https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

उडणारे पक्षी!

राजकीय नेते म्हणजे हवेत उडणारे पक्षी!

खूप हेवा वाटतो मला त्या पक्षांचा जे हवेत उडतात व त्या राजकीय नेत्यांचा जे विमानात बसून आकाशात विहार करतात. आपल्याला पण असे हवेत उडता आले असते तर किती मज्जा आली असती असा विचार अधूनमधून मनात येतो. पण नुसत्या विचारांवर हवेत उडता येत नाही हे कळल्यावर त्या विचारांना खाली बसवतो, त्यांना शांत रसात विश्रांती घ्यायला भाग पाडतो. आज असाच आकाशात पक्षांना न्याहाळत बसलो होतो. पण त्यांचे निरीक्षण करता असे लक्षात आले की हे पक्षी जास्त काळ हवेत उडू शकत नाहीत. वर उडून उडून एकतर ते थकतात व मग अन्न, पाण्यासाठी जमिनीवर येतात. हे पक्षी हवेत अंडी घालू शकत नाहीत व हवेत त्यांच्या पिलांना जन्म देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्यांना जमिनीचा किंवा जमिनीवरील झाडांचा आसरा घ्यावाच लागतो. राजकीय नेत्यांचे सुद्धा तसेच असते. ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, चक्रीवादळ, अतीवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी झालेल्या लोकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी जेंव्हा हे नेते विमानात बसून आकाशातून उडत उडत आपत्तीग्रस्त भागात जातात तेंव्हा त्यांना तिथे विमानातून उतरावेच लागते, स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांत, तिथल्या लोकांत मिसळावेच लागते. सांगायचे तात्पर्य काय तर लोकच नसतील, पक्ष कार्यकर्तेच नसतील तर राजकीय नेत्यांना कोण विचारेल? खाली जमीनच नसेल तर उडणारे पक्षी हवेत किती तग धरून राहतील? इथे प्रश्न पक्षांनी हवेत उडण्याचा नाही तर जमिनीने तिची किंमत  ओळखण्याचा आहे. तसेच इथे प्रश्न राजकीय नेत्यांनी रूबाबात राहण्याचा नाही तर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी व लोकांनी स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

वकिली व्यवसायाचे राजेपण!

वकिली व्यवसाय म्हणजे सर्व व्यवसायांचा, सर्व क्षेत्रांचा राजा व्यवसाय!

गरीब कुटुंबातील मुलामुलींना वकील होऊन या अत्यंत आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहणे कठीण असले तरी ते अशक्य नाही. यासाठी मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना माझे स्वतःचे जिवंत उदाहरण बिनधास्त देतो. मी मुंबईतील कापड गिरणी कामगाराचा मुलगा आहे. वडील सातवी शिकलेले, गिरणी कामगार, आई पूर्ण अशिक्षित अंगठेबहाद्दर, एक भाऊ व दोन बहिणी ही माझी सख्खी भावंडे फक्त एस.एस.सी. पर्यंत कशीबशी येऊन तिथेच ठप्प झालेली, घरी अत्यंत गरिबी, शिक्षणात मार्गदर्शन करायला कोणी सुद्धा नाही, वकिली क्षेत्र काय असते याविषयीची माहिती देणारा, त्यातले बारकावे, खाचखळगे समजावून सांगणारा कोणी नाही, आजूबाजूची बहुतेक सगळीच मंडळी माझ्या शैक्षणिक प्रगतीवर जळणारी. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी जिद्दीने वकील झालो व पैशाची तंगी, चेष्टा, अपमान या सगळ्या गोष्टी सहन करीत वकिलीत टिकून राहिलो व बायको बारावी शिकलेली गृहिणी व मुलगी शाळेत, पुढे कॉलेजात, मग पुढे एम.बी.ए. साठी मोठ्या मॕनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ही सर्व आर्थिक जबाबदारी एकट्याने डोक्यावर घेऊन वकिलीत राहूनच यशस्वीपणे संसार केला. आज माझी एकुलती एक मुलगी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत मॕनेजर म्हणून उच्च पदावर आहे. तिला तिचा आयुष्याचा जोडीदार स्वतःच निवडण्याचे मी व माझ्या पत्नीने पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मुलीनेही त्या स्वातंत्र्याचे सोने केले. तिचे पती हे सुद्धा लंडनचे एम.बी.ए. आहेत. जावई व मुलगी दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत. हे सर्व मला माझ्या वकिली व्यवसायात राहून प्राप्त करता आले. माझे हे यश म्हणजे देशाचे पंतप्रधान होण्याएवढे मोठे यश आहे असे मी स्वतः मानतो. कारण खडतर मेहनत करीत, अपमान सहन करीत मिळविलेल्या माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा व माझ्या वकिली पदाचा मला गर्व नसला तरी स्वाभिमान मात्र निश्चित आहे. बाकी इतर जळकुटे लोक माझ्या या कणखर मनावर व मोठ्या आत्मविश्वासावर हसून चेष्टा करतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देणार नाही. गरीब कुटुंबात जन्मून कायदा शिकणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांनो तुमच्यात जर हिंमत असेल तर कुणाचीही व कशाचीही पर्वा न करता जरूर वकील बना! वकिलीसारखा दुसरा व्यवसाय नाही, अगदी डॉक्टरकी सुद्धा नाही. कारण इतर सगळे व्यवसाय कोणत्या तरी एकाच ज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवून त्या संकुचित ज्ञानावर प्रॕक्टिस करण्याचे व्यवसाय आहेत. पण वकिली हा असा एकमेव व्यवसाय आहे जो जगातील सर्व ज्ञान क्षेत्रांवर राज्य करतो. मग कला, क्रीडा, डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., कंपनी सेक्रेटरी, एम.बी.ए., उद्योगपती, राजकारणी कोणीही असो. या सर्वांवर राज्य करणारा एकमेव व्यवसाय म्हणजेच वकिली व्यवसाय! राजेपण असलेल्या या वकिली व्यवसायात तुम्हाला यायचे असेल तर खिशात दमडी नसताना सुद्धा राजासारखे जगायची हिंमत ठेवा व वकील बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

टीपः

काल एका कायद्याच्या विद्यार्थ्याने वकील व्हावे की नको याविषयी मार्गदर्शन विचारले व त्यातून एक लेख तयार झाला. आजही मला कायदा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वकिली व्यवसाया विषयी हाच प्रश्न केला व त्यातून हा लेख तयार झाला.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

निसर्गाचा सर्वव्यापी कठोर कायदा व वकील!

निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!

(१) मानवी शरीराच्या शरीरग्रंथीतून जसे स्त्राव स्त्रवतात तसे मनाच्या कप्प्यातूनही वासना व भावनांचे रस स्त्रवतात. अर्थात मानवी शरीराचे जसे रसायनशास्त्र असते तसे मानवी मनाचेही रसायनशास्त्र असते. मनाचे रसायनशास्त्र हे मानवी मनाच्या वासना व भावना यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

(२) साहित्य व कलेत नऊ रसांचे वर्णन केले आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या सकारात्मक भावना, अहंकार, तिरस्कार, क्रोध, सूड यासारख्या नकारात्मक भावना, लैंगिक आकर्षण, तहान, भूक, झोप यासारख्या मूळ भौतिक वासना यांच्या रसांनी मानवी मन तुडुंब  भरलेले असते. या सकारात्मक व नकारात्मक भावना आणि मूलभूत भौतिक वासना यातून मनात नऊ रस तयार होतात ते खालीलप्रमाणे.

(क)शृंगार रसः लैंगिक आकर्षण/कामवासना
(ख)वीर रसः उत्साह, पराक्रम, शौर्य
(ग)करूण रसः शोक, वियोग, दुःख, संकट
(घ)हास्य रसः विसंगती, विडंबन, विनोद
(च)रौद्र रसः अतिशय क्रोध, चीड
(छ)भयानक रसः हिंस्त्रपणा, राक्षसी वृत्ती
(ज)बीभत्स रसः किळस, वीट, तिटकारा
(झ)अद्भुत रसः विस्मय, आश्चर्य
(ट)शांत रसः निसर्गशक्तीची/ईश्वराची भक्ती 

(३) मानवी मनातील वरील नऊ रसांपैकी नववा  जो शांत रस आहे त्याला भक्ती रस असेही म्हणता येईल. या भक्ती रसातूनच मानवी मन ईश्वर चिंतन करून शांती मिळविण्याचा प्रयत्न करते. हाच भक्ती रस मनुष्याला निसर्गात देव दर्शन घडवून आणतो. पण निसर्गातील देवाला माणसाने सतत भक्ती रसात बुडून रहावे असे बिलकुल वाटत नाही. तसे असते तर त्या देवाने इतर आठ रस निर्माणच केले नसते.

(४) नवग्रह, नवरंग, नवरस आणि आता देवीचा सुरू असलेला नवरात्रोत्सव यात नऊ हा अंक महत्त्वाचा! कला, साहित्यातील नवरस हे तर निसर्ग शक्तीचेच किंवा निसर्गातील ईश्वराचेच आविष्कार आहेत. मानवी मनाचे रसायनशास्त्र या आविष्काराचाच अभ्यास करते.

(५) वर लिहिलेले नवरस हा निसर्गाच्या विविध पदार्थांचा, विविध रूप व गुणांचा व त्यांच्या विविध वैशिष्ट्यांचा भाग आहे. हे नवरस त्यांची विशेषतः गाजवायला लागले की त्यांना त्यांच्या मर्यादेची आठवण करून देऊन त्यांना संतुलित करीत वठणीवर आणणारा निसर्गाचा सर्वव्यापी  कठोर कायदा हाच निसर्गाचा सर्वोच्च हुकूम होय. या हुकूमाची अर्थात निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०

POVERTY!

POVERTY!

Poverty does not mean just poverty in money or material wealth. It is poverty of mind too. The mind can remain poor means narrow even with higher education or higher material wealth. The basic purpose of education is to make mind rich by expanding its scope of thinking and understanding beyond its narrow, selfish world. If you see the world around, you can find lot of difference between developed countries, developing countries and under developed countries. The poverty is basic criterion for this world classification. The developed countries like America are top class  countries which are rich in material wealth as well as education. The developing countries like India are middle class countries which are are at middle level of richness in material wealth and education. But frankly speaking India continues to be very poor in education because its educated population is very less. On the other hand, under developed countries like Sudan, Nigeria are lower class countries being very backward both in material wealth and education. The poverty is thus not only in money or material wealth, but it is also in education! The feeding of hungry stomachs and educating of under developed brains of very poor class people with strong government support are two basic measures in eradication of poverty at lower economic and educational class (NOT CASTE) level! I am on the point of upliftment of very lower class people who cannot afford to attend schools with their hungry stomachs. This is NOT CASTE based but economic and educational poverty based classification. The strong government support is very much needed for upliftment of this very lower class people living below poverty line. This is NOT for those of ANY caste who have already reached at middle class level of material and educational richness!🙏

-Adv.B.S.More©19.10.2020

कायदा व वकील!

कायदा शिकून वकील का बनायचे?

कायदा जगातील सगळ्या विषयांना, सगळ्या ज्ञान शाखांना, सगळ्या गोष्टींना स्पर्श करतो व माणसाची समज प्रगल्भ करतो, माणसाला जगाची खरी ओळख करून देतो, म्हणून कायदा शिकायचा. पैसे कमावण्यासाठी कायद्याचेच काय पण कोणतेही औपचारिक शिक्षण आवश्यक नाही हे उदाहरणासह सिद्ध करायची गरज नाही. फक्त डोळे नीट उघडे ठेऊन आजूबाजूला बघा म्हणजे पैसा कुठे कुठे फिरतोय हे दिसेल. जो मनुष्य फक्त पैसा कमावण्यासाठी वकील बनतो तो वकील नव्हे!

-ॲड.बी.एस.मोरे©१९.१०.२०२०

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नैसर्गिक आविष्कार!

निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही!

(१) निसर्गातील देवाचा अर्क हाच निसर्गरूपाने प्रकट झालाय, सादर झालाय. हा आविष्कार म्हणजे त्या देवाची नैसर्गिक अभिव्यक्ती! गंमत अशी की निसर्गातील मूलद्रव्ये मानवी बुद्धीच्या  आकलनाला (विज्ञानाला) सापडली असली तरी निसर्गातील देवाचा तो अर्क किंवा प्रत्यक्षात  तो देव मात्र विज्ञानाला सापडला नाही. मग तो देव सापडत नाही म्हणून निसर्गाचा आविष्कार हेच सत्य आहे, नैसर्गिक आविष्काराच्या या सत्यामागे देवाचा अर्क, देव वगैरे काही नाही  असा निष्कर्ष काढून काही माणसे सरळ हात वर करून मोकळी होतात.

(२) निसर्गातील देव निसर्गात (विश्वात/सृष्टीत) किती गुणांत, किती आकारात, किती रंग व रूपात प्रकट, सादर, व्यक्त झालाय! केवढी प्रचंड ही निसर्गाच्या आविष्काराची अनेकता व विविधता! हा एवढा मोठा निसर्गाचा आविष्कार  माणसाला त्याच्या मेंदूत साठवून ठेवता येईल का? शेतातून जीवनावश्यक धान्य पिकणे, आकाशातून पाऊस पडणे, नद्या समुद्राला जाऊन मिळणे आणि एवढेच नव्हे तर मानवी भाषा, संस्कृती तिच्या वैविध्यपूर्ण रंगढंगाने, लकबीने काय नटणे, प्रादेशिक विविधतेचा या विविध मानवी संस्कृतीवर विविधांगी प्रभाव पडणे, हे सर्व मानवी मनाला अचंबित, चकित करून टाकणारे आहे. फेसबुकवर भारतातील विविध राज्यांतील माझे मित्र, मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे वेगवेगळे व्हिडिओज, चित्रे मला बघायला मिळतात. सद्या चाललेल्या नवरात्रोत्सवाचेच उदाहरण घ्या! देवीचा उत्सव एकच पण पश्चिम बंगाल, आसाम, गुजराथ, महाराष्ट्र या विविध राज्यांत देवीच्या या सणाचे वेगळेपण दिसते. अर्थात देशात हिंदू संस्कृती एक पण तिच्यातही विविध राज्यांची प्रादेशिक विविधता पहायला मिळते.

(३) अशा पर्यावरणीय परिस्थितीत मानवी मन निसर्ग आविष्काराच्या किती रूपात, किती रंगात, किती गुणांत समरस होणार व या सर्व विविधतेला स्वतःत सामावून घेऊन स्वतःचा कृत्रिम मानवी आविष्कार दाखविणार? असा मानवी आविष्कार, अभिव्यक्ती ही निसर्गाची नकल (कॉपी) असते. अशी नकल करायला पण अक्कल लागते. म्हणून जे जे मानवनिर्मित आहे ते ते नकली (कृत्रिम) आहे. निसर्गाच्या आविष्काराची नकल (कॉपी) करणे व अशा कृत्रिमतेतही निसर्गाची नैसर्गिकता कायम राखणे हे माणसापुढे निसर्गातील देवाने निर्माण केलेले मोठे आव्हान होय! निसर्गाचा विविधांगी आविष्कार मनात मुरवणे, अंगात जिरवणे ही काही सोपी गोष्ट नाही.

(४) निसर्गाची कृत्रिम नकल करताना निसर्गाची नैसर्गिकता या कृत्रिमतेतही कायम ठेवण्याचे आव्हान स्वीकारणारा माणूस या आव्हानात नेहमीच यशस्वी होईल असे नसते. म्हणून तर त्याचे वर्तन कधीकधी नैसर्गिक (नॉर्मल) ऐवजी अनैसर्गिक (अबनॉर्मल) होते. अशा अनैसर्गिक वर्तनाला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवून माणसाला कृत्रिम पण नैसर्गिक वर्तन करण्यास  भाग पाडण्यासाठी सुशिक्षित, सुसंस्कृत मानव समाजाने कायद्याच्या राज्याची निर्मिती केली आहे जी कृत्रिम असली तरी नैसर्गिक आहे. निसर्गाच्या नैसर्गिक आविष्काराचा कृत्रिम (नकली) मानवी आविष्कार अनैसर्गिक असू शकत नाही हे सांगण्यासाठी तर माझा हा अभ्यासपूर्ण लेख आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०

https://www.facebook.com/338024653358851/posts/958188094675834/

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

मानवी संबंधातील ओलावा व कोरडेपणा!

मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा!

लहानपणी आईवडिलांच्या छत्रछायेत वाढत असताना बहीण भावंडांत असलेला भावनिक ओलावा पुढे वय वाढत जाईल तसा कमीकमी होत जातो. लग्ने होऊन आपआपल्या संसारात पडल्यानंतर तर या भावनिक ओलाव्याचा प्रवास घट्ट, दाट ते पातळ असा होतो. आठवा ती लहानपणीची रक्षाबंधने, भाऊबीजेच्या ओवाळण्या व नंतर प्रौढपणीचे, वृध्दापकाळाचे बहीण भावातील भावनिक ओलावा जपणारे हेच सण! आईवडील दोघेही वारल्यावर तर मग रक्ताची नाती आणखी पातळ होत जातात. काही अपवाद असतीलही या अनुभवाला पण सर्वसाधारण अनुभव तर कालानुरूप होणाऱ्या भावनिक दुराव्याचाच असतो ना! अगोदरच दुरावलेल्या रक्ताच्या नात्यांत पुढे जेंव्हा व्यवहार आडवा येतो तेंव्हा तर अशा नातेसंबंधात खूप ताणतणाव निर्माण होतात. आईवडिलांच्या इस्टेटीची भावाबहिणीत वाटणी करताना तर भावनिक ओलाव्याची मोठी कसोटी लागते. रक्ताची नैसर्गिक नाती असोत की लग्नाची कृत्रिम नाती असोत, ही नाती इतर कारणांनी सुद्धा दुरावतात. नातेवाईकांतील कोणी त्याच्या स्वकर्तुत्वावर पुढे गेला की नातेवाईकांकडून त्याचे मनापासून कौतुक होण्याऐवजी असूया व तिरस्काराच्या नकारात्मक भावनेतून अशा नातेवाईकाबरोबर संपर्क कमी करीत त्याला दूर ठेवण्याचे (वाळीत टाकण्याचे) प्रकारही काही ठिकाणी होत असतात. अशा जळकुट्या नातेवाईकांकडून भावनिक ओलाव्याची अपेक्षा करणे हा शुद्ध मूर्खपणा! बाहेरच्या जगातही मानवी संबंध निर्माण होत असतात. पण त्यात जवळच्या नातेसंबंधासारखा भावनिक ओलावा नसतो. असे संबंध व्यावहारिक असतात जे कोरडे असतात. अशा व्यावहारिक संबंधात वस्तू व सेवांची व त्यासोबत पैशाची आर्थिक देवाणघेवाण होत असते तशी सत्तेची राजकीय देवाणघेवाणही होत असते. अशा व्यावहारिक संबंधात हृदयापेक्षा (भावनेपेक्षा) मेंदू (बुद्धी) महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. अशा संबंधात फायद्यातोट्याचा हिशोब असतो व अशा हिशोबातून निर्माण होणारा व्यावहारिक कोरडेपणा असतो. भावनिक ओलाव्याचा अंश नगण्य असल्याने असे कोरडे व्यावहारिक संबंध बिघडण्याची शक्यता मोठी असते. गरज सरो व वैद्य मरो असाच काहीसा प्रकार अशा व्यावहारिक संबंधात असतो. म्हणून तर अशा कोरड्या व्यावहारिक संबंधाना नियंत्रित करणे ही सरकारची मोठी जबाबदारी असते. त्यासाठी तर सरकारी कायदे असतात. माझा हा लेख मानवी संबंधातील भावनिक ओलावा व व्यावहारिक कोरडेपणा या विषयापुरताच मर्यादित आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.१०.२०२०