https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

उथळ मनाचा थयथयाट फार!

जसा उथळ पाण्याला खळखळाट फार तसा उथळ मनाचा थयथयाट फार!

मानवी मनाला बाजारी आकर्षणाने बाजारी  बनविणारे तीन प्रमुख बाजार मला या जगात दिसतात. पहिला बाजार वस्तूंचा ज्यात अनेक वस्तू व सेवा मानवी मनाला आकर्षित करीत असतात. दुसरा बाजार सत्तेचा ज्यात अनेक राजकीय पक्ष लोकांना न झेपणारी आश्वासने देत त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा व त्यातून सत्ता मिळविण्याचा व ती टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. तिसरा बाजार देवाचा ज्यात अनेक धर्म व पंथ देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक कर्मकांडे सांगत निसर्गातील देवाला तुकड्या तुकड्यांत वाटून लोकांचे धार्मिक विभाजन करीत असतात. या धार्मिक तुकड्यांनी जगात अनेक धार्मिक प्रार्थनास्थळे, तिर्थस्थळे निर्माण केली आहेत.

या बाजारांत फिरून का कुठे मानवी मनाला शांती लाभत असते? लोकांना काम हवे म्हणे! अहो काम कसले तर या तीन बाजारांत व्यस्त राहण्याचे काम! कर्म करीत रहायचे म्हणजे काय तर या तीन बाजारांत सतत फेरफटका मारून बाजारी जीवन जगत रहायचे. यासाठीच का मानवी जीवनाचा ध्यास किंवा अट्टाहास? या बाजारांत मनाला जेवढे जास्त गुंतवत जावे तेवढे मनाला अधिकाधिक अशांत करीत जावे.

नश्वर असलेल्या एवढ्याशा मानवी शरीराच्या गरजा किती? पण मानवी मनाला मात्र वरील तीन बाजारांत फिरून फिरून सारखे हिंडावे वाटते. हा कसला मानवी मनाचा वेडपटपणा?
जगाला उष्णता व प्रकाश देणाऱ्या सूर्याचा लांबून आनंद घ्यायचा सोडून त्या सूर्यालाच गिळायला जाणे म्हणजे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची भयंकर इच्छा मनात बाळगणे हा मानवी मनाचा महामूर्खपणा नव्हे काय?

विश्वाची निर्मिती एका सूक्ष्म पदार्थाच्या मोठ्या  स्फोटातून झाली असे काही शास्त्रज्ञ त्यांच्या बिग बँग थिअरीनुसार म्हणतात. म्हणजे प्रचंड पसरलेले विश्व हे सूक्ष्मातून निर्माण झाले हे मानायला या शास्त्रज्ञांनी थोडी जागा ठेवलीय. आता ही जागा जर ठेवलीय तर या जागेचा उपयोग करून घेत मनाला सूक्ष्मात ठेवायचे म्हणजे मर्यादेत ठेवायचे की जगाच्या बाजारी पसाऱ्यात भरकटत ठेवायचे या प्रश्नाचे उत्तर उथळ मनाला काय मिळणार? कारण जसा उथळ पाण्याला खळखळाट फार तसा उथळ मनाचा थयथयाट फार!

-ॲड.बी.एस.मोरे©४.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा