कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच!
कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा कुत्र्याचे शेपूट शेवटी वाकडे ते वाकडेच. निसर्गाची व समाजाची एकंदरीत व्यवस्था ही कुत्र्याच्या वाकड्या शेपटासारखी आहे. या वाकड्या शेपटाला सरळ करण्याचा खुळा नाद करणे म्हणजे मंत्रचळाचा (ओसीडी) मानसिक आजार मागे लावून घेणे.
कितीही उच्च शिक्षण घ्या शेवटी मूठभर धनदांडग्या लोकांची गुलामी करीत राहण्याशिवाय पर्यायच नसतो सुशिक्षितांपुढे. निसर्गाच्या जंगली व्यवस्थेत बळी तो कानपिळी या नियमाने जसा हरणांसारख्या अशक्त प्राण्यांना वाघ, सिंहासारख्या सशक्त प्राण्यांपुढे शरणागत होऊन बलिदान देण्याशिवाय पर्याय नसतो तसा मानवनिर्मित तथाकथित नागरी सुसंस्कृत सामाजिक व्यवस्थेत सुद्धा मूठभर धनदांडग्यांची गुलामगिरी करण्याशिवाय सुशिक्षितांपुढे पर्याय नसतो. सुशिक्षितांची ही हालत मग अशिक्षित, अर्धशिक्षित बिच्चाऱ्या गरीब कामगार, कर्मचाऱ्यांची हालत तर विचारूच नका.
समाजात श्रीमंत भांडवलदार किती तर मूठभर. पण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा यांच्या पाठीमागे नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. नोकऱ्याच काय पण छोटे छोटे व्यवसाय, उद्योगधंदे यासाठी सुद्धा बड्या भांडवलदार लोकांवर अवलंबून रहावे लागते. गरीब अशिक्षित, अर्धशिक्षित माणसे तर या भांडवलदार लोकांची कायम गुलाम असतात. संसारासाठी पैसा कमी पडला की मग या भांडवलदार मंडळींतून तयार झालेल्या सावकार मंडळींना अव्वाच्या सव्वा व्याज देऊन कर्ज उचलावे लागते व पुढे कर्जफेडीच्या चक्रात खिचपत पडावे लागते. असले सावकारी कर्ज फेडता येईना म्हणून काही हतबल लोक निराश होऊन आत्महत्या सुद्धा करतात. एवढे हे पैशाच्या भांडवलावर आधारित असलेले दुष्ट चक्र भयंकर आहे.
आपली तथाकथित नागरी सुसंस्कृत समाज व्यवस्था मूठभर लोकांच्या या असल्या कंपूगिरी व मक्तेदारी वर आधारित आहे. ही कंपूगिरी व मक्तेदारी फक्त आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही आहे. या आर्थिक व राजकीय कंपू व मक्तेदार लोकांनी शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांत सुद्धा शिरकाव केला आहे व ही दोन्ही पवित्र क्षेत्रेही भ्रष्ट करण्यास सुरूवात केली आहे. खरं तर यांची ही कंपूगिरी व मक्तेदारी हाच मानवी जगातील मोठा भ्रष्टाचार आहे. या मोठ्या भ्रष्टाचाराच्या आडोशाला राहून छोट्या छोट्या भ्रष्टाचारांचे जाळे समाजात निर्माण झाले आहे.
अशा निर्ढावलेल्या भ्रष्ट व्यवस्थेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदाच काय पण कोणताही कायदा या कंपूंचे व मक्तेदारांचे काही वाकडे करू शकत नाही. या भ्रष्ट कंपूंना व मक्तेदारांना अधोविश्वातून दहशतवादी मदत करायला मूठभर गुंडपुंड असतातच यांच्या साथीला. साथी हात बढाना?या लोकांवर कायद्याचा अंकुश ठेवून त्यांना वठणीवर आणण्याच्या मार्गात न्याययंत्रणेलाही तिच्या मर्यादा आहेत. शेवटी प्रशासकीय कामकाज राज्यघटनेच्या चौकटीत (काॕन्स्टिट्युशन'स बेसिक स्ट्रक्चर) चाललेय का एवढेच न्याययंत्रणा बघणार. पण या मूलभूत चौकटीच्या बाहेरही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर सक्त नजर, कठोर नियंत्रण ठेवणे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या न्याययंत्रणेला फार कठीण आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२४