शुभ मंगल सावधान!
अरे बेटा, नको वाटतंय रे तुझ्यासाठी आॕनलाईन जोडीदार शोधायला. ही आॕनलाईन जोडीदार शोधायची प्रक्रिया खूपच कठीण वाटतेय मला. ही आॕनलाईन वधूवर मंडळे अनुरूप जोडीदार शोधून देऊन हा जोडीदार तुम्हाला मॕच होतोय असे सांगतात आणि त्या मॕच जोडीदाराबरोबर बोलायला परवानगी द्या म्हटले की लगेच आॕनलाईन पैसे भरा म्हणतात. बेटा, मी तुझ्यासाठी आज दोन तीन मुली पसंत करून त्यांना लगेच फोन लावायचा प्रयत्न केला तर मला त्या आॕनलाईन वधूवर सूचक मंडळाचा मध्यस्थ मध्येच येऊन ताबडतोब पैसे भरा म्हणाला. अरे बेटा, मी पण गरीब आणि तू पण गरीब. मग काय माझ्याकडे पैसे नाहीत आणि बेटा तुझ्याकडेही पैसे नाहीत. आपण काय करणार? आणि तसेही आपण गरीब लोकांनी का म्हणून असे पैसे द्यावेत या मध्यस्थ विवाह संस्थांना? आॕनलाईन पैसे भरून पुढची गॕरंटी काय? ते पैसे फुकट गेले तर? ही मंडळे त्यांच्या विवाह संस्थेची जाहिरात मात्र फुकट करतात आणि नंतर हळूहळू पैसे उकळायला सुरूवात करतात. बेटा, तुझ्यासाठी मी काही आॕनलाईन विवाह संस्थेत फुकटात नोंदणी केली. त्यांना माझा ईमेल आय.डी. दिला. मग तुझे ते आॕनलाईन प्रोफाईल आवडले म्हणून मला वधूवर मंडळांमधील काही मुलींकडून ईमेल आले. पण मुलींनी पाठवलेल्या लिंकवर गेलो की लगेच प्रोफाईल प्रिमियम अपग्रेड करा व साधारण १५०० रू. एवढी रक्कम आॕनलाईन भरून मुलीशी अमूक अमूक काळ साधारण फक्त १० मिनिटे बोला असे मेसेज आले. खरंच हे सगळे माझ्या डोक्यावरून चाललेय बघ. बेटा, हल्ली काळ फार बिकट आलाय बघ. प्रत्यक्ष नोंदणी करणारी काही वधूवर सूचक मंडळे आहेत पण तीही ५०० रू. पासून ते ३००० रूपयापर्यंत नोंदणी फी मागतात. तिचा काळही मर्यादित एक वर्षासाठी असतो. त्या एक वर्षात लग्न नाही जमले तर पुन्हा नवीन नोंदणी फी भरा. तिथे त्यांच्या फाईल्समध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती ठासून भरलेली असते. पण बेटा, आॕनलाईन नोंदणी असो नाहीतर प्रत्यक्ष नोंदणी, ही वधूवर सूचक मंडळे या सामाजिक संस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्याही फुकट समाजसेवेची अपेक्षा करू नकोस. लग्नाचा बाजार मांडलाय यांनी व विवाह हा पैसे कमावण्याचा धंदा केलाय यांनी. हल्लीची तरूण मुले मुली यांच्या जाळ्यात कशी सापडलीत हेच कळेनासे झालेय. मला खूप वाईट वाटते याचे. पण हल्लीच्या या तरूण पिढीला तरी माझे म्हणणे काय पटणार? कारण आम्ही जुनाट वळणाची माणसे. आणि आमच्या जुनाट गोष्टी म्हणजे आम्हाला फुकटात नातेवाईकच मध्यस्थ बनून लग्न जमवायला मदत करायचे. आमचे आईवडीलही पदराला पदर लागतोय का याची काळजी घ्यायचे. पण खरंच जुनाट वळणाच्या आमचे संसार या जुनाट वळणावरच व्यवस्थित पार पडले ही गोष्ट खरी आहे. तरीही आम्ही नवीन पिढीला जुनाट वाटतो. मग फसतात बिच्चारे आणि भोगतात फळे. पण याला काही चांगल्या विवाह संस्था व काही चाणाक्ष मुलेमुली अपवाद आहेत बरं का! पण हे अपवाद सोडले तर बेटा आयुष्याची धूळवड केलीय बघ या विवाह संस्थांनी व त्यांच्या नादी लागलेल्या हल्लीच्या मुलामुलींनी!
-©ॲड.बी.एस.मोरे, धूळवड, २५.३.२०२४,