https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

मानवी व्यवहार कायदा!

निसर्ग विज्ञान, तंत्रज्ञान व मानवी व्यवहार कायदा!

माया, प्रेम, करूणा (दया, सहानुभूती), लज्जा, परोपकार, कृतज्ञता, विश्वास (देवाचे म्हणजेच निसर्गातील सर्वोच्च शक्तीचे अस्तित्व मान्य करून त्या शक्तीवर भावनिक श्रद्धेने विश्वास ठेवणे हाही विश्वासाचा भाग) या सकारात्मक उदात्त भावना मानवी आयुष्यातून वजा केल्या तर बाकी शिल्लक राहतो तो फक्त पदार्थांचा कोरडा तांत्रिक व्यवहार! निर्जीव पदार्थांचे भौतिक-रासायनिक गुणधर्म व त्यांचा कोरडा तांत्रिक व्यवहार इथपर्यंत कोरडेपणा ठीक आहे पण पुढे अर्धसजीव वनस्पती, सजीव पक्षी व प्राणी आणि शेवटी माणूस यांच्याकडे फक्त याच तांत्रिक कोरडेपणाने बघून त्यांच्याशी याच तांत्रिक कोरडेपणाने व्यवहार करायचा का? 

वनस्पती व मानवेतर पक्षी व प्राणी यांना वर उल्लेखित उदात्त भावना नसतात व काहींना  असल्या तरी खूप कमी प्रमाणात असतात. त्यांचे जीवन हे जैविक वासनाप्रधान असते. म्हणून त्यांच्याशी तसा कोरडा तांत्रिक व्यवहार करणे हेही मान्य होण्यासारखे आहे. पण एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याबरोबरचा व्यवहार हा फक्त तांत्रिक कोरडा असू शकत नाही. कारण वर उल्लेखित सकारात्मक उदात्त भावना या सर्व माणसांत असतात. परिस्थितीनुसार त्यांचे प्रमाण थोडे कमीजास्त होऊ शकते. पण या भावनांशिवाय माणूस असूच शकत नाही. या उदात्त भावना नसलेला माणूस हा पशू होय. 

म्हणून निसर्गाच्या मूलभूत विज्ञानाचे वर्गीकरण दोन प्रकारात करावे लागेल. एक मानवेतर कोरडा तांत्रिक प्रकार व दोन मानव संबंधी निम कोरडा (तांत्रिक) व निम ओला (भावनिक) प्रकार. निसर्ग विज्ञानाची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी (प्रॕक्टिस) करताना विज्ञानाचे हे दोन मूलभूत प्रकार लक्षात घेऊनच वैज्ञानिक व्यवहार करावा लागतो. हे व्यवहारज्ञान प्रत्येक मनुष्याला असायलाच हवे! 

या व्यवहारज्ञानाचे अर्थात तंत्रज्ञानाचे मानवेतर कोरडे तंत्रज्ञान व मानव संबंधी निम कोरडे (तांत्रिक) व निम ओले (भावनिक) संमिश्र तंत्रज्ञान अशा दोन वर्गात वर्गीकरण करता येईल. मानवी व्यवहाराचे नियंत्रण करण्यासाठी जो कायदा निर्माण करण्यात आला आहे त्याचा वैज्ञानिक आधार हे व्यावहारिक (प्रॕक्टिकल) वर्गीकरण आहे. मानवी व्यवहार कायदा फक्त आंतरमानवी सामाजिक व्यवहाराचेच नियंत्रण करीत नाही. तो मानवेतर कोरड्या तांत्रिक व आंतरमानवी निम कोरड्या तांत्रिक व्यवहाराचे सुद्धा नियंत्रण करतो. कारण कोरड्या तांत्रिक व्यवहारज्ञानाचा वापर मानवेतर पक्षी, प्राणी जसे करतात तसा माणसेही करतात व जिथे माणसे तिथे मानवी व्यवहार कायद्याचे नियंत्रण  हे आलेच! 

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा