https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
रविवार, १६ जून, २०२४
MY AI CONVERSATION!
निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?
निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती?
मानवी शरीर अनेक अवयवांनी बनले आहे. या सर्व अवयवांत मेंदू हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रमुख अवयव आहे. या प्रमुख अवयवाला माहिती पुरवणारे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा हे पाच अवयव मेंदूसाठी ज्ञान गोळा करणारे अवयव असल्याने त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. त्यानंतर हृदय, किडनी यासारखे महत्वाचे अवयव येतात व नंतर इतर अनेक अवयव येतात. या सर्व अवयवांची मिळून शरीर व्यवस्था बनली आहे. शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव पाच ज्ञान अवयवांकडून/ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शरीराच्या संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो.
मानवी शरीर अवयवांच्या शरीर व्यवस्थेचा धागा पकडून निसर्ग हे प्रचंड मोठे शरीर आहे असे मानले व ग्रह, तारे, इतर पदार्थ यांना या शरीराचे अवयव मानले तर मग या अवयवांची निसर्ग व्यवस्था समोर येते. आता पुढील महत्वाचा प्रश्न हा की या निसर्ग व्यवस्थेचे नियंत्रण करणारा निसर्गाचा मेंदू हा प्रमुख निसर्ग अवयव कुठे शोधायचा? त्यासाठी निसर्ग शरीराचे डोके व या डोक्याची कवटी शोधावी लागेल. कारण या कवटीतच निसर्गाचा मेंदू असणार.
मानवी शरीराचा मेंदू हा प्रमुख अवयव हा या शरीराचा एक मांसल भाग आहे जो माणसाच्या डोक्याच्या कवटीत असतो. मेंदू नावाच्या या मांसल भागाची पेशी, रासायनिक व विद्युत रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. मेंदू नावाच्या मांसल भागाच्या या गुंतागुंतीच्या रचनेतच मानवी मन असते. हे मेंदूमन म्हणजे सूक्ष्म मानसिक शक्तींचे गुंतागुंतीचे जाळे आहे ज्याची एक विशिष्ट कार्यशैली आहे.
निसर्गाचे डोके, त्या डोक्याची कवटी व त्या कवटीतील निसर्गाचा मेंदू सापडल्याशिवाय त्या निसर्ग मेंदूची रचना, त्या रचनेतील निसर्गाचे मेंदूमन व त्या मेंदूमनाची कार्यशैली कशी कळेल? निसर्गाच्या मेंदूमनाची कार्यशैली दोन प्रकारची आहे का? म्हणजे एक वैज्ञानिक कार्यशैली व दोन आध्यात्मिक कार्यशैली? तसे असेल तर वैज्ञानिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग मन व आध्यात्मिक कार्यशैलीच्या भागाचे नामकरण निसर्ग आत्मा (परमात्मा) असे करावे का? मानवी मनाचे सुद्धा दोन भाग आहेत. ते म्हणजे तार्किक मन (लाॕजिकल माईंड) व भावनिक मन (इमोशनल माईंड). तशीच काहीशी विभागणी निसर्ग मनाची असेल का? म्हणजे निसर्ग मनाचा एक भाग हा वैज्ञानिक भाग व निसर्ग मनाचा दुसरा भाग हा आध्यात्मिक भाग? मग माणसांनी एका बाजूने निसर्ग विज्ञानाच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या वैज्ञानिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) व दुसऱ्या बाजूने अध्यात्म धर्माच्या माध्यमातून निसर्ग मनाच्या आध्यात्मिक भागाचा सराव (प्रॕक्टिस) करावा का? निसर्गाचे मेंदूमन हीच निसर्गाची वैज्ञानिक व आध्यात्मिक महाशक्ती असे मानावे का?
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.६.२०२४
शुक्रवार, १४ जून, २०२४
मेंदू एक विषय अनेक!
मेंदू एक विषय अनेक!
निसर्गाने सृष्टीच्या उत्क्रांती प्रक्रियेत माणसाला पर्यावरण साखळीत उच्च स्थानावर आणून ठेवले आहे. त्यातून परिस्थिती अशी निर्माण झाली की माणसाचा मेंदू एक पण त्याच्यापुढे वाढून ठेवलेले पर्यावरणीय विषय अनेक. या अनेकविध विषयांना नीट हाताळता यावे म्हणून निसर्गाने मानवी मेंदू इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित केला. एकीकडून निसर्गाने पर्यावरणाचा विकास केला तर दुसरीकडून मानवी मेंदूचा.
पण हा विकसित मेंदू निसर्गानेच निर्माण केलेल्या अनेक विषयांना झेलण्यासाठी खरंच समर्थ आहे का? निसर्गाचा एकेक विषयच एवढा मोठा व किचकट की त्यात जेवढे खोल जावे तेवढा त्यात मेंदू अधिकाधिक गुंतत व रूतत जातो. एकच विषय संपता संपत नाही. मग आयुष्याच्या मर्यादित काळात व दिवसाच्या मर्यादित वेळेत मानवी मेंदू दुसऱ्या विषयांकडे लक्ष कसे व किती देणार?
माणसाच्या दैनंदिन क्रिया कितीतरी असतात. एका विषयाला जास्त महत्व द्यावे तर इतर विषय रडत, वाट बघत बसतात. बाबा, विषय संपव व दुसऱ्या विषयाकडे वळ असे मेंदूनेच मेंदूला बजावले तरी घाईघाईने एखादा विषय संपवून टाकून दुसऱ्या विषयाकडे वळावे असे मेंदूला वाटत नाही. काम, काळ व वेग यांचे व्यवस्थापन करताना कामांचा प्राधान्य क्रम ठरवावा असे सांगितले जाते. पण काहीवेळा सगळ्याच गोष्टींना पूर्ण करण्याची गरज असते. उदाहरणार्थ, झोपेतून उठल्यावर शौचकर्म, व्यायाम, दात घासणे, अंघोळ, नाष्टा, अंगावर कपडे घालणे या गोष्टी तशा एकत्रच, एका पाठोपाठ एक लगेच कराव्या लागतात. पहिले काम संपते ना संपते तोपर्यंत दुसरे काम वाट बघत उभे असते. अशावेळी मेंदूला किती घाईत एकेक काम करावे लागते हे त्या मेंदूलाच माहीत. अशावेळी एखाद्या माणसाच्या मेंदूला प्रत्येक विषय व्यवस्थित हाताळण्याची व प्रत्येक काम अचूक (परफेक्ट) करण्याची सवय असेल तर? गेला ना असा मेंदू बाराच्या भावात! तसे पाहिले तर लोकांसाठी हा विषय म्हणजे छोटा विषय व त्यामुळे ते याचा जास्त विचार करीत नाहीत. पण हा काटेकोर (परफेक्शनीस्ट) माणसासाठी गंभीर विषय आहे.
एखाद्या औद्योगिक किंवा व्यापारी संस्थेचा मालक त्याच्या उद्योग धंद्यात अनेक विषयांच्या तज्ज्ञांची नेमणूक करतो. कारण तो सगळ्या विषयांत पारंगत नसतो. तसा तर कोणताच माणूस सगळ्या विषयांत पारंगत असू शकत नाही. मनुष्य जीवनाला स्पर्श करणारे विषय इतके विविध व अनेक आहेत की कोणालाही या सर्व विषयांना पूर्ण न्याय देता येत नाही आणि ही खंत मरेपर्यंत कायम राहते. काही थोडे विषय सोडले तर बरेच विषय संपता संपत नाहीत. ते कायम अर्धवटच राहतात. बाबा, संपव ना तो विषय एकदाचा असे वाक्य आपण समाज जीवनात कित्येकदा ऐकतो. पण एखादा विषय संपवला म्हणून सर्व विषय संपत नाहीत. बरेच विषय आयुष्यभर अर्धवटच राहतात आणि त्यामुळे माणूस कायम असमाधानी राहतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, १५.६.२०२४
गुरुवार, १३ जून, २०२४
जाणिवेतला परमेश्वर!
आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे अस्थिर व अशांत मन!
आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे कायम अस्थिर व अशांत मन!
निसर्गातील विविधतेचे कोडकौतुक जास्त नको. याच विविधतेने जगात अनेक आकर्षणे निर्माण केलीत व याच आकर्षणांच्या नादी लागून माणसांनी जगात आकर्षणांचा बाजार मांडलाय. या बाजारातील ही विविध आकर्षणे विविध माध्यमांतून मानवी मनाला सतत क्षणाक्षणाला स्पर्श करून जातात व मनाला ये ये म्हणून सतत डिवचत राहतात.
आकर्षणांच्या या मोहमायी दुनियेत जगताना आपली गरज किती व आपली ताकद किती हे माणसाने नीट ओळखूनच या आकर्षणांच्या चैनीचा नाद करावा. माणसाच्या गरजा तशा खूपच कमी आहेत. पण या विविध आकर्षणांनी माणसाच्या चैनी मात्र खूप वाढवल्या आहेत.
आकर्षणांनी पछाडलेले मन म्हणजे कायम अस्थिर व अशांत मन. अशा मनालाच आकर्षणांचा मंत्रचळ लागू शकतो. खरं तर विविध आकर्षणांनी घेरलेल्या मानवी मनापुढे सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर आकर्षणांनी विचलित न होता स्थितप्रज्ञ राहणे.
जगातील आकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत काही का असेना मला स्वतःला समजलेला आकर्षणांचा सिद्धांत या लेखात मी विस्तृतपणे कारणमीमांसेसह सांगितला आहे. जगातील इतर शहाण्या लोकांनी जवळ केलेला आकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत माझ्या या समजेच्या विपरीत असेल तर या लेखातील माझे म्हणणे वाचक मंडळी नाकारू शकतात.
-©ॲड.बी.एस.मोरे, १३.६.२०२४