गोव्याचे पवार भाऊजी!
पवार भाऊजीच्या (बी.एन.पवार) व माझ्या वयात जवळजवळ बारा वर्षांचे अंतर, म्हणजे मी ६५ वयाचा तर भाऊजी ७७ वयाचे. पण आमच्या संबंधात वयातील या अंतरामुळे कधी अंतर पडलेच नाही. आम्ही सतत मित्र म्हणूनच राहिलो. ताईला (हिराबाई भैरवनाथ पवार) बघायला भाऊजी एक मित्र व धर्मा भाऊजींना घेऊन वरळी बी.डी.डी. चाळीतील घरात आले होते तेंव्हा आईने गोडेतेल घालून शिरा केला होता. त्यावेळी घरात डालडा म्हणजे वनस्पती तूप नव्हते, मग गाई, म्हशीच्या दुधाचे अस्सल तूप कुठून असणार घरात? भाऊजी गेल्यावर आई सारखी मला म्हणत होती "बाळू, शिरा नीट झाला होता ना"!
ताई बरोबर भाऊजींचा विवाह झाला. त्यांना चार मुले झाली, म्हणजे दोन मुली व दोन मुले. या सर्वांचा भार पवार भाऊजीने एकट्याने खूप कष्टाने झेलला. खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये मॕनेजर म्हणून काम करीत असताना पवार भाऊजींचा मोठा रूबाब होता. मॕनेजर म्हणून इकॉनोमिक ट्रान्सपोर्ट अॉर्गनायझेशन मध्ये त्यांना गोव्यात नोकरी मिळाली व त्यांनी त्यांचा सगळा संसार उचलून गोव्याला नेला. शाळा व कॉलेज यांना उन्हाळ्यात सुट्टी लागली की मी गोव्याची कदंब बस पकडून गोवा गाठायचो. त्या सुट्टीत दोन महिने माझा गोव्याला मुक्काम असायचा. काय धमाल मजा यायची गोव्याला! भाऊजींची ती बुलेट मोटार सायकल गोव्यात सुसाट सुटायची. मडगावला ट्रान्सपोर्टचे मुख्य अॉफीस होते. पण संपूर्ण गोव्याचे रिजिअनल मॕनेजर असल्याने गोव्यातील पणजी, म्हापसा वगैरे ठिकाणच्या शाखांना त्यांना भेटी द्याव्या लागत असत. मी त्यांच्या बुलेटवर मागच्या सीटवर बसायचो आणि मग ते बुलेटला किक मारून त्या शाखांना भेटी देत. त्यांच्याबरोबर मी रूबाबात त्या शाखांत जायचो. शाखांना भेट देताना भाऊजी सगळ्या शाखा प्रमुखांच्या कामाची झाडाझडती व त्यांचा आर्थिक हिशोब घ्यायचे. काय रूबाब होता भाऊजींचा! मला भाऊजी बरोबर गोव्यातील शाखांना भेटी देताना स्वतः मॕनेजर झाल्याचा भास व्हायचा. ती गोव्याची मजा खूप वेगळी होती.
नंतर ई.टी.ओ. ची ती नोकरी गेल्यावर भाऊजी खचले नाहीत. त्यांनी गोव्यातच राजेश रोडवेज या दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीत जनरल मॕनेजर म्हणून नोकरी मिळवली. तिथेही मॕनेजर म्हणून त्यांचा रूबाब होताच. गोव्यात मडगावला नावेली चर्चसमोरच सी.जे. फर्नांडीस बिल्डिंग मध्ये तळमजल्यावरच त्यांचा मस्त फ्लॅट होता. समोरच्या शेतात भात लावलेला असायचा. त्या इमारतीत तळालाच त्या दारूचे दूकान होते. तिथे लोक दारू पीत तेंव्हा गोवा फेनी दारूचा मस्त सुगंध दळवळायचा. मी कधी चालत तर कधी भाड्याच्या मोटर सायकल वरून मडगाव मार्केट मध्ये जायचो. त्या मार्केटमधून मी घरी खेकडे आणल्याचे आठवते. त्या मार्केटमध्ये एक डबडा टॉकीज होती. तिथे मी पिक्चर बघायचो. कधी कधी मी नावेली चर्च जवळून भाऊजीच्या अॉफीसकडे जाणाऱ्या पायवाटेने (लाल मातीचा काय मस्त सुगंध दळवळायचा त्या पायवाटेवर) विशांत टॉकीज गाठायचो व तिथेही पिक्चर बघायचो. हेमा, कांचन, रमेश या मुलांना घेऊन मी घराजवळ एक शाळा होती त्या शाळेच्या मैदानात घेऊन बसायचो. गणेश बहुतेक खूप लहान बाळ होते त्यावेळी. घरातून मडगाव मार्केटमध्ये मी चालत जायचो तेंव्हा पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला साप दिसायचे.
काही वर्षांनी भाऊजींनी गोवा ट्रान्सपोर्ट नोकरी सोडून पुणे गाठाले. संसार गोव्याहून पुण्याला आणला. कासारवाडी येथे लांडगे चाळीत ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले. पण पुण्यातही उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भाऊजींच्या घरी येतच राहिलो. कासारवाडी येथे मी ताईला शेजारीच असलेल्या नासिक फाट्याजवळील बँकेत एक बचत खाते काढून दिले होते. मुंबई पुणे हायवे हा रहदारीचा मोठा रस्ता. पण तो ओलांडून रेल्वे रूळापलिकडील नदी किनारी जाऊन मी एकटाच टाईम पास करीत बसायचो. भाऊजी कासारवाडीला नासिक फाट्याजवळच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॕनेजर म्हणून नोकरी करीत होते. ते संध्याकाळी कामावरून कधी घरी येतात याची मी वाट बघत असायचो. पिंपरीला अशोक टॉकीज आहे. तिथे पिक्चरला घेऊन चला म्हणून मी त्यांच्याकडे आग्रह करायचो. हॉटेलात खाणे असो की पिक्चर असो, पवार भाऊजींनी तसे माझे बरेच लाड केले.
भाऊजी व ताई कासारवाडीला लांडगे चाळीत रहायचे. तिथे त्या चाळ मालकाची डॉक्टरीन (डॉक्टरची बायको डॉक्टरीन) सून घरी येऊन छान गप्पा मारायची. त्या रस्त्यावरून हातात चिनपाट घेऊन चालत तिथले सार्वजनिक संडास गाठताना आजूबाजूला दुकाने वगैरे न्याहाळत जाताना मजा यायची. एकदा मी मुंबई-पुणे रस्ता ओलांडून नदीजवळ एका शेतात संडास करायला बसलो. त्यावेळी ताई तिकडे नदीवर धुणे धूत होती. मी शेतात संडास करतोय हे बघून शेतमालक दगड घेऊन मला मारायला आला तेंव्हा ताई नदीवरून त्या शेतमालकावर जोरात ओरडली तेंव्हा मग त्याने दगड मागे घेतला.
काही वर्षानंतर ताई व मुलांना पुण्यालाच ठेऊन भाऊजींना मुंबईत राहून ट्रान्सपोर्टची नोकरी करावी लागली. मग ते वरळीला बी.डी.डी. चाळीतील आमच्या घरी राहू लागले. वरळीच्या त्या वास्तव्यात पवार भाऊजींचा बिछाना किती स्वच्छ व व्यवस्थित असायचा. पावसाळ्यात व थंडीत घराबाहेरील वटणात ( व्हरांड्यात) एका बाजूला मी व दुसऱ्या बाजूला नानासाहेबाच्या दारात भाऊजी अशी आमची झोपण्याची सोय होती. उन्हाळ्यात चाळीच्या गच्चीवर आमचे बिछाने शेजारी असायचे व आमच्या शेजारी सयाजी मामा यांचा बिछाना असायचा. वर काळ्या आकाशात चंद्र, चांदण्या न्याहाळत गप्पा मारत असताना त्या गच्चीवर कधी झोप यायची ते कळायचेच नाही.
भाऊजींच्या व माझ्या गप्पांत त्यांच्या कामाच्या गोष्टींबरोबर त्यांच्या मुलांची शिक्षणे, विवाह यांची वडील म्हणून त्यांना असलेली काळजी असायची. संसारासाठी कोणाच्याही भक्कम पाठबळाशिवाय भाऊजींनी घेतलेली प्रचंड मेहनत मी विसरू शकत नाही. मेहुण्याच्या नात्याने नव्हे तर जिवलग मित्राच्या नात्याने ते कितीतरी गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. तेवढा विश्वास होता, तेवढी आपुलकी होती आमच्या नात्यात!
पंढरपूरला गजानन महाराज मठात काही वर्षापूर्वी भाऊजी व मी राहिलो तेंव्हा मटण खाण्यासाठी स्टेशन रोडवरून खूप लांब चालत गेलो होतो. भाऊजी बरोबर फिरताना मस्त मोकळेपणानं फिरता येते. त्यांनी मला सोनारी गावात जवळजवळ तीन वेळा नेले आहे. तिथे भैरवनाथाच्या जत्रेत घरांच्या वर बसून देवाचा रथ गुलाल, खोबऱ्याच्या वर्षावात पुढे सरकत असताना व त्यातच माकडे इकडेतिकडे उड्या मारताना खूप मजा आली होती. भाऊजी एकदा माझ्या डोंबिवलीच्या नवीन घरी राहून गेले. मागे एकदा चाळीतल्या घरीही राहून गेले. पिनूचे रिशेप्शन डोंबिवलीला झाले तेंव्हा ते रमेश, गणेश, ताई सगळ्या फॕमिलीसह कारने पुण्याहून डोंबिवलीला आले होते.
भाऊजींची उर्जा (एनर्जी) दांडगी! सत्तरी पार केल्यावरही पुण्यात स्कूटर चालवत ट्रान्सपोर्ट कंपनीत जाऊन नोकरी करणे ही साधी गोष्ट नाही. हल्ली करोना काळात ते आजारी पडून अशक्त झाले. पण मनोबल चांगले असल्याने बरे झाले. आता दोन मुले, सुना, नातवंडे यांच्या बरोबर मजेत राहत आहेत.
मी सद्या मुंबईत एका मोठ्या बिल्डरचा कायदा सल्लागार आहे. तिथे दररोज संध्याकाळी ४ ते ७ असे तीन तास काम केले की दर तासाला ५०० रूपये या दराने मला तो बिल्डर दररोज १५०० रूपये एवढी फी देतो. जर तिकडे गेलो नाही तर दिवसाचे १५०० रू. बुडतात. तिथे भरपगारी रजा वगैरे नसते. म्हणून बाहेरगावी कुठे फिरायला वगैरे गेले की रोजचे १५०० रू. नुकसान होणार. म्हणून भाऊजींबरोबर कुठे फिरायला जावे सवड काढून तर बिल्डचे ते रोजचे १५०० रूपये बुडणार. म्हणून योग्य वेळ येईल तेंव्हा भाऊजींबरोबर फिरायला जाणार. भाऊजींना भरपूर आयुष्य व चांगले आरोग्य लाभो!
-ॲड.बी.एस.मोरे©२३.१२.२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा