https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ९ जून, २०२४

मोठ्या लोकांबरोबर फोटो काढून घेण्याची हौस?

मोठ्या लोकांबरोबर फोटो काढून घेण्याची हौस?

केवळ कर्तुत्ववान आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांच्या मुलांना कर्तुत्ववान होता येत नाही. थोडेफार पाठबळ मिळत असले तरी शेवटी स्वतःचे कर्तुत्व स्वतःलाच सिद्ध करावे लागते. समाजातील मोठ्या लोकांच्या मुलांची ही स्थिती तर मग अशा मोठ्या लोकांशी काडीचाही संबंध नसताना त्यांच्या मागे लागून त्यांच्या बरोबर स्वतःचा फोटो काढून घेऊन तो जगभर मिरविण्याची हौस चुकीची नव्हे काय? स्वकष्टाने मिळविलेले आपले स्वतःचे कर्तुत्व छोटेसे का असेना पण त्याचा स्वाभिमान (सेल्फ रिस्पेक्ट) हवा. त्या स्वाभिमानाला त्या मोठ्या लोकांच्या शेजारी नेऊन छोटे करू नका. मी भूतकाळात असा वेडपटपणा काही प्रसंगी केला व स्वकष्टाने प्राप्त केलेल्या माझ्या उच्च शिक्षणाला व वकील पदाला अप्रत्यक्षपणे कमी लेखले. आता हा मूर्खपणा करणार नाही. या मोठ्या लोकांनी स्वतःहून तुमच्या कर्तुत्वाचा मान ठेवून तुमच्या बरोबर त्यांचा फोटो काढला तर तो फोटो स्वतःच्या कर्तुत्वाचा मान म्हणून जगाला दाखविण्यात काहीतरी अर्थ आहे नाहीतर नाही. तुम्ही एखाद्या प्रसिद्ध खेळाडूचे, कलाकाराचे, नेत्याचे चाहते (फॕन) असणे यात काही गैर नाही पण फॕनला (पंख्याला) लटकल्यासारखे त्या खेळाडू, कलाकार किंवा नेत्याच्या मागे मागे करून त्याच्या सोबत स्वतःचा फोटो काढून घेऊन तो जगभर मिरविणे यात स्वतःचे कर्तुत्व (असेल तर) झाकोळण्यासारखे आहे असे मला वाटते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.६.२०२४

सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

मानवी वासना व भावना यांना लगाम घालणारी सुज्ञ मानवी विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य!

निर्जीव पदार्थांचे रासायनिक गुणधर्म व सजीव पदार्थांचे जैविक गुणधर्म हे एकमेकांशी संलग्न असले तरी त्या गुणधर्मांत खूप फरक आहे. दोन्ही पदार्थांचे हे रासायनिक व जैविक गुणधर्म वेगळे असले तरी ते दोन्हीही गुणधर्म निसर्गाच्या पदार्थीय विश्वाचे भौतिक गुणधर्मच होत. अर्थात निसर्गाची भौतिकता रासायनिक व जैविक अशा दोन्ही प्रकारची आहे.

मनुष्य हा निसर्गाने उत्क्रांत केलेला उच्च पातळीचा जैविक गुणधर्माचा सजीव पदार्थ आहे. या पदार्थाला अन्नाची भूक, लैंगिक भूक, झोप इ. मूलभूत जैविक वासना आहेत तशा मायाप्रेम, करूणा, परोपकार इ. पूरक नैतिक/सकारात्मक भावनाही आहेत व त्याचबरोबर भय, राग, लोभ, मोह, मद, मत्सर यासारख्या उपद्रवी अनैतिक/नकारात्मक भावनाही आहेत ज्या नकारात्मक भावनांच्या अतिरेकाचे रूपांतर हिंसा या विध्वंसक लक्षणात होते.

जैविक वासना, सकारात्मक नैतिक भावना व नकारात्मक अनैतिक भावना यांचे अत्यंत किचकट मिश्रण म्हणजे मानवी मन. या मनात जर निसर्गाने सुज्ञ विवेकबुद्धी घातली नसती तर मनुष्याने स्वतःबरोबर निसर्गाची पुरती वाट लावली असती. ही सुज्ञ मानवी विवेकबुद्धी मनुष्याच्या जैविक वासना व नैतिक भावना यांच्यात संतुलन साधण्याचा व मनुष्याच्या अनैतिक भावनांना नियंत्रित ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहते. जैविक वासना आततायी असतात, नैतिक भावना नम्र असतात तर अनैतिक भावना आक्रमक असतात. मानवी मनाच्या या तिन्ही कार्यप्रेरणा जशा नैसर्गिक आहेत तशी त्यांच्यात संतुलन साधणारी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी मानवी मनाची सुज्ञ विवेकबुद्धी ही सुद्धा नैसर्गिक आहे. निसर्गाने केलेली मानवी मेंदूची रचनाच अशाप्रकारे खूप किचकट आहे. मनुष्याच्या वासना व भावना यांच्यावर अंकुश ठेवून त्यांना लगाम घालणारी मानवी मेंदूमनाची सुज्ञ विवेकबुद्धी हे निसर्गाचे मोठे आश्चर्य होय.

जैविक वासना व नैतिक/अनैतिक भावना यांचा मानवी मेंदूमनावरील दबाव प्रचंड मोठा असतो. तिन्ही बाजूंनी येणाऱ्या या दबावांना न जुमानता त्यांच्यात संतुलन साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ही साधी गोष्ट नाही. ही असाधारण गोष्ट सुज्ञ मानवी विवेकबुद्धीला साध्य करावी लागते. मानवी विवेकबुद्धीचे हेच आद्य नैसर्गिक कर्तव्य आहे ज्या मूलभूत बौद्धिक कर्तव्याचा समावेश मानवनिर्मित सामाजिक कायद्यात केला गेला आहे. या कायद्यानुसार मानवी विवेकबुद्धीने जैविक वासना, नैतिक भावना व अनैतिक भावना यांच्यापैकी कोणालाही झुकते माप देऊ नये हे अपेक्षित आहे. या आद्य नैसर्गिक कर्तव्याला मानवी बुद्धी सुज्ञपणाने, विवेकाने जागेल अशी अपेक्षा करूया!

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४

शनिवार, ८ जून, २०२४

निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत!

निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय!

निसर्गाकडे असलेला पदार्थांचा कच्चा माल मुळातच मर्यादित आहे. त्यातून तो बनवून बनवून तरी किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तरी त्याची कमालच म्हणायची. याच कच्च्या मालातून त्याने कितीतरी विविध गुणधर्मी निर्जीव व सजीव
पदार्थ निर्माण करून निर्जीव-सजीव पदार्थांचे प्रचंड मोठे विश्व निर्माण केले आहे. निसर्ग व विश्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? की त्या एकच आहेत? म्हणजे निसर्गानेच निसर्ग बनवला किंवा विश्वानेच विश्व बनवले का? काही ठोस सांगता येत नाही. शेवटी निसर्ग व विश्व यांना एक मानले तरी त्याहून कोणती तरी मोठी शक्ती (चैतन्यशक्ती) निसर्ग किंवा विश्वात अस्तित्वात असावी व ती सर्वशक्तीमान असल्याने तिलाच तार्किक अंदाजाने परमेश्वर मानावे का? आणि तसे मानले तरी या चैतन्यशक्तीची आध्यात्मिक भक्ती, तपस्या, आराधना, प्रार्थना किंवा इतर धार्मिक कर्मकांडे करून ती प्रसन्न होते का व प्रसन्न होऊन तिनेच निर्माण केलेल्या परिस्थितीत, सृष्टी रचनेत, सृष्टी व्यवस्थेत भक्तांच्या सोयीनुसार बदल करते का, हे प्रश्न बुद्धिमान मानवी मनाला पडतातच.

विविध गुणधर्मी विविध मूलद्रव्यांचा एक निर्जीव अणू ते अनेक निर्जीव अणू यांच्या पासून बनलेले निर्जीव पदार्थांचे निर्जीव विश्व व एक सजीव पेशी ते अनेक सजीव पेशी यांच्या पासून बनलेले सजीव पदार्थांचे सजीव विश्व व या दोन विश्वांना नियमबद्ध करणारी निसर्ग व्यवस्था ही निसर्गाची अजब निर्मिती आहे.

या प्रचंड मोठ्या सजीव, निर्जीव विश्वांना नियमबद्ध करणाऱ्या निसर्ग व्यवस्थेत प्रामुख्याने तीन नैसर्गिक प्रक्रिया आढळून येतात. त्या म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन, देवाणघेवाण. एखाद्या पदार्थाची त्याच प्रकारच्या पदार्थात पुनर्निर्मिती होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला पुनर्निर्माण असे म्हणतात. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरूषाच्या लैंगिक प्रक्रियेतून पुन्हा मनुष्याचीच निर्मिती होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे पुनर्निर्माण प्रक्रिया. दुसरी नैसर्गिक प्रक्रिया परिवर्तनाची. एखाद्या पदार्थाचे रूपांतर वेगळ्या प्रकारच्या पदार्थात होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला परिवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ  सजीव मानवी शरीराचे रूपांतर मृत्यूने निर्जीव शरीरात होण्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिवर्तन प्रक्रिया. या परिवर्तन प्रक्रियेत मानवी शरीर हळूहळू बाल व तरूण अवस्थेतून वृद्धावस्थेत म्हणजे मृत्यूच्या जवळ जाण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. 

पुनर्निर्माण व परिवर्तन या दोन प्रक्रियांच्या मध्ये तिसरी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती म्हणजे आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया. उदाहरणार्थ, जिवंतपणी मानवी शरीराने हवेतील प्राणवायू आत घेऊन कार्बन वायू हवेत सोडणे ही श्वासोच्छवास प्रक्रिया, निसर्गातील अन्न, पाणी शरीरात घेऊन विष्ठा बाहेर टाकण्याची पचन प्रक्रिया, स्त्री व पुरूष यांच्यातील लैंगिक संभोग प्रक्रिया, आंतर मानवी ज्ञानकारण, अर्थकारण, राजकारण यासारख्या सामाजिक प्रक्रिया, या सर्व आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रिया होत. अर्थात, आंतर मानवी सामाजिक देवाणघेवाण प्रक्रिया ही सुद्धा खोल अर्थाने आंतर पदार्थीय नैसर्गिक देवाणघेवाण प्रक्रिया होय. विशेष म्हणजे पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही नैसर्गिक प्रक्रिया एकमेकांशी संलग्न आहेत. उदाहरणार्थ, मुलामुलींचे लग्नाच्या वयात येणे हा परिवर्तन प्रक्रियेचा भाग आहे, वयात आल्यावर लग्न करून स्त्री पुरूषांनी त्यांच्या लैंगिक संबंधातून मुलामुलींना जन्म देणे हा पुनर्निर्माण प्रक्रियेचा भाग आहे तर स्त्री पुरूषांमधील लैंगिक-सांसारिक देवाणघेवाण हा आंतर पदार्थीय देवाणघेवाण प्रक्रियेचा भाग आहे. 

निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थ या तीन प्रक्रियांत चक्राकार फिरत असतात. सागरी खारट पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन (बाष्पीभवन) तिच्यापासून पिण्यास योग्य असलेल्या गोड्या पाण्याचा पाऊस पडणे ही निर्जीव पदार्थांची पुनर्निर्माण प्रक्रिया होय. मूलद्रव्यांच्या रासायनिक क्रियेतून त्यांचे संयुग (कम्पाऊंड) पदार्थात रूपांतर होणे ही निर्जीव पदार्थांची परिवर्तन प्रक्रिया होय. वनस्पतींनी जमिनीतील पोषक पदार्थ, सूर्याची उष्णता, पावसाचे पाणी घेऊन फुले व फळांची निर्मिती करणे ही निर्जीव व अर्धसजीव वनस्पतींमधील देवाणघेवाण प्रक्रिया होय. याचा अर्थ सजीव व निर्जीव हे दोन्ही प्रकारच्या पदार्थांना पुनर्निर्माण, परिवर्तन व देवाणघेवाण या तिन्ही प्रक्रियांतून जावे लागते. या तिन्ही प्रक्रियांचे सुद्धा एक चक्र बनले आहे व या चक्रापासून कोणताही पदार्थ मुक्त नाही मग माणसाने जीवनचक्र प्रक्रियेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी किंवा या चक्रातून मुक्ती मिळविण्यासाठी महान परमेश्वराची (चैतन्यशक्तीची) कितीही प्रार्थना केली तरी काही फरक पडत नाही. विज्ञान व धर्मातील हाच तर मोठा फरक आहे.

निसर्ग चक्र व निसर्ग नियम यांच्या वर कोणत्याही पदार्थाचे नियंत्रण नाही. निसर्गाने फक्त माणूस हाच असा प्राणी घडवलाय की तो त्याच्या बुद्धीने (बौध्दिक शहाणपणाने) या निसर्ग चक्राचे व निसर्ग नियमांचे योग्य किंवा त्याला सोयीस्कर असे व्यवस्थापन करू शकतो. माणसाने त्याच्या बौद्धिक शहाणपणाच्या जोरावर पृथ्वीवरील निसर्गसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण केले आहे ज्या मर्यादित राज्याचा तो मर्यादित राजा झाला आहे व हे राजेपण तो निसर्गाच्या परवानगीने मिरवतो. या मर्यादित राज्याचे कायदे मानवाने स्वतःच्या सोयीसाठी खास बनवले व मग कायद्याचे राज्य असे या राज्याचे नामकरण केले. पण मानवनिर्मित कायदे हे निसर्ग नियमांना म्हणजे निसर्ग कायद्याला बांधील आहेत ही गोष्ट विसरता कामा नये.

निसर्गाचे पदार्थीय विश्व, या विश्वाची हालचाल निसर्ग नियमांनी बनलेल्या ज्या निसर्ग व्यवस्थेने होते ती निसर्ग व्यवस्था या सर्व गोष्टींचे ज्ञान तेच विज्ञान. निसर्ग विशाल तसे त्याचे निसर्ग विज्ञानही विशाल. पुनर्निर्माण व त्याबरोबर परिवर्तन, देवाणघेवाण या प्रक्रियांतून निसर्गातील पदार्थ विश्वाची होणारी हालचाल कधीकधी मानवी मनाला रटाळ वाटते. तेच ते पदार्थ, तीच तीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा पाहून मानवी मनाला निसर्गाचा व मानवी आयुष्याचा कंटाळा येऊ शकतो. कारण काही काळानंतर त्यातले नाविन्य संपल्याने त्यातील उत्सुकता, रस संपून जातो. काही माणसे तर असा रस संपल्याने नैराश्येत जाऊन आत्महत्या करतात तर काही माणसे विरक्ती येऊन संन्यास घेतात. पण शहाणा माणूस नैराश्य व संन्यास या दोन्ही गोष्टींना जवळ करणार नाही. त्यासाठी तो सुज्ञ विचार करेल की शेवटी निसर्ग तरी करून करून काय करील? त्याच्याकडील मूलभूत कच्चा माल जर कायम तोच राहणार असेल तर त्यातून तो किती नवीन नवीन पदार्थ बनवत राहणार? तसेच निसर्ग नियम व निसर्ग व्यवस्थेत तरी तो काय आणि किती बदल करणार? अर्थात निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत. मग त्याच्याकडून माणसाने जास्त अपेक्षा करणे चुकीचे नव्हे काय? तेव्हा निसर्गाकडून आपल्या अपेक्षा कमी करा, मागण्या कमी करा, निसर्गाचे पर्यावरण बिघडवू नका व नैसर्गिक दुःखातही नैसर्गिक आनंद शोधून आनंदात जीवन जगा. निसर्गालाही त्याच्या मर्यादा आहेत हेच निसर्ग आपल्याला शिकवतोय.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.६.२०२४

शुक्रवार, ७ जून, २०२४

केमिकल लोचा २

आपल्या बुद्धीला निसर्गाच्या संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास करणे झेपत नसेल तर निदान आपण ज्या मानव समाजात राहतो त्या समाजातील माणसे खून, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, आत्महत्या का करतात, विरक्त होऊन संन्यास का घेतात, देवभोळेपणात वैज्ञानिक चुका का करतात, त्यांच्या मेंदूत असे चुकीचे वर्तन करताना कोणते रासायनिक असंतुलन (केमिकल लोचा) होते, या कारणांची कारणमीमांसा करीत राहून समाजाला काही अभ्यासू मार्गदर्शन करता येईल का हे पाहिले पाहिजे! -ॲड.बी.एस.मोरे

केमिकल लोचा!

आपल्या बुद्धीला निसर्गाच्या संपूर्ण विज्ञानाचा अभ्यास करणे झेपत नसेल तर निदान आपण ज्या मानव समाजात राहतो त्या समाजातील माणसे खून, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यभिचार, आत्महत्या का करतात, विरक्त होऊन संन्यास का घेतात, देवभोळेपणात वैज्ञानिक चुका का करतात, त्यांच्या मेंदूत असे चुकीचे वर्तन करताना कोणते रासायनिक असंतुलन (केमिकल लोचा) होते, या कारणांची कारणमीमांसा करीत राहून समाजाला काही अभ्यासू मार्गदर्शन करता येईल का हे पाहिले पाहिजे! -ॲड.बी.एस.मोरे

गुरुवार, ६ जून, २०२४

परिवर्तन!

परिवर्तन!

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जसजसे माणसाचे वय वाढत जाते तसतसा हा नियम पदोपदी अनुभव देत राहतो. या निसर्ग नियमानुसार सळसळत्या तारूण्याच्या घोड्यावर आरूढ झालेली तरूण पिढी प्रगल्भ ज्ञान व परिपक्व अनुभव गाठीशी असलेल्या जुन्या जाणत्या पिढीचा पाणउतारा करायला मागेपुढे पहात नाही. जोश आहे पण होश नाही या तारूण्यावस्थेचा हा परिणाम असतो. वय जसजसे वाढत जाते तसतशी कालची आपली माणसे आज आपली रहात नाहीत. अगदी सहज हालचाल करणारे आपले कालचे शरीर आज कुरकुर करायला लागते. थोडक्यात कालचा भूतकाळ आजचा वर्तमानकाळ रहात नाही. अशा बदललेल्या परिस्थितीत बदललेल्या लोकांच्या पाठीमागे लागणे आणि बदललेल्या शरीराला बळेच ओढून ताणून कठीण व्यायाम करायला भाग पाडणे म्हणजे निसर्ग नियमाच्या विरोधी वागणे व त्यातून स्वतःला स्वतःच्या हट्टाने त्रास करून घेणे होय. थोडक्यात काय तर ता म्हणता ताक ओळखावे आणि पळत्याच्या पाठीमागे धावणे सोडून द्यावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.६.२०२४

बुधवार, ५ जून, २०२४

मला कळलेले अध्यात्म!

शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे, कारण परमात्मा अमर आहे, हे मला कळलेले अध्यात्म!

माझ्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून  निसर्ग किंवा विश्व हे परमात्म्याचे म्हणजे विश्वातील चैतन्यशक्तीचे प्रचंड मोठे पदार्थीय शरीर आहे. या विशाल शरीरातील अलौकिक चैतन्यशक्ती कधीही नष्ट होत नाही. मात्र ही शक्ती परिवर्तनशील असल्याने पदार्थीय निसर्ग किंवा विश्वातील विविध पदार्थांच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ती परिवर्तीत होत राहते व त्यानुसार निसर्ग/विश्वातील विविध पदार्थ उत्पत्ती, अस्तित्व व लय (सजीव पदार्थांसाठी जन्म, जीवन व मृत्यू) या तीन अवस्थांना पार करीत परिवर्तन चक्रात सतत फिरत राहतात. परमात्म्याच्या आध्यात्मिक ध्यानधारणेने किंवा भक्ती प्रार्थनेने या परिवर्तन चक्रातून माणसासह कोणत्याही पदार्थाला मुक्ती मिळत नाही हे माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे. परमात्म्याच्या निसर्ग विज्ञानाला मुळात असली मुक्ती मान्यच नाही असे माझे मत आहे. निसर्गातील हा परमात्मा किंवा ही चैतन्यशक्ती निसर्गातील विविध पदार्थांना परिवर्तन चक्रातून सतत फिरवत राहते. या चैतन्यशक्तीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी परमात्मा असे म्हणतो. निसर्गातील किंवा विश्वातील या चैतन्यशक्तीची अनुभूती म्हणजे अमर परमात्म्याची अनुभूती असे माझे वैयक्तिक मत आहे. तसेच या चैतन्यशक्तीला (परमात्म्याला) मन व बुद्धी असावी जी स्वयंभू असावी कारण मन व बुद्धी नसलेल्या चैतन्य शक्तीकडून (परमात्म्याकडून) विश्व किंवा निसर्ग सृष्टीची रचना होऊच शकली नसती. पण माझा हा तर्कावर आधारित गृहीत अंदाज आहे ज्याला कोणताही ठोस असा वैज्ञानिक पुरावा नाही.

मनुष्य जन्म घेतो म्हणजे परमात्मा सूक्ष्म स्वरूपात मनुष्य शरीर धारण करतो व त्या शरीराला निसर्ग किंवा विश्व रचनेचे फळ भोगायला भाग पाडतो. हे फळ किती गोड व किती कडू असेल हे मानवी मेंदूमन व मेंदूबुद्धीच्या बऱ्यावाईट कर्मावरच अवलंबून नव्हे तर काही अंशी तरी परमात्म्याच्या (चैतन्यशक्तीच्या) अनाकलनीय निर्णयावर (ज्याला नियती, प्रारब्ध, नशीब असे म्हणता येईल) अवलंबून असावे असे मला वाटते. पण असे मानणे हे परमात्मा (चैतन्यशक्ती) ला स्वयंभू मन व बुद्धी असावी या माझ्या तार्किक अंदाजावर आधारित आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. अंदाजाने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक असतोच.

मनुष्यच काय पण इतर कोणत्याही सजीव पदार्थातील सूक्ष्म स्वरूपी परमात्म्याला (चैतन्यशक्तीला) त्या सजीव पदार्थाचा आत्मा असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मी तर असे म्हणेल की निसर्ग/विश्वातील परमात्मा (चैतन्यशक्ती) सर्वच पदार्थांत निवास करून असल्याने सर्व सजीव व निर्जीव पदार्थांत आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. पण सजीव पदार्थाला त्याच्या जिवंतपणाची जाणीव असल्याने तो पदार्थ त्याच्या जीवनात निसर्ग/विश्व रचनेचे जे बरेवाईट फळ भोगतो त्याची जाणीव त्या सजीव पदार्थाला त्याच्या मृत्यूपर्यंत होत राहते.

एक अतिशय वासना/भावनाप्रधान व अतिशय बुद्धिमान सजीव पदार्थ म्हणून माणूस त्याच्या जीवनात जन्म ते मृत्यू दरम्यान निसर्ग/विश्व रचनेचे जे बरेवाईट फळ भोगतो ते फळ खरं तर त्याच्या शरीरातील आत्मा (सूक्ष्म चैतन्यशक्ती) भोगत असतो. असे फळ भोगताना मानवी शरीरात असलेल्या परिवर्तनशील आत्म्याच्या सोबतीला शरीराचा राजा म्हणजे मेंदू असतो ज्यात जैविक वासना व उदात्त भावना (वासना-भावना) असलेले मेंदूमन व वासना-भावना यांच्यात संतुलन साधणारी मेंदूबुद्धी असते. म्हणजे मनुष्य शरीरात मन, बुद्धी व आत्मा (दिल, दिमाग और आत्मा) अशा तीन गोष्टी एकत्र नांदत असतात.

माणसाकडून कोणतेही काम किंवा कोणतीही कृती परमात्म्याच्या (चैतन्यशक्तीच्या) सृष्टी रचनेनुसार व सृष्टी कायद्यानुसार (विज्ञानानुसार) व्यवस्थित, नीट होण्यासाठी मानवी मेंदूच्या मेंदूमन व मेंदूबुद्धी या दोन भागांत सतत समन्वय, एकवाक्यता असणे व त्यासाठी मेंदूतील मन व बुद्धी हे दोन भाग सतत एकजीव, एकसंध, एकात्म असणे आवश्यक असते. जर मेंदूतील मन व बुद्धी हे दोन भाग एकमेकांपासून अलग, विलग किंवा विभाजित झाले तर माणसाची मनःस्थिती द्विधा होते. मन व बुद्धीचे हे विभाजन जास्त झाले तर माणूस दुभंगलेल्या मनःस्थितीचा शिकार होतो. अशा विमनस्क मानसिक अवस्थेतला मनुष्य चुकीचे वर्तन करतो.

मानवी शरीरातील आत्मा मानवी शरीराला सोडून जातो तेव्हा मानवी शरीर त्यातील मेंदूच्या मेंदूमन व मेंदूबुद्धी या दोन भागांसह मृत होते. यालाच तर माणसाचा मृत्यू असे म्हणतात. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे, कारण परमात्मा अमर आहे, हे मला उतार वयात कळलेले अध्यात्म आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.६.२०२४