https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २० जुलै, २०२४

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या चालू होत्या तेव्हा त्यात नोकरी करणाऱ्या मराठी माणसांची घरे व नोकऱ्या दोन्ही गोष्टी मुंबईतच जवळ होत्या. कापड गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईत घरे राहिली पण नोकऱ्या गेल्या. गिरणी कामगारांची मुले मोठी झाली व लग्ने होऊन संसारी झाली. पण मुंबईतले एकच छोटे घर सर्व मुलांना लग्नानंतर अपुरे पडू लागले. म्हणून ते छोटे घर विकून आईवडील, पोरं अशी सर्वच मराठी माणसे मुंबईबाहेर लांब रहायला गेली. आता घरे मुंबईबाहेर व इतर उद्योगातील नोकऱ्या मुंबईत अशी अवस्था झाल्याने बंद पडलेल्या गिरण्यांतील कामगारांची मराठी पोरं लोकल ट्रेनला लटकत दररोज जीव मुठीत घेऊन घर मुंबईबाहेर तर नोकरी मुंबईत अशा लटकत्या अवस्थेत जगत आहेत. पण हे सर्व स्थित्यंतर घडेपर्यंत मुंबईतील झोपडपट्ट्या काबीज करून त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधलेल्या इमारतींच्या फुकटच्या सदनिकांत मराठी माणसे किती रहात आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

माझा लेखन छंद!

लेखन छंदाची ऐसी की तैसी!

माझ्या डोक्यातील ज्ञान, अनुभवाचा मौल्यवान माल सोशल मिडियावर फुकट वाटण्याची फालतू सवय मला लागली. त्यामुळे बरेच फालतू प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्याचे बघायला मी सोशल मिडियावर आलो नाही. त्यासाठी सोशल मिडियाची गरजच नाही. पारंपरिक माध्यमातून भरपूर मसाला बघायला, ऐकायला मिळतो. सोशल मिडियाचा उपयोग मी माझी लेखन छंद वही म्हणून करतो. पण हा छंद महागात पडतोय. या छंदाची ऐसी की तैसी!

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

निसर्ग व्यवस्थेचे भान!

निसर्ग व्यवस्थेचे भान ठेवले पाहिजे!

निसर्गदेवाने सृष्टी निर्माण केली व त्यासोबत त्या सृष्टीची नियमबद्ध व्यवस्था निर्माण केली. सृष्टीची जशी एक विशिष्ट रचना आहे तशी सृष्टी/निसर्ग व्यवस्थेचीही एक विशिष्ट रचना आहे. सृष्टी व तिची व्यवस्था या दोन्ही गोष्टींची रचनात्मक निर्मिती करून निसर्गदेव त्यांच्यापासून अलिप्त, ध्यानमग्न व शांत झाला.

मानवनिर्मित समाजव्यवस्था हा निसर्गनिर्मित (निसर्गदेव निर्मित) सृष्टी व्यवस्थेचा भाग आहे. हा भाग मूळ निसर्ग/सृष्टी व्यवस्थेतून मानवी बुद्धीने निर्माण केला जी बौद्धिक प्रेरणा मानवाला मूळ निसर्ग/सृष्टी व्यवस्थेतूनच मिळाली. सृष्टी, सृष्टी/ निसर्ग व्यवस्था व समाज व्यवस्था या तिन्हींचे मिळून विज्ञान बनते. या विज्ञानाचा बारकाईने अभ्यास करून त्यातील व्यवस्थेनुसार जो वागत नाही तो रसातळाला जातो. पण निसर्गदेव अशाप्रकारे विनाश पावणाऱ्या प्राणी किंवा माणसाची पर्वा करीत नाही व त्याला दयामाया दाखवत नाही. इथे चुकीला माफी नाही.

एकवेळ निसर्गदेवाचे (परमेश्वराचे) नामस्मरण विसरले तरी परमेश्वराला चालते पण त्याच्या सृष्टी व्यवस्थेला विसरलेले त्याला चालत नाही. सृष्टी  व्यवस्था ही आध्यात्मिक नसून ती वैज्ञानिक आहे हे नीट ध्यानात घेतले पाहिजे व या वैज्ञानिक व्यवस्थेचे ध्यान करून तिचे सतत भान ठेवले पाहिजे. निसर्गदेव हाच परमेश्वर आहे. पण हा परमेश्वर अध्यात्माला अनाकलनीय आहे व विज्ञानाला आकलनीय आहे. म्हणून त्याला सृष्टी/निसर्गातून बघायचे, सृष्टी/निसर्ग विज्ञानातून समजून घ्यायचे व त्याला वैज्ञानिक नमस्कार करून त्याच्याशी वैज्ञानिक वागायचे.

जगातील विविध धर्मातील देवदेवता किंवा प्रेषिते एकमेव निसर्गदेवाच्या/परमेश्वराच्या/परमात्म्याच्या अधीन आहेत. खरं तर ही निसर्गदेवाची/परमेश्वराची प्रतिके आहेत. या सर्व प्रतिकांना केलेला नमस्कार शेवटी एकमेव निसर्गदेवाला/परमेश्वराला पोहोचतो जशा विविध प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या शेवटी सागराला मिळतात. हिंदू धर्मात निसर्गदेवाला निर्गुण निराकार परमेश्वर/परमात्मा म्हणतात. निर्गुण निराकार का तर तो सृष्टीची व सृष्टी/निसर्ग व्यवस्थेची रचनात्मक निर्मिती केल्यानंतर त्यांच्यापासून अलिप्त, ध्यानमग्न व शांत झाला. म्हणून त्याच्या मदतीची अपेक्षा न करता, त्याच्या कृपेची याचना न करता त्याच्या व्यवस्थेचे भान ठेवले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

गुरुवार, १८ जुलै, २०२४

गेले ते दिवस!

गेले ते प्रत्यक्ष फोन करून बोलायचे दिवस!

मी व्हॉटसॲप बंद करून टाकले कारण व्हॉटसॲपवर सुद्धा सोशल मिडियाच फिरतोय. जवळचे मित्र, नातेवाईक म्हणवणारे सुद्धा कुठून तरी गोळा केलेले रिल्स, व्हिडिओज, दुसऱ्यांच्या रेडिमेड पोस्टस, विचार व्हॉटसॲपवर फिरवत बसतात. गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे रेडिमेड मेसेज पाठवतात पण कधी स्वतःहून फोन करून वैयक्तिक हितगुज करीत नाहीत. म्हणून शेवटी वैतागून ते व्हॉटसॲपच बंद करून टाकले. जोपर्यंत फक्त बोलण्यापुरते मर्यादित असलेले फोन होते, हल्लीचे स्मार्ट मोबाईल फोन नव्हते तोपर्यंत सोशल मिडिया ना डोळ्यांना दिसत होता ना कानावर आदळत होता. निसर्गात व समाजात घडणाऱ्या घटनांच्या दैनंदिन बातम्या जमेल तशा व जमेल तेवढ्या वर्तमानपत्र घेऊन वाचायच्या किंवा टी.व्ही. वर बघायच्या. त्यांना किती महत्व द्यायचे हे बरोबर कळायचे किंवा कळते. पण व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम इ. खिडक्यांतून सोशल मिडिया स्मार्ट मोबाईल फोनमध्ये घुसतो व तिथून मग सरळ डोक्यात घुसतो. बरं या स्मार्ट मोबाईल फोनची आता इतकी सवय झालीय की फक्त वैयक्तिक हितगुजावर बोलण्यासाठी साध्या फोनवर पुन्हा यावे असेही करता येत नाही. कारण आता जवळचे मित्र, नातेवाईकही स्मार्ट मोबाईल फोनवर इतके बिझी झालेत की त्यांना कधी प्रत्यक्ष फोन करून बोलायलाच वेळ नाही. संपले ते पूर्वीचे माया, प्रेम आपुलकीचे दिवस. आता जिकडे पहावे तिकडे कृत्रिमता आणि कृत्रिमता ठासून भरल्याचे दिसत आहे. लोकांना हे वास्तव सांगत बसण्यापेक्षा निदान स्वतःपुरता तरी योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

समाज प्रभावी व्यक्ती!

समाज प्रभावी व्यक्ती (सोशल इनफ्लुएन्सर)!

फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंकडइन वगैरे सारख्या समाज माध्यमांवर स्वतःचे रिल्स, व्हिडिओज टाकून समाज प्रभावी व्यक्ती (सोशल इन्फ्लुएन्सर) होण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही. पण माझ्या लेखनातून समाज माध्यमी लोकांवर प्रभाव टाकण्याचा मात्र जरूर प्रयत्न केला. पण प्रभाव कसला माझ्या लेखनाने साधी शिंक सुद्धा कोणाला आली नाही. स्वकष्टाने मिळवलेले स्वतःचे उच्च शिक्षित ज्ञान कुठे पाजळावे ही अक्कल मला उतार वयात का बरे आली नाही? जिथे अशा ज्ञानाची खरोखर आवश्यकता आहे, कदर आहे तिथेच खरं तर योग्य मोबदला घेऊन असे ज्ञान पाजळणे योग्य होय. समाज माध्यमावर ते फुकटात टाकून किंवा वाटून त्याचे अवमूल्यन करू नये हा मोठा धडा समाज माध्यमातून मला मिळाला.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४

दुष्काळात तेरावा महिना!

दुष्काळात तेरावा महिना!

माझ्या फेसबुक खात्यावरील होम पेज वर स्वतःच्या सहली, नटणे, मुरडणे, रंगीबेरंगी ड्रेस डिजाईन्स व तसेच व्यापारी उद्देशाने निर्माण केलेले कमर्शियल व्हिडिओज आणि रेडिमेड सुविचारांचा नुसता भडिमार सुरू आहे. पण स्वतःच्या ज्ञान व अनुभवावर आधारित चिंतनातून निर्माण केलेल्या स्वविचारांचा इथे दुष्काळ आहे. अशा दुष्काळात मी मात्र माझ्या ज्ञानाधारित व स्वचिंतनी स्वविचारांचा झरा माझ्या फेसबुक खात्यावर व फेसबुक पेजवर माझ्या लेखन छंदातून उगाच चालू ठेवलाय असे वाटते. कारण माझ्या झऱ्यावर या झऱ्याचे निर्मळ, स्वच्छ पाणी प्यायला कोणी येत नाही व चुकून कोणी आले तर त्या पाण्याने चूळ भरून त्या झऱ्यातच चूळ टाकून निघून जाते. थोडक्यात काय माझे फेसबुक खाते व फेसबुक ब्लॉग पेज पूर्ण निष्क्रिय झालेय. विचारांना दाद देऊन त्यांना नुसते लाईक्स नाही तर त्यावर योग्य प्रतिक्रिया देणारे मित्र काही अत्यंत थोडे अपवाद वगळता इथे जवळजवळ नाहीतच. तरीही लेखन छंद वही म्हणून फेसबुक खाते व ब्लॉग पेज चालू ठेवतोय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४

सृष्टी बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सृष्टीतील परिवर्तनीय बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सूर्यमालेत सूर्य मध्यवर्ती ठिकाणी स्थिर आहे व नवग्रह त्याच्या भोवती फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवतीही फिरते. ती फिरताना स्वतःबरोबर तिच्यावर उत्क्रांत झालेल्या सृष्टीलाही घेऊन फिरते. सूर्य स्थिर व पृथ्वीचे फिरणे स्थिर पण पृथ्वीवरील सृष्टी मात्र अस्थिर. ही अस्थिरता सृष्टीतील परिवर्तनीय बदलामुळे निर्माण होते. याच परिवर्तनीय बदलामुळे मानवी जीवन अस्थिर व अनिश्चित झाले आहे.

सृष्टी बदलाचे एक चक्र आहे ज्याला सृष्टी चक्र म्हणतात. मनुष्याचा जन्म, जीवन व मृत्यू हे जीवनचक्र हा सृष्टी चक्राचाच भाग आहे. या चक्रात ऋतू निर्माण होत राहतात, वनस्पती, पशु व पक्षी, माणसे यांची पुनर्निर्मिती होत राहते. काही वनस्पती, फळे जीवनासाठी उपयुक्त असतात तर काही घातक, विषारी. तीच गोष्टी पशुपक्षांची. काही प्राणी गरीब, शाकाहारी तर काही हिंस्त्र, मांसाहारी. तीच गोष्ट माणसांची. पुनर्निर्माण चक्रात काही माणसे विधायक आढळून येतात तर काही विध्वंसक. या सर्व चित्रविचित्र सृष्टी वास्तवाशी जुळवून घेण्याचे व संघर्ष करण्याचे दुहेरी आव्हान माणसाला त्याच्या आयुष्यात स्वीकारावेच लागते. निसर्गाचा तसा हुकूमच असतो.

असे आव्हान स्वीकारण्यात मानवी मनाच्या प्रतिसादाचा भाग असतो. जीवन जगण्यासाठी विविध निर्जीव पदार्थ (हवा, पाणी इत्यादी) उपयुक्त असतात. पण निर्जीव पदार्थांना सजीवासारख्या भावना नसतात. म्हणून त्यांना अभावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व त्यासाठी माणसाला अभावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करावा लागतो. वनस्पती, झाडे, फळे हे अर्धसजीव पदार्थ आहेत. त्यांनाही भावना आहेत. पण त्या इतर सजीवांसारख्या प्रगत नाहीत. म्हणून त्यांना भावनिक-अभावनिक असा संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. तसेच इतर पशुपक्षी यांच्या भावना सुद्धा मानवाएवढ्या प्रगत नसल्याने त्यांनाही असाच संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. पण माणसांच्या भावना सर्वसाधारणपणे सारख्या असल्याने माणसाला माणसांशी वागताना भावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व असा प्रतिसाद देताना भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. प्रतिसाद हा जशास तसाच द्यावा लागतो. म्हणजे चांगल्याला चांगला प्रतिसाद व वाईटाला वाईट प्रतिसाद. अर्थात माणूस नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक वागू शकत नाही. सृष्टीत होणाऱ्या परिवर्तनीय बदलाचा मानवी शरीर व मनावर परिणाम होत असतो व त्यानुसार मानवी मनाकडून सृष्टीतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना देण्यात येणाऱ्या प्रतिसादावरही परिणाम होत असतो. या प्रतिसादात मानवी मेंदूच्या अभावनिक व भावनिक बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४