https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

धर्मसंस्कारातील तत्वज्ञान!

धर्मसंस्कारातील तत्वज्ञान, विज्ञान!

मी नास्तिक नसून देवावर श्रद्धा असलेला आस्तिक आहे पण माझा देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा म्हणजे नैसर्गिक, वैज्ञानिक आहे हे मी अगोदरच जाहीर केले आहे.  निसर्ग व समाज यांच्या हालचालींचे जिज्ञासेने बारीक निरीक्षण करणे व त्यातील सत्य शोधून काढण्याचा सातत्याने प्रयत्न करणे ही माझी लहानपणापासूनची सवय. ते माझे अनौपचारिक शिक्षण अजूनही चालू आहे व मरेपर्यंत चालूच राहील.

याच सातत्यपूर्ण शिक्षणाचा भाग म्हणून मी हिंदू धर्म संस्कारामागील विज्ञान काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न दादर, मुंबई येथे आयुर्वेदाची प्रॕक्टिस करणाऱ्या डॉ. इंदूभूषण बडे यांच्याकडून केला. डॉ. बडे हे स्वतः ब्राम्हण पण डॉक्टर असल्याने त्यांचे देवधर्माविषयीचे विचार नेहमीच विज्ञाननिष्ठ. १९८८ साली वकिली सुरू केल्यानंतर व्यापारी क्लायंटस यांच्या बरोबर त्यांच्या केसेसवर त्यांच्या दुकानांत जेवण न करताच चर्चा करीत राहताना सतत चहा पित राहिल्याने मला पोटाचा ड्युओडिनम अल्सर झाला होता. तेव्हा इंडियन डेरी कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या कंपनीच्या अकौंटस खात्यातील माझी पूर्व लेडी सहकारी अरोरा डिकाॕस्टा हिने मला डॉ. इंदूभूषण बडे यांचे नाव सुचवले. मग मी डॉ. बडे यांच्याकडून सहा महिने माझ्या अल्सरवर आयुर्वेदीक ट्रिटमेंट घेतली व शस्त्रक्रिया न करता माझा अल्सर केवळ आयुर्वेदीक औषधांनी पूर्ण बरा झाला.

माझ्या ट्रिटमेंटच्या काळात मी जेव्हा जेव्हा दादर शिवसेना भवनाजवळ व स्वामी समर्थ मठासमोर असलेल्या  डॉ. बडे यांच्या लक्ष्मी आरोग्य मंदिर क्लिनिकमध्ये जायचो तेव्हा तेव्हा मला तपासून झाल्यावर काही मिनिटे मी डॉ. बडे यांच्याबरोबर देवधर्मावरच चर्चा करायचो. त्यामुळे बाहेर रांगेत बसलेले पेशंटस वैतागून जायचे. मी तरूण वकील व डॉ. बडे यांचे वडील पण वकील होते त्यामुळे डॉ. बडे यांची व माझी वैचारिक मैत्री झाली. याच विषयावर डॉ. इंदूभूषण बडे यांनी पुढे पुस्तक लिहिले त्याचे नाव "संस्कारधन". या पुस्तकात त्यांनी सोळा हिंदू धर्मसंस्कारामागचे तत्वज्ञान व विज्ञान अगदी व्यवस्थित   समजावून सांगितले आहे. माझ्या या लेखाबरोबर त्या पुस्तकातील काही भाग जोडत आहे. तो वाचकांनी जरूर वाचावा. डॉ. इंदूभूषण बडे आता हयात नाहीत.

-ॲड.बी.एस.मोरे, २०.१०.२०२४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा