https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

फिरूनी नवा जन्मेन मी!

फिरूनी नवा जन्मेन मी!

हो, मी ६४ वयाचा वृद्ध आहे. हेही खरे की, मी सद्या कोरोना साथीने निर्माण केलेल्या भीतीच्या छायेत जगत आहे. पण मला आशा आहे की ही कोरोना साथ लवकर संपेल. साथीची भीती संपल्यानंतरचे ते चांगले दिवस बघायला मी जिवंत असेन. मग माझ्या याच जन्मी मी पुन्हा नव्याने जन्मेन. वृध्दावस्थेतही तरूण होईन. लहरेन मी, बहरेन मी! हो, मी आशादायी आहे! माझ्या याच आशेला बळ देणारे एक जुने सुंदर  मराठी गीत मला सापडले. पुढचं पाऊल या मराठी चित्रपटातील हे गीत आशा भोसले या महान गायिकेने गायले आहे. पण चित्रपटात ते स्त्री कलाकार म्हणते. म्हणून या गाण्याचा मुखडा "एकाच या जन्मीं जणू, फिरूनी नवी जन्मेन मी" असा आहे. मी पुरूष असल्याने फक्त "नवी" या शब्दाच्या जागी "नवा" असा शब्द घालून हे सुंदर गीत गाण्याचा आज प्रयत्न केला. कारण या गाण्यात खूप मोठा अर्थ आहे, आशा आहे जो अर्थ, जी मोठी आशा माझ्या आशेला समर्पक आहे. फिरूनी नवा जन्मेन मी!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.९.२०२०
https://youtu.be/HVsTHmKKYls

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

आयुष्याचे टप्पे व मेंदूतील कप्पे!

आयुष्याचे टप्पे व मेंदूतील कप्पे!

जन्मानंतर सुरू होऊन मृत्यूजवळ संपणाऱ्या मानवी आयुष्याचे काही टप्पे असतात व त्या टप्यांवर जीवन जगताना येणारे आयुष्याचे वेगवेगळे अनुभव असतात. बालपण व शाळा, तरूणपण व कॉलेज, मध्यम व प्रौढ वयातील नोकरीधंदा, व्यवसाय, साठीनंतरची वृध्दावस्था हे मनुष्य जीवनाचे काही ठळक टप्पे. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी मुले, माणसे भेटतात व वेगवेगळे अनुभव येतात. जाणिवा प्रगल्भ होत जातात. आयुष्याच्या या प्रत्येक टप्प्यासाठी मेंदूत स्वतंत्र कप्पे तयार होत जातात. आपण संगणकात विषयानुरूप फोल्डर्स तयार करतो. पण मेंदूत असे फोल्डर्स (कप्पे) आपोआप तयार होतात. बालपणाचा कप्पा उघडला की बालपण आठवते, तरूणपणाचा कप्पा उघडला की तरूणपण आठवते. मग वृध्दापकाळात एकेक कप्पे उघडून त्यात रमता येते. प्रत्यक्षात मात्र त्या संपलेल्या मागच्या टप्प्यांवर उलट वळून मागे जाता येत नाही. पण त्या टप्प्यांचा आभासी अनुभव व आनंद मेंदूतल्या मेंदूत घेता येतो. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा महत्वाचाच असतो. तिथे काही धोकेही असतात. ते नीट ओळखून सरळ मार्गावर रहायचे असते. तरच पुढचा टप्पा सुरळीत पार पडतो. एखादा टप्पा वाईट लोकांच्या संगतीला लागल्याने जीवनाला वाईट वळण लावू शकतो. आपण मिडियात सद्या अंमली पदार्थ व इतर वाईट गोष्टींच्या नादी लागून काही तरूण मंडळी वाया गेल्याचे बघत आहोत. आपण सद्या कोरोना साथीचा भयानक काळ अनुभवत आहोत. पण हा अनुभव लहान मुलांना वेगळा असेल, तरूणांना वेगळा असेल व माझ्या सारख्या वृद्धांना वेगळा असेल. हा अनुभव प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या टप्प्यावर मेंदूत साठवत असेल. त्या टप्प्याचा प्रत्येकाच्या मेंदूत या अनुभवाचा कप्पा तयार होत असेल. पण हा अनुभव भयानक आहे. त्याची आठवण मेंदूच्या कप्प्यात साठली तरी तो कप्पा उघडून त्या अनुभवात रमणे कोणालाही आवडणार नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१६.९.२०२०

मानवता व कायदा!

मानवतेचे कायदे अधांतरी व न्याय असमान!

मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी हाच खरं तर मानवतेचा मुख्य आधार! सदसद्विवेकबुद्धीचा हा आधार घेऊन पुढे सरकलेल्या मानवतेला समाजमान्यता मिळणे म्हणजे मानवतेचे समाज कायद्यांत रूपांतर होणे. पण राज्यघटनेसह असे समाज कायदे लोकशाही संसदेत संमत झाले की लगेच समाजात मानवता प्रस्थापित झाली असे होत नाही. या समाज कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी हा मानवतेचा पुढचा टप्पा असतो. पण याच टप्प्यावर ही मानवता अधांतरी राहते. लोकशाही संसदेत बहुमतानेच काय पण सर्वमताने संमत झालेल्या समाज कायद्यांची अंमलबजावणी पुढे नीट होईल याची शास्वती नसते. याचे कारण म्हणजे शासन नियुक्त कायदा अंमलदार व लोक यांच्या सदसद्विवेकबुद्धीत असलेली भली मोठी तफावत, असमानता! मानवतेचा प्रमुख आधार काय तर मनुष्याची सदसद्विवेकबुद्धी आणि ही सदसद्विवेकबुद्धीच जर असमान असेल तर मग समाजात मानवता समान कशी राहील? ती कायम अधांतरीच राहते! त्यामुळे मानवतेवर आधारित न्याय सुद्धा कायमच असमान राहतो. मग भले "कायद्यापुढे सगळी माणसे समान" असे कायद्यात भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले का असेना!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

सदसद्विवेकबुद्धी आपली मार्गदर्शक!

निर्जीव पदार्थांना त्यांचे गुणधर्मच कळतात, त्या पलिकडचे त्यांना कळत नाही. वनस्पतींना जगण्यापलिकडचे काही कळत नाही. पण जगताना स्वसंरक्षण करण्यासाठी त्या असमर्थ असतात. त्या बाबतीत त्या अपंगच! मनुष्य सोडून इतर सजीव प्राणी, पक्षी यांनाही त्यांच्या जगण्यापलिकडचे काही कळत नाही. मात्र जगताना स्वसंरक्षण करण्याची शक्ती व बुद्धी त्यांना प्राप्त असते. माणूस हाही एक सजीव प्राणी असला तरी तो इतर सजीवांपासून वेगळा आहे. इतर सजीवांना स्वतःच्याच जगण्याचा व स्वसंरक्षणाचा स्वार्थ कळतो. माणूस मात्र याला अपवाद आहे. त्याला स्वार्थाबरोबर परमार्थही कळतो. मानवी मनाला चिकटलेल्या उदात्त नैतिक भावना या मनुष्याला परमार्थाचा मार्ग दाखवतात. लैंगिकता, तहान, भूक, झोप इ. जैविक वासना माणसाला स्वार्थ शिकवितात तर प्रेम, करूणा, परोपकार इ. नैतिक भावना त्याला परमार्थ शिकवितात. आस्तिक माणसे देवावर श्रद्धा ठेवतात. त्या श्रध्देतून केलेली देवभक्ती हा सुद्धा त्यांच्या परमार्थाचा विशेष भाग असतो. वासनिक स्वार्थ व भावनिक परमार्थ यांच्यात संतुलन साधण्यासाठी मानवी मनात सदसद्विवेकबुद्धी असते. खरं तर, उदात्त मानवी भावना व सदसद्विवेकबुद्धी या मानवी मनाच्या खास वैशिष्ट्यांमुळे तर माणूस हा इतर सजीवांपासून वेगळा होतो. सदसद्विवेकबुद्धी ही मनुष्याची मार्गदर्शक आहे. जर बुद्धीपासून सदसद्विवेक (सत् सत् विवेक) अलग झाला तर बुद्धी भ्रष्ट होते. ती वासना व भावना यांच्यात नीट संतुलन साधू शकत नाही. ती भरकटते. अंमली पदार्थ सेवन केल्यानंतर हे पदार्थ मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा घेतात व मग बुद्धीला चिकटलेल्या सदसद्विवेकाला बुद्धी पासून अलग करून बुद्धीला एकटे पाडतात. बुद्धी एकटी पडली की तिला नैतिक भावनांचा विसर पडतो व ती वासनांध होते. वासनेच्या आहारी जाऊन ती हिंसकही होते. अशाप्रकारे हे अंमली पदार्थ माणसाचे रूपांतर जनावरात करतात. म्हणून माणसाने नशा आणणाऱ्या या अंमली पदार्थांपासून नेहमी दूर रहावे. अंमली पदार्थ टाळले तरी सदसद्विवेकबुद्धी इतर काही  कारणांमुळे अस्थिर होऊ शकते. उदा. उपद्रवी माणसे व त्यांनी निर्माण केलेली आव्हानात्मक परिस्थिती. अशावेळी देवश्रद्धा उपयोगाला येऊ शकते. निसर्गात देव आहे व देवाची महाशक्ती आपल्याला संकटातून वाचवेल हीच ती श्रद्धा! जेंव्हा आस्तिक माणसाची सदसद्विवेकबुद्धी संकटकाळी अस्थिर होते तेंव्हा आस्तिक तिला देवापुढे घेऊन जातो व देवापुढे नतमस्तक, लीन होऊन त्या सदसद्विवेकबुद्धीला शक्ती, स्थिरता मिळवतो आणि मग स्थिर होऊन संकटाशी सामना करतो. शिवरायांचे मावळे हरहर महादेव म्हणून असेच शत्रूवर तुटून पडायचे. या श्रध्देला कोणी अंधश्रद्धा म्हणणे हे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मानवी मनाला देवाचा  आधार वाटणे यात चुकीचे ते काय? नास्तिक माणसांचा त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रचंड मोठा आत्मविश्वास असणे ही कौतुकास्पद गोष्ट असली तरी त्यांनी आस्तिक मनांना कमकुवत समजू नये किंवा आस्तिकांच्या देवश्रद्धेची चेष्टा करू नये.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

कर्तुत्वाची उंची व उंचीचे पुतळे!

कर्तुत्वाची उंची व उंचीचे पुतळे!

महापुरूषांच्या कर्तुत्वाची उंची पुतळ्यांच्या उंची पेक्षा खूप मोठी आहे. नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मुंबई जवळील अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. दिनांक ११.९.२०२० च्या लोकसत्तेतील बातमीनुसार मुंबईतील इंदु मिल स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. महापुरूषांचे हे भव्य दिव्य पुतळे व त्यांची स्मारके बघण्याचे भाग्य साठी, पासष्टी पार केलेल्या आमच्या सारख्या वृध्दांना आहे की नाही हे कोरोनाग्रस्त काळच ठरवेल! या महापुरूषांच्या कर्तुत्वाची उंची इतकी मोठी आहे की त्या उंचीचे पुतळे उभारणे खरं तर अवघड आहे. पण तरीही पुतळ्यांची ही उंची बघून थक्क व्हायला होते. आपण सर्वसामान्य माणसे महापुरूषांच्या कर्तुत्वाच्या पायाजवळही पोहोचू शकलो नाही आहोत हे सत्य आहे. या महापुरूषांना वंदन!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

सर्पमित्रांचे मानधन!

सर्पमित्र व एकंदरीतच पर्यावरण मित्रांचे मानधन सरकारने निश्चित करावे!

सर्व सर्पमित्रांना माझे अनेक धन्यवाद! साप आणि तेही नाग, घोणस, मण्यार सारखे विषारी साप पकडण्याचे तंत्र अवगत केले तरी ते तंत्र हातात घेऊन अंमलात आणायला फार मोठे धाडस लागते आणि ते या सर्पमित्रांत आहे. पण तरीही  सांभाळून करत जा बाबांनो हे काम! खरं तर या कामाचे मोल पैशात करताच येणार नाही. तरीही सरकारने सर्पमित्रांसाठी व एकंदरीतच पर्यावरण मित्रांसाठी प्रोत्साहनपर मानधन निश्चित केले पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०

संसार मांडते मी!

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते मी संसार मांडते!

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले व आशा काळे यांच्यावर चित्रित झालेले माझ्या आवडीचे हे मराठी गीत! या महान कलाकारांच्या नखाजवळही बसायची  माझी लायकी नाही. पण हे गाणे मला आवडते म्हणून आज सोमवार दिनांक १४.९.२०२० च्या पहाटे घरातच गाण्याचा प्रयत्न केला. कोरोना बाबा अजून अंगाला चिकटला नाही तोपर्यंत त्याच्या भितीच्या छायेतही आनंदाने रहायचा प्रयत्न करायचा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२०
https://youtu.be/q4GWGs8WlhI