मर्यादेच्या नैतिक अध्यात्मात स्वर्ग दडलाय!
माझ्या आतापर्यंतच्या अभ्यास व निरीक्षणानुसार लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता ही मानवी स्वार्थाला अतिरेकी बनवून त्या स्वार्थाला अगदी खालच्या नीच पातळीवर घेऊन जाणारी तीन प्रमुख स्वार्थकारणे होत व अहंकार, क्रोध व हिंसा ही या तीन कारणांच्या अतिरेकाची तीन प्रमुख लक्षणे होत.
माझ्या मते, लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता या तीन स्वार्थकारणांना स्वयंस्फूर्तीने मर्यादेत ठेवण्याचा मानवी मनाचा उदात्त ध्यास व प्रयत्न हेच मर्यादेचे नैतिक अध्यात्म होय. मर्यादेचे हे नैतिक अध्यात्म यशस्वी करणे महाकठीण काम आहे व हे काम सर्व माणसांना शक्य होत नाही.
सर्वसाधारण माणूस लैंगिक वासना, आर्थिक संपत्ती व राजकीय सत्ता या तीन प्रमुख स्वार्थकारणांच्या आहारी जाऊन अहंकार, क्रोध व हिंसा या तीन लक्षणांचा शिकार बनतो. तो तसा बनताना स्वतःबरोबर इतरांना उपद्रव करतो. म्हणून मग या तीन लक्षणांना शिक्षेची भीती दाखवून धाकात ठेवणारा धाक बंधन कायदा मानव समाजाला आवश्यक वाटतो. अर्थात मर्यादेचे नैतिक अध्यात्म व्यापक प्रमाणावर समाजात यशस्वी झाले असते तर समाजाला धाक बंधन कायद्याची गरजच भासली नसती.
मर्यादेचे नैतिक अध्यात्म समाजात जेवढे व्यापक प्रमाणावर यशस्वी होत जाईल तेवढ्या प्रमाणात मानव समाजात मायाप्रेम, करूणा, औदार्य या तीन प्रमुख उदात्त भावना फुलत जातील व त्यातून मानव समाज जगण्यासाठी एक स्वर्ग होईल. याचा अर्थ हाच की मर्यादेच्या नैतिक अध्यात्मात स्वर्ग दडलाय.
-©ॲड.बी.एस.मोरे, ४.६.२०२४