https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

कर्मगोष्टींचा मंत्रचळ!

कर्मगोष्टींचा मंत्रचळ एक चक्रव्यूह!

आपले विशाल विश्व हे अनेकविध मूलद्रव्यांनी व त्यांच्या मुळाशी असलेल्या अनेकविध मूलतत्त्वांनी बनलेले आहे. विविधतेने नटलेली ही द्रव्ये व त्यांच्या मुळाशी असलेली ही तत्वे अनेक आहेत. अर्थात विश्वात मूलद्रव्ये व मूलतत्वांची विविधता आहे तशी त्यांची अनेकता आहे. या मूलद्रव्यांना व मूलतत्वांना विविध प्रकारच्या अनेक जैविक, अजैविक कर्मगोष्टी चिकटलेल्या आहेत. हिंदू धर्मशास्त्रातील अनेकविध देवदेवता विश्वातील अनेकविध मूलद्रव्यांची, मूलतत्त्वांची व कर्मगोष्टींची प्रतीके होत.

माणसाचे जीवन म्हणजे निसर्गाने त्याच्यावर सोपवलेल्या अनेकविध कर्मगोष्टींचा भार ज्या भाराच्या मुळाशी विश्वातील अनेकविध मूलद्रव्ये व मूलतत्वे आहेत. माणूस हा या अनेकविध मूलद्रव्यांतून व मूलतत्त्वांतूनच उत्क्रांत झालेला बुद्धिमान प्राणी आहे. सजीवांची बुद्धी हे सुद्धा विश्वाचे एक तत्व आहे ज्या मूलतत्वाचे प्रतीक म्हणजे हिंदू धर्मशास्त्रातील श्रीगणेश हा बुद्धीदेव ज्याचे मेंदूमन हे निवासस्थान आहे. पण एक प्रतीक म्हणून मानवी मन बुद्धीदेव श्रीगणेशाची बाह्य मंदिरात स्थापना करून या देवाचे स्मरण, मनन व चिंतन (ध्यान) करू शकते.

मानवी जीवनातील एखादी कर्मगोष्ट ही छोटी असो की मोठी पण कोणत्याही एका कर्मगोष्टीकडे मन अधिक लक्ष देऊ लागले व तिच्यात स्वतःला जास्त काळ गुंतवून घेऊ लागले की मानवी मेंदूमनाला त्या गोष्टीचा मंत्रचळ लागतो. मंत्रचळ म्हणजे एखाद्या कर्मगोष्टीचे वेड. या वेडाने मानवी मन बेचैन होऊन अस्थिर व अशांत होते. त्या गोष्टीने मनाची अवस्था पछाडलेली होते. ते त्याच कर्मगोष्टी भोवती भिरभिरत राहते.

हा एक विचित्र सापळा, चक्रव्यूह आहे. या सापळ्यातून, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक काम झाले की लगेच दुसऱ्या कामाकडे लक्ष वळवले पाहिजे. कामातील बदल हीच मेंदूमनाची विश्रांती असे विज्ञान सांगते. निसर्गाचे भौतिक विज्ञान व परमेश्वराचा आध्यात्मिक धर्म या दोन्ही गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. भौतिक निसर्ग दिसतो पण त्यात असलेली अलौकिक चैतन्य शक्ती दिसत नाही. निसर्गाच्या माध्यमातूनच त्या चैतन्य शक्तीचा म्हणजे परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असतो. परमेश्वराचे अस्तित्व मान्य करीत नाही तो नास्तिक व मान्य करतो तो आस्तिक, पण कोणी नास्तिक असो की आस्तिक, चैतन्य शक्ती परमेश्वर ही अशी गोष्ट आहे की ती सोड म्हटले तरी सोडता येत नाही व धर म्हटले तरी धरता येत नाही. सर्व मंगलमय होवो!

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा