निसर्गाचे विज्ञान व माणसांचे तत्वज्ञान यांचा ताळमेळ!
कायदामान्य शासन व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून जेव्हा काही माणसे बेकायदेशीर व्यवहार, कृती करतात व शासन अशा बेकायदेशीर समांतर व्यवस्थेचे कंबरडे मोडू शकत नाही व तसेच श्रध्दामान्य परमेश्वराची बिलकुल पर्वा न करता जेव्हा काही माणसे देवाच्या नावाने अंधश्रद्धेवर आधारित अघोरी प्रथा चालू ठेवतात व तरीही परमेश्वर नुसता गप्प बसून राहतो तेव्हा सरळमार्गी, सदाचारी, विवेकी प्रामाणिक माणसांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास उडतो व परमेश्वरावरील श्रद्धा उडते.
लोकांच्या सुज्ञ, विवेकी समाज बुद्धीवर आधारित असलेले समाज धार्मिक (विधी/कायद्याचे) तत्वज्ञान व लोकांच्या देवश्रद्धाळू धर्मबुद्धीवर आधारित असलेले देव धार्मिक (आध्यात्मिक) तत्वज्ञान ही दोन्ही तत्वज्ञाने मानवी बुद्धीशी निगडीत आहेत. त्यात निसर्गाचा किंवा निसर्गातील निसर्गशक्तीचा (चैतन्य परमेश्वराचा) प्रत्यक्ष सहभाग किती हे सांगता येत नाही. अर्थात निसर्ग विज्ञानाच्या कार्यपद्धतीत मानवी मेंदूने घुसवलेले समाज धार्मिक (विधी/कायद्याचे) बौद्धिक तत्वज्ञान व देव धार्मिक (आध्यात्मिक) बौद्धिक तत्वज्ञान ही दोन्ही तत्वज्ञाने निसर्ग/ईश्वर निर्मित नसून ती मानवनिर्मित असल्याने ती परिपूर्ण नाहीत तर अर्धवट आहेत व म्हणून या दोन्ही विधी/कायदा व देवधार्मिक/आध्यात्मिक तत्वज्ञानांना त्यांच्या मर्यादा आहेत. तत्वज्ञान हे विज्ञानाला फार मर्यादित स्वरूपात प्रभावित करते कारण ते मानवी बुद्धीच्या स्वेच्छाधिकारावर अवलंबून आहे पण तत्वज्ञानाला प्रभावित करण्याचा विज्ञानाचा आवाका मात्र अमर्यादित आहे कारण विज्ञानाची चावी माणसांकडे नसून निसर्गाकडे आहे. मानवनिर्मित तत्वज्ञान हे निसर्ग निर्मित विज्ञानाचे बाळ आहे त्यामुळे ते विज्ञानावर अमर्याद सत्ता गाजवू शकत नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१०.२०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा