वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्टस लिहू नका किंवा शेअर करू नका!
वैयक्तिक चारित्र्य मग ते एखाद्या सेलिब्रिटी कलाकाराचे, खेळाडूचे किंवा राजकारणी व्यक्तीचे असो की सर्वसामान्य व्यक्तीचे असो, ते सार्वजनिक तमाशाचा भाग बनू नये. इतर माध्यमांएवढे समाज माध्यमांवर म्हणावे तसे सरकारी नियंत्रण नाही. त्यामुळे होते काय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाविरूद्ध काहीही गरळ ओकण्यास सदैव तयार असते. नेटिजन्सची खास आचार संहिता असावी काय व तिचे नियमन माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार सरकारने कसे करावे हा वेगळा विषय आहे. पण समाज माध्यमावरील तुमच्या लिखाणातून किंवा तुम्ही शेअर केलेल्या पोस्टस मधून जर कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊन त्या व्यक्तीची जाहीर बदनामी होत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या विरोधी फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला व दिवाणी अब्रू नुकसानभरपाईचा दावा दोन्हीही कोर्टात दाखल करण्याचा हक्क आहे. ही बाब समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या सर्वांनीच नीट लक्षात ठेवावी. "आ बैल मुझे मार" करणे कृपया टाळावे. समाजमाध्यमावर फिरणाऱ्या लेखाखाली लेखक म्हणून कोणाचे तरी नाव टाकले म्हणून तो लेख त्याच व्यक्तीने लिहिला हे ठामपणे सांगता येत नाही. कारण असे नाव म्हणजे हस्तलिखित किंवा डिजिटल सही नव्हे. अशावेळी तो लेख मुळात कोणत्या फेसबुक किंवा इतर समाज माध्यम खात्यावरून प्रसिद्ध झाला त्या उगमस्थानाचा शोध घेतला पाहिजे व असा लेख शेअर करताना खाली टीप म्हणून ते उगमस्थान लिहिले पाहिजे. पण खरं म्हणजे मुळात वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्टस शेअर करूच नयेत. अशा प्रकारच्या शेअरिंग मधून पोस्टस शेअर करणारी व्यक्ती अडचणीत येऊ शकते. सद्या तर काय सेलिब्रिटी लोकांच्या भानगडीत नाक खुपसण्याची सर्वच माध्यमांत चढाओढ लागली आहे. राजकारणी नेते मंडळी यातून कशी सुटतील? मग राजकीय वातावरण तापते. त्यातून हिंसक हाणामाऱ्या सुद्धा होऊ शकतात. हे सगळं आपल्याला सहज टाळता येऊ शकते. त्यासाठी आपण सूज्ञपणे विचार केला पाहिजे. वैयक्तिक बदनामीकारक पोस्टस न लिहिणे किंवा शेअर न करणे हा पळपुटेपणा आहे की सूज्ञपणा आहे याचा तुम्हीच विचार करा!
-ॲड.बी.एस.मोरे©१२.९.२०२०