https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

धर्म व कायद्यातील फरक!

धर्म व कायद्यातील फरक!

इतर प्राणीमात्रांप्रमाणे मानवालाही मूलभूत जैविक वासना आहेत. पण या वासनांचे समाधान करण्याच्या इतर प्राणीमात्रांच्या नैसर्गिक पद्धती व मानवाच्या नैसर्गिक पद्धती यात फरक आहे व या फरकाचे नैसर्गिक कारण म्हणजे मानवाला असलेल्या कनिष्ठ तमोगुणी, मध्यम रजोगुणी व उच्च सत्वगुणी भावना व त्यासोबत असलेली उच्च बुद्धी.

आदिमानवापासून आधुनिक मानवा पर्यंतचा उत्क्रांतीचा काळ म्हणजे मानवी तमोगुण ते मानवी रजोगुण ते मानवी सत्वगुण असा गुणात्मक विकासाचा संक्रमण काळ. तमोगुण म्हणजे क्रूर गुन्हेगारी राक्षसी प्रवृत्ती. रजोगुण म्हणजे असभ्य भ्रष्टाचारी व सभ्य नैतिक यांचे मिश्रण असलेली मिश्र प्रवृत्ती. सत्वगुण म्हणजे मानवी सभ्यतेची आदर्श नैतिक प्रवृत्ती. मनुष्याचा तमोगुण म्हणजे कनिष्ठ (नीच) भावना, मनुष्याचा रजोगुण म्हणजे मध्यम भावना व मनुष्याचा सत्वगुण म्हणजे उच्च भावना.

धर्म म्हणजे अध्यात्म नसून ती मनुष्याच्या उच्च भावनेवर आधारित  असलेल्या आदर्श नैतिक प्रवृत्तीची आचार संहिता होय. जिथे सत्वगुणी धर्म नांदतो तिथे सौम्य व कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याची गरज नसते. पण जिथे अधर्म असतो म्हणजे तमोगुण व रजोगुण यांचा निवास असतो तिथे शिक्षा प्रधान कायद्याची आवश्यकता असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.७.२०२४

गुरुवार, ४ जुलै, २०२४

घरात डबके होऊन राहणे मला पसंत नाही!

घरात डबके होऊन राहणे मला पसंत नाही!

मला मुलापेक्षाही भारी मुलगी व जावई आहेत जे उच्च शिक्षित व चांगल्या आर्थिक स्थितीत आहेत. आम्हा नवरा बायकोला त्यांचा मोठा आधार आहे. मला आता घरी बसून आराम करा असे ते दोघेही म्हणतात. आम्हा नवरा बायकोला पर्यटनस्थळी जाण्यासाठी पैसे देऊ करतात. पण माझी बुद्धी व माझे शरीर नीट काम देतेय तोपर्यंत मी माझ्या आवडत्या वकिली व्यवसायाचे काम करीत राहणार व त्यातून पैसे कमवून बायकोबरोबर मजेत राहणार. जेव्हा हातपाय काम देईनासे होतील तेव्हाच विवाहित मुलीकडून अतिशय गरज पडली तरच पैसा घेणार. संघर्ष हेच माझे जीवन. नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठांसारखे जीवन जगणे मला मंजूर नाही. तसेही डॉक्टर, वकील रिटायर्ड होत नसतात जोपर्यंत त्यांचे शरीर व बुद्धी नीट काम देत असते तोपर्यंत. घरी बसून राहणे म्हणजे डबके होऊन राहणे. डबक्यावर डास तयार होतात, वाहत्या झऱ्यावर नाही, हे व. पु. काळे यांचे वाक्य माझ्या जीवनाला लागू आहे. मला झरा होऊन रहायला आवडते. नुसती संघर्षमय वकिलीच नव्हे तर दररोज लिहित असलेले माझे वैचारिक विचार हा सुद्धा माझा वाहता झरा आहे.  

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.७.२०२४

मंगळवार, २ जुलै, २०२४

लोकशाहीतील असामान्य सभागृहे!

लोकशाहीतील असामान्य सभागृहे?

ब्रिटिशांनी बनविलेले कायदे स्वतंत्र भारतातून हद्दपार करणे व तिथे नवीन भारतीय कायदे प्रस्थापित करणे स्वागतार्ह असले तरी ब्रिटिश लोकांची संसदीय लोकशाही पद्धत भारतातून हद्दपार करणे आपल्याला जमेल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

इंग्लंड मध्ये ब्रिटिश लोकशाहीची दोन सभागृहे आहेत. एक सभागृह लोकांतून निवडून येणाऱ्या लोक प्रतिनिधींचे सामान्य सभागृह ज्याला तिथे हाऊस आॕफ कॉमन्स म्हणतात तर दुसरे सभागृह मागच्या दाराने निवडून येणाऱ्या म्हणजे सामान्य सभागृहातील लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या लोक प्रतिनिधींचे असामान्य सभागृह असते ज्याला तिथे हाऊस आॕफ लॉर्डस म्हणतात.

भारतात केंद्रीय स्तरावर लोकसभा व राज्य स्तरावर विधानसभा ही दोन्ही सभागृहे म्हणजे ब्रिटिशांच्या हाऊस आॕफ कॉमन्सची भारतीय रूपे तर केंद्रीय स्तरावर राज्यसभा व राज्य स्तरावर विधान परिषद ही दोन्ही सभागृहे म्हणजे ब्रिटिशांच्या हाऊस आॕफ लॉर्डसची भारतीय रूपे.

आता या मागच्या दाराने निवडून येणाऱ्या असामान्य सभागृहातील (राज्यसभा व विधान परिषद) लोक प्रतिनिधींना असामान्य हा दर्जा का दिला जातो हे कळायला मार्ग नाही. कारण राष्ट्रपतींनी विशेष नियुक्ती  केलेले अगदी मोजकेच राज्यसभेचे सदस्य व राज्यपालांनी विशेष नियुक्ती केलेले अगदी मोजकेच विधान परिषदेचे सदस्य सोडले तर या दोन्ही असामान्य सभागृहातील लोक प्रतिनिधी सामान्य सभागृहाचे सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच निवडले जातात व त्यासाठी उच्च शिक्षण, विज्ञानातील विशेष कामगिरी असे विशेष पात्रतेचे निकष कायद्याने अधोरेखित केलेले नाहीत. 

माझा कायदेशीर मुद्दा हा आहे की लोकशाहीत लोक प्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असले पाहिजेत व त्यासाठी हाऊस आॕफ काॕमन्सची रूपे असलेली लोकसभा व विधानसभा ही दोन सामान्य सभागृहे भारतात पुरेशी आहेत. लोकांमधून निवडून येण्याची ताकद नसणाऱ्या काही लोकांसाठी हाऊस आॕफ लॉर्डसची रूपे असलेली राज्यसभा व विधानसभा ही दोन असामान्य सभागृहे भारतात हवीतच कशाला? शेवटी काय तर आम्ही अजून ब्रिटिशांच्या पद्धती सोडायला तयार नाही आहोत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.७.२०२४

गर्दीचा नरक!

नको ती गर्दी आणि त्या गर्दीने निर्माण केलेला नरक!

लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराने गर्दीचा जो हैदोस घातलाय त्याने जग एक नरक बनवलाय. गर्दी, गर्दी आणि गर्दी, एक भयानक वास्तव! या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर सुचलेले हे सुंदर स्वप्न.

छान निसर्गरम्य ठिकाण असावे. तिथे थोडीच पण जिवाला जीव देणारी माणसे असावीत. त्यांच्यात धर्म, वंश, जात, भाषा, प्रांत असे भेद नसावेत. सगळ्यांची जगण्याची छान सोय असावी व शिस्तीने कामे वाटून घेतल्याने स्पर्धा नसावी. तिथे राजकारण ही गोष्ट तर बिलकुल नसावी. ज्ञान, प्रतिभेची तिथे सुंदर देवाणघेवाण व्हावी व त्यातून तिथे एकमेकांचे दिलखुलास कौतुक व्हावे. तिथे जीवन यांत्रिक नव्हे तर नैसर्गिक असावे व कृत्रिम साधने कमीतकमी असावीत. थोडक्यात तिथे सर्वांचा आत्मा व परमात्मा एक असावा व तिथे स्वर्ग नांदावा. कमी लोकसंख्या असलेली अशी सुंदर स्वर्गीय ठिकाणे जगभर असावी व संपूर्ण जगच एक स्वर्ग व्हावा. नको ती गर्दी व नको त्या गर्दीने निर्माण केलेला नरक!

-©ॲड.बी.एस.मोरे, २.७.२०२४

शरीर व मन, कोण कोणाला भारी?

शरीर व मन, कोण कोणाला भारी?

मनाचा ठाम निश्चय व धाडस असेल तर बरेच काही करता येत असले तरी सर्व काही करता येत नाही हे नैसर्गिक वास्तव आहे. मनोनिग्रहाने शारीरिक व्याधी दूर होत नाहीत. शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी शारीरिक पातळीवरच इलाज करावा लागतो जो इलाज भौतिक शास्त्रावर आधारित (उदाहरणार्थ फिजीओ थेरपी) व रसायनशास्त्रावर आधारित (उदा. जैवरासायनिक औषधे) असतो.

याच कारणाने मनाने कितीही निश्चय केला व कितीही धाडस केले तरी सर्वांना हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर सर करता येत नाही. जे असे शिखर सर करतात त्यांच्या मदतीला नुसता मनोनिग्रह/निश्चय व धाडसच नव्हे तर इतर अनेक शारीरिक घटक कारणीभूत असतात ज्या घटकांत कठोर व्यावसायिक प्रशिक्षणाचाही भाग असतो. हीच गोष्ट समुद्राच्या खाडीत सहज पोहणाऱ्याची असते. 

माणसाचे मन त्याच्या स्वतःच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही मग इतरांच्या शरीरावर व निसर्गाच्या प्रचंड मोठ्या पदार्थीय शरीरावर नियंत्रण मिळविण्याची तर गोष्टच सोडा. निसर्गाचे प्रचंड मोठे पदार्थीय शरीर व त्या शरीराची हालचाल घडवणारे निसर्ग नियम म्हणजे विज्ञान. हे विज्ञान मानवी मनाला आव्हानात्मक आहे. हे आव्हान मानवी मनाला पूर्णतः पेलणे शक्य नाही कारण निसर्गाचे शरीर व निसर्ग शरीरात असलेले निसर्गमन मानवी मनाच्या, बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहे. माणसाचे मन निसर्ग मनापेक्षा जास्त शक्तीशाली असते तर माणसाने मृत्यूवर विजय मिळवून मरणारी मानवी शरीरे मरू दिली नसती.

निसर्गाला मन म्हणजे आत्मा आहे का या प्रश्नावरच मानवी बुद्धी ठाम नाही. ठोस पुराव्या अभावी ती या प्रश्नाच्या उत्तरावर चाचपडत आहे. परमेश्वरावर श्रद्धा असणारी माणसे निसर्गात असे निसर्गमन (परमात्मा) आहे असे मानून त्याच्याशी श्रद्धेने आध्यात्मिक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे माहित नाही. पण यातून देवश्रध्दाळू माणसाला काही अंशी मानसिक समाधान मिळते हे मात्र खरे. पण संपूर्ण निसर्ग शरीर जसे विज्ञानाला पूर्णपणे कळले नाही तसे त्या शरीरातील निसर्गमनही मानवी मनाला अनाकलनीय राहिले आहे.

पण तरीही मानवी मनाची मनःशक्ती मोठी आहे, तिचे बौद्धिक सामर्थ्य मोठे आहे यावर वादच नाही. मन घाबरट, कमकुवत असेल तर सोप्या गोष्टीही अवघड होतात व आजारी माणसाला चांगली औषधेही लागू पडत नाहीत. याउलट खंबीर मनाचा माणूस प्रबळ इच्छाशक्तीने असाध्य रोगावरही मात करू शकतो. पण तरीही शरीरावर नियंत्रण ठेवण्याच्या मानवी मनाच्या मनःशक्तीला तिच्या नैसर्गिक मर्यादा आहेत ही गोष्ट मान्य करावी लागते. तरीही आधी कोंबडी की अंडे या प्रश्नाप्रमाणे शरीर मनाला भारी की मन शरीराला भारी हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. 

मन हे शरीरात असते कारण मेंदू हा शरीरात असतो हे मान्य करावेच लागते. शरीरात मेंदू नसता तर मेंदूत मेंदूमन कुठून असते? म्हणजे मानवी शरीर व मानवी मन व त्याहून मोठे असलेले निसर्ग शरीर व निसर्गमन या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्हीही गोष्टी एकमेकांशी निगडीत, एकमेकांवर अवलंबून असून एकमेकांना आपआपल्या ताकदी व मर्यादा (स्ट्रेन्ग्थ अँड विकनेस) नुसार नियंत्रित करतात. त्यातील कोण कोणाला भारी हा प्रश्नच मुळात निरर्थक वादाचा प्रश्न आहे. दोन्हीही गोष्टींनी आपआपल्या ताकदी व मर्यादा ओळखून सुसंवाद व संतुलन साधायला हवे, एवढेच मी म्हणेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २.७.२०२४

सोमवार, १ जुलै, २०२४

नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा तुलनात्मक अभ्यास!

नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यास!

निसर्गाचा रौद्रावतार व माणसाचे क्रोधित हिंसक वर्तन यांच्यात जसा कुठेतरी संबंध असल्याचे मला जाणवते अगदी तसाच संबंध निसर्गाचे शांत, निर्मळ सौंदर्य व माणसाचे कोमल, प्रेमळ मन यांच्यात असावा असे मला जाणवते. याच जाणिवेतून माणसाच्या क्रोध भावनेला व त्याच्या हिंसक वर्तनाला प्रतिबंधित करणारा मानवनिर्मित फौजदारी कायदा व माणसाची कोमल, प्रेमळ भावना व त्याची समाजशीलता यातून निर्माण होणाऱ्या आंतरमानवी व्यवहाराचे नियमन करणारा मानवनिर्मित दिवाणी कायदा या दोन्ही कायद्यांचा निसर्गाशी संबंध असावा असे मला जाणवते. नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यासातून काढलेला हा माझा वैयक्तिक निष्कर्ष आहे. निसर्ग विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मनुष्याच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यास मानवी स्वभाव वैशिष्टयांचे अनेक कंगोरे कळतात. 

-©ॲड.बी.एस.मोरे, २.७.२०२४

GOD AND SECULARISM!

If anybody says that his God is the only true God and his religion is the only supreme religion, I will call him narcissist because all including myself are in search of true God and his true religion, we may have difference of opinion or understanding about God and his religion as our perception about God and religion may differ, learn to accept and respect this difference, this is true secularism! -Adv.B.S.More