕनेजर म्हणून इकॉनोमिक ट्रान्सपोर्ट अॉर्गनायझेशन मध्ये त्यांना गोव्यात नोकरी मिळाली व त्यांनी त्यांचा सगळा संसार उचलून गोव्याला नेला. शाळा व कॉलेज यांना उन्हाळ्यात सुट्टी लागली की मी गोव्याची कदंब बस पकडून गोवा गाठायचो. त्या सुट्टीत दोन महिने माझा गोव्याला मुक्काम असायचा. काय धमाल मजा यायची गोव्याला! भाऊजींची ती बुलेट मोटार सायकल गोव्यात सुसाट सुटायची. मडगावला ट्रान्सपोर्टचे मुख्य अॉफीस होते. पण संपूर्ण गोव्याचे रिजिअनल मॕनेजर असल्याने गोव्यातील पणजी, म्हापसा वगैरे ठिकाणच्या शाखांना त्यांना भेटी द्याव्या लागत असत. मी त्यांच्या बुलेटवर मागच्या सीटवर बसायचो आणि मग ते बुलेटला किक मारून त्या शाखांना भेटी देत. त्यांच्याबरोबर मी रूबाबात त्या शाखांत जायचो. शाखांना भेट देताना भाऊजी सगळ्या शाखा प्रमुखांच्या कामाची झाडाझडती व त्यांचा आर्थिक हिशोब घ्यायचे. काय रूबाब होता भाऊजींचा! मला भाऊजी बरोबर गोव्यातील शाखांना भेटी देताना स्वतः मॕनेजर झाल्याचा भास व्हायचा. ती गोव्याची मजा खूप वेगळी होती.

नंतर ई.टी.ओ. ची ती नोकरी गेल्यावर भाऊजी खचले नाहीत. त्यांनी गोव्यातच राजेश रोडवेज या दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीत जनरल मॕनेजर म्हणून नोकरी मिळवली. तिथेही मॕनेजर म्हणून त्यांचा रूबाब होताच. गोव्यात मडगावला नावेली चर्चसमोरच सी.जे. फर्नांडीस बिल्डिंग मध्ये तळमजल्यावरच त्यांचा मस्त फ्लॅट होता. समोरच्या शेतात भात लावलेला असायचा. त्या इमारतीत तळालाच त्या दारूचे दूकान होते. तिथे लोक दारू पीत तेंव्हा गोवा फेनी दारूचा मस्त सुगंध दळवळायचा. मी कधी चालत तर कधी भाड्याच्या मोटर सायकल वरून मडगाव मार्केट मध्ये जायचो. त्या मार्केटमधून मी घरी खेकडे आणल्याचे आठवते. त्या मार्केटमध्ये एक डबडा टॉकीज होती. तिथे मी पिक्चर बघायचो. कधी कधी मी नावेली चर्च जवळून भाऊजीच्या अॉफीसकडे जाणाऱ्या पायवाटेने (लाल मातीचा काय मस्त सुगंध दळवळायचा त्या पायवाटेवर) विशांत टॉकीज गाठायचो व तिथेही पिक्चर बघायचो. हेमा, कांचन, रमेश या मुलांना घेऊन मी घराजवळ एक शाळा होती त्या शाळेच्या मैदानात घेऊन बसायचो. गणेश बहुतेक खूप लहान बाळ होते त्यावेळी. घरातून मडगाव मार्केटमध्ये मी चालत जायचो तेंव्हा  पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला साप दिसायचे.

काही वर्षांनी भाऊजींनी गोवा ट्रान्सपोर्ट नोकरी सोडून पुणे गाठाले. संसार गोव्याहून पुण्याला आणला. कासारवाडी येथे लांडगे चाळीत ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले. पण पुण्यातही उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भाऊजींच्या घरी येतच राहिलो. कासारवाडी येथे मी ताईला शेजारीच असलेल्या नासिक फाट्याजवळील बँकेत एक बचत खाते काढून दिले होते. मुंबई पुणे हायवे हा रहदारीचा मोठा रस्ता. पण तो ओलांडून रेल्वे रूळापलिकडील नदी किनारी जाऊन मी एकटाच टाईम पास करीत बसायचो. भाऊजी कासारवाडीला नासिक फाट्याजवळच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॕनेजर म्हणून नोकरी करीत होते. ते संध्याकाळी कामावरून कधी घरी येतात याची मी वाट बघत असायचो. पिंपरीला अशोक टॉकीज आहे. तिथे पिक्चरला घेऊन चला म्हणून मी त्यांच्याकडे आग्रह करायचो. हॉटेलात खाणे असो की पिक्चर असो, पवार भाऊजींनी तसे माझे बरेच लाड केले.

भाऊजी व ताई कासारवाडीला लांडगे चाळीत रहायचे. तिथे त्या चाळ मालकाची डॉक्टरीन (डॉक्टरची बायको डॉक्टरीन) सून घरी येऊन छान गप्पा मारायची. त्या रस्त्यावरून हातात चिनपाट घेऊन चालत तिथले सार्वजनिक संडास गाठताना आजूबाजूला दुकाने वगैरे न्याहाळत जाताना मजा यायची. एकदा मी मुंबई-पुणे रस्ता ओलांडून नदीजवळ एका शेतात संडास करायला बसलो. त्यावेळी ताई तिकडे नदीवर धुणे धूत होती. मी शेतात संडास करतोय हे बघून शेतमालक दगड घेऊन मला मारायला आला तेंव्हा ताई नदीवरून त्या शेतमालकावर जोरात ओरडली तेंव्हा मग त्याने दगड मागे घेतला.

काही वर्षानंतर ताई व मुलांना पुण्यालाच ठेऊन भाऊजींना मुंबईत राहून ट्रान्सपोर्टची नोकरी करावी लागली. मग ते वरळीला बी.डी.डी. चाळीतील आमच्या घरी राहू लागले. वरळीच्या त्या वास्तव्यात पवार भाऊजींचा बिछाना किती स्वच्छ व व्यवस्थित असायचा. पावसाळ्यात व थंडीत घराबाहेरील वटणात ( व्हरांड्यात) एका बाजूला मी व दुसऱ्या बाजूला नानासाहेबाच्या दारात भाऊजी अशी आमची झोपण्याची सोय होती. उन्हाळ्यात चाळीच्या गच्चीवर आमचे बिछाने शेजारी असायचे व आमच्या शेजारी सयाजी मामा यांचा बिछाना असायचा. वर काळ्या आकाशात चंद्र, चांदण्या न्याहाळत गप्पा मारत असताना त्या गच्चीवर कधी झोप यायची ते कळायचेच नाही.

भाऊजींच्या व माझ्या गप्पांत त्यांच्या कामाच्या गोष्टींबरोबर त्यांच्या मुलांची शिक्षणे, विवाह यांची वडील म्हणून त्यांना असलेली काळजी असायची. संसारासाठी कोणाच्याही भक्कम  पाठबळाशिवाय भाऊजींनी घेतलेली प्रचंड मेहनत मी विसरू शकत नाही. मेहुण्याच्या नात्याने नव्हे तर जिवलग मित्राच्या नात्याने ते कितीतरी गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. तेवढा विश्वास होता, तेवढी आपुलकी होती आमच्या  नात्यात!

पंढरपूरला गजानन महाराज मठात काही वर्षापूर्वी भाऊजी व मी राहिलो तेंव्हा मटण खाण्यासाठी स्टेशन रोडवरून खूप लांब चालत गेलो होतो. भाऊजी बरोबर फिरताना मस्त मोकळेपणानं फिरता येते. त्यांनी मला सोनारी गावात जवळजवळ तीन वेळा नेले आहे. तिथे भैरवनाथाच्या जत्रेत घरांच्या वर बसून देवाचा रथ गुलाल, खोबऱ्याच्या वर्षावात पुढे सरकत असताना व त्यातच माकडे इकडेतिकडे उड्या मारताना खूप मजा आली होती. भाऊजी एकदा माझ्या डोंबिवलीच्या नवीन घरी राहून गेले. मागे एकदा चाळीतल्या घरीही राहून गेले. पिनूचे रिशेप्शन डोंबिवलीला झाले तेंव्हा ते रमेश, गणेश, ताई सगळ्या फॕमिलीसह कारने पुण्याहून डोंबिवलीला आले होते.

भाऊजींची उर्जा (एनर्जी) दांडगी! सत्तरी पार केल्यावरही पुण्यात स्कूटर चालवत ट्रान्सपोर्ट कंपनीत जाऊन नोकरी करणे ही साधी गोष्ट नाही. हल्ली करोना काळात ते आजारी पडून अशक्त झाले. पण मनोबल चांगले असल्याने बरे झाले. आता दोन मुले, सुना, नातवंडे यांच्या बरोबर मजेत राहत आहेत.

मी सद्या मुंबईत एका मोठ्या बिल्डरचा कायदा सल्लागार आहे. तिथे दररोज संध्याकाळी ४ ते ७ असे तीन तास काम केले की दर तासाला ५०० रूपये या दराने मला तो बिल्डर दररोज १५०० रूपये एवढी फी देतो. जर तिकडे गेलो नाही तर दिवसाचे १५०० रू. बुडतात. तिथे भरपगारी रजा वगैरे नसते. म्हणून बाहेरगावी कुठे फिरायला वगैरे गेले की रोजचे १५०० रू. नुकसान होणार. म्हणून भाऊजींबरोबर कुठे फिरायला जावे सवड काढून तर बिल्डचे ते रोजचे १५०० रूपये बुडणार. म्हणून योग्य वेळ येईल तेंव्हा भाऊजींबरोबर फिरायला जाणार. भाऊजींना भरपूर आयुष्य व चांगले आरोग्य लाभो!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.१२.२०२१