https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

परप्रांतीय मजूर व मराठी माणूस!

कोरोनामुळे महाराष्ट्रात मराठी माणूस आणखी बेकार होतोय का?

कोरोनाला घाबरून परप्रांतीय कामगारांनी मुंबई  सोडली, महाराष्ट्र सोडला तेंव्हा किती ओरड केली काही लोकांनी! परप्रांतीय कामगारांची कामगार कायद्याप्रमाणे स्थलांतरीत कामगार म्हणून कामगार आयुक्तांकडे नोंदणी होतेय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाला घाबरून आपआपल्या राज्यांत परत जाणारे परप्रांतीय जर महाराष्ट्रात रितसर नोंदले असतील तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी कायद्याने आडकाठी नाही. पण ज्यांची महाराष्ट्रात अशी नोंदच नाही त्यांचे पुन्हा कायदेशीर नोंदणी न करताच स्वागत करणे चालू असेल तर ते फार चुकीचे आहे. मागे मा. राजसाहेब ठाकरे हे या मुद्यावर बोलले आहेत. मला तर यामागे वेगळेच अर्थकारण असल्याचे दिसून येते. इथे मराठी माणसांना डावलून या परप्रांतीयांचे कोरोना लॉकडाऊन काळातच स्वागत होताना दिसत आहे कारण हे मजूर स्वस्तात राबतात. ते स्वस्तात मिळतात कारण त्यांच्या राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्याप्रमाणे उद्योगधंद्याचा विकास झाला नाही. म्हणून तिकडे खूप बेकारी आहे. ते मजूर स्वस्तात काम करतात म्हणून इथल्या व्यापारी, उद्योगपतींना हे परप्रांतीय मजूर फायदेशीर वाटतात. पिळवणूकीवर आधारित असलेल्या या आर्थिक फायद्यासाठी या परप्रांतीयांचे पुन्हा स्वागत करून मराठी माणूस या महाराष्ट्रात बेकार केला जातोय का? परप्रांतीय मजूर पुरवठा करणारे ठेकेदार या परप्रांतीय मजूरांकडून मधल्या मध्ये त्यांच्या स्वस्त पगारातूनही कमिशन खात या परप्रांतीय मजूरांची आणखी पिळवणूक करीत नसतील कशावरून? शिवाय महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भूमीपुत्र या मराठी मातीतच या परप्रांतीय मजूरांच्या स्वागतामुळे बेकार होतोय त्याचे काय करायचे?

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

कोरोना लॉकडाऊन व माझी घसरलेली वकिली!

कोरोना लॉकडाऊन व अर्थप्राप्तीचे कायदेशीर काम हे दोनच विषय सद्या मला महत्त्वाचे!

सद्या कोरोना लॉकडाऊन व पैशाची भ्रांत एवढे दोनच विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत व मुंबईच्या लोकल ट्रेन्स सुरू होत नाहीत तोपर्यंत तरी मला काम मिळणे कठीण आहे. सद्या या लोकल ट्रेन्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालू आहेत. वकील अत्यावश्यक सेवेत मोडत नाही असे हायकोर्टाने जाहीर केलेय. मी कोर्टाच्या बाहेरही कायदा सल्ला व दस्तऐवज बनविणे ही पार्ट टाईम प्रॕक्टिस करू शकतो. इथे डोंबिवली मुक्कामी स्थानिक पातळीवर ते काम मिळत नाही. त्यासाठी मला मुंबईलाच जायला हवे. मला तिकडेच अशाप्रकारचे थोडेफार काम मिळू शकते. म्हणून मी मुंबई लोकल ट्रेन सुरू व्हायची आतुरतेने वाट बघतोय. बाकी आता मला इतर गोष्टींत रस वाटत नाही. माणूस असा बिझी हवा की त्याला त्या कामातून थोडे तरी पैसे मिळाले पाहिजेत. गेली पाच ते सहा महिने मी निर्लज्जासारखा विवाहित मुलीच्या पैशावर जगत घरी बसून आहे. स्वाभिमानी माणसाला हे असे जगणे महाकठीण! आयुष्यात मी कधीही कोणाची मदत घेतली नाही. मी जे कमावले ते स्वतःच्या कर्तुत्वावर! बालपणी आईवडील व म्हातारपणी मुलगी असा मात्र माझ्या मदतीचा भाग झालाय. आईवडिलांचे ठीक आहे कारण आपण त्यावेळी लहान असतो. पण मी ज्ञानाने व अनुभवाने ६४ वर्षे वयाचा टप्पा गाठल्यावर मुलीच्या मदतीवर जगणे हे माझ्या स्वाभिमानी मनाला पटत नाही. वकील मंडळी व वकील संघटनांचीही मदतही मी सविनय नाकारली. ती इतर गरजूंना द्या असे मी त्यांना सांगितले. माझे ज्ञान कमकुवत झालेले मी सहन करू शकत नाही. सद्या एकदम बेकार अवस्था झालीय! मला अॉनलाईन कामे जमत नाहीत. कायद्याचे मोठमोठे दस्तऐवज असतात. फेसबुकवर लेख लिहिणे मला सोपे आहे. पण या उतार वयात ते अॉनलाईन वकिलीचे काम मला अवघड आहे. माझी वकिलीची स्टाईल जुनी आहे. हल्लीचे तरूण वकील या अॉनलाईन वकिलीत हुशार आहेत. तीच तर माझी गोची आहे! मी क्लायंटसोबत प्रत्यक्ष समोरासमोर बसून केस ऐकून क्लायंटला पटकन कायदेशीर सल्ला देऊ शकतो. पण त्यासाठी समोरासमोर बसून केस चर्चा महत्त्वाची असते. मग त्या चर्चेत (कॉन्फरन्स) मी दिलेल्या सल्ल्यानुसार कंपनीचाच टायपिस्ट तिथे हजर असतो. मग मी सांगेन त्याप्रमाणे तिथे कोर्टाचे प्रोसिंडिंग्ज, दस्तऐवज बनतात. मी मुख्यतः कायदेशीर दस्तऐवज व कोर्टाचे सिव्हिल प्रोसिडिंग्ज ड्राफ्ट करतो व चर्चेतून कायदेशीर सल्ला देतो. हाच तर माझा अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे. मुंबईत सॉलिसिटर फर्म्स असे काम करतात. मी सॉलिसिटर नसलो तरी माझे काम त्याच स्वरूपाचे आहे. लिगल ड्राफ्टिंग व कोर्ट ब्रिफिंग कामात मी तज्ञ आहे. असे उच्च कायदेशीर काम फक्त मुंबईतच मी मिळवलेय व यापुढेही ते मी मिळविणारच! कृपया ही माझ्या कामाची जाहिरात आहे असे कोणीही समजू नये. मन मोकळे करावे वाटले म्हणून थोडे सविस्तर लिहिले आहे. एवढे मात्र खरे की हा सद्याचा काळ मलाच नाही तर सगळ्यांसाठीच खूप कठीण आहे. मिडियात मात्र दुसरेच विषय घोळून घोळून चवीने चघळले जात आहेत. मला तर तो टी.व्ही. बघू वाटत नाही की वर्तमानपत्र उघडून वाचू वाटत नाही. मला वाटतेय की, अॉक्टोबर महिन्यापासून हळूहळू गाडी रूळावर येईल. तोपर्यंत आशेने वाट बघतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

मैं तो चला जिधर चले रस्ता!

मैं तो चला जिधर चले रस्ता!

कोरोनाला किती घाबरून राहू? मरण तर आज नाहीतर उद्या कधीही येऊ शकते. मग आहे तो दिवस, आहे तो क्षण आनंदात का घालवू नये? कोरोनामुळे व त्याच्या लॉकडाऊनमुळे मला आता पुढे कोणतेच ध्येय दिसत नाही. मी आता कोणत्याच मैफिलीत सामील होऊ शकत नाही. मग माझे मन काय म्हणणार? जिथे रस्ता नेईल तिकडे मी चाललो! म्हणून तर आज दिनांक ६ सप्टेंबर २०२० च्या सकाळी सूर्याची किरणे अंगावर घेत घरात बसूनच धडकन या जुन्या हिंदी चित्रपटातील हेच गाणे गुणगुणलो "मै तो चला जिधर चले रस्ता"!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

https://youtu.be/GTj1Ki5MMMM

मैं तो चला जिधर चले रस्ता!

जेंव्हा सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे होतात!

मानवी मनाच्या लोखंडासारख्या जड भौतिक वासना व हवेसारख्या हलक्या आध्यात्मिक भावना यांच्या भरकटण्यावर नियंत्रण ठेवणारी व त्या दोघांत समन्वय व संतुलन साधणारी स्वतंत्र बुद्धी हीच सदसद्विवेकबुद्धी होय. ही स्वतंत्र बुद्धी जेंव्हा कोमात जाते किंवा काही काळापुरती रिकामी होते तेंव्हा तिचे दोन तुकडे होतात. सदसद्विवेकबुद्धीचा एक तुकडा जड वासनांबरोबर वाहत जातो व दुसरा तुकडा हलक्या भावनांबरोबर वाहत जातो व हे दोन्ही तुकडे मनाबरोबर भरकटले जातात. वासनिक व भावनिक मनावरील सदसद्विवेकबुद्धीचा ताबा सुटणे यालाच बुद्धीचे भरकटणे म्हणतात. अशा अवस्थेत वासनांध व भावना वेडे मन हे बुद्धीचा ताबा घेते व बुद्धीच्या दोन तुकड्यांना मनाप्रमाणे नाचवते. स्वतंत्र कार्य करणाऱ्या सदसद्विवेकबुद्धीचे दोन तुकडे झाले की काय होते तर माणूस एकतर इहवादी बनतो किंवा देवभोळा किंवा अती नैतिक होतो. खरं म्हणजे इहवाद (मटेरियलिजम) हे निसर्गाचे पूर्ण विज्ञान नसून ते बुद्धीचे जड वासनेबरोबर भरकटणे होय. तसेच देवभोळेपणा किंवा अती नैतिकता (स्पिरिच्युअलिजम) ही आध्यात्मिकता नसून ते बुद्धीचे हलक्या भावनेबरोबर भरकटणे होय.

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

टीपः

माझ्या या लघु लेखाला १९७२ साली प्रदर्शित झालेल्या धडकन या चित्रपटातील संजय खान या नटावर चित्रित केलेले "मैं तो चला जिधर चले रस्ता" हे गाणे प्रातिनिधीक म्हणून घेतले आहे. आपल्या मनाला निश्चित ध्येय नसेल तर आपले मनही असेच जिथे रस्ता फुटेल तिथे भरकटते. आपली सदसद्विवेकबुद्धी जेंव्हा रिकामी होते व तिचे दोन तुकडे होतात तेंव्हा मग मन जिकडे धावेल तिकडे बुद्धीचे हे दोन तुकडेही भरकटलेल्या अवस्थेत धावत जातात. कारण मनाला निश्चित ध्येय सांगणारी व त्या ध्येयाच्या दिशेने योग्य मार्ग दाखविणारी स्वतंत्र   सदसद्विवेकबुद्धी जाग्यावर नसते. मग  काय, मैं तो चला जिधर चले रस्ता!

-ॲड.बी.एस.मोरे©६.९.२०२०

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

लोकल ट्रेन्सचा प्रवास व कोरोनाचे सुरक्षित अंतर?

लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?

हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच  घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

टीपः

माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

विचारपुष्पांची ओंजळ!

विचारपुष्पांची ओंजळ, विविध विषयांवरील चौफेर लिखाण असलेले एक सुंदर पुस्तक!

(१) विचारपुष्पांची ओंजळ हे २२९ पानांचे पुस्तक माझे फेसबुक मित्र श्री.सुधीर ना. इनामदार यांनी मला सोलापूरवरून माझ्या डोंबिवलीच्या घरी स्पीड पोस्टने पाठवून दिले. गेले आठवडा त्या पुस्तकाचे वाचन चालू होते. आज शिक्षक दिनी (५ सप्टेंबर २०२०) रोजी या पुस्तकाचे वाचन संपले हा एक सुंदर योगायोग! माझी श्री. इनामदार यांच्याशी फेसबुकवरच बहुतेक दोन वर्षापूर्वी मैत्री झाली. ते वयाने माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठे आहेत त्यामुळे परिपक्वता या निकषावर माझ्या जवळच! शिवाय ते सोलापूर न्याय खात्यातून प्रबंधक (अधिकारी वर्ग १) या उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत व मी वकील त्यामुळे कायदा व न्याय या विषयाच्या निकषावर आणखी जवळीक! शिवाय ते मूळ सोलापूरचे स्थायिक व पंढरपूर त्यांचे आजोळ आणि माझे बालपण पंढरपूरी गेले आहे. ती गावच्या मातीची ओढ ही मैत्री आणखी जवळ करीत गेली. आणि शेवटचा निकष म्हणजे तेही फेसबुक लेखक आणि मीही फेसबुक लेखक! या सर्व गोष्टींमुळे ही फेसबुक मैत्री तशी थोडी हटकेच!

(२) हे पुस्तक म्हणजे श्री. इनामदार यांच्या फेसबुक लिखाणाचे संकलन आहे. वैयक्तिक नातेसंबंध इथपासून ते न्याय खात्यातील त्यांचे नोकरीचे विविध अनुभव, सामाजिक जाण व संवेदनशीलता असल्याने विविध सामाजिक विषय, भारतातील विविध ठिकाणी केलेल्या प्रवासाचे वर्णन, बालपणीचे त्यांचे गरिबीचे दिवस इत्यादी विविध विषयांवरील चौफेर लिखाणामुळे हे पुस्तक नुसते वाचनीयच नव्हे तर ज्ञान वर्धक व मनाला प्रगल्भ, परिपक्व करणारे झाले आहे. काही लेख वाचताना तर जणूकाही तो अनुभव मीच घेतोय असा भास झाला. विशेष करून पान क्रमांक २१० व २११  वर असलेला त्यांचा "आर्थिक विवशता" हा लेख तर अक्षरशः माझाच बालपणीचा अनुभव आहे. लेखक इनामदार यांचे वडील सोलापूर येथील लक्ष्मी मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते तर माझे वडील मुंबईतील व्हिक्टोरिया मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. त्यावेळी मिलच्या सोसायटी कडून मिळणारे रेशन, मिलमधील सावकारी कर्ज वगैरे गोष्टी मीही प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. हा लेख मला स्वतःचाच वाटला म्हणून मी तो इथे पोस्ट करीत आहे.

(३) हे पुस्तक म्हणजे प्रस्तुत लेखकाचे एक छोटेसे आत्मचरित्रच आहे असे मला वाटते. कसलाही संकोच न करता त्यांनी त्यांचा जीवनपट या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या वाचकांसाठी उघड केला आहे. पण त्यामध्ये आत्मप्रौढी बिलकुल नाही. ज्ञानाने प्रगल्भ, अनुभवाने संपन्न, बालपणी गरिबी अनुभवली तरी आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाचा उच्च आर्थिक स्तर व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी म्हणून सरकारी पेन्शनची सुरक्षितता अनुभवत पुण्याजवळ तळेगाव-दाभाडे येथील लॕटिस या सुंदर गृहसंकुलात २ बीएचके सदनिकेतील व त्या सुंदर परिसरातील सुखवस्तू जीवन, एक मुलगा सोलापूरात व दोन मुली पुण्यात उच्च विद्याविभूषित, हुशार व प्रेमळ नातंवडे, चांगले प्रेमळ नातेवाईक या एवढ्या चांगल्या गोष्टी जवळ असूनही अहंकाराचा लवलेशही नाही. मनाने सरळसाधा व प्रामाणिक माणूस! हे या लेखकाचे व माझ्या फेसबुक मित्राचे थोडक्यात वर्णन!

(४) योगायोगाने आज ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे व या पुस्तकाचे लेखक श्री. सुधीर ना. इनामदार यांनी त्यांच्या ज्ञान प्रगल्भ व अनुभव संपन्न जीवनपटातून माझा आणखी एक शिक्षक होण्याचे काम केले आहे. म्हणजे तेही माझे गुरूजी झाले. या पुस्तकाने माझे ज्ञान आणखी प्रगल्भ झाले, अनुभव आणखी संपन्न झाला व विचार आणखी परिपक्व झाले. फेसबुकचा वापर कसा करायचा व फेसबुक लिखाणाचे लोकांच्या लक्षात राहील असे सुंदर छापील पुस्तक कसे बनवायचे हे श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडूनच शिकावे. मीही फेसबुक वर लिहित असतो. माझेही गेल्या पाच वर्षांत  ५०० च्या वर लेख व असंख्य विचार वाक्ये फेसबुकवर लिहून झालीत. पण त्या प्रदीर्घ लिखाणाचे मला पुस्तक काही बनवता आले नाही ही माझी वैयक्तिक खंत आहे. श्री. सुधीर ना. इनामदार यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने  कदाचित माझ्या फेसबुक लिखाणाचीही पुस्तके  बनतील अशी आशा व्यक्त करून मी या सुंदर पुस्तकावरील माझे मनोगत इथेच संपवतो. या पुस्तकाच्या लेखकास व माझ्या या फेसबुक मित्रास उत्तम आरोग्य व भरपूर आयुष्य लाभो व त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचे काम असेच आणखी होत राहो ही परमात्म्याजवळ प्रार्थना!

-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा?

आधी पोटोबा, मग विठोबा ही म्हण मराठीत  प्रचलित आहे. तिच्या मागे खूप मोठा अर्थ दडला आहे. आपले शरीर, त्या शरीरात मन व त्या मनात आत्मा ही साखळी काही लोकांच्या डोक्यातच जात नाही. मनुष्याचा मेंदू व इतर प्राण्यांचा मेंदू यात फार फरक आहे. मानवी मेंदू   हा मोठा मेंदू व छोटा मेंदू या दोन भागांत आहे. आपला छोटा मेंदू आपल्या नकळत आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया पार पाडत असतो. त्याचे कार्य मोठ्या मेंदूशी संलग्न असले तरी ते बहुतांशी स्वतंत्र असते. आपला मोठा मेंदू मात्र तो काय करतोय याची आपल्याला जाणीव करून देत असतो. तो जाणीवपूर्वक आपल्या नुसत्या शरीराच्याच नव्हे तर आपल्या जाणिवेत असलेल्या मनाच्याही ऐच्छिक क्रिया पार पाडत असतो. जिथे जाणीव तिथे मन! छोटा मेंदू जर जाणीवच करून देत नाही तर मग त्याला मन आहे हे कसे म्हणावे? म्हणूनच माझ्या मते, आपले मन हे जाणीवपूर्वक ऐच्छिक शारीरिक व ऐच्छिक मानसिक क्रिया पार पाडणाऱ्या आपल्या मोठ्या मेंदूतच असते. मोठ्या मेंदूत असलेल्या या मनाच्या जाणिवा माझ्या मते दोन प्रकारच्या असतात. एक असते ती भौतिक जाणीव म्हणजे तहान, भूक, लैंगिक समाधान यासारख्या कनिष्ठ पातळीवरील शारीरिक वासनांची प्राथमिक जाणीव व दुसरी म्हणजे प्रेम, करूणा, देव, धर्म, देश यासारख्या उच्च पातळीवरील मानसिक भावनांची दुय्यम परंतु श्रेष्ठ जाणीव! ही श्रेष्ठ जाणीव मानवी नैतिकता व ज्यांची देवावर भावनिक श्रद्धा आहे त्यांची देवधार्मिक आध्यात्मिकता यांच्याशी निगडीत असते. मोठ्या मेंदूतील मानवी मनाची ही दुय्यम पण उच्च स्तराची श्रेष्ठ जाणीव हाच तर आत्मा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हा आत्मा नसेल तर माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. आपण ज्याला माणुसकी वगैरे म्हणतो ही याच आत्म्याची उच्च स्तरीय श्रेष्ठ जाणीव व अभिव्यक्ती आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. मग आधी पोटोबा व मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय तर अगोदर शारीरिक गरजा भागवायच्या व त्यानंतरच मानसिक भावनांचा आदर करायचा. म्हणजे अगोदर आपल्या  मनाच्या शारीरिक वासनांची तृप्ती करायची व नंतर मनात असलेल्या आत्म्याच्या आध्यात्मिक  भावनांचे समाधान करायचे. पण असे करून चालेल काय? म्हणजे आपल्या शरीराची भूक किंवा लैंगिकता यांची तृप्ती करताना आत्मा हळूच बाजूला काढून ठेवायचा व मग शारीरिक तृप्ती झाली की मग आत्म्याचे भजन करायचे. याचा अर्थ असाही होईल की एखाद्याने वारकरी संप्रदायाची विठ्ठल माळ गळ्यात घालायची व मटण खाऊ वाटले की ती विठ्ठल माळ हळूच गळ्यातून काढून खुंटीला अडकवायची, मग मटण खायचे व नंतर अंघोळ करून शुद्धीकरण  भास करून घेत गळ्यात पुन्हा ती विठ्ठल माळ घालायची. यालाच आत्म्याला तात्पुरते खुंटीवर टांगणे असे म्हणतात. मनुष्याचे वासनिक मन व भावनिक आत्मा या दोन गोष्टी जाणीवपूर्वक ऐच्छिक काम करणाऱ्या मोठ्या मेंदूतून अलग करता येत नाहीत. कारण त्या संलग्न असतात. वासनिक मन व आध्यात्मिक आत्मा यांना जोडणारा एक दुवा मोठ्या मेंदूत असतो ज्याला सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. जनावरांच्या मेंदूत फक्त बुद्धी असते व ती त्यांच्या वासनिक मनाशी निगडीत असते. त्यांना आध्यात्मिक आत्माच नसतो व त्यामुळे सदसद्विवेकबुद्धी असण्याचा तिथे प्रश्नच नसतो. म्हणून जीवो जीवस्य जीवनम हा नियम फक्त जनावरांना लागू होतो. तो उच्च पर्यावरणीय पातळीवरील माणसांना लागू होत नाही. तसे जर असते तर जगात कधीही माणुसकी दिसली नसती. सर्व माणसे हिंस्त्र झाली असती व त्यांनी एकमेकांना खाल्ले असते. ही हिंस्त्र वृत्ती एखाद्या माणसात जेंव्हा जागृत होते तेंव्हा समजावे की त्याची सदसद्विवेकबुद्धी काही काळ नाहीशी झाल्याने अशा माणसाने स्वतःचा आत्मा खुंटीला टांगून ठेवलाय. स्त्री व पुरूष जेंव्हा विवाह करतात तेंव्हा त्यांच्या लैंगिक वासना व आध्यात्मिक भावना यांचा संगम होतो. विवाहात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या व एकमेकांशी निगडीत असतात. या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडणारी वैवाहिक  सदसद्विवेकबुद्धी पती व पत्नी दोघांतही असेल तरच त्यांचा विवाह कायम टिकतो, नाहीतर मग घटस्फोट होतो. काही मानसशास्त्रज्ञ बुद्धीचे वासनिक बुद्धी व भावनिक बुद्धी असे दोन भाग करून मग वासनिक बुद्धीचे मोजमाप इंटेलिजन्स क्वोशंटने (आय. क्यू.) करतात व भावनिक बुद्धीचे मोजमाप इमोशनल क्वोशंटने (इ.क्यू.) करतात. पण दोन्ही बुद्धी या एकत्रच काम करतात व त्यांची सदसद्विवेकबुद्धी बनते त्या सदसद्विवेकबुद्धीचे मोजमाप कोण व कसे करणार? म्हणून म्हणतोय की मन व आत्मा या दोन गोष्टी व तसेच त्यांना नेहमी एकत्र ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी यांना अलग करता येत नाही. कोणी तसे अलग केले की माणूस हा माणूस रहात नाही. तो जनावर होतो. मनाचे ऐहिक सुख व दुःख व त्यासोबत असलेल्या आत्म्याचे आध्यात्मिक समाधान व शांती या गोष्टी जिथे एकत्र नांदतात तिथे माणूस होतो. म्हणून आधी पोटोबा व मग विठोबा ही मराठी म्हण माझ्या  सदसद्विवेकबुद्धीला पटत नाही. पोटोबा व विठोबा दोन्हीही गोष्टी एकत्रच हव्यात अर्थात मन व आत्मा हे दोघेही एकत्रच नांदले पाहिजेत अशी माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.९.२०२०