https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ जुलै, २०२०

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

मी माझे खरे अनुभव समाज माध्यमावर शेअर करतो ते माझे दुःख हलके करण्यासाठी मुळीच नाही. माझे वय ६४ आहे. आता कसले आले आहे दुःख हलके करणे? खूप गोष्टी पचवल्यात या आयुष्याने! पूर्वी कुठे होती समाजमाध्यमे वैयक्तिक दुःख हलके करायला? तेंव्हा स्वतःचे दुःख हलके करणे हा माझ्या सत्य लिखाणाचा हेतूच नाही. माझे अनुभव हे आत्मचरित्र म्हणून मी समाज माध्यमावर माझ्या पोस्टसमधून खुले करतो जेणे करून इतर समदुःखी लोकांना हलके वाटेल हे जाणून की कोणीतरी आहे तिथे जे आपलेच दुःख भोगतोय आणि दुसरा हेतू हा की इतर लोक माझ्या अनुभवातून अगोदरच सावध होतील. या गोष्टी लोकांपासून लपवून वर जायचे का? छे, ही तर स्वतःचीच शुद्ध फसवणूक झाली! अशा खोट्या चेहऱ्याने जगून काय उपयोग? लोक माझ्यासारखे जर मोकळे झाले असते तर जगातील बऱ्याच आत्महत्या थांबल्या असत्या. पण लोक खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसतात, उगाच लाजतात, घाबरतात व खोटे जीवन जगतच मरतात. मला असे जगणे आवडत नाही म्हणून मी हा असा आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.७.२०२०

मंगळवार, २८ जुलै, २०२०

आजपासून सर्व नातेवाईक ब्लॉक!

आजपासून सर्व नातेवाईकांना मी ब्लॉक करीत आहे!

(१) मित्रांनो, आज मी तुम्हाला मनातले सांगत आहे. मी लहानपणापासून न घाबरता मला जे योग्य वाटले त्याप्रमाणेच वागत आलो. खोट्या चेहऱ्यांनी फिरत खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसणाऱ्या समाजातील ढोंगी माणसांचा मला पहिल्यापासूनच तिटकारा आहे. गुंड, मवाली लोक स्वतःला साजूक तुपातले म्हणवून घेत नाहीत. आम्ही तसेच आहोत हे ते सांगतात. ते स्वतःचे खरे रूप झाकत नाहीत. त्यामुळे निदान  त्यांच्यापासून थोडे सावध तरी राहता येते. पण डबल ढोलकी माणसांचे काय? म्हणून मनात एक आणि ओठात दुसरे असणाऱ्या खोट्या चेहऱ्याच्या ढोंगी माणसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते.

(२) मी जो वकील झालो आहे तो मी माझ्या स्वकष्टाने व स्वतःच्या हिंमतीवर झालो आहे. माझे लहानपणापासून बाहेर काम करून मी माझे शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरात दोन वेळेचे जेवण मिळत होते हाच तो काय घरचा पाठिंबा! मला इतर भावंडे होती पण ती दहावी, अकरावी पर्यंत कशीबशी येऊन पोहोचली आणि तिथेच ठप्प झाली. म्हणजे शेवटी शिक्षण हे तुम्हाला तुमच्या कष्टानेच घ्यावे लागते. माझ्या शाळेची, कॉलेजची फी मी स्वतः बाहेर काम करून भरली आहे. माझ्या शालेय जीवनात सुद्धा मी प्रौढ साक्षरता वर्ग घेत होतो व त्यातून दरमहा  ५० रूपये मिळायचे त्यातून शाळेची फी भरत होतो. मी वकील होण्याला तर मला घरातूनच विरोध होता. नातेवाईकांचे तर विचारूच नका. याला भिकेचे डोहाळे लागले असे म्हणून जवळच्या लोकांकडूनच माझा अपमान झाला, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी डगमगलो नाही. लहानपणापासूनच आत्मनिर्भर झाल्याने घरातील लोकांची वा इतर कोणाचीही पर्वा न करता मी वकील झालो व माझ्या पद्धतीने या आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहिलो. यात मला ना माझ्या आईवडिलांची मदत झाली ना कोणा नातेवाईकाची. वकिलीत सुध्दा काँग्रेसचे तत्कालीन बडे प्रस्थ बॕ. ए. आर. अंतुले यांच्या विरूद्ध सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल करणे असो किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे असो या सर्व गोष्टी मी एकट्याच्या हिंमतीवर केल्या. यात घरातल्या माणसांचा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांचा सहभाग नव्हता की पाठिंबा नव्हता.

(३) पण मी कृतघ्न नाही. लग्न झाल्यावर मला वकिलीत कमी पैसे मिळत असल्याने माझी व माझ्या बायकोची भांडणे व्हायची. माझा हा स्वभाव असा बंडखोर असल्याने त्याचा माझ्या बायकोला खूप त्रास व्हायचा. मग आमची ती भांडणे आमच्या नातेवाईकांपर्यंत जायची. मग मला संसाराच्या दोन गोष्टी सुनवल्या जायच्या. काहीवेळा नातेवाईकांबरोबर उसनवारीही झाली आहे. पण मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीत. सगळ्यांचे उसने पैसे चुकते केले. पण माझीही एक वकील व धडपड्या, धाडसी माणूस म्हणून  माझ्या नातेवाईकांना काही ना काहीतरी मदत झालीच आहे. बाहेरच्या जगाबरोबर ९० टक्के देवाणघेवाण सुरू असताना नातेवाईक मंडळी बरोबर निदान १० टक्के तरी देवाणघेवाण ही होणारच ना!

(४) या पार्श्वभूमीवर २६ व २७ जुलै, २०२० च्या मध्यरात्री मी एका महिला फेसबुक फ्रेंडच्या हनी ट्रॕप मध्ये सापडलो. एकवेळ समाजात माझी बदनामी झाली तरी चालेल पण ही गोष्ट  समाज हिताच्या दृष्टिकोनातून उघड करायचीच या हेतूने मी लगेच फेसबुकवर ती पोस्ट टाकली व नंतर स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला याबाबत ईमेलने अॉनलाईन तक्रारही केली. सामाजिक हितासाठी हे रॕकेट उघड झालेच पाहिजे म्हणून मी जे सत्य घडले ते न घाबरता उघड केले आहे. पण हे सत्य उघड केल्याने माझ्यासारखा माणूस आपला नातेवाईक असल्याची लाज माझ्या कोणत्याही  नातेवाईला वाटू नये किंवा त्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी आजपासून माझ्या सर्व नातेवाईकांना माझ्या फेसबुक व व्हॉटसअप खात्यांवरून ब्लॉक करीत आहे.

(५) आता माझे एकट्याचे काय व्हायचे ते होऊनच जाऊद्या. नाहीतरी मला आयुष्यात तग धरून राहण्यासाठी बाहेरच्या क्लायंटस व मित्र मंडळींनीच आधार दिला आहे. शेवटी "एकला चलो रे" हेच माझे खडतर जीवन आहे. माझ्या मयताला कोणीही नातेवाईक हजर असण्याची मला बिलकुल गरज नाही. नाहीतरी मेल्यावर आपल्या डेड बॉडीचे काय होते हे मेलेल्या माणसाला कळतच नाही. मग मी नातेवाईक मंडळीनी माझ्या मयताला यावे म्हणून माझ्या बिनधास्त जगण्याला का आवरावे? पण माझ्या या अशा बिनधास्त जगण्याने माझ्या नातेवाईक मंडळींची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांना मी आजपासून ब्लॉक करीत आहे. पण नातेवाईक ज्या गावात, शहरात, विभागात राहत आहेत तिथले माझे मित्र मात्र बिलकुल ब्लॉक होणार नाहीत याची नातेवाईक मंडळींनी नोंद घ्यावी.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०

सोमवार, २७ जुलै, २०२०

निवडक मित्रांसाठीच हे फेसबुक खाते!

काही निवडक मित्रांसाठीच आहे हे फेसबुक खाते!

(१) माझ्या या फेसबुक खात्यावर फक्त काही निवडक व्यक्तीच माझे मित्र आहेत, बाकीची मंडळी नुसती नावापुरती आहेत ही गोष्ट मला माहित आहे. माझ्या रोजच्या विचारांतून या काही निवडक मित्रांशी मी बोलत असतो व त्यामुळे माझ्याशी वेगळे वैयक्तिक बोलण्याची तशी गरज नाही. आता फेसबुक इनबॉक्स चॕटिंग नकोच नको!

(२) काल मध्यरात्री (२६ व २७ जुलैच्या मधली रात्र) मला हनी ट्रॕप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मागे एका माणसाने इनबॉक्स मध्ये अगोदर चांगले बोलून अचानक होमो लैंगिकतेचे फोटो पाठवले. कोणाला कसा ओळखू आणि कितीजणांना ब्लॉक करीत बसू? ६४ वय होऊन अनुभवाने परिपक्व व ज्ञानाने प्रगल्भ झालो असलो तरी शेवटी मीही एक माणूसच आहे ना! असे काही विचित्र घडले, माझ्या पोस्टसवर कोणी काही विचित्र कमेंटस केल्या की मग मी वैतागून जाऊन फेसबुक खातेच बंद करून टाकतो. पूर्वी पण अशाच काही गोष्टींमुळे वैतागून जाऊन मी माझी दोन फेसबुक खाती कायमची बंद केली. पण विचार थांबत नाहीत. ते लोकांना सांगावेसे वाटतात म्हणून पुन्हा हे तिसरे फेसबुक खाते उघडले. पण त्यालाही काल दृष्ट लागली. हनी ट्रॕपच्या जाळ्यात काल कसा ओढला गेलो हे कळलेच नाही. मग रात्रभर झोप आली नाही. सकाळी नाष्टा वगैरे न करता स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला तक्रार केली.

(३) माझ्या सततच्या विचारांतूनच या काही निवडक फेसबुक मित्रांशी माझी मैत्री सुरू आहे. मी आता व्हॉटसअप पण कमी करणार आहे. नको ते गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे औपचारिक संदेश व नको ती इकडून तिकडून फिरणारी माहिती! पूर्वी आमच्या काळात ही समाजमाध्यमे नव्हती तेच खूप चांगले होते. पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांतून होणारा संवाद खूप जवळचा वाटायचा. समोरासमोर बोलणे व्हायचे तेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्यक्ष बघायला मिळायचे. त्यामुळे फसगत होत नसायची. आता या अॉनलाईन संवादात समोरची व्यक्ती तिकडून कोणत्या मूड मध्ये आहे, तिच्या मनात काय चाललेय, ती पुढे काय करणार आहे याचा अंदाजच येत नाही. मला तर मोबाईल वरून स्क्रीन शॉटस कसे घ्यायचे हेही माहित नव्हते. एका फेसबुक मित्रानेच ते शिकवले. ते माहित नसते तर मला काल त्या हनी ट्रॕप चॕटिंगचे पुरावेच ठेवता आले नसते. मग माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. या सर्व गोष्टी फार भयंकर आहेत. काय पण अनुभव! माणसे पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलीत! अॉनलाईन व्यवहार तर मला जमतच नाहीत. मला कधी एटीएम ने बँकेतून पैसे काढता आले नाहीत.

(४) अशा परिस्थितीत मी या अॉनलाईन समाज माध्यमावर का रहावे आणि कशासाठी रहावे? फक्त ज्ञान व अनुभवावर आधारित माझे विचार मांडण्यासाठी? पण आज माणसाला चांगल्या विचारांचे कोठे सोयरसुतक आहे! काहीजण मलाच म्हणतील की, अहो मोठमोठे विचार मांडणारे तुम्ही हनी ट्रॕप मध्ये असे कसे हो सापडलात? त्यामुळे मित्रांनो, आता माझ्याशी फेसबुक इनबॉक्स, व्हॉटसअप वर संवाद करू नका. माझ्या पोस्टस आवडल्या तर लाईक करा. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. म्हणून मी फेसबुक सारख्या समाज माध्यमावर आहे. पण मला अॉनलाईन जग हे आता खूपच आभासी वाटू लागलेय. औपचारिकता खूपच भरलीय या जगात! इथे निर्मळ मैत्री हे केवळ मृगजळ आहे.

(५) पण याच फेसबुकने मला काही चांगले मित्र दिले. कालच्या घडलेल्या प्रसंगात हेच मित्र पुढे आले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला आधार दिला. दोन वकिलांनी तर प्रत्यक्ष फोन करून मला स्थानिक पोलीस स्टेशन, सायबर क्राईम सेल चे ईमेल आयडी पाठवून ईमेलने पोलीस तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले, धीर दिला. माझे काही मनसैनिक मित्र, मैत्रिणींनी त्या हनी ट्रॕपवाल्या फेक फेसबुक अकाऊंटसचा पाठलाग केला. हे खरे प्रेमही मला याच अॉनलाईन जगातील फेसबुक वर मिळाले. त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी वाईट  नाहीत व सगळीच माणसे ढोंगी नाहीत. पण इथे सावधानता ही खूप महत्त्वाची!

(६) माझ्या या तिसऱ्या फेसबुक अकाऊंटसवर या कोरोना लॉकडाऊन काळात पटापट झालेले माझे मित्र किती तर जवळजवळ ३४०० व मला माझ्या कालच्या हनी ट्रॕप प्रसंगात माझ्या त्या जाहीर पोस्टवर मला जाहीर पाठिंबा देणारे मित्र  किती तर जवळपास फक्त १५० च! म्हणजे फेसबुकवर माझे खरे मित्र किती तर फक्त ४ टक्केच! मग बाकीच्या ९६ टक्के  लोकांना मित्र म्हणून उगाच का मिरवत बसू? या ९६ टक्के तथाकथित मित्रांना हळूहळू रामराम करायला हवा! वेळ मिळेल तसे ते काम करणे आवश्यक झालेय. आता यापुढे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे हेच आव्हान असणार आहे. कारण बरीच मंडळी माझ्या पोस्टस, माझे विचार वाचून फ्रेंड रिक्वेस्टस पाठवत असताना दिसत नाहीत.

(७) महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारून काहीही वैचारिक सुसंवाद निर्माण होत नाही. एकतर माझे ९५ टक्के लिखाण हे मराठीत असते. मी काय लिहितोय हेच त्यांना कळत नाही. आता परप्रांतातील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना वकील हाच निकष ठेवावा तर त्यातही भाषेची अडचण येतेच. शेवटी माझी मातृभाषा मराठी! म्हणून मायबोली मराठी हीच माझ्या लिखाणासाठी मला योग्य व सोपी भाषा आहे. इंग्रजी भाषा ही फक्त काही कायदेशीर व्यवहारासाठी वापरायची. बाकी इतर ठिकाणी फक्त आणि फक्त मराठी भाषाच वापरायची! बाकी या तथाकथित ९६ टक्के मित्रांना हळूहळू रामराम कसा करायचा ही आणखी एक नवीन डोकेदुखी! कारण जर कोणाला अनफ्रेंड करायचे असेल तर प्रत्येक खात्याला स्पर्श करावा लागतो. आता एवढ्या खात्यांना स्पर्श करणे म्हणजे महादिव्यच! मग या खोट्या, वरवरच्या फेसबुक मित्रांना असेच नावाला ठेऊन पुढच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना काळजी घेणे एवढेच सद्या तरी ठीक वाटतेय! माझे काही निवडक चांगले फेसबुक मित्र इथे आहेत. त्यांच्या मैत्रीसाठी माझे हे फेसबुक खाते चालू ठेवावे असे म्हणतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०


देव भावनेला देवाचा आधार!

देव भावनांना देवाचा आधार!

सजीव मनाची नैसर्गिक वासना जनावरांना जशी असते तशी माणसांनाही असते आणि मनाच्या या वासनेला मनाच्याच बुद्धीचे जे बळ लाभलेले असते त्याला बुद्धीबळ म्हणतात. जनावरे याच बुद्धीबळावर स्वार होऊन त्यांचा शरीर घोडा पळवतात व त्यांच्या मूळ वासनांची तृप्ती करतात. तहान, भूक, झोप, लैंगिकता या त्या मूळ नैसर्गिक वासना होत. पण माणसांचे गणित निसर्गाने थोडे वेगळे बनवले आहे. ते तसे का बनवले याचे कारण त्या निसर्गालाच ठाऊक! पण एवढे मात्र खरे की या वेगळ्या गणितामुळेच माणूस इतर जनावरांपासून वेगळा झाला. जनावरांमध्ये माणसांपासून वेगळे असलेले प्राणी व पक्षी हे दोघेही आले. हे गणित एकाच गोष्टीने झाले आणि ती म्हणजे माणसांना जनावरांच्या वासनांसोबत दिलेली उच्च मानवी भावना! प्रेम, करूणा, परोपकार, कृतज्ञता इत्यादी उच्च भावना या माणसांनाच असतात. निसर्गात देव आहे अशी श्रद्धाच नव्हे तर तसा ठाम विश्वास असणारे आस्तिक लोक या उच्च मानवी भावनांना देव भावना असेही म्हणू शकतील. मानवी मनात जनावरांच्या मूळ नैसर्गिक वासना व या देव भावना ज्या सुद्धा नैसर्गिकच आहेत यांचे मिश्रण आहे. ते जर संयुग झाले असते तर वासना व भावना यांचा वेगळा विचार करण्याचा प्रश्नच मानवी मनात निर्माण झाला नसता. पण मानवी मनात संयुग न होता ते मिश्रण झाले व मग मानवी बुद्धीपुढे प्रश्न निर्माण झाला की वाईट वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना मनात ठेऊनच वागायचे की चांगले वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना व मानवी भावना या दोन्ही मध्ये संतुलन ठेवीत विवेकाने वागायचे? जी मानवी बुद्धी वासना व भावना यांच्या संतुलनावर लक्ष केंद्रित करून त्या संतुलनाची तृप्ती करण्यालाच स्वतःचे बळ अर्थात बुद्धीबळ देते अशा बुद्धीला विवेकबुद्धी म्हणतात. पण कधीकधी असे होते की मानवी मनात असलेल्या वासना व भावनांचे मिश्रण थोडे इकडेतिकडे होते, त्यांच्यातील संतुलन बिघडते व मग मानवी बुद्धी थोडीशी भ्रमिष्ट होऊन बुद्धीबळाचा शरीरावरील ताबा सुटतो व शरीर रूपी घोडा उधळतो. भरकटलेली बुद्धी व उधळलेला शरीर रूपी घोडा माणसाला कधी जनावर बनवून टाकतो हे कळतच नाही. या विश्लेषणातून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे मानवी बुद्धीचे चांगले वागणे म्हणजे काय तर वासना व भावना यांच्या मिश्रणात संतुलन ठेवीत विवेकाने वागणे. असे विवेकी वागण्यासाठी मनातील देव भावनांना बळ प्राप्त होणे आवश्यक असते. देव भावनांना देव शक्ती मिळण्यासाठी मग आस्तिक लोक देवाचा आधार घेतात. देवावर श्रद्धा, विश्वास ठेऊन मिळविलेला तो आधार खूप मोठे काम करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व त्यांचे मर्द मावळे जेंव्हा शत्रूवर चढाई करीत तेंव्हा हर हर महादेव अशी आध्यात्मिक आरोळी देत चढाई करीत. महादेवावर असलेली श्रद्धा, विश्वास त्या मर्द मावळ्यांत अशी चेतना निर्माण करीत असे की आपण देव भावनेच्या रक्षणासाठीच म्हणजेच धर्मासाठी जनावरांच्या वासनेने जगणाऱ्या दुष्ट शत्रूवर महादेवाचे रौद्र रूप अंगात संचारून घेत चढाई करीत आहोत. देव भावनांचा वासनांमुळे चोळामोळा होऊ नये म्हणून आस्तिक माणसे देवाचा आधार घेतात व यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.७.२०२०

रविवार, २६ जुलै, २०२०

भुतांचा बाजार!

भुतांचा बाजार!

(१) हल्ली थोडी चांगली सवय लागत चाललीय व ती म्हणजे रात्री झोपून सकाळी उठायची सवय. घुबडासारखे रात्रभर जागून दिवसाची झोप घेणे हा प्रकार माणसासाठी विचित्रच! पण मी आयुष्यात थोडा विचित्र म्हणजे जरा हटकेच वागलो. त्यामुळे थोडे नुकसानही झाले. पण त्या वेगळे वागण्यातली वेगळी मजाही घेता आली.

(२) तर काय झाले की, काल रात्री मला कायदा नीट समजावून सांगणारे एक स्वप्न पडले. मला झोपेत स्वप्ने पडतात व झोपेतून उठल्यावर ती बरोबर लक्षातही राहतात हे विशेष! कालच्या स्वप्नात मी रात्रीच्या वेळी चालू असलेल्या एका  फार मोठ्या भुतांच्या बाजारात फिरत होतो. त्या मोठ्या बाजारात ती भुते जी देवाणघेवाण करीत होती ती विचित्रच होती. थोडक्यात सुसंस्कृत मानवी मनासाठी ती घाणेरडी होती. पण त्या विचित्र, घाणेरड्या व्यवहारांच्या, देवाणघेवाणीच्या पाठीमागे भुतांचे एक बळ होते आणि ते म्हणजे हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरणाऱ्या काही आंडदांड भुतांचे. काही ठिकाणी या देवाणघेवाणीत थोडी जरी गडबड होताना दिसली की ही आंडदांड तलवारधारी, बंदूकधारी भुते तिथे पोहोचायची व मग तिथला व्यवहार शांतपणे पार पडायचा. त्या बाजारात मीही न घाबरता त्या भुतांप्रमाणेच बिनधास्त फिरत असल्याने मला त्या भुतांनी अडवले नाही. विशेष म्हणजे ती भुते माणसांसारखीच दिसत होती. पण वागत मात्र विचित्र होती. त्या बाजारात ज्या मोठमोठया जाहिराती लावल्या होत्या त्या बघून तर माझे डोके फिरायची वेळ आली होती. मी जर भुतांच्या त्या बाजारातील भुतांचे ते व्यवहार, भुतांची ती विचित्र, घाणेरडी देवाणघेवाण, त्यांच्या त्या भयंकर जाहिराती इथे शब्दांत वर्णन करू लागलो तर लोक सहन करूच शकणार नाहीत इतका विचित्र प्रकार होता तो. नरक नरक ज्याला म्हणतात ना तोच मला त्या बाजारात दिसला.

(३) मी ठरवले होते की रात्रभर त्या भुतांच्या बाजारात फिरायचे व सकाळ झाली की काय होतेय ते बघायचे. जसजशी पहाट सुरू झाली तसतशी त्या बाजारात सावरासावर सुरू झाली. सामानाची बांधाबांधी, जाहिराती काढून टाकणे हे प्रकार सुरू झाले. सकाळ होताना तो बाजार शांत होऊ लागला, ती भुते गायब होऊ लागली. आणि एकदाची सकाळ झाली, सूर्यकिरणांचा प्रकाश पडला. तो भुतांचा बाजार तिथून नष्ट झाला होता. आता तिथून पाय काढता घ्यावा असे वाटत असतानाच तिथे दुसरी वर्दळ सुरू झाली. दुसरा बाजार सुरू झाला. तो होता खऱ्या माणसांचा बाजार! ज्या ओट्यांवर रात्री भलतेच व्यवहार चालू होते तिथे छान टेबल, खुर्च्या आल्या. त्यावर मस्त स्वच्छ कपड्यातील माणसे हळूहळू येऊन बसू लागली. टेबलावर संगणक आले. त्यावर टायपिंगचे काम सुरू झाले. माझ्या मनाजोगते सुसंस्कृत मानवी व्यवहार त्या दिवसाच्या बाजारात सुरू झाले ज्या ठिकाणी काल रात्री तो भुतांचा बाजार भरला होता.

(४) मी या माणसांच्या बाजाराचे निरीक्षण करीत पुन्हा तिथे फिरू लागलो. हळूच काही ठिकाणी लक्ष गेले तर तिथे काल रात्री जी काही आंडदांड भुते हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरत होती त्यापैकी काही थोडी भुते हळूच त्या टायपिस्ट लोकांच्या मागे असलेल्या दारात येऊन उभी राहिली व त्यांच्या तलवारीचा धाक त्या टायपिस्टना दाखवू लागली. खरं म्हणजे तो धाक होता की खोडसाळपणा होता हेच मला कळेनासे झाले. कारण ती भुते हळूच त्यांच्या तलवारीचे पुढचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या शर्टाच्या कॉलर्स मध्ये घुसवायची व टायपिस्ट लोकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करायची. ते टायपिस्ट लोक पण त्या भुतांना ओळखत होते असेच वाटू लागले. कारण त्या भुतांनी त्यांच्या तलवारीचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या कॉलर्स मध्ये घुसवून त्यांची कॉलर इकडेतिकडे फिरवली की ते टायपिस्टस मागे वळून हातानेच त्या भुतांना खुणवायचे व बाबांनो तुमचे काय ते नंतर देतो असे नजरेनेच खुणवायचे. हा प्रकारच मला कळेनासा झाला. भुतांचे आणि माणसांचे हे असे गुपचूप संबंध असू शकतात? मनाला ते पटत नव्हते. पण प्रत्यक्षात तर मी माझ्या डोळ्यांनी ते बघत होतो.

(५) माझी झोप पूर्ण झाली व माझे ते स्वप्न भंग पावले. खरं सांगतोय की, हा लेख त्या स्वप्नावर आधारित आहे व झोपेतून उठल्यावर अंघोळ न करताच लिहित आहे. पडलेले स्वप्न विसरून जाईल या भीतीने मी असे स्वप्न जागा झालो की एका कागदावर कच्चे लिहून ठेवतो व नंतर त्याचा लेख बनवतो. आज मी तसे न करता डायरेक्ट लेख लिहायलाच बसलोय. प्रत्येक स्वप्न मला काहीतरी शिकवते, संदेश देते. मला त्या स्वप्नातून जे कळते ते मी माझ्या लेखात उतरवतो व तो लेख वाचकांसाठी फेसबुक वर प्रसिद्ध करतो.

(६) कालच्या स्वप्नाने डार्विनने सांगितलेला बळी तो कानपिळी हा नियम समोर आला. रात्री  चालू असलेला भुतांचा बाजार म्हणजे जंगली व्यवहार जे वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना शोभतात, पण माणसांना नाहीत. हेच दिवसा चालू झालेल्या माणसांच्या सुसंस्कृत बाजाराने सिद्ध झाले. आता बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही बाजारांना लागू पण वेगळ्या पद्धतीने! भुतांच्या जंगली बाजारात तलवारी, बंदूका यांच्या दहशतखोर बळावरच आर्थिक व्यवहार सुरू होते. पण माणसांच्या सुसंस्कृत बाजारात त्या दहशतखोर बळाचाच कान माणसांनी पिरगळून टाकला होता. कशाच्या जोरावर तर सूर्यप्रकाशाच्या जोरावर! सूर्यप्रकाशाची ताकद एवढी मोठी की रात्री मोकळ्या फिरणाऱ्या  तलवारी, बंदूका दिवसा लपून बसतात. पण स्वप्नातली काही भुते ज्याप्रमाणे दिवसाच्या सुसंस्कृत मानवी बाजारात त्यांच्या तलवारीने खोडसाळपणा करीत होती अगदी त्याचप्रमाणे "बळी तो कानपिळी" हा जंगली प्राण्यांसाठी असलेला निसर्ग नियम माणसांतही आणू पाहणारी काही दहशतखोर माणसे त्या रात्रीच्या  भुतांप्रमाणे माणसांतही फिरत आहेत हेच त्या स्वप्नातल्या दृश्याने स्पष्ट केले.

(७) पण त्या स्वप्नातली विशेष गोष्ट ही होती की, हातात तलवार, बंदूक नसलेली टायपिस्टस मंडळी त्या तलवारधारी भुतांना न घाबरता "गप्प बसताय की नाही आता, नंतर तुमची ती शिते तुम्हाला देण्यात येतील, तोपर्यंत आम्हाला आमची कामे करू द्या" अशी एका ताकदीच्या जोरावर सांगत होती आणि ती ताकद म्हणजे सूर्यप्रकाशाची ताकद! सूर्यप्रकाश ही अंधाराचे जाळे नाहीसे करणारी प्रचंड मोठी ताकद आहे. त्यात सत्य ज्ञानाचीही ताकद आहे. हीच ताकद "बळी तो कानपिळी" या नियमालाही योग्य मार्ग शिकवते. बळाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवते. ही विशेष अक्कल फक्त माणसांनाच निसर्गाने दिली आहे. म्हणून बळी तो कानपिळी हा जंगली नियम माणसांना पूर्णपणे लागू नाही. तो अयोग्य वर्तन करणाऱ्या काही माणसांना धडा शिकविण्यासाठीच काही अंशी लागू आहे हेच मला काल रात्रीच्या स्वप्नाने अधोरेखित करून दाखविले. काल रात्रीच्या स्वप्नाने मला कायदा पुन्हा शिकवला. जमलेच तर तुम्हीही शिका!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.७.२०२०


शनिवार, २५ जुलै, २०२०

माझी मराठी लेखनाची आवड!

माझी मराठी लेखनाची आवड!

१९४७ ते १९९७ अशी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा मी त्याकाळी केलेल्या मराठी लेखनाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेकडून पारितोषिक मिळाले व तो पुरस्कार १९९८ साली देण्यात आला. त्याला आता २२ वर्षे पूर्ण झाली. मराठी लेखनाची मला पूर्वीपासूनच आवड आहे. फेसबुक वरील माझे मराठी लिखाण ही त्या मूळ आवडीची एक झलक आहे. श्री. पंडित हिंगे, अध्यक्ष, पुणे मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांनी आज माझ्या "बेभरवशाचे जीवन" या लेखावर प्रोत्साहनपर कमेंट केली व माझी ती जुनी आठवण जागृत केली. विशेष म्हणजे पंडित हिंगे हे पुण्याच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत हे कळले. १९९८ साली श्री. गणेश केळकर हे मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष होते. ते आता हयात नाहीत.

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०

बेभरवशाचे जीवन!

बेभरवशाचे जीवन!

(१) कुठून आलात तुम्ही, कुठून आलो मी? आपण सगळेजण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी, कोणाच्या तरी घरी, कोणत्या तरी आईबापाच्या पोटी जन्मलो आहोत. हळूहळू या जगाची ओळख आपल्याला होत गेली, अनुभव मिळत गेले. आपण अजूनही जिवंत आहोत व कसे का असेना पण जगत आहोत यासाठी आपण निसर्गाचे व समाजाचे खूप आभार मानायला हवेत. आजूबाजूला जर आपल्याच समाजाने निर्माण केलेल्या शाळा नसत्या तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेत कसे घातले असते. आजूबाजूला दवाखानेच नसते तर आपण आजारी पडल्यावर आपण कुठे गेलो असतो? या समाजाचे खूप उपकार आहेत आपल्यावर ही गोष्ट विसरता कामा नये.

(२) पण आपले जीवन सरळसाधे, सरळसोपे नाही. ज्यावेळी निसर्गाने गुलाबाची निर्मिती काट्यांबरोबर केली तेंव्हाच निसर्गाने या जगात अर्थकारणाबरोबर राजकारण सुरू केले. काय म्हणावे या निसर्गाला! जीवन दिले म्हणून कृतज्ञ भावनेने निसर्गाचे आभार मानावेत तर याच जीवनात एकीकडून जगण्याचा आधार व दुसरीकडून मरण्याची भीती देऊन हे जीवन बेभरवशाचे करून टाकले.

(३) हा लेख लिहिण्यापूर्वीच सातारा, खंडाळा येथील कण्हेरी गावातून विनायक मामाचा फोन आला. हा विनायक मामा (विनायक धनवडे) आमच्या वरळीच्या घरी बरेच वर्षे राहिला. गावी शेती व मुंबईला गिरणी कामगार म्हणून नोकरी  करीत असलेला हा मानलेला मामा आमच्या घरातलाच एक कुटुंब सदस्य होऊन गेला. तो आता ७५ वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी चैत्र महिन्यात त्याच्या कण्हेरी गावच्या जत्रेला गेलो होतो. त्यावेळी तिथे त्याचा थोरला मुलगा संदीप व धाकटा मुलगा किरण हे दोघेही भेटले. संदीप हा साधारण ३५ वर्षाचा विवाहित मुलगा ज्याला चार वर्षाचा छोटा मुलगा आहे. ही दोन्हीही मुले विवाहित व स्वभावाने विनायक मामा सारखीच खूप गोड!

(४) माझी व माझ्या सोबत जत्रेला आलेल्या बळी या आतेभावाची या सर्वांनी खूप बडदास्त ठेवली. विनायक मामा बरोबर गावात, शेतात खूप फिरलो. जत्रेत खूप मजा केली. त्यावेळी विनायक मामाचा थोरला मुलगा संदीप याने घरात आम्हाला जेवण वाढले, रात्री जत्रेतले खेळ दाखवले. आज अचानक विनायक मामा गावाहून फोन करतात व दुःखद बातमी देतात की त्यांचा थोरला मुलगा संदीप गेला. ते ऐकून मला खूप धक्का बसला. कारण संदीप कोरोना मुळे नाहीतर त्याच्या किडनीला अचानक कसले तरी इन्फेक्शन झाल्याने व ते छातीपर्यंत वर चढून त्याचे छातीत पाणी साचल्याने व मग त्या पाण्याच्या दबावाने हार्ट अटॕक आल्याने संदीप आठच दिवसांत गेला. धाकटा भाऊ किरण याने मुंबईवरून गावी जाऊन लाखाच्या वर तिकडे खाजगी रूग्णालयात खर्च केला पण त्याला यश आले नाही. संदीप कायमचा निघून गेला.

(५) काय म्हणावे या अशा घटनांना? आश्चर्य हे की ७५ वर्षाच्या विनायक मामाच्या अंगावर पाच वर्षापूर्वी त्यांचाच एक बैल उधळतो, संपूर्ण बैलगाडी विनायक मामाच्या छातीवर उलटी होते, त्यांच्या बरगड्या मोडतात व एवढा मोठा शारीरिक आघात होऊनही विनायक मामा वाचतात व त्यांचा तरूण मुलगा अचानक काहीतरी होते व अचानक या जगाचा कायमचा निरोप घेतो. म्हातारा बाप जगतो व तरूण मुलगा जातो. केवढे मोठे हे दुःख आणि कसले हे निसर्गाचे विचित्र वागणे!

(६) माणूस चांगल्या भावनेने देवाला मानतो, त्याला शरण जातो. पण सत्य हेच आहे की नुसत्या चांगल्या भावनेने जगात चांगले होईलच याची काहीही खात्री नसते. या जगात काही वाईट गोष्टी याच निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा निर्माण केल्या आहेत त्यांची कीड कुठून तरी चांगल्या गोष्टींना लागते व चांगल्या गोष्टी अचानक सडून नष्ट पावतात. मग ते कष्टाने वाढवलेले शेतीतले उभे पीक असो किंवा आईवडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेले मूल असो! काय म्हणावे निसर्गाच्या की देवाच्या या खेळाला? आपण देवाला चांगला, दयाळू असे आपल्या चांगल्या भावनेने मानून त्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो आणि देव हा असा उलट वागतो. त्याचे हे उलट वागणे माणसाच्या समजण्याच्या पलिकडचे असते म्हणून मग माणूस देवाला सोडून नियतीला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे देवाला नियती भारी पडते?

(७) कुठून कळ दाबली जाते, कुठून चक्र फिरते आणि आपण या जगात जन्म घेतो. मग जीवन काय ते हळूहळू आपल्याला कळू लागते. तुम्ही कुठले, मी कुठला, पण आपली या जीवन चक्रात योगायोगाने ओळख होते, जगण्याचे विचार, व्यवहार यांची आपल्यात देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण होत असताना आपले कधीकधी खटकते, मग रूसवे, फुगवे होतात. पण आपण मनाने चांगले असतो. जगात जर आपल्या सारखे सगळे चांगले असते तर जगात आपल्याला सगळीकडे फक्त सहज सुंदर असे अर्थकारणच दिसले असते. पण नाही, त्या खोडकर निसर्गाने म्हणा नाहीतर देवाने म्हणा, गुलाबाची निर्मितीच मुळी काट्यांबरोबर केली. हेच ते काटे जे गुलाबाला सरळसाधे, सहज सुंदर अर्थकारण करू देत नाहीत. त्यांना टोचून त्रास द्यायचा एवढेच माहित. काट्यांच्या या उपद्रवी टोचण्यातून मग सुरू होते राजकारण!

(८) राजकारण ही अर्थकारणाला लागलेली कायमची कीड आणि ती कोणी लावलीय तर त्या महान निसर्गाने किंवा देवानेच! प्लेग घ्या, स्वाईन फ्लू घ्या नाहीतर सद्याचा कोरोना घ्या, या सर्व गोष्टी हे काटेच आहेत व मग हे काटे काढून टाकण्यासाठी वैद्यकशास्त्र व आरोग्य व्यवस्था! शेवटी या आरोग्य व्यवस्थेचा संबंध कशाशी आहे तर रोगजंतू, विषाणू या काट्यांशी आणि म्हणूनच आरोग्य व्यवस्था ही सुद्धा कडू राजकारणाचाच एक भाग होऊन गेलीय.

(९) अशा या डबल ढोलकी जीवनात म्हणजे गुलाब व काटे, अर्थकारण व राजकारण अशा दोन्ही गोष्टी समांतर असणाऱ्या जीवनात तुम्ही व मी जन्म घेतला आहे व असे हे जीवन आपण जगत आहोत. आपले हे जीवन बेभरवशाचे आहे. कोरोना हा काही एकमेव काटा नाही या जगात! पुढे कोरोनावर लस आली तरी हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. कारण बाकीचे असंख्य काटे या जगात शिल्लक राहणार आहेत व निर्माणही होणार आहेत. आपण आता एकमेकांच्या संपर्कात आहोत. पुढच्या क्षणाचा आपला भरवसा नाही कारण आपले जीवन बेभरवशाचे आहे. तेंव्हा जमेल तेवढा आपला संपर्क व आपली वैचारिक, व्यावहारिक  देवाणघेवाण आनंदी करूया! विनायक मामा यांच्या कण्हेरी गावच्या जत्रेतील लोकनाट्यात मीही सहभागी झालो होतो. त्यावेळी तमाशा कलावंतांबरोबर काढलेला फोटो या लेखाच्या सोबत जोडत आहे. शेवटी या जगातील आपले बेभरवशाचे जीवन एक तमाशाच बनून राहिले आहे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०