माझे पोदार काॕमर्स काॕलेज!
हेच ते माझे रमणीरंजन आनंदीलाल पोदार काॕलेज आॕफ काॕमर्स अँड इकाॕनाॕमिक्स (थोडक्यात पोदार काॕमर्स काॕलेज), माटुंगा, मुंबई ज्या काॕलेजात १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी काॕमर्स पदवीचे शिक्षण घेतले. या काॕलेजची मजा नंतर ना सिडनॕहम काॕमर्स काॕलेज मधून कंपनी सेक्रेटरी (इंटर) चा पार्ट टाईम अभ्यासक्रम करताना आली ना गव्हर्मेंट लाॕ काॕलेज मधून तीन वर्षाची पदव्युत्तर कायद्याची पदवी (एलएल.बी.) घेताना आली.
पोदार काॕलेजचा माझ्या बॕचचा फक्त एकच अशोक सावंत नावाचा मित्र फेसबुक माध्यमातून सद्या माझ्या संपर्कात आहे. बाकी सगळे विखुरले गेले. काही मित्र परदेशात स्थायिक झाले. त्या काॕलेजची एकही मैत्रीण माझ्या बिलकुल संपर्कात नाही. मी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) माध्यमातून या काॕलेजच्या समाज कार्यात सक्रिय होतो. पण अभ्यासू, गंभीर विद्यार्थी म्हणूनच काॕलेजमध्ये माझी ओळख होती व कदाचित त्यामुळे माझी काॕलेजच्या मुलींशी मैत्री तशी कमीच होती.
वर्गात अभ्यास वह्यांच्या माध्यमातून एका सुंदर मैत्रिणीशी छान जवळीक निर्माण झाली होती. पण नंतर तिचे व माझे कुठेतरी बिनसले आणि मग ती दूर झाली. वर्ग मैत्रिणीशी ही मैत्री सुरू असताना मी त्यावेळी प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर व रंजिता यांचा अखियों के झरोको से हा हिंदी चित्रपट सारखा बघत होतो. असो, ती गोड मैत्री सोडली तर मग काॕलेजच्या इतर कोणत्याही मुलीशी तशी मैत्री झालीच नाही. ती मैत्रीण आता कुठे असेल? असो, पण तिची गोड आठवण मात्र माझ्या जवळ कायम आहे.
माझा हा फोटो आमच्या पोदार काॕमर्स काॕलेजच्या गच्चीवरील टाॕवर खालील आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४