https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

देव, दानव, मानव!

देव, दानव, मानव!

नुसत्या आध्यात्मिक धर्माला कवटाळून देवाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही देव नाही व नुसत्या भौतिक विज्ञानाला कवटाळून मनगटाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही दानव नाही, देवाची आध्यात्मिक मनःशक्ती व निसर्गाची भौतिक शरीर शक्ती या दोन्ही शक्तींना सोबत घेऊन सारासार विचार करणाऱ्या बुद्धीच्या जोरावर जगावर राज्य करणारा माणूस हा देव नाही की दानव नाही तर तो फक्त माणूस आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

मॉडर्न आर्ट

मॉडर्न आर्ट!

परिपूर्णतेचा ध्यास व नीटनेटकेपणाची सवय पुढे पुढे त्रासदायक होते. हे आहे माझे बाथरूम जिथे मी दररोज अंघोळ करतो. साधेच आहे पण जमेल तेवढे स्वच्छ ठेवण्याचा बायको प्रयत्न करते. अंघोळ करताना बाथरूम मध्ये ठेवलेल्या या निळ्या रंगाच्या पाण्याच्या पिंपावर असलेले हे डाग पुसण्याचा मी अधूनमधून उगाच निरर्थक प्रयत्न करतो. कालानुरूप पिंपाचा निळा रंग उडणे व बाथरूम सिलिंगला मागे पांढरा रंग लावताना त्या पिंपावर पडलेले पांढऱ्या रंगाचे डाग पिंपावर तसेच राहणे ही गोष्ट नॉर्मलच! पण माझा काटेकोरपणा मला आडवा येतो. ते डाग साबणाने धुवून किंवा ब्रशने घासून सुद्धा निघणार नाहीत हे मनाला कळत असूनही अंघोळ करताना मला हे डाग दिसले की जाम त्रास होतो. मग त्यावर हात फिरव, पाणी टाक असले प्रकार मी करतो. यालाच मंत्रचळ (ओसीडी) असे म्हणतात. हा सौम्य मानसिक आजारच आहे. त्यावर मी माझ्या विचारांनीच मात करीत आलोय. माझे काटेकोरपणाचे किंवा नीटनेटकेपणाचे विचार मला अंघोळ करण्याच्या कृतीवर लक्ष एकाग्र करू देत नाहीत. त्या विचारांच्या प्रवाहातून लक्ष पुनःपुन्हा अंघोळीच्या कृतीवर आणताना मी चाचपडतो. माझे मन अंघोळीऐवजी त्या पाण्याच्या पिंपावरील डागांवरच सारखे सारखे गेल्याने मी स्वतःच स्वतःवर चिडतो. त्यामुळे अंघोळ क्रिया पूर्ण करण्यासाठी मला जास्त वेळ लागतो. मग मी सजग होतो व निरर्थक कृतीत वेळ वाया घालवू नकोस असे स्वतःला बजावतो. आज शेवटी मनाला समजावले की बाबारे, हे असेच असते. जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते. या पिंपावर जे डाग आहेत ना त्यांना तू मॉडर्न आर्ट समज. मॉडर्न आर्ट मधील त्या उभ्या आडव्या रंगरेषा तूला समजल्यात का कधी? मग तसेच या पिंपावरील न पुसल्या जाणाऱ्या डागांना समज आणि त्यांच्याकडे मॉडर्न आर्टच्या नजरेने बघत मस्त अंघोळ कर. अगदी खरंच सांगतोय! मी आज असा नवीन दृष्टिकोन स्वीकारूनच मस्त शांतपणे अंघोळ केली. फुकट डोक्याला तापच नको त्या जुनाट काटेकोरपणे, नीटनेटकेपणाने राहण्याच्या सवयीचा! अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आल्यावर मग मात्र डोक्यात विचार आला की, यालाच बदल म्हणायचा का? खरं तर, बदल हा झालाच नव्हता. फक्त आहे त्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघायचे ठरवले एवढेच! फक्त दृष्टी बदलायची आणि बदल झालाय असे खोटे खोटे मनाला पटवायचे आणि अशाप्रकारे मनाला शांत करायचे. खरंच, हे मन म्हणजे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

माणूस व निसर्ग!

माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार झाला आणि निसर्ग हात चोळत बसला?

सृष्टीला रचतानाच सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी सृष्टी व्यवस्था निर्माण करून तुमचे जीवन-तुमची जबाबदारी असे सजीवांना सांगून निसर्ग हात झटकून मोकळा झाला. मग माणसाने पुढे होऊन ती जबाबदारी अंगावर घेत निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी व सृष्टी व्यवस्था स्वतःच्या दावणीला बांधत स्वतःला सोयीस्कर वाटणारा स्वतःच्या फायद्याचा कायदा त्या मूळ व्यवस्थेतूनच निर्माण केला व त्या कायद्याच्या जिवावर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे म्हणत हा माणूस निसर्गाला वाकुल्या दाखवत बसला. हे बघून, कशाला हा असला माणूस मी बनवला असे म्हणत निसर्ग हात चोळत बसला असेल. वैतागून हात चोळता चोळता निसर्गाला स्वतःच्याच चुकीचा राग आला की मग अवर्षण, अतीवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा मारा निसर्ग त्यानेच निर्माण केलेल्या माणसांवर करतो. कोरोना विषाणू हा त्यातलाच एक प्रकार! पण माणूस महावस्ताद! तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर असल्या नैसर्गिक आपत्तींनाही तोंड देतो व फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने झेप घेतो. खरंच काय बरे वाटत असेल निसर्गाला की निसर्गातील देवाला या असल्या माणसाकडे बघून?

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

गाठ पडली ठका ठका!

गाठ पडली ठका ठका!

राजकारण, धर्म, जात हे विषय हल्ली फारच धोक्याचे वाटू लागलेत. लोक खूप संवेदनशील असतात या विषयांवर! म्हणून हल्ली मी या विषयांवर सावधपणे व्यक्त होतोय. यात वाद वाढत गेले तर लोक भावनातिरेकाने जीव घ्यायला कमी करीत नाहीत. हे समाजमाध्यम आहे. हितशत्रू लोक प्रतिक्रिया देत नसतीलही पण गुपचूप तुमच्या लिखाणाचे वाचन करीत नसतील कशावरून? मी पूर्वी खूप सडेतोड लिहायचो. पण हल्ली तसले रोखठोक लिखाण कमी केलेय. आपण पोटतिडकीने लिहून काही उपयोग नाही हे कळून चुकलेय. माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या चाव्या मोठ्या लोकांच्याच हातात आहेत हेच खरे! त्यांना राग आला तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिलटा सारखे चिरडून मारतील हे सत्य लक्षात घेऊन हळूहळू सावध लिहायला, सावध प्रतिक्रिया द्यायला शिकत चाललोय. काही धूर्त मंडळी ही खूप हुशार, कावेबाज, दगाबाज असतात. ज्या गोष्टी मला या ६४ वयात कळू लागल्यात त्या काही लोकांना तरूणपणातच त्यांच्या घरातूनच कळलेल्या असतात. त्यामुळे मध्यम वयातच अशा व्यक्ती व्यवहार चतुर झालेल्या असतात. त्यांच्यापुढे या उतार वयात मी शहाणपणाचा आव आणून समीक्षा करणे हा मूर्खपणा होय! म्हणून माझे सामान्य जीवन आनंदात व शांतीत जगण्याचा प्रयत्न करतोय. जवळ नुसते ज्ञान असून उपयोग नसतो. इतरही बऱ्याच गोष्टी जवळ लागतात मोठी हिंमत करायला. त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे स्वतःचा वकूब बघून वागायला हवे. नाहीतर गाठ पडली ठका ठका असे व्हायचे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.१०.२०२०

विविधता, समरसता, सहजता, समता!

विविधतेत समरसता व सहजता आहे, पण समता (समानता) नाही!

(१) मानव समाजात माणसे सारखी का वागत नाहीत हा मला सतावणारा एक वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न! माणसे व त्यांची माणुसकी हा सुद्धा याच प्रश्नाला चिकटलेला दुसरा एक प्रश्न! माणसे इथून तिथून सारखीच! समता व बंधुत्व हे शब्द किती गोड! मन प्रसन्न होऊन जाते हे शब्द ऐकताना, वाचताना. पण हे खरेच असे आहे का?

(२) माणसे इथून तिथून सारखीच, त्यांच्या  सभोवतालचे नैसर्गिक पर्यावरण सारखेच, त्यांच्यावर असलेला निसर्गाचा प्रभाव पण सारखाच, पण या सारखेपणात जगणाऱ्या  माणसांचे विचार व वर्तन सारखे का नाही हा मला सारखा सतावणारा मूलभूत वैज्ञानिक व कायद्याचा प्रश्न!

(३) मग वरील प्रश्नातून बाहेर पडलेला माझा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने माणसांना दिलेली शरीरे व वासना-भावना-बुद्धी या तिन्हींचा संगम असलेली मने सारखी नाहीत का? मग आणखी पुढे पडणारा प्रश्न हा की, निसर्गाने सृष्टीत जशी विविधता निर्माण केलीय तशी माणसांच्या शरीर व मनातही विविधता निर्माण केलीय का? मग वरील विचारातून पडणारा पुढील प्रश्न हा की, निसर्गाने जर सृष्टीप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केली असेल तर मग त्यांच्यात समानता कुठून येणार?

(४) वरील प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मला कळलेले नैसर्गिक सत्य हे आहे की, निसर्गाने माणसे अगदी तंतोतंत सारखी केली नाहीत. म्हणून तर मराठीत एक म्हण आहे की हात एक असला तरी हाताची सर्व बोटे सारखी नसतात. निसर्गाने सृष्टीच्या रचनेप्रमाणे माणसांतही विविधता निर्माण केलीय आणि म्हणून तर माणसांचे धर्म सारखे नाहीत, त्यांच्या भाषा सारख्या नाहीत, त्यांच्या संस्कृती सारख्या नाहीत. निसर्गाने जर सृष्टीप्रमाणेच विविधता प्रधान रचना माणसांतही निर्माण केली आहे तर मग त्यांच्यात समानता कुठून आणणार?

(५) विविधतेने नटलेल्या सृष्टीत समरसता आहे म्हणजे सृष्टीतील विविध आकारी, विविध गुणधर्मी पदार्थ एकमेकांशी समरसतेच्या एका समान धाग्याने बांधले आहेत, ते समरसतेच्या धाग्याने एकमेकांशी निगडीत आहेत. अशा विविध पदार्थांना एकमेकांशी जोडणारा हा समरसतेचा धागा समान असला तरी या विविध  पदार्थांत व त्यांच्या समरसी देवाणघेवाणीच्या जोडणीत समानता नाही अर्थात सर्वांना ५०ः५० टक्के असा समान न्याय नाही.

(६) वरील नैसर्गिक सत्य लक्षात घेऊन भारतीय   संविधानात वाजवी वर्गीकरण (reasonable classification) व त्याबरोबर वाजवी बंधने (reasonable restrictions) या महत्वाच्या तरतूदींचा समावेश केला आहे. या तरतूदी या मूलभूत नैसर्गिक तरतूदी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याच तरतूदीनुसार समान काम, समान वेतन व असमान काम, असमान वेतन हे मूलभूत नैसर्गिक तत्व मानवी श्रम कायद्यात समाविष्ट केले आहे. म्हणून तर औद्योगिक कारखान्यात व्यवस्थापक व कामगार यांच्या पगारात तफावत असते. याच नैसर्गिक तत्वाने समान वर्तणूकीला समान कायदा व असमान वर्तणूकीला असमान कायदा हे नैसर्गिक तत्व अधोरेखित होते.

(७) या लेखाचा सार हाच आहे की, माणसांनी कितीही ठरवले तरी त्यांच्यात पूर्ण समानता निर्माण होणे केवळ अशक्य आहे. समानतेचा असा कायदा करून का मानव समाजात अशी ओढूनताणून कृत्रिमपणे पूर्ण समानता निर्माण करता येऊ शकेल? अशा कृत्रिम समानतेत नैसर्गिक सहजता कशी असेल? साम्यवाद जर अशा कृत्रिम समानतेचा आग्रह धरीत असेल तर तो आग्रह अनैसर्गिक होय. म्हणून नैसर्गिक विविधता, समरसता, सहजता, पदार्थांतील मोजकी समानता (समता) व त्यासोबत सर्व विविध पदार्थांतील असमानता (असमता) ही नैसर्गिक तथ्ये व सत्ये नीट समजून घेतली पाहिजेत.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.१०.२०२०

रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

हळदी कुंकू!

हळदी कुंकू!

हळदी कुंकू म्हणजे पती नसलेल्या महिलांना अपमानीत करण्याचा सण.... 

हळदीकुंकू या विषयावर लिखाण करताना महिला माझ्यावर नाराज होणार हे अपेक्षित आहे. कोणाला बरं वाटाव कोणी मला चांगले म्हणावे म्हणून मी कधीही लिखाण केले नाही.

ज्या सणामध्ये पती मयत झालेल्या स्त्रिया, शहीद जवानांच्याच्या वीर पत्नी व आत्महत्या शेतकर्‍यांच्या पत्नी यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल ते सण मला मान्य नाहीत. त्या सणाचे मी आज ही समर्थन करत नाही या पुढे करणार नाही. संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रम घरोघरी गल्लीबोळात दिसतात. हळदी कुंकू सण म्हणजे नवरा असणाऱ्या बायका नटून थटून एकमेकींना हळदी कुंकू लावतात व भेटवस्तू देतात. हे हळदी कुंकू त्याच स्त्रिया लावतात ज्यांचा पती जिवंत आहे. हा कार्यक्रम करत असताना त्या महिलेचा नवरा असणे अपेक्षित आहे. तिला सवाष्णी असे म्हणतात.

देशाच्या सिमेवर शहीद झालेल्या वीर पत्नीला कधी सन्मानपूर्वक या कार्यक्रमात वागणूक दिलेली मी पाहिले नाही. जेव्हा तुम्ही नटूनथटून तुम्ही हळदीकुंकू समारंभात जाता तेव्हा ज्या महिलांचे पती जिवंत नाहीत त्यांच्या मनात सतत येत असते माझे पती असते तर मीही अशी नटली असते. फक्त महिला बोलतात एका स्त्रीचे मन फक्त एक स्त्रीच जाणू शकते. कधी पती नसलेल्या महिलांचे हळदीकुंकू विषयावर मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? सतत त्यांना हेतू पुरस्सर अपमानीत केल जाते. का यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारा सण असू शकत नाही का? कोणत्या शुभ कार्यात त्यांना पुढे येऊन देत नाही. ती चुकून त्या कार्यक्रमात पुढे आली तर तिच्यावर रागावले जाते. असं का  अपमानीत जीवन जगायचे. 

"नवरा असणे" हाच केंद्रबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का? खरंतर जास्तीची भावनिक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवे. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो तेंव्हा अपमानीत न करता त्यांना सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.

पती नसलेल्या स्त्रियांना अपमानीत करणारे सण, उत्सव, प्रथा अजून किती काळ चालू ठेवायच्या? कर्मकांडाच्या आणि धार्मिक श्रध्दांच्या नावाखाली असले सरळ सरळ 'विषमतेला' खतपाणी घालणारे रिवाज किती वर्षे पाळायचे ? पाया पडणाऱ्या स्त्रीला फक्त 'सौभाग्यवती भवः' असा आशीर्वाद देणे, ही तिच्या आत्मसन्मानाची कुचेष्टाच आहे हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही, तोपर्यंत ती संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतच राहणार!

वर्षानुवर्षे चालत आलेल्या या मानसिक गुलामगिरीचं काय? परंपरांच्या नावाखाली चालत असलेल्या सांस्कृतिक गुलामगिरीचं काय?  मूग गिळून गप्प बसणार का ?
आपलं हे वागणं सुसंस्कृत म्हणायचं की संधिसाधू?

शिकलेला स्त्री, पुरुष समाज आपल्या परिवार, समाजाला अनिष्ट रूढी, परंपरा, यातून मुक्त करु शकत नाही त्या शिक्षणाचे काय उपयोग? शिक्षण याला म्हणावे जे घेतल्यानंतर चांगले वाईट यातील फरक समजतो व वाईट कृतीला विरोध करतो.आता आपण बदलायला हवं. नवरा नसलेल्या स्रीलाही सन्मानपूर्वक जगता आले पाहिजे.

साभार🙏

(फेसबुक कॉपी पेस्ट)

एकाकीपणा!

आयुष्याच्या अखेरीस येणारे एकटेपणाचे दुःख भयंकर!

आज दिनांक ११.१०.२०२० च्या रविवारच्या लोकसत्तेत आयुष्याच्या अखेरीस एकाकीपणा असह्य झाल्याने अरण्य जीवनावर सतत लेखन करणारे प्रसिद्ध लेखक मारूती चितमपल्ली यांना नागपूर सोडून सोलापूरला स्थलांतर करावे लागले ही बातमी वाचून काळजात धस्स झाले. आधी त्यांची पत्नी गेली, मग मुलगीही काळाने हिरावून नेली. मग लेखकाची वैयक्तिक  काळजी घ्यायला घरी कोणीच नाही. बाहेरून भरपूर मानसन्मान मिळवलेले. पण बाहेरची मंडळी वैयक्तिक काळजी घ्यायला घरी रहात नाहीत. बायको नाही, मुलगी नाही. मग घरात एकटेच मरून पडू की काय ही भीती मनाला सतत सतावू लागली. आयुष्याच्या अखेरीस आलेला हा एकाकीपणा खायला उठला. म्हणून शेवटी नागपूर ही कर्मभूमी सोडून चितमपल्ली यांनी सोलापूरला जायचे ठरवले. कारण काय तर तिथे त्यांचा पुतण्या आहे म्हणून. शेवटी काय तर बाहेरची माणसे तुमच्या उपयोगाला येत नाहीत. तुमच्यावर माया प्रेम करणारी तुमची जवळची माणसेच तुमच्या उपयोगाला येतात. असे नातेवाईक आयुष्यात शेवटपर्यंत जवळ असणे हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे हेच वरील उदाहरणावरून सिद्ध होते. जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे, तुमचा फायदा आहे तोपर्यंतच बाहेरचे लोक तुमच्या अवती भोवती घुटमळतील. वयानुसार तुम्ही त्यांना निरूपयोगी झालात की तुमचे कौतुक करणारी हीच मंडळी तुम्हाला टाटा, बाय बाय करून दूर निघून जातील. म्हणून सार्वजनिक लोकप्रियता, घराबाहेर मिळणारा मानसन्मान याची नशा डोक्यात शिरू देऊ नका. हा खेळ क्षणिक असतो. आयुष्याच्या अखेरीस जेंव्हा शरीर थकते व मन खचते तेंव्हा या खेळातील हवा फुस्स होते. दुसरे एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक वयस्कर पुरूष क्लायंट आहे. भरपूर पैसा जवळ, मुंबईत आलिशान फ्लॅट पण पैशाच्या मस्तीत राहून लग्न केले नाही. मुंबईतील मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये आता एकटाच राहतोय. पण पैशाच्या मस्तीत सगळे जवळचे, लांबचे नातेवाईक दूर ठेवले. आता आयुष्याच्या अखेरीस जवळ कोणीच नाही. त्याने लग्न केले असते तर त्याच्या जवळ निदान बायको, मुले तरी असती त्याची काळजी घ्यायला. कोरोना लॉकडाऊन काळात तर या जीवघेण्या एकाकीपणामुळे त्याची हालत खूप खराब झाली. एकही नातेवाईक जवळ आला नाही. पैशाला मिठीत घेऊन जग आता शेवटचे आयुष्य असे ते म्हणाले. शेवटी एका मित्रालाच त्याची दया आली. तो मित्र पैशाने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. तो मित्र दररोज माझ्या या श्रीमंत क्लायंटच्या फ्लॅटवर दोन्ही वेळचे जेवण सकाळच्या नाष्ट्यासह आणून देतो. त्याचे पैसे मात्र घेत नाही. इथे तो पैसा किती भिकारी झाला बरे! अहो पण नुसते जेवण पुरेसे नसते आयुष्याच्या अखेरीस! मायाप्रेमाची माणसे जवळ लागतात तुमची आपुलकीने वैयक्तिक काळजी घेण्यासाठी! लोकप्रियता मिळवलेले मारूती चितमपल्ली व माझा श्रीमंत क्लायट यांची ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. अखेरच्या आयुष्यात लोकप्रियता कामी आली नाही व पैसाही कामी आला नाही. फौजदारी  कायद्यात एकांतवासाची शिक्षा (solitary confinement) ही फार भयंकर मानली जाते. एकटेपणा हा खायला उठतो. म्हणून हजारो, लाखो लोकांची लोकप्रियता तुम्ही नाही मिळवली तरी चालेल पण मरेपर्यंत तुमची काळजी घेणारी मायाप्रेमाची थोडी जरी माणसे मिळवलीत तरी खूप मिळवलेत. विवाहसंस्था ही या दृष्टीने अत्यंत मोलाचे काम करीत आहे. आयुष्यातील तिचे महत्त्व जाणा! जीवनभर तुमची साथ देणारा आयुष्याचा जोडीदार व तुमच्यावर प्रेम करणारी तुमची मुले व तसेच आपुलकीचे नातेवाईक हीच जगातील तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे हे कायम ध्यानात ठेवा! वरील दोन उदाहरणातून मला बस्स एवढेच सांगायचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.१०.२०२०