खेळणारे संपतात पण खेळवणारी व्यवस्था संपत नाही!
जोपर्यंत निसर्ग व समाज व्यवस्था मुळापासून समजत नाही तोपर्यंत या व्यवस्थेतील हालचालींचा भाग होऊन रहायला आनंद वाटतो व या व्यवस्थेनुसार चाललेल्या पदार्थांच्या, पशुपक्षांच्या, माणसांच्या हालचाली मानवी मनाला आकर्षित करीत राहतात. पण एकदा का व्यवस्था मुळापासून समजली की मग गोष्टी अनाकर्षक, रटाळ, निरर्थक होऊ लागतात. या हालचालींचा भाग होऊन रहायला नकोसे होते. त्याचा वीट, उबग येतो. मानवी मनाची ही पूर्ण ज्ञानी अवस्था म्हणजे विरक्त, स्थितप्रज्ञ होण्याची अवस्था. ही अवस्था ज्ञान संपादनाच्या कठोर मेहनतीतून प्राप्त होते.
परंतु व्यवस्थेच्या मुळापासूनच्या पूर्ण ज्ञानाने विरक्त होण्याची अवस्था ही ना घरका ना घाटका किंवा इकडे आड तर तिकडे विहीर अशी विचित्र अवस्था असते. कारण इतर सजीव, निर्जीव पदार्थांबरोबर होणारी मनुष्य नावाच्या प्राण्याची पुनर्निर्मिती ही व्यवस्थेकडून खेळवण्यासाठीच झालेली असते. मनुष्याचा जन्म हाच मुळी व्यवस्थेच्या खेळाचा भाग असतो. त्यामुळे व्यवस्थेच्या पूर्ण ज्ञानाने व्यवस्थेविषयी मनात विरक्ती निर्माण झाली तरी व्यवस्थेला धरून रहावेच लागते. पण विरक्ती नंतर व्यवस्थेला धरले तर ती चावते व तिला सोडले तर ती पळते अशी अवस्था होते. व्यवस्था पळते म्हणजे काय होते तर ती विरक्त मनुष्याला व्यवस्थेत रहायला तर भाग पाडते पण त्याला निरूपयोगी ठरवून म्हणजे व्यवस्थेला डोईजड ठरवून त्याची किंमत कमी करून त्याचे जगणे अवघड करून टाकते. इतका या व्यवस्थेचा खेळ भयंकर आहे. याचा अर्थ एवढाच की व्यवस्थेला तिच्याविषयी कोणी मुळापासून पूर्ण ज्ञानी झालेले आवडत नाही. म्हणून व्यवस्थेविषयी अज्ञानी, अर्धवट ज्ञानी रहा व व्यवस्थेबरोबर जमेल तसे खेळत रहा असा व्यवस्थेचा हुकूम असल्याचे दिसत आहे. ही व्यवस्था अशाप्रकारे हुकूमशाही प्रवृत्तीची आहे. तिच्याशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान असते. तिच्या विरूद्ध संघर्ष हा तिच्या खेळाचाच भाग असतो. शेवटी ती संघर्ष करणाऱ्या माणसाला जेरीस आणते, थकवते व तिच्याशी निमूटपणे जुळवून घ्यायला भाग पाडते. अशा परिस्थितीत व्यवस्थेविषयी पूर्ण ज्ञानी होऊन विरक्त झालेल्या ज्ञानी माणसाने काय करावे? तर त्याने या व्यवस्थेपासून पूर्णपणे अलिप्त न होता (ते शक्यच नाही) तिच्याशी जुळवून घेत जमेल तसे तिच्याशी खेळत रहावे पण तिच्यात अती गुंतून राहू नये. वास्तव हेच आहे की व्यवस्थेबरोबर खेळत राहणारे संपतात पण या खेळाडूंना खेळवणारी व्यवस्था मात्र संपत नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, १७.७.२०२४