विश्वचैतन्य म्हणजेच परमेश्वर का?
पदार्थातील (मॕटर) अणुकणांचा समुच्चय/संच जागा व्यापतो त्याला त्या पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) म्हणतात आणि अणुकणांच्या या वस्तुमानाला गती देऊन हालचाल करायला भाग पाडणारी जी क्षमता त्या पदार्थात असते त्या क्षमतेला त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) म्हणतात. अर्थात पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) व पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) मिळून पदार्थ (मॕटर) बनतो.
मनुष्य प्राणी (लिविंग मॕटर) हा अनेक जीवपेशींनी बनलेला मांसाचा गोळा आहे. हा गोळा म्हणजे शरीर (लिविंग मटेरियल स्टफ/मास) होय. पण या शरीरात उर्जा/शक्तीच (लिविंग एनर्जी) नसेल तर मानवी शरीराची हालचालच होऊ शकणार नाही. मानवी शरीरातील ही जिवंत उर्जा/शक्ती म्हणजे जिवंत चैतन्य होय. या जिवंत चैतन्यालाच आत्मा असे म्हणतात. आत्मा म्हणजे मन नव्हे. मन हे फक्त मेंदूत (एक मांसल अवयव) असते. पण चैतन्यमय आत्मा हा संपूर्ण शरीरभर असतो. हा आत्मा (चैतन्य) जिवंत शरीरातून निघून गेला की जिवंत शरीर मृत होते. अर्थात आत्मा हा मनापेक्षा मोठा असतो. त्याचा निवास मानवी मनातही (मेंदूत) असतो. मनातील या आत्मिक चैतन्यशक्तीलाच मनःशक्ती असे म्हणतात. मनःशक्ती हा शरीरातील चैतन्यशक्तीचा एक छोटासा भाग असतो.
पदार्थ सजीव असो की निर्जीव, त्या पदार्थात जर उर्जा/शक्ती नसेल तर त्या पदार्थाला काही अर्थ नसतो. सजीव शरीरातील उर्जा/शक्तीला आत्मा तर निर्जीव पदार्थातील उर्जा/शक्तीला फक्त उर्जा/शक्ती असे म्हणता येईल. सजीव शरीरातील चैतन्यशक्ती (आत्मा) निघून गेली तर खाली राहिलेल्या मृत शरीराला काही अर्थ रहात नाही. म्हणून मृत मानवी शरीराची आपआपल्या धर्म संस्कृती नुसार विल्हेवाट लावतात.
विश्वाला एक प्रचंड मोठा पदार्थ (जायंट मॕटर) मानले तर त्यातील पदार्थीय अणुकणांच्या वस्तुमानाला (जायंट मास) हलवण्यासाठी प्रचंड मोठी उर्जा/शक्ती अर्थात महाशक्ती (जायंट एनर्जी) विश्वरूपी पदार्थात असल्याशिवाय विश्वाची हालचाल होऊच शकत नाही.
पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थातील उर्जा/ शक्ती (एनर्जी) या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. मास व एनर्जी या दोघांत कोण कोणाला भारी हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. कारण एनर्जी ही अणुमासाला गतीमान करणारी प्रचंड मोठी क्षमता आहे. मग महाप्रचंड ताकदीच्या विश्वातील महाशक्तीलाच परमेश्वर मानावे का? महाशक्तीमान विश्व चैतन्य म्हणजेच महान परमेश्वर (चैतन्यप्रभू) का? हे प्रश्न मानवी मनात निर्माण होतात. खरं तर विश्व रूपी पदार्थ व त्यातील एकूण उर्जा/ शक्ती कायम स्थिर आहे. त्यात बदल होत नाही. परिवर्तनीय बदल होतोय तो विश्व पदार्थातील अणुमासाच्या वस्तुमानात. तसेच संपूर्ण भौतिक विश्वाची परिवर्तनशील भौतिक हालचाल ही निसर्ग नियमांनी म्हणा नाहीतर विश्व नियमांनी म्हणा स्थिर आहे. अस्थिर आहे ते मानवी मन!
-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४