https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३० जून, २०२४

राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे!

राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे!

समाज हा माणसांचा संघ असतो. या संघात विविध स्वभावाची व विविध ताकदीची माणसे जगत असतात. या विविधतेत ती किती सांघिक भावनेने व सहकार्याने जगतात हा अभ्यासाचा फार मोठा विषय आहे. मानवी मनांचे प्रकार तरी किती याचा हिशोब नाही. काही प्रकार ते असे. झोपाळू, स्वप्नाळू (काल्पनिक आभासात जगणारी), आळशी मने, जागृत, डोळस (वैज्ञानिक वास्तवात जगणारी), उत्साही मने, अज्ञानी, मूर्ख, विकृत मने, ज्ञानी, व्यवहारी, सुज्ञ मने असे मानवी मनांचे अनेक, विविध प्रकार आहेत. या विविध मन प्रकारातील कोणता प्रकार, वर्ग निवडून त्याची साथसंगत करायची व कोणत्या प्रकारापासून, वर्गापासून दूर रहायचे हा प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न. पण अशी निवड केली तरी प्रत्येक माणसाला विविध मनांच्या माणसांच्या गराड्यात प्रत्यक्ष किंवा  अप्रत्यक्षरीत्या रहावेच लागते.

मानवी मनाच्या विविध प्रकारानुसार माणसांचे विविध वर्ग बनविता येऊ शकतात. पण त्याऐवजी आर्थिक व जातीपातीच्या निकषावर समाजात विविध वर्ग निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ, रेल्वेच्या डब्यात प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी असे पाडलेले वर्ग ज्ञानावर नव्हे तर आर्थिक निकष विचारात घेऊन पाडलेले असतात. तसेच उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न  गट व अल्प उत्पन्न गट असे राहत्या सोसायट्यांचे तीन वर्ग समाजाने निर्माण केलेत त्याचा आधार काय तर जवळ असलेली आर्थिक ताकद.

माणसाच्या मानसिक जडणघडणीत माणूस कोणत्या वातावरणात वाढतो याला फार महत्व आहे. जातीपातीने निर्माण केलेला सामाजिक वर्ग व आर्थिक निकषाने निर्माण केलेला आर्थिक वर्ग यापैकी कोणत्या वर्गात सुशिक्षित, ज्ञानी माणसांचा वर्ग बसतो हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर ज्ञानाला जातपात व पैसा चिकटवून ज्ञानाचे मूल्यमापन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पण चुकीचा हा पायंडा समाजाकडून पाडला गेलाय ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीशी सतत संघर्ष करीत एखाद्या गरीब माणसाने उच्च शिक्षण घेतले तरी शेवटी त्याच्या ज्ञानाची, बौद्धिक कष्टाची किंमत समाजात कोण करते तर मूठभर श्रीमंत लोकांचा विशिष्ट वर्गच. ही वस्तुस्थिती व परिस्थिती शैक्षणिक प्रगतीसाठी नैराश्यजनक आहे.

या परिस्थितीत राहून कमी शिक्षण जवळ असूनही (सर्व राजकारणी उच्च शिक्षित नसतात) राजकारणी मंडळी समाजातील विविध वर्गांना एकत्र करून त्या संघावर (राष्ट्र हा सुद्धा एक प्रचंड मोठा संघ आहे) राजकीय मुत्सद्देगिरी करून धूर्तपणे राज्य करतात हे विशेष आहे. कोणाचे व्यक्तित्व कितीही मोठे असो ते कोणालाही संघावर लादता येत नाही कारण संघशक्ती ही व्यक्तीच्या वैयक्तिक शक्तीपेक्षा फार मोठी असते. या संघशक्तीचा समाजाच्या कल्याणासाठी कमी व स्वतःच्या फायद्यासाठी जास्त उपयोग कसा करून घ्यायचा हे गणित धूर्त राजकारणी मंडळींना चांगले ठाऊक असते व त्याचा ते चाणाक्षपणे उपयोग करून घेतात. म्हणून तर यशस्वी राजकारणी मंडळींकडे भरपूर पैसा असतो व ती मंडळी उच्चभ्रू सोसायटीतील लोकांपेक्षाही भारी असलेल्या आलिशान घरांत (बंगल्यात) राहतात व उच्च प्रतीच्या सुखसुविधा उपभोगतात. पण हा उपभोग घेत असताना ही राजकारणी मंडळी झोपडपट्ट्या, चाळी, साध्या सोसायट्यांमधून फिरून तिथल्या लोकांना आपलेसे करून घेतात व श्रीमंत, उच्चभ्रू लोकांनाही जवळ करून त्यांच्याशी छुपी भागीदारी करतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही. राजकीय गणित हा अत्यंत कठीण विषय आहे जो धूर्त राजकारणी मंडळींना अगदी व्यवस्थित कळतो. म्हणून तर राजकारणी मंडळींच्या या विशेष बुद्धीला व त्यांच्या विशेष नेतृत्व गुणाला जेवढे नमस्कार करावे तेवढे थोडेच. खरंच, राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे! 

-©ॲड.बी.एस.मोरे, १.७.२०२४

दुर्मिळ संगम!

देखणे शारीरिक सौंदर्य, कुशाग्र बौद्धिक प्रतिभा व आदर्श नैतिक चारित्र्य या तिन्ही उच्च गोष्टींचा संगम एखाद्या व्यक्तीत आढळणे व तो कायम टिकून राहणे ही मानवी जगातील अत्यंत दुर्मिळ गोष्ट होय! -ॲड.बी.एस.मोरे

शनिवार, २९ जून, २०२४

धर्म व राष्ट्र!

धर्म म्हणून एक असणे व राष्ट्र म्हणून एक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, धर्म वैयक्तिक पातळीवर तर राष्ट्र सार्वजनिक पातळीवर असते, धर्माचे राष्ट्र करणे म्हणजे स्वतःच्या धार्मिक व्यक्तित्वालाच राष्ट्र करणे होय, राष्ट्र ही संकल्पना अशी नाही, ती सर्वसमावेशक आहे, त्यामुळे धर्माचे राष्ट्र करण्याऐवजी राष्ट्राचा धर्म करणे ही गोष्ट राष्ट्र संकल्पनेस सुसंगत होईल! -ॲड.बी.एस.मोरे

क्रिकेट व देश!

क्रिकेटच्या मैदानी खेळात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक या सर्व खेळाडूंच्या एकाग्रता, चपळता, मनोधैर्य, निश्चय या गुणांची कसोटी वैयक्तिक पातळीवर तर लागतेच पण सर्व खेळाडूंच्या सांघिक एकता व शिस्तीच्या बळाचीही कसोटी लागते, ही सांघिक एकता व शिस्त ज्या देशाच्या नागरिकांच्या रक्तात भिनलेली असते तो देश प्रगत व सामर्थ्यवान झाल्याशिवाय रहात नाही! -ॲड.बी.एस.मोरे

सत्य परमेश्वर!

जो परमेश्वर सृष्टीचक्राच्या भोगातून कोणाचीही सुटका करीत नाही व निसर्ग विज्ञानाच्या वास्तवापासून कोणालाही मुक्त करीत नाही त्या परमेश्वराची कशासाठी व किती प्रार्थना करायची हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा व बुद्धीचा प्रश्न, कल्पनेतला आभासी परमेश्वर व वास्तवातला सत्य परमेश्वर यातील फरक आम्हा नीट कळो व सत्य परमेश्वराकडून वास्तवात जगण्याची आम्हा शक्ती मिळो! -ॲड.बी.एस.मोरे

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

वृद्ध शरीर एक बुडते जहाज!

पृथ्वीवर गुरूत्वाकर्षण आहे म्हणून इथे माणसांसह सगळ्याच पदार्थांना जडत्व प्राप्त होते. इतकेच नव्हे तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेलाही वजन प्राप्त होते. म्हणजे आम्ही इथे वजनदार का आहोत तर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे. अंतराळात हे गुरूत्वाकर्षण नसल्याने माणूस त्या वातावरणात तरंगत राहतो कारण तिथे पृथ्वीवरील त्याचा जडपणा नष्ट होतो. खोल पाण्यावर तरंगत राहण्यासाठी पदार्थाला पाण्याच्या जडपणापेक्षा हलके व्हावे लागते. माणूस खोल पाण्यात पोहताना पाण्याला त्याच्या  पोटाखाली ओढून हलके होत पोहत पुढे सरकतो किंवा शरीर पाण्यापेक्षा हलके करून खोल असलेल्या जड पाण्यावर तरंगूही शकतो.

बालपणी व तरूणपणात सळसळते असलेले रक्त वृद्धापकाळी तसे रहात नाही. त्यामुळे बालपणी व तरूण वयात सहज करता येणाऱ्या गोष्टी वृद्धापकाळी जड, अवघड होतात. वृद्ध शरीरातील वृद्ध मेंदू अधूनमधून जड होतो (याला डोके जड होणे म्हणतात) व त्यामुळे साध्या साध्या गोष्टीही जड होतात. काहीजणांच्या मेंदूला भौतिक जगाची विरक्ती येते. विरक्ती हा प्रकार वृद्धापकाळीच जास्त जाणवतो. हे असे का होते तर मेंदू जड झाल्याने होते. समुद्रातून प्रवास करताना पाण्यापेक्षा हलक्या असलेल्या जहाजात समुद्राचे पाणी शिरले तर ते जहाज जड होऊन समुद्रात बुडते. तीच गत जडत्व आलेल्या वृद्ध शरीराची होत असते.

वृद्धापकाळी शरीराचे अवयव एकेक करून हळूहळू कमकुवत व निकामी होत जातात. असा एकेक कमकुवत अवयव म्हणजे वृद्ध शरीररूपी जहाजाला पडलेली भोके ज्यातून जड समुद्राचे (जड सृष्टीचे) पाणी जहाजात शिरून जहाज सृष्टीरूपी सागरात बुडू लागते. निसर्गाने ही जहाज बुडण्याची क्रिया इतकी अनिवार्य करून ठेवलीय की वृद्ध जहाजाला नीट सावरता येत नाही व इतर तरूण जहाजेही या जड वृद्ध जहाजाला बुडण्यापासून वाचवू शकत नाहीत कारण वृद्ध शरीराला भोकेच इतकी पडलेली असतात की त्यातून जड पाणी आत शिरतच राहते. 

रूग्णालयात वृद्धावस्थेत आजारी पडलेल्या माणसाच्या नाकातोंडाला लावलेल्या प्राणवायूच्या नळ्या म्हणजे वृद्ध जहाजाला पडलेली भोके बुजवण्याचाच प्रकार जो काही काळ जहाज बुडण्याची प्रक्रिया लांबवतो. पण ही तशी वरवरची मलमपट्टी असते. काही वृद्ध जहाजे सत्तरी पार करायच्या आतच जड सृष्टीत (पाण्यात) बुडतात तर काही वृद्ध जहाजे नव्वदी पार करून मग बुडतात, पण बुडतात जरूर!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.६.२०२४

शुक्रवार, २८ जून, २०२४

अवघड, आव्हानात्मक जीवन!

अवघड, आव्हानात्मक जीवन!

मानवी मेंदू हा निसर्गाचा एक अजब नमुना आहे. मानसिक संतुलन बिघडणे हा फार विचित्र प्रकार आहे. आपल्या आजूबाजूला मूर्ख माणसे तर असतातच पण मानसिक संतुलन बिघडलेली वेडी, विकृत माणसेही असतात. संख्येने थोडीच असली तरी ही माणसे समाजात भय निर्माण करतात. फार वर्षापूर्वी मी लहान असताना १९६५ ते १९६८ या काळात मुंबईत रामन राघव नावाच्या व्यक्तीने त्याच्या विकृत मानसिकतेतून अनेक खून करून एक प्रचंड मोठी दहशत निर्माण केली होती. आता दिनांक २८.६.२०२४ च्या लोकसत्तेतील तीन बातम्या वाचा. एक बातमी आहे आईस्क्रीम मध्ये कामगाराचे बोट सापडल्याची. दुसरी बातमी आहे नैराश्यग्रस्त स्त्री मरिन ड्राइव्हच्या समुद्रात पडून बुडत असताना तिला तिथे तैनात असलेल्या दोन पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवल्याची. तर तिसरी बातमी आहे एका विकृत मुलाने आईचा खून करून तिचे मांस भाजून खाल्ल्याची. या असल्या बातम्या वाचल्या की मन सुन्न होते व निसर्गाने हे जीवन किती अवघड, आव्हानात्मक केले आहे याची जाणीव होते व काळजात धस्स होते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.६.२०२४