https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ३ जून, २०२०

समुद्रातली मुंबई!

समुद्रातली मुंबई!

मुंबई ही समुद्रातच आहे. सात बेटांनी बनलेली मुंबई पुढे दूरवर उपनगरांत वाढली. त्या मुंबई उपनगरांना अरबी समुद्राचा धोका कमी असेल पण समुद्राला खेटून असलेल्या नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटी परिसर, दादर चौपाटी परिसर, माहिम वगैरे भागांना समुद्राचा धोका आहेच. शिवाय समुद्रात भर घालून मुंबई कृत्रिमरित्या वाढवलीय. त्यामुळे तर हा धोका आणखीनच वाढला आहे. पण मुंबई अशा तडाख्यातून वाचली आहे. याला निसर्गाची कमाल म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा. मुंबईच्या विशेष भौगोलिक रचनेमुळे म्हणे मुंबईला वादळाचा धोका कमी आहे. पण असेही म्हणतात की १८८२ साली ६ जूनला मुंबईला प्रचंड मोठ्या वादळाने झोडपले होते व त्यात जवळजवळ १ लाख माणसे मेली होती. पण त्याबाबत ठोस पुरावे गुगलवर सापडले नाहीत. पण हवामान शास्त्रज्ञ मात्र यावर जास्त अधिकाराने बोलू शकतील.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

मंगळवार, २ जून, २०२०

मन चंगा तो कठौती मे गंगा!

मी धार्मिक कर्मकांडे टाळतो!

मी धार्मिक कर्मकांडे टाळतो. मी तिर्थस्थळांना भेटी देत नाही. मी "मन चंगा तो कठौती मे गंगा" या संत रविदासांच्या विचाराचा आहे. मी दररोज माझ्या छोट्या विश्वाची परिक्रमा करतो व त्या विश्वात शांती नांदण्यासाठी ओम् शांती म्हणत फक्त काही क्षणच स्थिर शांतीची ध्यानधारणा करतो. माझी आस्तिकता धार्मिक कमी व वैज्ञानिक जास्त आहे. पण तो माझा वैयक्तिक विचार आहे. त्यातून नास्तिकांशी वाद घालण्याचा व आस्तिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा किंचितही हेतू नाही!

ओम् शांती!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

ओम् शांती!

श्री गणेशाय नमः I श्री परमेश्वराय नमः II
ओम् शांती III

(१) सुख व दुःख या दोन गोष्टी जीवनात फिरून फिरून येतच असल्याने या दोन गोष्टी देवाला मागण्याची गरजच नाही. तुम्ही जर आस्तिक असाल तर देवाकडे शांती मागा. तुम्ही जर नास्तिक असाल व देवावर तुमची श्रध्दा नसेल तर मग ध्यानधारणा करून शांती मिळवा. पण जीवनात शांती हीच अत्यंत दुर्मिळ व महत्त्वाची गोष्ट आहे हे ध्यानात घ्या.

(२) जीवनात फिरून फिरून येणाऱ्या सुख व दुःख या दोन गोष्टी अस्थिर व चंचल असतात. त्यांचे हे विचित्र वागणे मनाला सैरभैर, अशांत करते. अशावेळी मनाला आवश्यकता असते ती स्थिर शांतीची! तुमच्याकडे भरपूर ज्ञान व पांडित्य असेल, भरपूर पैसा व संपत्ती असेल, अमर्याद सत्ता असेल, परंतु एवढी साधने जवळ असूनही तुम्ही जीवनात स्थिर शांती मिळवू शकाल याची खात्री देता येत नाही. कारण स्थिर शांती ही जीवनात अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

(३) म्हणूनच माझ्या देव प्रार्थनेचा शेवट ओम् शांती असे म्हणून होतो. ओम् म्हणजे विश्व! निसर्ग रूपी विश्व फार मोठे आहे. त्या विश्वात शांती नांदो ही सदिच्छा माझ्या ओम् शांतीच्या प्रार्थनेत असतेच. पण मी अत्यंत छोटा माणूस असल्याने माझी प्रार्थना एवढया मोठ्या विश्वात शांती निर्माण करण्यासाठी किती उपयोगी पडणार? म्हणून माझे स्वतःचे जे छोटे विश्व आहे (तसे प्रत्येकाचे एक छोटे विश्व असते) त्या माझ्या छोट्या विश्वात स्थिर शांती निर्माण करण्यासाठी या प्रार्थनेचा मला उपयोग होतो. त्यासाठी माझ्या छोट्या विश्वाची मी दररोज परिक्रमा करतो.

(४) मी निसर्ग शरीरात देव शक्ती आहे असे मानून चालणारा भौतिक व आध्यात्मिक प्रकारातला विज्ञाननिष्ठ आस्तिक आहे. त्याच बरोबर मी नुसत्या जन्मानेच नव्हे तर संस्काराने सुध्दा हिंदू धर्मीय असल्याने माझ्या हिंदू धर्म संस्कारानुसार मी अगोदर श्री गणेशाला स्मरून नंतरच निसर्गातील सर्वोच्च देव शक्तीला म्हणजे श्री परमेश्वराला स्मरतो व मग ओम् शांती अशी प्रार्थना म्हणतो. माझी ही छोटीशी प्रार्थना मी शांत चित्ताने करतो व तीच माझी ध्यानधारणा असते. ही ध्यानधारणा स्थिर शांतीसाठी असते. कारण माझ्यासाठी तरी सुख दुःखापेक्षा मला जीवनातील स्थिर शांती हीच सर्वात महत्वाची गोष्ट वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

नजरेतला फरक!

नजरेतला फरक!

(१) काल रात्री टी.व्ही. च्या झी क्लासिक चॕनेल वर दिलीप कुमार, मनोज कुमार व वहिदा रेहमान या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला आदमी हा जुना हिंदी चित्रपट बघत होतो. त्याचे कथानक आवडले व "ना आदमी का कोई भरोसा, ना दोस्ती का कोई ठिकाणा" हे गाणेही मनाला भावले. चित्रपट रंगात आला असताना मला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्याला मी सांगितले की, "आदमी हा चित्रपट रंगात आलाय, मी तूला नंतर फोन करील"! त्यावर त्याचे उत्तर काय तर "दिलीप कुमारचा ना, मग तूच बघ"! मला काही कळलेच नाही त्यावेळी की तो दिलीप कुमार विषयी असे का म्हणाला. मग चित्रपट संपल्यावर मी त्या मित्राला फोन केला व "चित्रपट खूप आवडला, तिघांचीही अदाकारी खूप छान होती, स्टोरी छान होती" वगैरे सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया काय तर "मनोज कुमार, वहिदा रेहमान ठीक आहे, पण तो दिलीप कुमार मला बिलकुल आवडत नाही"! मी त्यामागचे कारण विचारले तर त्याचे उत्तर काय तर दिलीप कुमार अॕक्टिंग करताना खूप घमेंडी वाटतो. मी त्याला विचारले की "दिलीप कुमार व सायरा बानू यांची जोडी माहित आहे ना, मूल नसतानाही एकजीव होऊन त्यांनी किती वर्षे एकत्र संसार केलाय, त्या सायरा बानूला दिलीप कुमार कधी घमंडी वाटला नाही, मग तुलाच तो तसा का वाटतो, तुझी व दिलीप कुमारची कधी भेट झालीय का"? तर तो नाही म्हणाला. पण तरीही त्याचे उत्तर एकच की दिलीप कुमार त्याला घमंडी वाटतो. मी तर चक्रावून गेलो माझ्या मित्राचे ते उत्तर ऐकून. पण मी त्याच्याशी वाद घातला नाही. मी त्याला एवढेच म्हटले की, "असेलही तुझ्या नजरेतून दिलीप कुमार घमंडी, पण मला तरी त्याची ॲक्टिंग खूप आवडते"!

(२) वरील उदाहरण हे एकच नाही. अशी बरीच उदाहरणे आयुष्यात अनुभवास आली. काही व्यक्तींचे नेहमीचेच उद्गार असे की अमूक अमूक व्यक्तीला बघितले की त्यांचा दिवसच खराब जातो. बरं अशा अमूक अमूक व्यक्तीशी त्यांचे विशेष संबंध आलेले नसतात की कसलेही वाद झालेले नसतात. तरीही काहींना काही माणसे आवडतच नाहीत. त्यांना बघितले की त्यांच्या डोक्यात तिडीक भरते. आता सौंदर्याचेच घ्या ना. मला एखादी गोष्ट सुंदर वाटते म्हणून ती माझ्या मित्रांनाच काय पण माझ्या बायको, मुलीलाही सुंदर वाटेल याची खात्री देता येत नाही. हे असे का होते, तर नजरेतला फरक! बहुतेक यातूनच पुढे "नजर लागणे" ही अंधश्रध्दा निर्माण झाली असावी.

(३) पूर्वी मला वाटायचे की, माणसांच्या ज्ञान व बुद्धीत तफावत असते म्हणून त्यांच्यात मतभेद होतात, वाद होतात. पण नंतर कळून चुकले की माणसाची नजर हेही एक कारण आहे मतभेद व वादाचे! नजर म्हणजे दृष्टी! दृष्टीतूनच पुढे दृष्टिकोन तयार होतो व हा दृष्टिकोनच बऱ्याच वेळा मतभेद, वादाचे कारण होतो. या मतभेद, वादांना कायदा व त्यावर स्पष्टीकरणात्मक आदेश देणारी न्यायालये किती पुरेशी पडणार?

-ॲड.बी.एस.मोरे©२.६.२०२०

हिशोबी कनिष्ठ मध्यमवर्गीय वकील!

*मी एक हिशोबी कनिष्ठ मध्यमवर्गीय वकील!*

मी तसा कनिष्ठ मध्यमवर्गीय वर्गातला वकील! त्यामुळे अगदी सुरूवातीपासूनच घरात हिशोब वही ठेवणारा. सरकारकडून २० लाख कोटी रूपयाचे आर्थिक पॕकेज जाहीर झालेय. त्या अंकातील २० वर शून्य किती हे मला सांगता येणार नाही. शेतकरी जसे अल्प भूधारक असतात तसा मी अल्प उत्पन्न गटातला वकील. घरात आवक कमी व जावक जास्त त्यामुळे बऱ्याच वेळी उसनवारी ठरलेली आणि तीही बायकोने करायची. मी नाही, कारण मी वकील पडलो ना! मग वैतागलेल्या बायकोचा राग शांत करण्यासाठी बायकोला पै ना पैचा हिशोब  देणारा मी नवरा आणि तो हिशोब आमच्या घरखर्चाच्या हिशोब वहीत आमच्या लग्नापासून लिहिला जातोय. त्यावर आम्ही दोघेही सह्या करतो. सगळे कसे अगदी कायद्याप्रमाणे चोख!

उदाहरण म्हणून मी मागे एका पाहुण्याच्या मुलाच्या लग्नासाठी २ डिसेंबर ते ६ डिसेंबर, २०१५ या काळात कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळच्या जमाखर्चाचा हिशोब त्या टूर वर असतानाच मी एका छोट्या डायरीत लिहिला होता. ती छोटी डायरी व २०१५ सालाची घरखर्चाची हिशोब वही सहज काही निमित्ताने पुढे आली आणि त्यातूनच हा लेख तयार झाला.

डिसेंबर २०१५ कोल्हापूर भेटीचा जमाखर्चः

पत्नीकडून रोख रू. १००० + स्वतःची रोख रू. १००० = रू. २००० एकूण जमा. लग्नाचा आहेर रू. ५०० + कफ औषधे रू. २०० + कोल्हापूरी कुंदा  रू. ४०० + शेंगदाणे चटणी रू. १०० + कोल्हापूर बस व नाष्टा रू. २०० + कोल्हापूर ट्रेन व बस तिकीट रू. ६०० = रू. २००० एकूण खर्च. शिल्लक शून्य!

आता लोक म्हणतील की, या वकिलाला काय वेड लागलेय काय असल्या घरगुती गोष्टी जाहीर करायला? पण हे जाहीर करण्यामागे एक कारण आहे. लोकांचा वकील वर्गाविषयी एक गैरसमज आहे की, वकील म्हणजे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारा एक लबाड, लुच्चा प्राणी! पण तसे नसते हे मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट करू इच्छितो. कदाचित लोकांना काही वाईट अनुभव आलेही असतील कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने, पण वकिली क्षेत्रात माझ्यासारखेही वकील असतात हे लोकांनी ध्यानात घ्यावे!

- *ॲड.बी.एस.मोरे©२.६.२०२०*

रविवार, ३१ मे, २०२०

राजकारणापासून अलिप्त!

मी राजकारणापासून अलिप्त!

माझे वडील मुंबईत गिरणी कामगारांच्या मान्यताप्राप्त युनियनचे म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पुढारी होते. त्यांचे व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जवळचे संबंध होते. कामगार चळवळ व राजकारण मी जवळून पाहिलेय. राजकारणात निवडणूक हा पैशाचा खेळ झालाय. उभे रहायचे, पैसे खर्च करायचे आणि पडायचे व पुन्हा निवडून येण्यासाठी आणखी प्रयत्न करायचा यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे व लोकांचे पाठबळही पाहिजे. त्यासाठी ही पैसा लागतो. केवळ तुमचा चांगला स्वभाव व चांगले काम हे राजकारणात तुमचे भांडवल होऊ शकत नाही. आता तर काय माझे वय झालेय ६३ वर्षे आणि दगदग सहन होत नाही. वकिली सुध्दा मर्यादित केली आहे. राजकारणापासून अलिप्त झालोय मी!

-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०

मनाशी मैत्री

मनाशी मैत्री!

ओम् अशी आध्यात्मिक संज्ञा विश्वाला कोणी दिली? दिलीही असेल कोणीतरी साधु संतांनी! म्हणून तेच सत्य मानायचे काय? शेवटी देव कोणी पाहिलाय? ते सत्य आहे की अशीच कोणाच्या तरी डोक्यातून आलेली संकल्पना आहे? कोणीतरी देव मानतो म्हणून आपणही देव मानायचा का? मानणे व असणे यात फरक नाही का? बरं देवाला मानल्यावर त्याची प्रार्थना  अमूक अमूक वेळी व अमूक अमूक पद्धतीनेच केली पाहिजे हे कोणी ठरविले? कोण ओम् सुख शांती परमेश्वरा म्हणेल तर कोण हरी हरी म्हणेल तर कोण आणखी काही! म्हणजे देवाचे अस्तित्व जसे वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता येत नाही तशी देवाची प्रार्थना कशी करावी यावर धर्माचे एकमत नाही. विविध धर्म विविध पद्धतीने देवाला मानतात व भजतात. असे मानणे व भजने हे वैश्विक सत्य नाही हेच यातून सिद्ध होत नाही का? आपल्या डोक्यात एखादी  गोष्ट लहानपणापासून भरवली गेली की मनाला त्या गोष्टीची सवय लागते. नंतर आयुष्यात सत्य काय हे मनाला कळल्यावर सुध्दा मन त्याला न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा टाकून देऊ शकत नाही. मग त्या न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा आपल्या मनाला मरेपर्यंत चिकटूनच राहतात. हे फक्त देवाचेच नाही तर कोणत्याही गोष्टीचे असेच आहे. मनाला जेवढा दाबण्याचा प्रयत्न करावा तेवढे ते चेंडूसारखी उसळी घेऊन उलटे वागते. म्हणून मनाशी कठोर वागण्याऐवजी त्याच्याशी गोड मैत्री करण्यातच बुद्धीचा शहाणपणा!

-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०