https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!

(१) कोरोना लॉकडाऊनचा मार्च २०२० पासून सुरू असलेला मोठा काळ हा माझ्या ज्ञानाच्या पुनर्विचाराचा, माझ्या मनात साचलेल्या खोट्या समजूती दूर करण्याचा, माझ्या पुनर्जन्माचा अर्थात मीच मला नव्याने भेटण्याचा, म्हणजेच  माझ्या आत्मपरीक्षणाचा, आत्मचिंतनाचा मोठा काळ!

(२) या काळात निसर्ग व देव, विज्ञान व धर्म, भौतिकता व आध्यात्मिकता या गहन विषयांवर सखोल आत्मचिंतन झाले. या आत्मचिंतनातून मला निसर्गातच देव गवसला व विज्ञानातच धर्म कळला. हेही कळले की, मी आतापर्यंतच्या आयुष्यात देवाला मंदिरात व देव प्रतिमांमध्ये बघत होतो व तिथे आध्यात्मिक भावनेने माझ्या हृदयाला झोकून देत होतो. पण प्रत्यक्षात मात्र  माझ्या जवळ असलेल्या देवाकडे दुर्लक्ष करीत होतो.

(३) या आत्मचिंतनातून हे कळले की, खरं तर मनुष्य जीवन हे इतर प्राणीमात्रांपासून वेगळ्या असलेल्या उच्च भौतिक कर्मांनीच बहुतांशी व्यापले आहे. या मानवी भौतिक कर्मांना उच्च शब्द चिकटल्याने ही कर्मे केवळ भौतिक न राहता भौतिक-आध्यात्मिक, वैज्ञानिक-धार्मिक अशी संमिश्र नैसर्गिक झाली आहेत. ही भौतिक कर्मे केवळ भौतिक वासनांच्या दबावाखाली व वासनांध घिसाडघाईने पार पाडावयाची नसून ती उच्च आध्यात्मिक दर्जाने पार पाडावयाची आहेत. विवाहसंस्था हा लैंगिकतेत आध्यात्मिक भावविश्वाचा अनुभव घेण्याचा एक उत्तम नमुना आहे.

(४) मनुष्याने त्याच्या जीवनात पार पाडावयाची उच्च दर्जेदार भौतिक कर्मे हा खरं तर निसर्गात असलेल्या देवाचाच आदेश आहे हे मला माझ्या आत्मचिंतनातून कळले. या भौतिक कर्मांनाच आध्यात्मिक दर्जा देऊन त्या कर्मांत मनुष्याने आपले हृदय झोकून दिले पाहिजे. हृदय झोकून देणे म्हणजे मनापासून, आंतरिक समाधानाने भौतिक कर्म पार पाडणे. अर्थात निसर्गाची भौतिक कर्मे आध्यात्मिक दर्जाने लक्षपूर्वक व हृदयापासून पार पाडली पाहिजेत.

(५) या आत्मचिंतनातून मानवी अर्थकारणात व राजकारणात सुद्धा अध्यात्म आहे हे मला छान कळले. उदाहरणार्थ, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्यकारभार हा लोकांचे विश्वस्त म्हणूनच पार पाडला पाहिजे. कारण लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो व या विश्वासात उच्च दर्जाचा आध्यात्मिक भाव असतो.

(६) खरं तर, अध्यात्म हा मिथ्या कल्पनांच्या आभासात, स्वप्नवत जगात जगण्याचा, निव्वळ भावनिक श्रद्धेनेच देवाकडे बघण्याचा, किंवा मानवी बुद्धीने कल्पनेबरोबर मैत्री करून तिच्या भोवती रूंजी घालत तिच्या संगतीत स्वतःची बौद्धिक करमणूक, मनोरंजन करून घेण्याचा वरवरचा विषय नसून तो निसर्गाच्या सत्यात जगण्याचा व निसर्गातच देवाला बघण्याचा खोल विषय आहे. निसर्गाच्या विज्ञानाला देवाचा धर्म करून ते विज्ञान धर्माने जगत श्रेष्ठ मनुष्य जीवनाचे सार्थक करण्याचे मोठे आव्हान या अध्यात्मात आहे. माझे या गहन विषयावरील आत्मचिंतन पूर्ण झाले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o

टीपः

माझ्या वरील आत्मचिंतनाला समर्पक असे एक अत्यंत सुंदर असे मराठी गीत मला आठवले. या गीताचे बोल आहेत "शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी". हे गीत शब्दबद्ध केलेय गीतकार वंदना विटणकर यांनी व गायलेय महान गायक मोहम्मद रफी यांनी. विशेष म्हणजे या गीताला संगीत दिलेय ते मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी. अर्थात या गीताशी संबंधित तीनही व्यक्ती  या महान कलाकार. त्यांच्या नखाजवळही मी बसू शकत नाही. परंतु या कोरोना लॉकडाऊन काळात ईश्वरावर मी जे आत्मचिंतन केलेय व त्याच आत्मचिंतनावर आधारित वर जो काही लेख लिहिला आहे त्याचे व या अर्थपूर्ण गीताचे सूर जवळजवळ जुळत असल्याने मी हे गीत माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या गीतात माझ्या ईश्वरी आत्मचिंतनाचा आत्मा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

हृदयस्पर्शी!

फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर हृदय शेअर करता येत नाही!

फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर तुम्ही तुमचे ज्ञान, अनुभव व विचार शेअर करू शकाल पण हृदय नाही. इथे हृदय म्हणजे मनापासून माया, प्रेम ही भावना! ही भावना मेंदूतच असते, पण तिच्या जाणिवेला नीट समजण्यासाठी हृदय हा  शब्दप्रयोग केला जातो. हृदय हे तुमच्या खास माणसांसाठी खाजगी असते. मेंदूतील बुद्धी प्रमाणे ते सार्वजनिक होऊ शकत नाही. असे खास लोक तुमचे कुटुंब सदस्य, तुमचे जवळचे नातेवाईक व तुमचे काही थोडेच खास मित्र असू शकतात. अशा जवळच्या लोकांबरोबरचे खाजगी संबंध हे बुद्धीशी निगडीत असलेल्या केवळ शैक्षणिक पांडित्यावर व तसेच आर्थिक, राजकीय व्यवहारावर अवलंबून नसतात. तर ते हृदयातून असतात. म्हणूनच अशा मायाप्रेमाच्या खाजगी संबंधाना हृदयस्पर्शी संबंध म्हणतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर असे फार जवळचे हृदयस्पर्शी संबंध प्रस्थापित होणे मला तरी अशक्य वाटते. म्हणूनच यापुढे फेसबुकवर बौद्धिक विचार लिहायचे तर आपल्यावर माया प्रेम करणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना, खास मित्रांना अधूनमधून फोन करीत रहायचे मी ठरवलेय. या कोरोनामुळे सहा महिने झाले मी घरात बिनकामाचा बसून आहे. त्यामुळे माझे डोके फिरल्यासारखे झाल्याने या गणपतीत मी नेहमीप्रमाणे कोणत्याच नातेवाईकाला फोन केला नाही. पण काल सर्वपित्री अमावास्या झाली आणि मग थोडा भानावर आलो. माणसे सोडून जातात आणि जे मायाप्रेमाचे बोलायचे असते ते राहूनच जाते. म्हणून आहे तोपर्यंत बोलून घ्या. मायाप्रेमाचे जवळचे संबंध कायम ठेवा. हे फेसबुक वगैरे समाजमाध्यम निव्वळ टाईमपास करमणूक व निरर्थक वादविवाद घालत बसण्याचे माध्यम झालेय असे वाटते. पैसे कमावण्याचा सद्या कामधंदा नाही अर्थात आर्थिक लाभाची वकिली बंद आहे म्हणून मी फेसबुकवर ज्ञान व अनुभव फुकट वाटत गेलो. पण या फुकट ज्ञान वाटपातून या फेसबुकवर किंवा एकंदरीतच समाजमाध्यमांवर हृदयस्पर्शी संबंध प्रस्थापित होणे तसे कठीणच आहे हे माझ्या लक्षात आलेय. जवळच्या माणसांना भले माझे बौद्धिक कळणार नाही पण त्यांना मायाप्रेमाची भावना आहे याची मला जाणीव आहे. म्हणून कधी व्हॉटसॲप तर कधी प्रत्यक्ष फोन करून मी यापुढे जवळच्या नातेवाईकांशी व काही थोड्या खास मित्रमंडळींशी बोलत राहण्याचे ठरवले आहे. सर्वपित्री अमावास्येने ही जाणीव जागृत केली म्हणून तिचे व माझ्या पितरांचे आभार मानावे तितके थोडेच!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.९.२०२०

या पितरांनो या!

या पितरांनो या!

(१) आज गुरूवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२० हा भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस! आज आहे सर्वपित्री अमावास्या म्हणजे आपल्या पितरांचे सार्वत्रिक श्राद्ध घालण्याचा दिवस! श्राद्ध या शब्दात श्रद्धा हा शब्द आहे व श्रध्देत असते ती शुद्ध भावना! आपले पितर म्हणजे आपले दिवंगत आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा व अन्य नातेवाईक जे मृत पावले आहेत त्या सर्वांचे  आदरयुक्त स्मरण व पूजन करण्याचा आज दिवस! पितर म्हणजे पूर्वज!

(२) देवापुढे भक्ती भावाने ठेवलेला प्रसादाचा नैवेद्य देव खात नाही व पितरांपुढे आदर भावाने ठेवलेला श्राद्धाचा नैवेद्य पितर खात नाहीत हे सांगायला आम्हाला कोणत्याही पंडिताची गरज नाही. आम्हाला ते माहीत नाही असे जर या पंडितांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही हे सर्व का करतो हे जरा आम्हाला नावे ठेवणाऱ्या अशा लोकांनी नीट समजून घ्यावे. आपण भारतीय लोक आता जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यामागे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग आहे. त्यांच्या स्मृतिदिनाला त्यांचे स्मरण करून त्यांना आपण आदरांजली वाहतो की नाही? ती जर अंधश्रध्दा नाही तर मग आम्ही आमच्या पितरांना भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात व शेवटी सर्वपित्री अमावास्येला आमच्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जर आदरांजली वाहण्याचे कर्तव्य पार पाडीत असू तर ती अंधश्रद्धा कशी? हे मात्र खरे की जिवंतपणी आईवडिलांना त्रास देऊन ते मृत झाल्यावर त्यांना अशी धार्मिक आदरांजली वाहणे हा शुद्ध दांभिकपणा झाला.

(३) आम्ही आज जे जीवन जगत आहोत, ज्या काही थोड्याफार सुखसोयी उपभोगत आहोत त्यामागे आमच्या पितरांचे कष्ट आहेत, त्याग आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पितरांविषयी कृतज्ञ आहोत. त्याच कृतज्ञतेपोटी आज आम्ही  सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आमच्या सर्व पितरांचे स्मरण करून त्यांचे आदराने मनोभावे पूजन करून भावनिक श्रध्देने त्यांना श्राद्धाचा नैवेद्य दाखवत आहोत. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांचे स्मरण व पूजन करणे हे तर वंशजांचे कर्तव्यच आहे असे जर आमचे हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगत असेल तर त्यात चुकीचे काय आहे?

(४) मला माझे आजी-आजोबा आठवत नाहीत तसे माझ्या पत्नीलाही तिचे आजी-आजोबा आठवत नाहीत. त्यांचे फोटोही नाहीत. आम्हा दोघांच्या स्मरणात आमचे आईवडील आहेत, त्यांचा संसार आहे, त्यांनी आम्हाला मोठ्या कष्टाने कसे वाढवले हे सर्व आहे. या आठवणी आम्ही विसरूच शकत नाही. त्या अधूनमधून येतच असतात. पण हिंदू धर्मशास्त्राने पूर्वजांचे स्मरण व पूजन करण्यासाठी वर्षातून ठराविक काळ व त्या काळातला सर्वपित्री अमावास्येचा दिवस ही जी काय वंशजांसाठी सोय करून ठेवली आहे ती चांगलीच आहे.

(५) ही सर्व कारणमीमांसा माझ्या तार्किक मेंदूचे बौद्धिक आहे, पण त्यासोबत माझ्या आईवडिलांबद्दल असलेली माझी कृतज्ञतेची भावनाही आहे. माझ्या पत्नीला मात्र माझ्या बौद्धिक तर्कशास्त्राशी काहीही घेणेदेणे नाही. तिच्याजवळ आहे ती फक्त शुद्ध भावना! म्हणून तिने बाजारातून दाराला लावण्यासाठी आज हार आणला व दारात रांगोळी काढली. याच शुद्ध भावनेने की जणुकाही तिचे आईवडील व माझे आईवडील आज आमच्या घरी येणार आहेत. त्यांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे. मग तिने तिचे आईवडील व माझे आईवडील या चौघांसाठी एकच श्राद्धाचा नैवेद्य बनवला. त्यामागे पुन्हा एकत्र कुटुंबाची भावना! आम्ही तो नैवेद्य आमच्या सदनिकेच्या गॕलरीत त्यांचे स्मरण करीत आदर भावाने ठेवला. उदबत्ती लावून त्या नैवेद्याचे पूजन केले. ते करताना असे वाटत होते की जणूकाही आम्ही आमच्या घरी आलेल्या आमच्या आईवडिलांना घास भरवत आहोत. ही भावना फार महत्त्वाची आहे. याच आदर भावनेला हिंदू धर्मशास्त्राने धार्मिक अधिष्ठान दिले आहे. एवढी साधी गोष्ट काही लोकांना कळत नाही याचे आश्चर्य वाटते.

(६) आज आमच्या आईवडिलांच्या आठवणींने आमचे मन हेलावून गेले व मग माझ्या तोंडून पुष्पांजली या जुन्या हिंदी चित्रपटातील मुकेश या महान गायकाने गायलेले, आनंद बक्षी या मोठ्या गीतकाराने शब्दबद्ध केलेले, लक्ष्मीकांत प्यारेलाल या मोठ्या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले हे दर्दभरे गीत आपोआप बाहेर पडले "दुनिया से जानेवाले, जाने चले जाते है कहाँ"!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०
https://youtu.be/OstZ_yFGa1I

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

तन, मन, धन फॉर्म्युला!

तन, मन, धनाचा फॉर्म्युला वापरा व मैत्री जुळवा आणि टिकवा!

माणसांचे संबंध का दुरावतात या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मानवी संबंध का जुळतात व टिकतात या प्रश्नाकडे वळले पाहिजे. अधिक खोलात जाऊन विचार केला तर बहुतांशी संबंध हे उपयुक्ततेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. आता या संबंधाचा काय फायदा म्हणजे काय उपयोग असा सोयीचा विचार बहुतेक माणसे करतात की नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे. एखाद्या आकर्षणातून एकत्र आलेली माणसे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे आकर्षण हे नव्याचे नऊ दिवस अशा तात्कालिक स्वरूपाचे असते. मग मानवी संबंध कसे जुळतात व ते कसे टिकतात हा विषय महत्त्वाचा ठरतो. मानवी संबंध जुळणे व टिकणे ही एक प्रक्रिया आहे व त्या प्रक्रियेला एक मूलभूत पाया, आधार आहे. हा पाया तीन मूलभूत तत्वांनी बनला आहे. तन-मन-धन हीच ती मूलभूत तत्वे! तन (शरीर) अर्थात शारीरिक उपयुक्तता. उदा. शारीरिक श्रम. मन म्हणजे भावना व बुद्धी यांचे मिश्रण. पण या मिश्रणात  उपयुक्ततेच्या दृष्टीने भावनेपेक्षा बुद्धी वरचढ ठरते. मानवी बुद्धीची उपयुक्तता म्हणजे ज्ञान व बौद्धिक हुशारीची उपयुक्तता. धन म्हणजे पैसा! पैशाने बऱ्याच गोष्टी बाजारातून विकत घेता येतात ज्या गोष्टी मानवी जीवनाला आवश्यक असतात. म्हणून मानवी जीवनात पैशाचे फार महत्व आहे. पण पैशाने मानवी संबंध जुळतात तसे ते बिघडतातही. याचे मुख्य कारण म्हणजे पैशाची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण न होणे. शारीरिक श्रम विकणारे मजूर व बौद्धिक श्रम विकणारे व्यावसायिक अशी तन व मनाची सामाजिक विभागणी करता येईल. या दोन्ही श्रमांना जोडणारा दुवा म्हणजे पैसा अर्थात धन! या तिन्ही गोष्टी जेंव्हा एकत्र येऊन त्यांची व्यावहारिक देवाणघेवाण कायम स्थिर राहते तेंव्हा मानवी संबंध जुळतात व टिकतातही. पण मन म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारख्या व्यावसायिकांचे विशेष ज्ञान व बौद्धिक कौशल्य किंवा हुशारी नव्हे. मानवी संबंधात व्यावहारिक ज्ञान व अक्कलहुशारी ज्याला इंग्रजीत कॉमन सेन्स म्हणतात हाही बुद्धीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या व्यक्तीकडे बुद्धीचा हा मूलभूत भागच नसेल तर मग अशा व्यक्ती बरोबर संबंध जुळणेच कठीण असते, मग ते टिकण्याची तर बातच नाही. हे सत्य आहे की फक्त हवापाण्याच्या मनोरंजक गप्पा मारण्यासाठी एकत्र आलेली मंडळी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. नीट बारकाईने बघितले तर समाज माध्यमांवर अशा मंडळींचा राबता असल्याचे दिसून येते. पण हे संबंध फार तकलादू असतात. म्हणून माझ्या मते फेसबुक मैत्री हा कायम टिकणारा प्रकार नव्हे! तन, मन व धन या तीन गोष्टींना वैवाहिक संसारात सुद्धा खूप महत्त्व आहे. गृहिणी असलेली पत्नी घरात संसारासाठी शारीरिक कष्ट उपसतेय व पती मात्र घराबाहेर जाऊन घरखर्च चालवण्यासाठी पैशाची थोडीही कमाई करीत नाही असा संसार किती दिवस टिकेल? या ठिकाणी मनातील प्रेम भावनेचा (ज्याला सोयीसाठी हृदय असा शब्द वापरलाय) प्रश्न निर्माण होतो. ज्या संबंधात तन (शरीर), मन (बुद्धी) व धन (पैसा) यांची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण सुरळीतपणे व तसेच सातत्याने चालू आहे तिथेच हृदयस्पर्शी प्रेम व त्या प्रेमावर आधारित हृदयस्पर्शी मैत्री निर्माण होऊ शकते व अशी मैत्री कायम टिकूही शकते. अशी मैत्री मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी तन, मन व धनाचा फॉर्म्युला वापरा!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०

फिरूनी नवा जन्मेन मी!

फिरूनी नवा जन्मेन मी!

हो, मी ६४ वयाचा वृद्ध आहे. हेही खरे की, मी सद्या कोरोना साथीने निर्माण केलेल्या भीतीच्या छायेत जगत आहे. पण मला आशा आहे की ही कोरोना साथ लवकर संपेल. साथीची भीती संपल्यानंतरचे ते चांगले दिवस बघायला मी जिवंत असेन. मग माझ्या याच जन्मी मी पुन्हा नव्याने जन्मेन. वृध्दावस्थेतही तरूण होईन. लहरेन मी, बहरेन मी! हो, मी आशादायी आहे! माझ्या याच आशेला बळ देणारे एक जुने सुंदर  मराठी गीत मला सापडले. पुढचं पाऊल या मराठी चित्रपटातील हे गीत आशा भोसले या महान गायिकेने गायले आहे. पण चित्रपटात ते स्त्री कलाकार म्हणते. म्हणून या गाण्याचा मुखडा "एकाच या जन्मीं जणू, फिरूनी नवी जन्मेन मी" असा आहे. मी पुरूष असल्याने फक्त "नवी" या शब्दाच्या जागी "नवा" असा शब्द घालून हे सुंदर गीत गाण्याचा आज प्रयत्न केला. कारण या गाण्यात खूप मोठा अर्थ आहे, आशा आहे जो अर्थ, जी मोठी आशा माझ्या आशेला समर्पक आहे. फिरूनी नवा जन्मेन मी!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.९.२०२०
https://youtu.be/HVsTHmKKYls

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

आयुष्याचे टप्पे व मेंदूतील कप्पे!

आयुष्याचे टप्पे व मेंदूतील कप्पे!

जन्मानंतर सुरू होऊन मृत्यूजवळ संपणाऱ्या मानवी आयुष्याचे काही टप्पे असतात व त्या टप्यांवर जीवन जगताना येणारे आयुष्याचे वेगवेगळे अनुभव असतात. बालपण व शाळा, तरूणपण व कॉलेज, मध्यम व प्रौढ वयातील नोकरीधंदा, व्यवसाय, साठीनंतरची वृध्दावस्था हे मनुष्य जीवनाचे काही ठळक टप्पे. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी मुले, माणसे भेटतात व वेगवेगळे अनुभव येतात. जाणिवा प्रगल्भ होत जातात. आयुष्याच्या या प्रत्येक टप्प्यासाठी मेंदूत स्वतंत्र कप्पे तयार होत जातात. आपण संगणकात विषयानुरूप फोल्डर्स तयार करतो. पण मेंदूत असे फोल्डर्स (कप्पे) आपोआप तयार होतात. बालपणाचा कप्पा उघडला की बालपण आठवते, तरूणपणाचा कप्पा उघडला की तरूणपण आठवते. मग वृध्दापकाळात एकेक कप्पे उघडून त्यात रमता येते. प्रत्यक्षात मात्र त्या संपलेल्या मागच्या टप्प्यांवर उलट वळून मागे जाता येत नाही. पण त्या टप्प्यांचा आभासी अनुभव व आनंद मेंदूतल्या मेंदूत घेता येतो. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा महत्वाचाच असतो. तिथे काही धोकेही असतात. ते नीट ओळखून सरळ मार्गावर रहायचे असते. तरच पुढचा टप्पा सुरळीत पार पडतो. एखादा टप्पा वाईट लोकांच्या संगतीला लागल्याने जीवनाला वाईट वळण लावू शकतो. आपण मिडियात सद्या अंमली पदार्थ व इतर वाईट गोष्टींच्या नादी लागून काही तरूण मंडळी वाया गेल्याचे बघत आहोत. आपण सद्या कोरोना साथीचा भयानक काळ अनुभवत आहोत. पण हा अनुभव लहान मुलांना वेगळा असेल, तरूणांना वेगळा असेल व माझ्या सारख्या वृद्धांना वेगळा असेल. हा अनुभव प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या टप्प्यावर मेंदूत साठवत असेल. त्या टप्प्याचा प्रत्येकाच्या मेंदूत या अनुभवाचा कप्पा तयार होत असेल. पण हा अनुभव भयानक आहे. त्याची आठवण मेंदूच्या कप्प्यात साठली तरी तो कप्पा उघडून त्या अनुभवात रमणे कोणालाही आवडणार नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.९.२०२०

मानवता व कायदा!

मानवतेचे कायदे अधांतरी व न्याय असमान!

मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी हाच खरं तर मानवतेचा मुख्य आधार! सदसद्विवेकबुद्धीचा हा आधार घेऊन पुढे सरकलेल्या मानवतेला समाजमान्यता मिळणे म्हणजे मानवतेचे समाज कायद्यांत रूपांतर होणे. पण राज्यघटनेसह असे समाज कायदे लोकशाही संसदेत संमत झाले की लगेच समाजात मानवता प्रस्थापित झाली असे होत नाही. या समाज कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी हा मानवतेचा पुढचा टप्पा असतो. पण याच टप्प्यावर ही मानवता अधांतरी राहते. लोकशाही संसदेत बहुमतानेच काय पण सर्वमताने संमत झालेल्या समाज कायद्यांची अंमलबजावणी पुढे नीट होईल याची शास्वती नसते. याचे कारण म्हणजे शासन नियुक्त कायदा अंमलदार व लोक यांच्या सदसद्विवेकबुद्धीत असलेली भली मोठी तफावत, असमानता! मानवतेचा प्रमुख आधार काय तर मनुष्याची सदसद्विवेकबुद्धी आणि ही सदसद्विवेकबुद्धीच जर असमान असेल तर मग समाजात मानवता समान कशी राहील? ती कायम अधांतरीच राहते! त्यामुळे मानवतेवर आधारित न्याय सुद्धा कायमच असमान राहतो. मग भले "कायद्यापुढे सगळी माणसे समान" असे कायद्यात भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले का असेना!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०