https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १८ जुलै, २०२४

दुष्काळात तेरावा महिना!

दुष्काळात तेरावा महिना!

माझ्या फेसबुक खात्यावरील होम पेज वर स्वतःच्या सहली, नटणे, मुरडणे, रंगीबेरंगी ड्रेस डिजाईन्स व तसेच व्यापारी उद्देशाने निर्माण केलेले कमर्शियल व्हिडिओज आणि रेडिमेड सुविचारांचा नुसता भडिमार सुरू आहे. पण स्वतःच्या ज्ञान व अनुभवावर आधारित चिंतनातून निर्माण केलेल्या स्वविचारांचा इथे दुष्काळ आहे. अशा दुष्काळात मी मात्र माझ्या ज्ञानाधारित व स्वचिंतनी स्वविचारांचा झरा माझ्या फेसबुक खात्यावर व फेसबुक पेजवर माझ्या लेखन छंदातून उगाच चालू ठेवलाय असे वाटते. कारण माझ्या झऱ्यावर या झऱ्याचे निर्मळ, स्वच्छ पाणी प्यायला कोणी येत नाही व चुकून कोणी आले तर त्या पाण्याने चूळ भरून त्या झऱ्यातच चूळ टाकून निघून जाते. थोडक्यात काय माझे फेसबुक खाते व फेसबुक ब्लॉग पेज पूर्ण निष्क्रिय झालेय. विचारांना दाद देऊन त्यांना नुसते लाईक्स नाही तर त्यावर योग्य प्रतिक्रिया देणारे मित्र काही अत्यंत थोडे अपवाद वगळता इथे जवळजवळ नाहीतच. तरीही लेखन छंद वही म्हणून फेसबुक खाते व ब्लॉग पेज चालू ठेवतोय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४

सृष्टी बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सृष्टीतील परिवर्तनीय बदलाचा मानवी मनावरील परिणाम!

सूर्यमालेत सूर्य मध्यवर्ती ठिकाणी स्थिर आहे व नवग्रह त्याच्या भोवती फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवतीही फिरते. ती फिरताना स्वतःबरोबर तिच्यावर उत्क्रांत झालेल्या सृष्टीलाही घेऊन फिरते. सूर्य स्थिर व पृथ्वीचे फिरणे स्थिर पण पृथ्वीवरील सृष्टी मात्र अस्थिर. ही अस्थिरता सृष्टीतील परिवर्तनीय बदलामुळे निर्माण होते. याच परिवर्तनीय बदलामुळे मानवी जीवन अस्थिर व अनिश्चित झाले आहे.

सृष्टी बदलाचे एक चक्र आहे ज्याला सृष्टी चक्र म्हणतात. मनुष्याचा जन्म, जीवन व मृत्यू हे जीवनचक्र हा सृष्टी चक्राचाच भाग आहे. या चक्रात ऋतू निर्माण होत राहतात, वनस्पती, पशु व पक्षी, माणसे यांची पुनर्निर्मिती होत राहते. काही वनस्पती, फळे जीवनासाठी उपयुक्त असतात तर काही घातक, विषारी. तीच गोष्टी पशुपक्षांची. काही प्राणी गरीब, शाकाहारी तर काही हिंस्त्र, मांसाहारी. तीच गोष्ट माणसांची. पुनर्निर्माण चक्रात काही माणसे विधायक आढळून येतात तर काही विध्वंसक. या सर्व चित्रविचित्र सृष्टी वास्तवाशी जुळवून घेण्याचे व संघर्ष करण्याचे दुहेरी आव्हान माणसाला त्याच्या आयुष्यात स्वीकारावेच लागते. निसर्गाचा तसा हुकूमच असतो.

असे आव्हान स्वीकारण्यात मानवी मनाच्या प्रतिसादाचा भाग असतो. जीवन जगण्यासाठी विविध निर्जीव पदार्थ (हवा, पाणी इत्यादी) उपयुक्त असतात. पण निर्जीव पदार्थांना सजीवासारख्या भावना नसतात. म्हणून त्यांना अभावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व त्यासाठी माणसाला अभावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करावा लागतो. वनस्पती, झाडे, फळे हे अर्धसजीव पदार्थ आहेत. त्यांनाही भावना आहेत. पण त्या इतर सजीवांसारख्या प्रगत नाहीत. म्हणून त्यांना भावनिक-अभावनिक असा संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. तसेच इतर पशुपक्षी यांच्या भावना सुद्धा मानवाएवढ्या प्रगत नसल्याने त्यांनाही असाच संमिश्र प्रतिसाद द्यावा लागतो. पण माणसांच्या भावना सर्वसाधारणपणे सारख्या असल्याने माणसाला माणसांशी वागताना भावनिक प्रतिसाद द्यावा लागतो व असा प्रतिसाद देताना भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. प्रतिसाद हा जशास तसाच द्यावा लागतो. म्हणजे चांगल्याला चांगला प्रतिसाद व वाईटाला वाईट प्रतिसाद. अर्थात माणूस नकारात्मक गोष्टींबरोबर सकारात्मक वागू शकत नाही. सृष्टीत होणाऱ्या परिवर्तनीय बदलाचा मानवी शरीर व मनावर परिणाम होत असतो व त्यानुसार मानवी मनाकडून सृष्टीतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना देण्यात येणाऱ्या प्रतिसादावरही परिणाम होत असतो. या प्रतिसादात मानवी मेंदूच्या अभावनिक व भावनिक बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.७.२०२४

चैनीचा खेळ!

चैनीचा खेळ!

मनुष्य जन्मात गरज व चैन यातील फरक ओळखता आला पाहिजे. कारण चैनीचा खेळ वाईट असतो. चैनीची सवय माणसाला तिच्या खेळात गुंतवत, अडकवत जाते जशी कोणतीही नशा मनुष्याला तिची गुलाम करते. पण तरीही समाज व्यवस्थेचे वास्तव हेच आहे की माणसाच्या शरीर, मनाची वाट लावणाऱ्या दारू, तंबाखू, सिगारेट वगैरे पदार्थांचे उद्योगधंदे कायदेशीर परवाना मिळवून समाजात उभे आहेत. या उद्योगधंद्यातून रोजगार निर्मिती होते व बेकारी दूर होते असे या उद्योगधंद्याचे समर्थक म्हणतात व तसा तार्किक युक्तिवादही करतात व सामाजिक कायद्याला हा युक्तिवाद मान्यही होतो हे विशेष. नशेची सवय लावणाऱ्या पदार्थांची चैन ही तशी भयंकर चैन. पण हे पदार्थ सोडून चैनीची चटक लावणाऱ्या इतरही बऱ्याच वस्तू व सेवा अशा आहेत की त्यांची सवय माणसाला चैनीच्या जाळ्यात ओढून खेळवत राहते.

बाजारातील या चैनीच्या वस्तू व सेवांच्या सवयी जसजशा वाढत जातात तसतसा माणूस त्यांच्यात अधिकाधिक गुंतत जातो. जवळ असलेल्या चैनीच्या वस्तूंचे प्रदर्शन करून त्यातून मोठेपणा मिरवण्याची चैन ही तर फार मोठी चैन आहे. तिची एकदा का सवय लागली की माणूस त्या चैनीसाठी अक्षरशः वेडा होतो. लोकांनी असे वेडे व्हावे हाच तर चैनीच्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या श्रीमंत भांडवलदारी उद्योगपतींचा उद्देश असतो. कारण लोकांना चैनीच्या अशा सवयी लागल्या नाहीत तर त्यांचे उद्योगधंदे कोसळून पडतील व त्यांची नफेखोरी तर बंद होईलच पण समाजात प्रचंड मोठी बेकारी वाढेल इतके या वेडलावी चैनीना महत्व आहे. हे महत्त्व ओळखून असे श्रीमंत भांडवलदार त्यांच्या चैनीच्या वस्तू व सेवांच्या लोकांना सवयी लागाव्यात म्हणून त्यांच्या चैनीच्या उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती माध्यमातून सतत करीत असतात ज्यांना भुलून माणसे गिऱ्हाईक बनून चैनीच्या जाळ्यात ओढली जातात व चैनीच्या खेळाचा भाग बनतात. चैनीच्या सवयी माणसाला वेडे करतात व गरज आणि चैन यातील फरक विसरायला भाग पाडतात. अशा लोकांची पुढे चैन हीच गरज होऊन बसते व तिचे समाधान झाले नाही तर अशी माणसे सैरभैर होतात जसा दारूची सवय लागलेला माणूस दारू मिळाली नाही तर तडफडतो. हा चैनीचा खेळ वेळीच ओळखून त्यात किती गुंतावे हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.७.२०२४

व्यवस्था!

खेळणारे संपतात पण खेळवणारी व्यवस्था संपत नाही!

जोपर्यंत निसर्ग व समाज व्यवस्था मुळापासून समजत नाही तोपर्यंत या व्यवस्थेतील हालचालींचा भाग होऊन रहायला आनंद वाटतो व या व्यवस्थेनुसार चाललेल्या पदार्थांच्या, पशुपक्षांच्या, माणसांच्या हालचाली मानवी मनाला आकर्षित करीत राहतात. पण एकदा का व्यवस्था मुळापासून समजली की मग गोष्टी अनाकर्षक, रटाळ, निरर्थक होऊ लागतात. या हालचालींचा भाग होऊन रहायला नकोसे होते. त्याचा वीट, उबग येतो. मानवी मनाची ही पूर्ण ज्ञानी अवस्था म्हणजे विरक्त, स्थितप्रज्ञ होण्याची अवस्था. ही अवस्था ज्ञान संपादनाच्या कठोर मेहनतीतून प्राप्त होते.

परंतु व्यवस्थेच्या मुळापासूनच्या पूर्ण ज्ञानाने विरक्त होण्याची अवस्था ही ना घरका ना घाटका किंवा इकडे आड तर तिकडे विहीर अशी विचित्र अवस्था असते. कारण इतर सजीव, निर्जीव पदार्थांबरोबर होणारी मनुष्य नावाच्या प्राण्याची पुनर्निर्मिती ही व्यवस्थेकडून खेळवण्यासाठीच झालेली असते. मनुष्याचा जन्म हाच मुळी व्यवस्थेच्या खेळाचा भाग असतो. त्यामुळे व्यवस्थेच्या पूर्ण ज्ञानाने व्यवस्थेविषयी मनात विरक्ती निर्माण झाली तरी व्यवस्थेला धरून रहावेच लागते. पण विरक्ती नंतर व्यवस्थेला धरले तर ती चावते व तिला सोडले तर ती पळते अशी अवस्था होते. व्यवस्था पळते म्हणजे काय होते तर ती विरक्त मनुष्याला व्यवस्थेत रहायला तर भाग पाडते पण त्याला निरूपयोगी ठरवून म्हणजे व्यवस्थेला डोईजड ठरवून त्याची किंमत कमी करून त्याचे जगणे अवघड करून टाकते. इतका या व्यवस्थेचा खेळ भयंकर आहे. याचा अर्थ एवढाच की व्यवस्थेला तिच्याविषयी कोणी मुळापासून पूर्ण ज्ञानी झालेले आवडत नाही. म्हणून व्यवस्थेविषयी अज्ञानी, अर्धवट ज्ञानी रहा व व्यवस्थेबरोबर जमेल तसे खेळत रहा असा व्यवस्थेचा हुकूम असल्याचे दिसत आहे. ही व्यवस्था अशाप्रकारे हुकूमशाही प्रवृत्तीची आहे. तिच्याशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान असते. तिच्या विरूद्ध संघर्ष हा तिच्या खेळाचाच भाग असतो. शेवटी ती संघर्ष करणाऱ्या माणसाला जेरीस आणते, थकवते व तिच्याशी निमूटपणे जुळवून घ्यायला भाग पाडते. अशा परिस्थितीत व्यवस्थेविषयी पूर्ण ज्ञानी होऊन विरक्त झालेल्या ज्ञानी माणसाने काय करावे? तर त्याने या व्यवस्थेपासून पूर्णपणे अलिप्त न होता (ते शक्यच नाही) तिच्याशी जुळवून घेत जमेल तसे तिच्याशी खेळत रहावे पण तिच्यात अती गुंतून राहू नये. वास्तव हेच आहे की व्यवस्थेबरोबर खेळत राहणारे संपतात पण या खेळाडूंना खेळवणारी व्यवस्था मात्र संपत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.७.२०२४

मंगळवार, १६ जुलै, २०२४

व्यवस्थेचा धनी, लाभार्थी व बळी?

निसर्ग व समाज व्यवस्थेचा मूळ धनी कोण व या व्यवस्थांचे लाभार्थी व बळी कोण?

मानव समाजाची समाज व्यवस्था हा प्रचंड मोठ्या निसर्ग व्यवस्थेचा एक छोटासा भाग आहे जणू ते विशाल सागरातील एक छोटेसे भेटच. पण हे बेट इतके प्रभावशाली आहे की ते विशाल सागरावर प्रभुत्व गाजवून त्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करते व हा प्रयत्न काही अंशी तरी यशस्वी होतो याला कारण म्हणजे मनुष्याला निसर्गानेच बहाल केलेली प्रचंड मोठी बुद्धिमत्ता. अर्थात मानव समाज व्यवस्थेचा आधार किंवा पाया मानवी बुद्धी हाच आहे.

निसर्ग कोणाला म्हणावे? काहीजण निसर्गाला राजा म्हणतात. पण या राजाचे विविध रंग, रूप, गंध, गुण, क्रिया इतक्या भागात विखुरलेल्या आहेत की या राजाला एकसंध पाहताच येत नाही. या राजाच्या आध्यात्मिक/भावनिक व वैज्ञानिक बौद्धिक मेंदूमनाचा तर पत्ताच लागत नाही. मग हा राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर आहे व तो अमूक अमूक स्वरूपात (सगुण व निर्गुण) आहे अशा अमूर्त तार्किक कल्पना मानवी मन करते व त्यांना  धार्मिक कर्मकांडाची जोड देऊन आभासी मानसिक शांती, समाधान मिळविण्याचा प्रयत्न करते. याला कारण हेच की निसर्ग व निसर्गाच्या व्यवस्थेचे मूळ किंवा धनी हा मानवी मेंदूमनाला कायम अनाकलनीय राहिला आहे.

पदार्थीय सृष्टी (निसर्ग) व तिची व्यवस्था (निसर्ग नियमांनी बद्ध असलेली निसर्ग व्यवस्था) या दोन गोष्टींचा निर्माता परमेश्वर असो की निर्माती चैतन्यशक्ती असो, शेवटी प्रश्न परमेश्वर किंवा चैतन्यशक्तीचा नसून या निर्माता किंवा निर्मातीने निर्मिलेल्या व लादलेल्या निसर्ग व्यवस्थेला व त्या अंतर्गत माणसांनी त्यांच्या बुध्दीच्या आधारावर निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेला प्रत्येक मानवी बुद्धीने व्यवस्थेनुसार योग्य प्रतिसाद देण्याचा आहे. ही मानवी बुद्धी वाढत्या वयानुसार क्षीण होत जाते कारण मानवी मेंदूच्या मेंदूपेशी वाढत्या वयानुसार मरत जातात व त्यांचे पुनर्रोपण करता येत नसल्याने व स्मरणशक्तीही कमी झाल्याने या दोन्ही व्यवस्थांना योग्य प्रतिसाद देताना मानवी मेंदूमनाची तारांबळ उडते, ते गडबडते. वृद्ध व्यक्तीच्या मेंदूमनाची अशी बिकट अवस्था असते.

निसर्ग व्यवस्थेत निर्जीव पदार्थांना व सजीव पशूपक्षांना काम व भूमिका यात निवडीचे स्वातंत्र्य नसते. पण माणसांना मात्र निसर्गाने थोड्याफार प्रमाणात हे निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. जन्मानंतर आयुष्यात कोणते काम करायचे व कोणती भूमिका निभावायची हे निवड स्वातंत्र्य जरी काही प्रमाणात माणसांना असले तरी त्यावर समाज व्यवस्था स्वतःची बंधने घालते. माणसाचा जन्म कोणत्या कुटुंबात होतो व ते कुटुंब समाज व्यवस्थेने कोणत्या वर्गात टाकले आहे यावर काम व भूमिका निवडीचे स्वातंत्र्य बऱ्याच अंशी अवलंबून असते. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील कुटुंबास व त्यातील कुटुंब सदस्यांस असे निवडीचे स्वातंत्र्य पुढारलेल्या वर्गातील कुटुंबापेक्षा व त्या कुटुंबात जन्मलेल्या माणसांपेक्षा खूप कमी असते. समाज व्यवस्थेची ही रचना पिढ्यानपिढ्या मागासवर्गीय समाज घटकांवर हुकूमशाही गाजवत राज्य करीत राहते. अशा समाज व्यवस्थेत लोकशाही राज्यव्यवस्थेचे मतदान ही थट्टा/प्रहसन (फार्स) असते. अशा परिस्थितीत मला नेहमी हा प्रश्न पडतो की निसर्ग व्यवस्था व त्या अंतर्गत माणसांनी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचा मूळ धनी कोण व या दोन्ही व्यवस्थांचे लाभार्थी व बळी कोण?

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.७.२०२४

रविवार, १४ जुलै, २०२४

गोंधळ की धिंगाणा?

गोंधळ की धिंगाणा?

मानवी मनाची भटकंती थांबता थांबत नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी या धावत्या, भटक्या मनाची स्थिती असते. या मनात भावना व बुद्धी यांचा सतत खेळ चाललेला असतो. काहीजण याला भावना व बुद्धीची मारामारी म्हणतात. हा अविकसित मानवी मनाचा गोंधळ आहे की विकसित मानवी मनाचा धिंगाणा हे कळायला मार्ग नाही. परंतु हे मात्र खरे की अशा या मानवी मनाला मनानेच आवर घालणे हे व्यक्तीपुढेच नव्हे तर समाजापुढेही आव्हान असते. अशा अनेक उतावीळ मानवी मनांना आवर घालण्याचा प्रयत्न सामाजिक कायदा करीत असतो. कायद्याला असे उतावीळ होऊन चालत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.७.२०२४

समग्रता व एकाग्रता!

समग्रता व एकाग्रता!

विविध गुणधर्मी पदार्थ, वनस्पती, प्राणी व विविध स्वभावांची अनेक माणसे सृष्टीत आहार, विहार करीत असतात. हे सर्व सजीव, निर्जीव पदार्थ असंख्य, अगणित आहेत व त्यातील प्रत्येकाला एक विशेष रूप, गुणाचे वैशिष्ट्य चिकटलेले आहे. त्यानुसार सृष्टीची सतत वैविध्यपूर्ण हालचाल होत असते. या वैशिष्ट्यांना निसर्गाची विविधता म्हणतात. ही विविधता हेच मानवी मेंदूचे खाद्य आहे. मानवी मेंदूमनाची विचार विविधा हा या खाद्याचा परिणाम आहे जो परिणाम मानवी मेंदूमनाला कोणत्याही एका ठराविक कामावर  लक्ष केंद्रित करू देत नाही. परंतु निसर्गातील विविधतेपासून व त्या परिणामस्वरूप विचार विविधेपासून मानवी मनाची सुटका नसल्याने या विविधतेतील समग्रता व वैशिष्ट्यपूर्ण कामातील एकाग्रता ही दोन आव्हाने मानवी मेंदूमनाला आयुष्यभर त्रास देत राहतात!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.७.२०२४