चाळीतला सीमावाद!
माझा जन्म १९५७ चा, म्हणजे १९६२ साली भारत व चीन यांच्यात सीमावादातून जे युद्ध झाले त्यावेळी मी जेमतेम पाच वर्षाचा होतो. पहिली इयत्तेत सुध्दा प्रवेश न घेतलेल्या मला त्या बाल वयात काय माहित असणार भारत काय, चीन काय? पण मुंबईत वरळी बी.डी.डी. चाळीत असलेली आमची खोली व समोरची खोली यांच्यात एक अलिखित सीमारेषा आहे हे मात्र कळत होते. मुंबईत वरळी, डिलाईल रोड, नायगाव याठिकाणी बी.डी.डी. चाळी आहेत. प्रत्येक चाळीला तळ मजला धरून एकूण चार मजले. चाळीच्या प्रत्येक मजल्यावर १०×१२ फूटाच्या एकूण २० खोल्या. म्हणजे चार मजल्यावर एकूण ८० खोल्या. एकाच चाळीत राहणाऱ्या या ८० खोल्यांत गिरणी कामगारांची ८० कुटुंबे संसार करायची. अर्थात सरकारी भाडेतत्वावरील त्या छोट्या खोल्या हीच चाळीत राहणाऱ्या सर्व गिरणी कामगारांची स्थावर मिळकत होती व मिलमधून मिळणारा पगार हेच त्या सर्वांचे आर्थिक उत्पन्न होते. म्हणजे सगळ्या कुटुंबाची परिस्थिती सारखी होती. पण तरीही त्यांच्यात अधूनमधून छोटे सीमावाद चालू असायचे. प्रत्येक भाडेकरूने स्वतःचे सामान म्हणजे चिनपाट (सार्वजनिक संडास करण्यासाठी लागणारा पत्र्याचा छोटा डबा किंवा प्लॅस्टिकची छोटी बादली), कपडे वाळू घालण्यासाठी लागणारा स्टूल, कपडे वाळू घालण्यासाठी आवश्यक असलेल्या दोऱ्या इत्यादी गोष्टी स्वतःच्याच अंगण भागात ठेवणे हा नियम होता. दोन खोल्यांमधील अंगण भागाचे म्हणजे वटणाचे (corridor) एका सीमारेषेने दोन भाग केलेले होते. अलिकडच्या खोलीचे सामान अलिकडच्या अंगण भागात, तर पलिकडच्या खोलीचे सामान पलिकडच्या अंगण भागात आणि मध्ये अंगण सीमारेषा अशी ती व्यवस्था होती. गणपती, नवरात्र, दिवाळी सारख्या सणात रांगोळी, आकाश कंदील, पणत्या वगैरे गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या अंगणातच लावणे हाही नियम होता. दोन अंगण भागांमधील सीमारेषा ओलांडून कोणीही दुसऱ्याच्या अंगण भागात अतिक्रमण करायचे नाही हे ठरलेले होते. हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित चालायचे. आम्ही लहान मुले मात्र या सीमारेषा ओलांडून एकमेकांच्या खोल्यांत घुसून धुडघूस घालायचो. पण आमचे सगळ्या खोल्यांत स्वागतच व्हायचे. इतकेच नव्हे तर आमच्या आया एकमेकींच्या खोल्यांत जाऊन बिनधास्त गप्पा मारीत बसायच्या. इतकेच नव्हे तर घरी केलेल्या मोदक, लाडू, करंजी, मच्छी, मटण वगैरे खाद्य पदार्थांचीही मुक्त देवाणघेवाण व्हायची. कोणाकडे बारसे, लग्नकार्य असले तर मजल्यावर (माळ्यावर) राहणारे शेजारी एकमेकांच्या मदतीला धावायचे. पण तरीही सीमारेषा या होत्याच. अधूनमधून क्षुल्लक सीमावाद व्हायचे, धुसफूस व्हायची, छोटी भांडणे व्हायची, पण पुन्हा सर्वजण एक व्हायचे. हळूहळू वय व शिक्षण वाढत गेले तसे आर्थिक व्यवहाराचा व राजकीय सीमावादाचा हा पसारा फार मोठा आहे हे मला कळू लागले. आमची चाळ एकच पण त्या चाळीतील ८० खोल्यांच्या सीमा वेगवेगळ्या, तशी पृथ्वी एकच पण या पृथ्वीवरील विविध देशांच्या सीमा वेगवेगळ्या हे हळूहळू कळू लागले. आता तर हेही कळलेय की या जगात कोणतीही व्यक्ती व कोणताही देश आत्मनिर्भर नाही. सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहेत. आमच्या आया जशा एकमेकींना मोदक, लाडू, करंज्या, मच्छी, मटण द्यायच्या तसे जगातील देश एकमेकांशी आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण करतात. तरीही त्यांच्यात अधूनमधून सीमावाद उफाळून येतोच. मग त्यांच्यात छोटी, मोठी युद्धे होतात. युद्ध ज्वराने सगळे वातावरण तापते. पण नंतर ही युद्धे संपतात, नव्हे ती संपवावीच लागतात. कोण युद्धात जिंकतो तर कोण हारतो. मग जिंकणारा देश व हरणारा देश यांच्यात तहाचे करार होतात. त्या देशांत आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होतात. जगात हे असेच चालू आहे आणि असेच चालू राहणार आहे. हे सर्व नीट समजून घ्यायला मला बी.डी.डी.चाळीतील त्या सीमारेषा व ते छोटे सीमावाद अजूनही मदत करतात. लहानपणीच्या या अनुभवाचा मी माझ्या वकिलीतही उपयोग करतो हे विशेष!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०