https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २५ जुलै, २०२०

माझी मराठी लेखनाची आवड!

माझी मराठी लेखनाची आवड!

१९४७ ते १९९७ अशी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा मी त्याकाळी केलेल्या मराठी लेखनाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेकडून पारितोषिक मिळाले व तो पुरस्कार १९९८ साली देण्यात आला. त्याला आता २२ वर्षे पूर्ण झाली. मराठी लेखनाची मला पूर्वीपासूनच आवड आहे. फेसबुक वरील माझे मराठी लिखाण ही त्या मूळ आवडीची एक झलक आहे. श्री. पंडित हिंगे, अध्यक्ष, पुणे मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांनी आज माझ्या "बेभरवशाचे जीवन" या लेखावर प्रोत्साहनपर कमेंट केली व माझी ती जुनी आठवण जागृत केली. विशेष म्हणजे पंडित हिंगे हे पुण्याच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत हे कळले. १९९८ साली श्री. गणेश केळकर हे मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष होते. ते आता हयात नाहीत.

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०

बेभरवशाचे जीवन!

बेभरवशाचे जीवन!

(१) कुठून आलात तुम्ही, कुठून आलो मी? आपण सगळेजण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी, कोणाच्या तरी घरी, कोणत्या तरी आईबापाच्या पोटी जन्मलो आहोत. हळूहळू या जगाची ओळख आपल्याला होत गेली, अनुभव मिळत गेले. आपण अजूनही जिवंत आहोत व कसे का असेना पण जगत आहोत यासाठी आपण निसर्गाचे व समाजाचे खूप आभार मानायला हवेत. आजूबाजूला जर आपल्याच समाजाने निर्माण केलेल्या शाळा नसत्या तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेत कसे घातले असते. आजूबाजूला दवाखानेच नसते तर आपण आजारी पडल्यावर आपण कुठे गेलो असतो? या समाजाचे खूप उपकार आहेत आपल्यावर ही गोष्ट विसरता कामा नये.

(२) पण आपले जीवन सरळसाधे, सरळसोपे नाही. ज्यावेळी निसर्गाने गुलाबाची निर्मिती काट्यांबरोबर केली तेंव्हाच निसर्गाने या जगात अर्थकारणाबरोबर राजकारण सुरू केले. काय म्हणावे या निसर्गाला! जीवन दिले म्हणून कृतज्ञ भावनेने निसर्गाचे आभार मानावेत तर याच जीवनात एकीकडून जगण्याचा आधार व दुसरीकडून मरण्याची भीती देऊन हे जीवन बेभरवशाचे करून टाकले.

(३) हा लेख लिहिण्यापूर्वीच सातारा, खंडाळा येथील कण्हेरी गावातून विनायक मामाचा फोन आला. हा विनायक मामा (विनायक धनवडे) आमच्या वरळीच्या घरी बरेच वर्षे राहिला. गावी शेती व मुंबईला गिरणी कामगार म्हणून नोकरी  करीत असलेला हा मानलेला मामा आमच्या घरातलाच एक कुटुंब सदस्य होऊन गेला. तो आता ७५ वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी चैत्र महिन्यात त्याच्या कण्हेरी गावच्या जत्रेला गेलो होतो. त्यावेळी तिथे त्याचा थोरला मुलगा संदीप व धाकटा मुलगा किरण हे दोघेही भेटले. संदीप हा साधारण ३५ वर्षाचा विवाहित मुलगा ज्याला चार वर्षाचा छोटा मुलगा आहे. ही दोन्हीही मुले विवाहित व स्वभावाने विनायक मामा सारखीच खूप गोड!

(४) माझी व माझ्या सोबत जत्रेला आलेल्या बळी या आतेभावाची या सर्वांनी खूप बडदास्त ठेवली. विनायक मामा बरोबर गावात, शेतात खूप फिरलो. जत्रेत खूप मजा केली. त्यावेळी विनायक मामाचा थोरला मुलगा संदीप याने घरात आम्हाला जेवण वाढले, रात्री जत्रेतले खेळ दाखवले. आज अचानक विनायक मामा गावाहून फोन करतात व दुःखद बातमी देतात की त्यांचा थोरला मुलगा संदीप गेला. ते ऐकून मला खूप धक्का बसला. कारण संदीप कोरोना मुळे नाहीतर त्याच्या किडनीला अचानक कसले तरी इन्फेक्शन झाल्याने व ते छातीपर्यंत वर चढून त्याचे छातीत पाणी साचल्याने व मग त्या पाण्याच्या दबावाने हार्ट अटॕक आल्याने संदीप आठच दिवसांत गेला. धाकटा भाऊ किरण याने मुंबईवरून गावी जाऊन लाखाच्या वर तिकडे खाजगी रूग्णालयात खर्च केला पण त्याला यश आले नाही. संदीप कायमचा निघून गेला.

(५) काय म्हणावे या अशा घटनांना? आश्चर्य हे की ७५ वर्षाच्या विनायक मामाच्या अंगावर पाच वर्षापूर्वी त्यांचाच एक बैल उधळतो, संपूर्ण बैलगाडी विनायक मामाच्या छातीवर उलटी होते, त्यांच्या बरगड्या मोडतात व एवढा मोठा शारीरिक आघात होऊनही विनायक मामा वाचतात व त्यांचा तरूण मुलगा अचानक काहीतरी होते व अचानक या जगाचा कायमचा निरोप घेतो. म्हातारा बाप जगतो व तरूण मुलगा जातो. केवढे मोठे हे दुःख आणि कसले हे निसर्गाचे विचित्र वागणे!

(६) माणूस चांगल्या भावनेने देवाला मानतो, त्याला शरण जातो. पण सत्य हेच आहे की नुसत्या चांगल्या भावनेने जगात चांगले होईलच याची काहीही खात्री नसते. या जगात काही वाईट गोष्टी याच निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा निर्माण केल्या आहेत त्यांची कीड कुठून तरी चांगल्या गोष्टींना लागते व चांगल्या गोष्टी अचानक सडून नष्ट पावतात. मग ते कष्टाने वाढवलेले शेतीतले उभे पीक असो किंवा आईवडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेले मूल असो! काय म्हणावे निसर्गाच्या की देवाच्या या खेळाला? आपण देवाला चांगला, दयाळू असे आपल्या चांगल्या भावनेने मानून त्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो आणि देव हा असा उलट वागतो. त्याचे हे उलट वागणे माणसाच्या समजण्याच्या पलिकडचे असते म्हणून मग माणूस देवाला सोडून नियतीला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे देवाला नियती भारी पडते?

(७) कुठून कळ दाबली जाते, कुठून चक्र फिरते आणि आपण या जगात जन्म घेतो. मग जीवन काय ते हळूहळू आपल्याला कळू लागते. तुम्ही कुठले, मी कुठला, पण आपली या जीवन चक्रात योगायोगाने ओळख होते, जगण्याचे विचार, व्यवहार यांची आपल्यात देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण होत असताना आपले कधीकधी खटकते, मग रूसवे, फुगवे होतात. पण आपण मनाने चांगले असतो. जगात जर आपल्या सारखे सगळे चांगले असते तर जगात आपल्याला सगळीकडे फक्त सहज सुंदर असे अर्थकारणच दिसले असते. पण नाही, त्या खोडकर निसर्गाने म्हणा नाहीतर देवाने म्हणा, गुलाबाची निर्मितीच मुळी काट्यांबरोबर केली. हेच ते काटे जे गुलाबाला सरळसाधे, सहज सुंदर अर्थकारण करू देत नाहीत. त्यांना टोचून त्रास द्यायचा एवढेच माहित. काट्यांच्या या उपद्रवी टोचण्यातून मग सुरू होते राजकारण!

(८) राजकारण ही अर्थकारणाला लागलेली कायमची कीड आणि ती कोणी लावलीय तर त्या महान निसर्गाने किंवा देवानेच! प्लेग घ्या, स्वाईन फ्लू घ्या नाहीतर सद्याचा कोरोना घ्या, या सर्व गोष्टी हे काटेच आहेत व मग हे काटे काढून टाकण्यासाठी वैद्यकशास्त्र व आरोग्य व्यवस्था! शेवटी या आरोग्य व्यवस्थेचा संबंध कशाशी आहे तर रोगजंतू, विषाणू या काट्यांशी आणि म्हणूनच आरोग्य व्यवस्था ही सुद्धा कडू राजकारणाचाच एक भाग होऊन गेलीय.

(९) अशा या डबल ढोलकी जीवनात म्हणजे गुलाब व काटे, अर्थकारण व राजकारण अशा दोन्ही गोष्टी समांतर असणाऱ्या जीवनात तुम्ही व मी जन्म घेतला आहे व असे हे जीवन आपण जगत आहोत. आपले हे जीवन बेभरवशाचे आहे. कोरोना हा काही एकमेव काटा नाही या जगात! पुढे कोरोनावर लस आली तरी हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. कारण बाकीचे असंख्य काटे या जगात शिल्लक राहणार आहेत व निर्माणही होणार आहेत. आपण आता एकमेकांच्या संपर्कात आहोत. पुढच्या क्षणाचा आपला भरवसा नाही कारण आपले जीवन बेभरवशाचे आहे. तेंव्हा जमेल तेवढा आपला संपर्क व आपली वैचारिक, व्यावहारिक  देवाणघेवाण आनंदी करूया! विनायक मामा यांच्या कण्हेरी गावच्या जत्रेतील लोकनाट्यात मीही सहभागी झालो होतो. त्यावेळी तमाशा कलावंतांबरोबर काढलेला फोटो या लेखाच्या सोबत जोडत आहे. शेवटी या जगातील आपले बेभरवशाचे जीवन एक तमाशाच बनून राहिले आहे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

मेल्यावरही चांगल्या आठवणीत रहावे!

मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

(१) जगात माणसे येतात, जातात पण जगाचे व्यवहार थांबत नाहीत. जग काय किंवा निसर्ग काय ही एक फार मोठी संस्था आहे. राष्ट्र ही छोटी संस्था तर जग ही मोठी संस्था! राष्ट्र हे अनेक नागरिकांचे बनते तर जग हे अनेक सजीव, निर्जीव पदार्थांचे बनलेले आहे. राष्ट्राचा कायदा असतो तसा जगाचा (निसर्गाचा) सुद्धा कायदा असतो. राष्ट्रध्वज हे राष्ट्राचे भावनिक प्रतीक असते. त्याचप्रमाणे काही लोकांसाठी  देव हे जगाचे (निसर्गाचे) प्रतीक आहे. मीही देवाला निसर्गाचे प्रतीक मानणाराच आस्तिक आहे.

(२) इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की, ज्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात राष्ट्राविषयीची चांगली भावना दडलेली असते त्याचप्रमाणे देवाच्या प्रतीकात जगाविषयीची (निसर्गाविषयीची) चांगली भावना दडलेली असते. पण राष्ट्राचे सर्व नागरिक ज्याप्रमाणे चांगले नसतात त्याप्रमाणे जगातील (निसर्गातील) सर्व सजीव, निर्जीव पदार्थ चांगले नसतात. त्यांच्यात विषारी किंवा विध्वंसक गुण असतात. ज्याप्रमाणे दुर्गुणी नागरिकांमुळे राष्ट्राविषयीच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचते व या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज अपमानित होतो, डागाळला जातो, अगदी त्याचप्रमाणे विषारी पदार्थ व दुर्गुणी प्राणीमात्रांमुळे जगाविषयीच्या किंवा निसर्गाविषयीच्या चांगल्या भावनेला खोल ठेच पोहोचून या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला देव अपमानित होतो, डागाळला जातो.

(३) महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली भावना जिवंत असते म्हणून चांगली प्रतीकेही जिवंत असतात. जिवंत राष्ट्र हे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात जिवंत असते व जिवंत जग (निसर्ग) हे देवाच्या प्रतीकात जिवंत असते. राष्ट्रीय व्यवहारांत जसा राष्ट्रध्वज सोबतीला असतो त्याप्रमाणे जगाच्या (निसर्गाच्या) व्यवहारांत देव सोबतीला असतो. पण राष्ट्रध्वज सोबतीला ठेऊन राष्ट्रद्रोह करणारे काही दुर्गुणी नागरिक असतात त्याप्रमाणे देवाला सोबतीला घेऊन वाईट कर्मे करणारी माणसेही असतात. वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना देव कळत नाही. कारण चांगल्या वाईटातला फरकच त्यांना कळत नाही. पण माणसाला हा फरक कळतो म्हणून त्याच्या मनात चांगल्या भावनेतून देव निर्माण होतो व तो देव जगात चांगल्या गोष्टींचे जतन व वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचा प्रयत्न करतो.

(४) जगात माणसे येतात तशी जातातही, पण त्यांच्या जाण्याने जग (निसर्ग) नावाची संस्था बंद पडत नाही, तिचे व्यवहार बंद पडत नाहीत.  याचे कारण म्हणजे गेलेल्या माणसांची जागा जगात नव्याने आलेली माणसे घेतात. माणूस काय किंवा जगातील इतर पदार्थ, वनस्पती व प्राणी काय त्यांच्यात सतत परिवर्तन होतच असते. नवीन गोष्टी जुन्या होतात, जुन्या गोष्टी नष्ट पावतात व त्यांची जागा पुन्हा नवीन गोष्टी घेतात. हे रहाटगाडगे, चक्र सतत चालूच आहे.

(५) माणसाचे जगणे या रहाटगाडग्यात काही काळापुरतेच असते. माणूस मेल्यावर त्याचा चेहरा जगाच्या व्यवहार पटलावरून नाहीसा होतो. जवळची नातेवाईक मंडळी त्याचा चेहरा फोटोत घालून ठेवतात तर महापुरूषांचे चेहेरे लोक चित्रांत, पुतळ्यांत जतन करून ठेवतात.  जगात जगताना लोकांच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचणार नाही व या चांगल्या भावनेवर आधारित असलेली प्रतीके डागाळली जाणार नाहीत याची काळजी घेत चांगले जीवन जगून आदर्श निर्माण करणारी माणसे लोकांच्या कायम स्मरणात राहतात. म्हणून मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.७.२०२०

बुधवार, २२ जुलै, २०२०

वो देखो जला घर किसी का!

वो देखो जला घर किसी का!

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एखाद्या घरावर जेंव्हा आकाश कोसळते तेंव्हा अनपढ या जुन्या हिंदी चित्रपटातील "वो देखो जला घर किसी का" हे दुःखद गीत आपोआप ओठांवर येते. त्या घराचे ते जळणे आपल्यापासून आता दूर नाही याची जाणीव होते.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.७.२०२०

वो देखो जला घर किसी का!

वो देखो जला घर किसी का
ये टूटे हैं किसके सितारे
वो क़िस्मत हँसी और ऐसे हँसी
के रोने लगे ग़म के मारे
वो देखो जला घर किसी का...

गया जैसे झोंका हवा का
हमारी ख़ुशी का ज़माना
दिए हमको क़िस्मत ने आँसू
जब आया हमें मुस्कराना
बिना हमसफ़र है सूनी डगर
किधर जाएँ हम बेसहारे
वो देखो जला घर किसी का...

हैं राहें कठिन दूर मंज़िल
ये छाया है कैसा अँधेरा
कि अब चाँद-सूरज भी मिलकर
नहीं कर सकेगा सवेरा
घटा छाएगी बहार आएगी
ना आएँगे वो दिन हमारे
वो देखो जला घर किसी का...

इधर रो रही हैं आँखें
उधर आसमाँ रो रहा है
मुझे कर के बरबाद ज़ालिम
पशेमान अब हो रहा है
ये बरखा कभी तो रुक जाएगी
रुकेंगे ना आँसू हमारे
वो देखो जला घर किसी का...

वो देखो जला घर किसी का
ये टूटे हैं किसके सितारे
वो किस्मत हँसी और ऐसी हँसी
के रोने लगे गम के मारे
वो देखो जला घर किसी का.



मंगळवार, २१ जुलै, २०२०

कोरोनासोबत जीवशास्त्राचा अभ्यास!

कोरोनासोबत जीवशास्त्राचा अभ्यास!

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व पुढे विधीशास्त्र शिकून  वकिलीत पडल्यानंतर माणसांतील संबंधावरच लक्ष केंद्रित केले गेल्याने इतर गोष्टी हळूहळू नजरेतून सुटत गेल्या. माणूस सोडून या जगात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचा अभ्यास सुटला तर मनुष्याचे जीवन कठीण होऊ शकते हे कोरोनाने सिद्ध केले आहे. या गोष्टी म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन, अन्न व औषध पुरवणाऱ्या वनस्पती, सूक्ष्मजीव, मोठे जीव व शेवटी माणूस. या सर्व गोष्टींचे एकमेकांशी अत्यंत जवळचे नाते आहे. पण माणूस सोडून सृष्टीत असणाऱ्या इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग तिथेच फसतो. या पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले याचा रोचक इतिहास डार्विन शास्त्रज्ञाने सांगितला. पण आपला इतिहासाचा अभ्यास माणसाच्या इतिहासापुढे जातच नाही. हवा, पाणी व इतर मूलद्रव्यांनी अमिबा सारखे प्राणी कसे निर्माण केले. सजीव सृष्टी काय अशीच हवेतून पटकन निर्माण झाली नाही. तर अगोदर वनस्पती व कोरोना सारखे अर्धजीव, अर्धजीवातही कोरोना सारखे सूक्ष्म अर्धजीव व वनस्पती सारखे मोठे अर्धजीव, नंतर टी.बी. च्या रोगजंतूसारखे सूक्ष्म  पूर्णजीव (जिवाणू), नंतर पाली, साप यासारखे  सरपटणारे प्राणी, मग हवेत उडणारे पक्षी, मग ससे, हरणे यासारखे वनस्पतीजन्य प्राणी, नंतर वाघ, सिंहासारखे मांसाहारी प्राणी व सर्वात शेवटी शाकाहारी व मांसाहारी असा माणूस. हा एवढा मोठा लांबलचक प्रवास व इतिहास आहे पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा! हा इतिहास  किती जण वाचतात, अभ्यासतात? वैज्ञानिक सत्य हे आहे की माणसांचा नुसता माणसांशीच नव्हे तर इतर अनेक व विविध निर्जीव व सजीव पदार्थांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. इतका की आपले संपूर्ण मानवी जीवनच या इतर सर्व पदार्थांवर अवलंबून आहे. कोरोना विषाणू हा अशाच अनेक व विविध अर्धजीवी पदार्थांतला एक अत्यंत सूक्ष्म पदार्थ! पण या अत्यंत सूक्ष्म अर्धजीवाने संपूर्ण जगाला जेरीस आणलेय की नाही? सूक्ष्मजीव शास्त्रात अशा सूक्ष्म अर्धजीवी विषाणूंचा व सूक्ष्म पूर्णजीवी जिवाणूंचा सखोल अभ्यास असतो. या अभ्यासातूनच पुढे सखोल अभ्यासाचे औषधनिर्माण शास्त्र उदयास आले. किती अवघड आहेत या गोष्टी! आपल्याला मात्र पटकन कोरोनावर लस हवीय! एवढी का सोपी गोष्ट आहे ती?

-ॲड.बी.एस.मोरे©२२.७.२०२०

अती शहाणा त्याचा बैल रिकामा!

शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होतो का?

सद्या कोरोनाच्या भीतीमुळे सरकारने धार्मिक प्रार्थनास्थळे, देवस्थानांना कुलूप लावून त्यांचे लॉकडाऊन केले असले तरी त्यामुळे लोकांची देवावरील श्रद्धा बिलकुल कमी होणार नाही. उलट आता ती श्रद्धा जास्त वाढेल असे माझे मत आहे. खाजगी रूग्णालयातील लाखांच्या घरातील बिले बघितली आणि मग धर्माची चाड नसलेले विज्ञान किती मोकाट सुटू शकते याची जाणीव या कोरोनानेच मला करून दिली. एक कोरोना विषाणू जगातील वैज्ञानिक प्रगतीचे जर तीन तेरा वाजवू शकतो तर मग या विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणे ही सुद्धा एक मोठी अंधश्रद्धाच आहे असेच मी म्हणेन. शिक्षण कमी होते तेंव्हा किती आनंदी व शांत होतो मी! लहानपणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जायचो तेंव्हा निरागस भावनेने त्या सावळ्या विठ्ठल मूर्तीकडे बघत बसताना केवढा मोठा आधार वाटायचा मला त्या मूर्तीचा व केवढा मोठा आनंद व्हायचा मला त्या सुंदर मूर्तीकडे बघत बसण्याचा! कारण माझी त्यावेळी देवावरील श्रद्धा मजबूत होती. तिला कोणी भोके पाडली नव्हती. पण जसजसा मी मोठा होत गेलो व अधिक शिक्षण घेत गेलो तसतशी माझी देव श्रद्धा डळमळीत होऊ लागली. माझे मन अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होत गेले आणि अतीशहाणा होऊन मी देवालाच उलट प्रश्न विचारू लागलो. पुढे पुढे तर देवाचे अस्तित्वच नाकारत नास्तिकतेकडे झुकू लागलो. आणि मग हा कोरोना आला! या कोरोनाने माझे डोळे खाडकन उघडले. कुठे येऊन पोहोचलो होतो मी अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होऊन! देवालाच उलट प्रश्न करायला लागलो मी! आता मी मलाच प्रश्न करतोय की, निसर्ग विज्ञानात धर्म नावाची गोष्ट नाही काय? त्या निसर्गात देव नाही काय? विज्ञाननिष्ठ होणे म्हणजे अधार्मिक होणे काय? बुद्धीवादी होणे म्हणजे भावनेचा, देवावरील श्रध्देचा चोळामोळा करून टाकणे काय? निसर्गाचे वैज्ञानिक सत्य कळण्यासाठी मला नास्तिक होणे ही पूर्वअट आहे काय? आस्तिक राहून मी नैसर्गिक वागू शकत नाही काय? आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक वागणे म्हणजे तरी काय? नैसर्गिक वर्तनात जर नैतिकता येते तर मग धर्माचा भाग आलाच ना! म्हणजे निसर्गाच्या विज्ञानात धर्म आला. आता या धर्मात देव आणायचा की नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा व बुद्धीचा प्रश्न! नास्तिक लोक म्हणतील की नैतिक वागायला देवच कशाला हवाय? मग पुढे ते असेही म्हणतील की विज्ञानात धर्म कशाला हवाय? काहीजण तर असेही म्हणतील की, नास्तिक व्हायला हिंमत पाहिजे. पण या कोरोनाने हे सर्व प्रश्न माझ्यासाठी तरी निकालात निघाले आहेत. मला देवाची भीती वाटत नाही तर आधार वाटतो आणि मरतानाही हा आधार घेऊनच मला मरायचेय! भले नास्तिकांच्या दृष्टिकोनातून  हा आधार आभासी असेल. मला एवढे मात्र कळते की, मानवी बुद्धीचे व ज्या विज्ञानाच्या जोरावर ती उड्या मारते त्या विज्ञानाचे बऱ्याच गोष्टींवर बिलकुल नियंत्रण नाही. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रियांचेच घ्या! आपल्या  बुद्धीला या अनैच्छिक क्रियांवर तिच्या ऐच्छिक इच्छाशक्तीच्या जोरावर किती नियंत्रण ठेवता येते? ही मानवी बुद्धी त्या पृथ्वीला उलटी का फिरवू शकत नाही? जन्म, जीवन, मृत्यू या जीवनचक्रावर या मानवी बुद्धीचे किती नियंत्रण आहे? निसर्गाच्या या विज्ञानावरच जर मानवी बुद्धीचे पूर्ण नियंत्रण नाही तर मग या बुद्धीला शेवटी शरणागती स्वीकारणे आलेच ना! आता नास्तिक निसर्गाच्या ताकदीला मानतील पण देवाला मानणार नाहीत. तो त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र आता म्हातारपणी माझा हा असला अती बुद्धीवादाचा, अती विज्ञानवादाचा अर्थात अती शहाणपणाचा किडा डोक्यातून काढून टाकायचाय. मला आता पुन्हा लहान व्हायचेय व देवाला जवळ करायचेय! चिरंतन विश्रांती घेण्यासाठी मृत्यूशय्येवर जाताना ते विज्ञान, ते तत्वज्ञान, ती अतीशहाणी बुद्धी मला सोबतीला मुळीच नको! मला माझ्या श्रद्धेतला तो देवच बरोबर हवाय! शेवटी एक प्रश्न राहतोच की, शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञान वादी होतो का?

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

निसर्गाचे लॉकडाऊन, अनलॉक!

निसर्गाचे लॉकडाऊन व अनलॉक!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायबाप सरकार ज्याप्रमाणे लॉकडाऊन व अनलॉक असा दुहेरी कार्यक्रम अंमलात आणते अगदी त्याचप्रमाणे निसर्गही वागतो याचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे काय? म्हणजे बघा, वासना असो नाहीतर भावना, आपल्या या जाणिवा जागृत कोण करतो तर निसर्ग! हा झाला त्या महान निसर्गाचा कळ लावण्याचा प्रकार! ही कळ लावून दिली की या कळीला आपल्या बुद्धीने प्रतिसाद कसा द्यायचा हे कोण ठरवतो, तर तेही निसर्गच ठरवतो. पण इथे निसर्ग थोडा  शिथिलही होतो. जाणिवांच्या कळीला प्रतिसाद कसा द्यायचा याची अर्धी चावी निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवतो. तिथे तो त्याची पूर्ण हुकूमशाही राबवतो. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया हा निसर्गाच्या ताब्यातील त्या अर्ध्या चावीचा भाग झाला आणि हा अनैच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा कडक लॉकडाऊन झाला. आता गंमत अशी की निसर्ग त्याची अर्धी चावी मानवी बुद्धीच्याही ताब्यात देऊन  टाकतो. ही असते बौध्दिक स्वातंत्र्याची चावी! निसर्ग निर्मित जाणिवांना प्रतिसाद कसा द्यायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य निसर्गाकडून आपल्या बुद्धीला याच अर्ध्या चावीने मिळते. या निर्णय स्वातंत्र्यात तर बुद्धीचा खरा कस लागतो. आपल्या बुद्धीकडून  शरीराच्या माध्यमातून होणाऱ्या ऐच्छिक क्रिया हा निसर्गाने आपल्या बुद्धीच्या ताब्यात दिलेल्या अर्ध्या चावीचा भाग होय आणि हा ऐच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा अनलॉक होय. आहे की नाही निसर्गाच्या लॉकडाऊन व अनलॉकची आश्चर्यकारक करामत!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०