आभासी दर्शन!
(१) पूर्वी वस्तूंची अदलाबदल किंवा विनिमय प्रत्यक्ष स्वरूपात म्हणजे बार्टर पद्धतीने होत असे. एका वस्तूच्या किंमतीचे मोजमाप दुसऱ्या वस्तूच्या किंमतीने व्हायचे. उदा. एक किलो तांदूळ विकत घ्यायला दोन किलो गहू मोबदला म्हणून द्यावे लागणे म्हणजे तांदळाची किंमत गव्हापेक्षा जास्त कारण एक किलो तांदूळ घेण्यासाठी दोन किलो गहू मोजावे लागायचे. वस्तूंची किंमत अशाप्रकारे ठरवून त्या वस्तूंचा विनिमय प्रत्यक्ष स्वरूपात करणे त्रासदायक होऊ लागले म्हणून पुढे पैसा हे विनिमय व किंमतीचे माध्यम म्हणून पुढे आले. पण पैसा काय आहे तर तो प्रत्यक्षात असलेल्या वस्तू व सेवांचा आभासी प्रतिनिधी आहे. अर्थात पैसा हे प्रत्यक्ष संपत्तीचे आभासी दर्शन आहे. पैसा ही प्रत्यक्ष संपत्ती नव्हे. तो प्रत्यक्ष संपत्तीचा एक आभास आहे. पण याच पैशाच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपत्ती विकत घेता येत असल्याने या पैशालाही म्हणजे संपत्तीच्या आभासालाही पुढे संपत्ती इतकेच महत्व प्राप्त झाले.
(२) आता सिध्दिविनायक गणपती मुंबई मधील प्रभादेवी येथे स्थानापन्न असला व पंढरपूरचा विठोबा पंढरपूरी स्थानापन्न असला तरी या देवांचे अॉनलाईन दर्शन घरी बसून निवांतपणे घेता येते. हे अॉनलाईन दर्शन आभासी असते. जर पैशाप्रमाणे या अॉनलाईन देव दर्शनाचेच महत्व वाढले तर ज्या ठिकाणी हे देव स्थानापन्न झाले आहेत त्या तिर्थस्थळांचे महत्व पुढे कमी होईल त्याचे काय करायचे? म्हणजे असे की पैशाचे महत्व मोठे पण प्रत्यक्ष संपत्तीचे महत्व कमी! विकासाच्या नावाखाली करायला जायचे एक आणि व्हायचे भलतेच!
(३) या कोरोनाने तर हल्ली प्रत्यक्ष व्यवहारांची वाटच लावून टाकलीय. घरी बसून अॉनलाईन शिक्षण, अॉनलाईन काम, अॉनलाईन बँकिंग व्यवहार आणि आता लग्नेही अॉनलाईन होऊ लागलीत. पुढे नवरा बायकोला एकत्र राहू नका म्हणतील व संसार म्हणजे मुलेबाळे, सगळेच अॉनलाईन करा म्हणतील. अरे, काय चाललंय काय? म्हणजे या सर्व गोष्टींचे लांबूनच आभासी दर्शन घ्यायचे. प्रत्यक्षात भेटीगाठीच नाहीत!
(४) हल्ली व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांवरून लोकांचा संवाद चालतो. शहरातील बागेत किंवा गावच्या चावडीवर एकत्र बसून गप्पा मारण्याचे पूर्वीचे दिवसच या अॉनलाईन संवादाने संपवून टाकले. अॉनलाईन संवाद करणारी ही माणसे प्रत्यक्षात लांबच्या ठिकाणी कुठेतरी असतात, पण ती जणूकाही जवळच आहेत असा आभास होतो. हेही एक प्रकारचे लोकांचे आभासी दर्शनच! बरं, हे असे समाज माध्यमावरील संवाद खरे मानून चालले तरी त्याचा प्रत्यक्षात काय व किती उपयोग होतो हा सुध्दा एक अभ्यासाचाच विषय आहे.
(५) समोर बसून खळखळून हसणे, एकमेकांना टाळी देणे यात किती मजा येते. व्हॉटसअप किंवा समाज माध्यमावर मात्र करायचे काय तर हसू आले की हसण्याचे चिन्ह पुढे करायचे, टाळी वाजवू वाटली तर हात किंवा अंगठा पुढे करायचा, राग आला तर लालबुंद कपाळाचे चिन्ह पुढे करायचे. अॉनलाईन विनोदी संवादाने समोरच्याला गुदगुल्या झाल्या आहेत हे त्याच्या हास्य चिन्हावरून ओळखायचे. हा आभासी खेळ मोठा गंमतीदार असतो. भूक लागली तर लोक उद्या अॉनलाईन जेवण करा म्हणतील. खरंच माणूस हल्ली आभासी दुनियेत खूपच वावरू लागलाय!
-ॲड.बी.एस.मोरे©८.७.२०२०