https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ४ जून, २०२०

आॕनलाईन शाळा!

अॉनलाईन शाळा या शाळाच नव्हेत!

कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू व रोगजंतू पचवलेत माणसाने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात. हळूहळू लॉकडाऊन सैल होणार व थोड्या दिवसांत तो उठवावाच लागणार. मग मास्क लावून विद्यार्थी व शिक्षक शाळेत जातील. जावेच लागेल. मैदानी खेळ घरात खेळता येत नाहीत तशा शाळा घरात अॉनलाईन चालत नाहीत, नव्हे अॉनलाईन शाळा या शाळाच नव्हेत!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

कुदरत और ईश्वर!

कुदरत और ईश्वर!

कुदरत है, लेकिन ईश्वर नही, यह नास्तिक बहस चलता ही आया है. दोनोंको जोड दो, फिर आस्तिक-नास्तिक वाद खतम! तत्वज्ञान और विज्ञान मे फर्क है. कुदरत का विज्ञान वैश्विक सत्य है, लेकिन ईश्वर है या नही का तत्वज्ञान यह सब अपने अपने तर्क है. बहस तर्क पर ही होता है, सत्य पर नही!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

गंमतीदार स्वप्न!

स्वप्नांना काय रोखणार, त्यांचीही गंमत असते!

(१) लॉकडाऊनचा काळ म्हणजे कोरोनाच्या भीतीने गांगरून, घाबरून जायचा काळ! या काळात झोपेत पडणारी स्वप्नेही तशीच हवीत ना! पण तसे होत नाही. काल रात्री झोपेत मला एक गंमतीदार स्वप्न पडले. पडले म्हणण्यापेक्षा माझ्या मेंदूने ते माझ्यावर लादले असेच म्हणावे लागेल.

(२) या स्वप्नात माझी कंबर दुखत होती म्हणून तिचा व एकूणच लॉकडाऊन मुळे आंबलेल्या माझ्या शरीराचा मसाज करण्यासाठी मी एका मसाज पार्लर मध्ये गेलो. सुरूवातीलाच मी काऊंटर वर मसाज फी म्हणून ५०० रूपये दिले. ती फी दिल्यावर मला पोहे व चहा देऊन  माझे स्वागत करण्यात आले. मसाज पार्लर व पोहे व चहाचा नाष्टा, हा प्रकारच माझ्या डोक्यावरून गेला. पण मी त्या नाष्ट्याची मजा घेतली. त्या पार्लर मध्ये मसाज करून घेणाऱ्या पुरूषांची रांग लागली होती. मी पण त्या रांगेत जाऊन बसलो. आत असलेल्या एका खोलीत एकेकाला घेऊन त्याचा मसाज केला जात होता.

(३) शेवटी माझा नंबर आला. मग मी त्या आतल्या खोलीत गेलो. तिथे डॉक्टरच्या दवाखान्यात असतो तसा गादीचा बाकडा होता. त्या खोलीत बिग बॉस सारखा कोठून तरी आवाज आला व मला त्या बाकड्यावर झोपा असे सांगण्यात आले. मी बाकड्यावर झोपल्यावर साधारण ७० वयाची एक म्हातारी आली. तिने मला तुमची बेंबी उघडी करा असे सांगितले. मी तसे केले. मग तिने माझ्या बेंबीवर नरसाळे धरून बेंबीत कसले तरी तेल ओतले व तेल बेंबीत चांगले जिरल्यावर आता चला अशी म्हणाली. मी त्या म्हातारीला म्हणालो "अहो, मी इथे मसाज करायला आलोय आणि तुम्ही हे काय केले"? तर ती मला म्हणाली की, यालाच मसाज म्हणतात. मी डोक्यावर हात मारून त्या मसाज पार्लरच्या बाहेर पडलो.

(४) तुम्हाला वाटेल की हे स्वप्न उगाच माझ्या कल्पनेने रंगवून सांगतोय. पण खरं सांगतोय की, हे स्वप्न अगदी असेच पडले. तुम्ही म्हणाल की, मग स्वप्नात म्हातारीच का आली, म्हातारा का आला नाही? तर याला माझ्याकडे उत्तर नाही. मीही ६३ वर्षाचा म्हातारा आहे, मग ७० वर्षाची म्हातारी का आली, यालाही माझ्याकडे उत्तर नाही. खरंच सांगतो की झोपी गेल्यावर आपला मेंदू आपला पूर्ण ताबा घेतो व त्याला हवी तशी स्वप्ने आपल्यावर लादतो. अशा स्वप्नांना रोखणे आपल्या नियंत्रणात नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०

निसर्गराजा!

राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!

(१) लहानपणापासूनच निसर्गाचे मला खूप कुतूहल व आकर्षण! प्राथमिक शाळेपासून सतत पुस्तके वाचतोय, त्यातून या निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतोय. अनेक शास्त्रज्ञांचे शोध वाचले व अनेक तत्ववेत्त्यांचे तात्विक लिखाण वाचले पण त्यातून माझी तृप्ती झालीच नाही व होतच नाही. माझ्या ज्ञानाचा घडा रिकामा राहिल्यासारखाच वाटत आहे. निसर्गाला मी जाणून घेण्यात खूप कमी पडतोय, म्हणून मी अतृप्त आहे.

(२) म्हणून वाचनाबरोबर मी निसर्गातील भवतालाचे, पर्यावरणीय हालचालीचे खूप जवळून, खूप बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्या निरीक्षणातून मला जो निसर्ग कळतो तो मी पुस्तके वाचून मिळविलेल्या ज्ञानापेक्षा खूप मोठा आहे. निसर्गाच्या जास्त जवळ जाण्याने माझ्या जाणिवा प्रगल्भ होतात. त्या प्रगल्भतेतून पुस्तकातील ज्ञानाहून वेगळे असलेले जे ज्ञान मला मिळते त्याचा अंतर्भाव माझ्या लिखाणात असतो. अर्थात माझ्या लिखाणात पुस्तकांतून मिळविलेले ज्ञान व निसर्गाशी मैत्री करीत स्वतःच्या निरीक्षणातून मिळविलेले स्वतंत्र ज्ञान यांचे मिश्रण असते. निसर्गाविषयीचे माझे निरीक्षण व समाजात असणाऱ्या इतर लोकांचे निरीक्षण यात मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी जे लिहितो ते लोकांना पटण्याची शक्यता तशी कमीच. तरीही वाद टाळीत मी माझे लिखाण चालूच ठेवले आहे.

(३) आजचा विषय राजा म्हणून निसर्ग मला कसा वाटतो हा आहे. जगाच्या पर्यावरणात व जन्म, जीवन व मृत्यू या जीवनचक्रात मला निसर्गाचे बळ जाणवते व त्या बळाचा प्रभाव जाणवतो. निसर्ग त्याच्या बळाचा वापर करतोय व सर्व गोष्टी त्या बळाच्या प्रभावाखाली अगदी अपरिहार्यपणे, अनिवार्यपणे घडवून आणतोय अशी मला जाणीव होतेय. पण जगत असताना आपण करीत असलेल्या गोष्टी आपण बळेच करतोय असे जाणवत नाही. त्या गोष्टी अगदी सहज, नैसर्गिकपणे आपल्याकडून घडतात. त्यात निसर्ग त्याच्या बळाने आपल्यावर त्याची बळजबरी करतोय अशी जाणीव होत नाही.

(४) मनुष्य त्याच्या बुद्धीने निसर्गाच्या राज्य कारभारात ढवळाढवळ करून ज्या कृत्रिम सोयीसुविधा स्वतःच्या सोयीसाठी निर्माण करतोय त्या गोष्टीही अगदी सहज, नैसर्गिकपणे होत आहेत, मग त्यांना कृत्रिम म्हणायचे कसे? त्याही नैसर्गिकच! कारण निसर्गाने त्यासाठी परवानगीच दिली नसती तर मनुष्याला स्वतःची तांत्रिक व सामाजिक प्रगती करताच आली नसती. म्हणून असे वाटते की, जणूकाही निसर्गच मनुष्याकडून या गोष्टी सहजपणे करून घेतोय आणि मनुष्याला मात्र उगाच वाटत राहते की स्वतःच्या बुद्धीने तोच निसर्ग राजावर मात करतोय.

(५) सद्याचा कोरोना विषाणूचा कहर असो नाहीतर चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, निसर्ग आपल्याला यातून घडवतोय, शिकवतोय असेच माझ्या मनाला वाटत राहते. या व अशा सर्वच नैसर्गिक गोष्टींत निसर्गाच्या जुलूम जबरदस्तीचा भागच जाणवत नाही. या सर्व गोष्टींत निसर्गाचे बळ आहे, त्या बळाचा वापर आहे व त्या बळाचा प्रभाव आहे, पण निसर्गाची ती बळजबरी, ती हुकूमशाही मला जाणवतच नाही. सगळं अगदी नैसर्गिकपणे, सहज होतंय!

(६) निसर्गाच्या या आश्चर्यकारक, आगळ्या वेगळ्या राजेशाहीत निसर्गाचाच एक छोटा भाग असलेल्या बुद्धीमान मनुष्याने स्वतःच्या विशेष  सोयीसाठी स्वतःची एक स्वतंत्र हुकूमशाही लोकशाहीच्या नावाने सुरू केली आहे. या लोकशाहीत राज्य कारभार करणाऱ्या राज्य कर्त्यांचे हुकूम जनतेला असे वाटले पाहिजेत की जणूकाही त्यात निसर्गाची सहजता आहे. माझे नास्तिकांनाही जाहीर आव्हान आहे की, तुम्ही निसर्गाला देव मानू नका किंवा निसर्गात देवाचे अस्तित्व आहे हे मान्य करू नका, पण तुम्ही निसर्गाला राजा मानणार आहात की नाही? असे तर नाही ना की, तुम्ही शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांना मानणार पण त्या शरीराचा, इंद्रियांचा राजा जो मेंदू आहे त्याला तुम्ही मान्य करणार नाहीत? माझ्या मनाला तरी निसर्ग हा राजा म्हणून खूप भावतो व म्हणून माझे म्हणणे हे आहे की, राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!

-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०


बुधवार, ३ जून, २०२०

समुद्रातली मुंबई!

समुद्रातली मुंबई!

मुंबई ही समुद्रातच आहे. सात बेटांनी बनलेली मुंबई पुढे दूरवर उपनगरांत वाढली. त्या मुंबई उपनगरांना अरबी समुद्राचा धोका कमी असेल पण समुद्राला खेटून असलेल्या नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटी परिसर, दादर चौपाटी परिसर, माहिम वगैरे भागांना समुद्राचा धोका आहेच. शिवाय समुद्रात भर घालून मुंबई कृत्रिमरित्या वाढवलीय. त्यामुळे तर हा धोका आणखीनच वाढला आहे. पण मुंबई अशा तडाख्यातून वाचली आहे. याला निसर्गाची कमाल म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा. मुंबईच्या विशेष भौगोलिक रचनेमुळे म्हणे मुंबईला वादळाचा धोका कमी आहे. पण असेही म्हणतात की १८८२ साली ६ जूनला मुंबईला प्रचंड मोठ्या वादळाने झोडपले होते व त्यात जवळजवळ १ लाख माणसे मेली होती. पण त्याबाबत ठोस पुरावे गुगलवर सापडले नाहीत. पण हवामान शास्त्रज्ञ मात्र यावर जास्त अधिकाराने बोलू शकतील.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

मंगळवार, २ जून, २०२०

मन चंगा तो कठौती मे गंगा!

मी धार्मिक कर्मकांडे टाळतो!

मी धार्मिक कर्मकांडे टाळतो. मी तिर्थस्थळांना भेटी देत नाही. मी "मन चंगा तो कठौती मे गंगा" या संत रविदासांच्या विचाराचा आहे. मी दररोज माझ्या छोट्या विश्वाची परिक्रमा करतो व त्या विश्वात शांती नांदण्यासाठी ओम् शांती म्हणत फक्त काही क्षणच स्थिर शांतीची ध्यानधारणा करतो. माझी आस्तिकता धार्मिक कमी व वैज्ञानिक जास्त आहे. पण तो माझा वैयक्तिक विचार आहे. त्यातून नास्तिकांशी वाद घालण्याचा व आस्तिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा किंचितही हेतू नाही!

ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

ओम् शांती!

श्री गणेशाय नमः I श्री परमेश्वराय नमः II
ओम् शांती III

(१) सुख व दुःख या दोन गोष्टी जीवनात फिरून फिरून येतच असल्याने या दोन गोष्टी देवाला मागण्याची गरजच नाही. तुम्ही जर आस्तिक असाल तर देवाकडे शांती मागा. तुम्ही जर नास्तिक असाल व देवावर तुमची श्रध्दा नसेल तर मग ध्यानधारणा करून शांती मिळवा. पण जीवनात शांती हीच अत्यंत दुर्मिळ व महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या.

(२) जीवनात फिरून फिरून येणाऱ्या सुख व दुःख या दोन गोष्टी अस्थिर व चंचल असतात. त्यांचे हे विचित्र वागणे मनाला सैरभैर, अशांत करते. अशावेळी मनाला आवश्यकता असते ती स्थिर शांतीची! तुमच्याकडे भरपूर ज्ञान व पांडित्य असेल, भरपूर पैसा व संपत्ती असेल, अमर्याद सत्ता असेल, परंतु एवढी साधने जवळ असूनही तुम्ही जीवनात स्थिर शांती मिळवू शकाल याची खात्री देता येत नाही. कारण स्थिर शांती ही जीवनात अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

(३) म्हणूनच माझ्या देव प्रार्थनेचा शेवट ओम् शांती असे म्हणून होतो. ओम् म्हणजे विश्व! निसर्ग रूपी विश्व फार मोठे आहे. त्या विश्वात शांती नांदो ही सदिच्छा माझ्या ओम् शांतीच्या प्रार्थनेत असतेच. पण मी अत्यंत छोटा माणूस असल्याने माझी प्रार्थना एवढया मोठ्या विश्वात शांती निर्माण करण्यासाठी किती उपयोगी पडणार? म्हणून माझे स्वतःचे जे छोटे विश्व आहे (तसे प्रत्येकाचे एक छोटे विश्व असते) त्या माझ्या छोट्या विश्वात स्थिर शांती निर्माण करण्यासाठी या प्रार्थनेचा मला उपयोग होतो. त्यासाठी माझ्या छोट्या विश्वाची मी दररोज परिक्रमा करतो.

(४) मी निसर्ग शरीरात देव शक्ती आहे असे मानून चालणारा भौतिक व आध्यात्मिक प्रकारातला विज्ञाननिष्ठ आस्तिक आहे. त्याच बरोबर मी नुसत्या जन्मानेच नव्हे तर संस्काराने सुध्दा हिंदू धर्मीय असल्याने माझ्या हिंदू धर्म संस्कारानुसार मी अगोदर श्री गणेशाला स्मरून नंतरच निसर्गातील सर्वोच्च देव शक्तीला म्हणजे श्री परमेश्वराला स्मरतो व मग ओम् शांती अशी प्रार्थना म्हणतो. माझी ही छोटीशी प्रार्थना मी शांत चित्ताने करतो व तीच माझी ध्यानधारणा असते. ही ध्यानधारणा स्थिर शांतीसाठी असते. कारण माझ्यासाठी तरी सुख दुःखापेक्षा मला जीवनातील स्थिर शांती हीच सर्वात महत्वाची गोष्ट वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०