https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १३ मार्च, २०२४

कसे आहात, एकदम मस्त!

कसे आहात, एकदम मजेत!

कसे आहात या लोकांच्या प्रश्नाला "एकदम मजेत" असेच उत्तर द्यायचे ठरवलेय. स्वतःचे दुःख दुसऱ्यांना सांगितल्याने हलके होते असा माझा गैरसमज होता. तो फार उशिरा दूर झाला. स्वतःचे दुःख दुसऱ्यांना सांगितल्याने ते हलके होण्याऐवजी जड होते हा माझा जिवंत अनुभव. याचे कारण हेच की काही अपवाद सोडले तर असल्या फुकटच्या चौकशा करणाऱ्या लोकांचा दुःखात काही उपयोग तर होत नाहीच पण हे लोक सतराशे साठ फुकटचे सल्ले देऊन डोक्याला ताप करतात.

आपला आनंद शेअर करून बघा. तो किती लोकांकडून सगळीकडे शेअर केला जातोय हे जरा बघा आणि मग आपले दुःख शेअर करून बघा. त्यात तिखट, मीठ, लसूण, मसाला घालून ते दुःख लोकांकडून गावभर फिरवले जाईल. लोकांना इतरांच्या चटपटीत गोष्टी विशेष करून इतरांची भांडणे, इतरांचे दुःख ऐकण्यात/वाचण्यात भयंकर रस असतो.

कॉलेजात असताना एका मित्राने मला सहज एक चांगला सल्ला दिला होता. तो सल्ला म्हणजे कोणी "हाऊ आर यू" असा प्रश्न विचारला की त्याला "बेटर दॕन यू" असे उत्तर द्यायचे. म्हणजे "तू कसा आहेस" या प्रश्नाला "तुझ्यापेक्षा सुखी" असे उत्तर द्यायचे. मित्राच्या या सल्ल्याचा अर्थ मला त्यावेळी नीट कळला नाही पण आता अनेक अनुभवांतून तो नीट कळलाय.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.३.२०२४

किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य माणसांचे जीवन, किड्या मुंग्यांचे जीवन!

सर्वसामान्य लोकांनी थोडे अंतर्मुख होऊन स्वतःचा विचार करावा. काय करतोय आपण आयुष्यात याचे थोडे तरी मनन, चिंतन करावे. देवाच्या ध्यानधारणेपेक्षा वास्तव जीवनाचे हे मनन, चिंतन फार महत्त्वाचे आहे. या मनन, चिंतनात जगाच्या एकूण संपत्तीत लाखो, करोडो सर्वसामान्य लोकांचे भागभांडवल किती हे नीट समजून घ्यावे व मग मोठमोठ्या गोष्टींच्या हवेतील गप्पा माराव्यात.

खरं तर गरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना लहानपणापासून मर्मभेदी शिक्षण मिळतच नाही. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत गोल गोल फिरवत एवढा काही मसाला शिकवला जातो की विचारू नका. पण त्या ढीगभर मसाल्यात मर्मातल्या मूळ गोष्टी किती असतात? सर्वसामान्यांच्या मुलांना सुरूवातीपासूनच या गोष्टी शिकवल्या जात नाहीत कारण काय तर म्हणे बालबुद्धीला त्या झेपणार नाहीत? मग मोठ्या भांडवलदार व पॉवरफुल राजकारण्यांच्या मुलांना लहानपणापासूनच घरात बाळकडू दिले जाते ते मोठ्यांच्या त्या मुलांना कसे झेपते? ही मोठ्यांची मुले फक्त नावाला शाळा, कॉलेजात जातात. खरे शिक्षण त्यांना घरातूनच मिळत असते.

आयुष्यातील छोट्या गोष्टी कोणत्या व मोठ्या गोष्टी कोणत्या हे समजून घेऊन छोट्या गोष्टींना कमी वेळ व कमी शक्ती आणि मोठ्या गोष्टींना जास्त वेळ व जास्त शक्ती दिली गेली पाहिजे हे सर्वसामान्यांना कधी कळते? छोट्या गोष्टींतच आयुष्याचा मोठा काळ व मोठी शक्ती वाया घालवल्यावर म्हातारपणी हे कळते. पण तोपर्यंत आयुष्यातील अमूल्य वेळ टळून गेलेली असते.

जगातील मोठया गोष्टी ठराविक मोठ्या लोकांच्या ताब्यात का आहेत व त्या त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या कोणत्या ताकदीवर चालू राहिल्यात यातील वास्तव कधी समजून घेणार सर्वसामान्य माणसे? सर्वसामान्य माणसांना कायम छोट्या गोष्टींतच गुंतवून ठेवून मोठ्या गोष्टींचा विचार करण्याची सुद्धा संधी मिळू द्यायची नाही हा तर मोठ्यांचा मोठा गेम आहे जो पिढ्यानपिढ्या चालू आहे.

सर्वसामान्य माणसे म्हणजे मोठ्या लोकांच्या मोठ्या व्यवहारांत प्रत्यक्ष भाग न घेता त्यांचा फक्त हिशोब ठेवणारी हिशोबनीस माणसे. बँकेत रोखपाल (कॕशियर) काय करतो तर लोकांच्या नुसत्या नोटा मोजतो. पण त्या नोटांचा मालक तो असतो का? या नोटांतील मोठ्या गठ्ठ्याचे खरे मालक कोण असतात तर मोठे भांडवलदार व मोठे राजकारणी असतात. या रोखपालाला नोटा मोजण्याच्या कामाचा मासिक पगार किती दिला जातो? चिल्लर पगार असतो तो. कारण त्या नोटांमागील मोठ्या व्यवहारांत त्या रोखपालाचा सहभाग नसतो. नव्हे तशी संधीच त्याला मिळू दिली जात नाही. सर्वसामान्य गरिबांच्या उच्च शिक्षित मुलांच्या तोंडावर पैशाचे असे छोटे छोटे तुकडे फेकले जाऊन त्यांना मिंधे केले जाते, गुलाम केले जाते. गुलामगिरीचा घाऊक बाजार भरला आहे जगात मग ते भांडवलशाही देश असोत की साम्यवादी देश असोत.

ब्रिटिश लोकांची शिक्षण व्यवस्था ही भारतीयांना ब्रिटिशांचे गुलाम बनविण्याची शिक्षण व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर या व्यवस्थेत काही बदल झालाय का? कसला बदल आणि कसला विकास आणि कोणाचा विकास? मूठभर श्रीमंत भांडवलदारांचा विकास? का झाले सर्वसामान्य गरिबांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण महाग? गुलामगिरीच्या मानसिकतेतून, किड्या मुंग्यांच्या जीवनातून सर्वसामान्य माणसांना बाहेर काढणारे मर्मभेदी शिक्षण लहानपणापासून सर्वसामान्यांच्या मुलांना देण्याची मूलभूत गरज आहे. भारतीय राज्यघटनेनुसार हा शिक्षण हक्क सर्वसामान्य भारतीयांचा मूलभूत हक्क आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.३.२०२४

मंगळवार, १२ मार्च, २०२४

लग्ने जमवताना सावधान!

लग्ने जमवताना सावधान!

समाजमाध्यम बंद करण्यापूर्वी एक नमुना हाही वाचा. आमच्या शेजारी एका सोसायटीत घडलेली लग्नाची ही सत्य घटना. हिंदू मराठा मुलगी दिसायला गोरी, गोमटी छान, सुंदर. शिक्षण बी.काॕम. खाजगी कंपनीत अकौंटंटची नोकरी महिना ३०००० रूपये पगार. तिच्या आईवडिलांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या मार्फत एल.आय.सी. सरकारी कंपनीतला एम.काॕम. शिकलेला व महिना ५०००० रू. पगारवाला नवरा मुलगा मुंबईत बघितला. पण मुलगी सहा महिनेही तिथे नांदली नाही. नवरा फारच कंजूष आहे हे कारण घेऊन आईवडिलांकडे परत आली व घटस्फोट घेऊन रिकामी झाली. तिचे आईवडील त्या नातेवाईकाला आता सारख्या शिव्या देत आहेत की त्याच्यामुळेच त्यांच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाले. 

मग ती घटस्फोटित मुलगी एक वर्ष घरी बसल्यावर तिच्या आईने तिच्या ओळखीच्या मैत्रिणी मार्फत एक घटस्फोटित मुलगा बघितला. तो पण एम.एस्सी. व चांगल्या खाजगी कंपनीत महिना ६०००० रूपये पगारवाला होता. मग घटस्फोटित मुलीच्या आईने या घटस्फोटित मुलाबरोबर आपल्या घटस्फोटित मुलीचे दुसरे लग्न लावले. ही मुलगी त्या दुसऱ्या नवऱ्या बरोबर चांगली दीड वर्षे नांदली. त्या काळात त्यांना एक मूल झाले (मुलगा). मात्र पुढे त्या नवरा बायकोची काही घरगुती कारणांवरून भांडणे होऊ लागली आणि एके दिवशी ती मुलगी त्या बाळाला घेऊन आईवडिलांच्या घरी परत आली ती कायमचीच. आता तिने दुसऱ्या घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केलाय. आणि त्या मुलीची आई तिच्या त्या मैत्रिणीला येता जाता सारखी शिव्या देत असते की त्या मैत्रिणी मुळेच तिच्या मुलीचे वाटोळे झाले.

आजूबाजूला अशा घटना घडताना बघून लोक सावध झालेत. माझ्या पुतण्याचा बायोडाटा आमच्याच सोसायटीतील दोघांकडे मी जेव्हा दिला तेव्हा त्यानी मला रिस्पेक्ट देण्यासाठी तो त्यांच्याकडे घेतला पण शेवटी हात झटकून मला वधूवर सूचक मंडळ बघा असा सल्ला दिला. हल्ली लोक इतरांची लग्ने जमवायला घाबरतात. कारण चांगले झाले तर आमच्या नशिबाने आणि वाईट झाले तर तुमच्यामुळे असाच लोकांचा पवित्रा असतो. 

गंमत ही की, वरील सत्य घटनेतील मुलीची आई फार देवभक्त. तिने मुलीच्या दोन्ही लग्नाच्या वेळी तिची सगळी कुलदैवते, ग्रामदैवते व इष्ट दैवते गोळा केली होती. पण या  सगळ्या देवदेवतांनी तिच्या मुलीच्या संसारावरून दोन वेळा चांगला नांगर फिरवला. म्हणून मी कधीही जास्त देवदेव करीत नाही. 

आमच्या घरातील देव्हाऱ्यात माझ्या व माझ्या बायकोच्या कोणत्याही कुलदैवताला व ग्रामदैवताला स्थान नाही. कारण मी काय किंवा माझी मुलगी काय आम्ही खूप मेहनतीने शिक्षण घेत असताना, स्वकर्तुत्वावर व्यवसाय, नोकरी करीत असताना व जीवनात आडव्या येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करीत असताना यातील कोणतेही देव आम्ही जवळ केले नव्हते. साडे नाही, ढवळस नाही की कुर्डु नाही आणि तिथले कोणतेही कुलदैवत किंवा ग्रामदैवत आमच्या घरात आम्ही जवळ केले नाहीत. अहो, लग्नातील सत्यनारायण पूजा सोडून नंतर कधी साधी सत्यनारायण पूजा मी माझ्या घरात घातली नाही. इतकी घरे बदललीत मी की प्रत्येक ठिकाणी सत्यनारायण पूजा घालीत बसलो असतो तर अनेक पूजा कराव्या लागल्या असत्या. मी कधीही श्रावण पाळत नाही की  गेल्या ३९ वर्षाच्या संसारात आम्ही कधी आमच्या घरात श्रावणातील सत्यनारायण पूजा घातली.

आमच्या घरात, देव्हाऱ्यात काही मुख्य देव आहेत ते म्हणजे गणपती, ब्रम्हा, विष्णू, महेशाचा एकावतार गुरूदेव दत्त (गुरू दत्तामध्ये शंकर असल्याने त्याची वेगळी पूजा नको), गुरूदेव दत्ताचाच अवतार ज्यांना समजले जाते ते श्री स्वामी समर्थ, महालक्ष्मी देवी (आम्ही एकच शक्ती मानतो व सरस्वती, पार्वतीला एकाच महालक्ष्मी देवीत बघतो) आणि माझ्या गावचा पंढरपूरचा विठ्ठल (पांडुरंग) या देवांनाच प्रमुख स्थान आहे. बाकी कुठल्याही कुळदैवत, ग्राम दैवत यांना आमच्या घरात स्थान नाही. कारण त्यांचे सोवळे ओवळे मोठे असते व ते आम्हाला जमणारे नाही, परवडणारे नाही. उगाच कोपले तर काय करायचे?

या उपदेवांची भीती आम्ही मनात कधी घेत नाही कारण मुख्य देव आमच्या सोबत असतात. बाकी मनुष्य जीवन आहे. संकटे येणार. आजार येणार. आता कोणी असेही म्हणेल की मी कुळदैवताला, ग्रामदैवताला जवळ न केल्यामुळे मला माझा विद्युत प्रवाह रोखणारा हार्ट ब्लॉक झाला. असे कोणाला वाटले तर माझ्यासमोर तसे काही बोलायची कोणाची हिंमत तर होणार नाही आणि झालीच तर त्याला मी सरळ म्हणेन बस रे बाबा आता आनंदाने टाळ्या वाजवत तुझ्या मानसिक समाधानात की कुठले तरी कुळदैवत, ग्रामदैवत माझ्या वर कोपले म्हणून. मला हार्ट ब्लॉक झालाय तो सहन करायला मी स्वतः समर्थ आहे व त्याने मला मरण आले तर ते स्वीकारायलाही मी समर्थ आहे. त्यासाठी कुठल्याही देवाची जपमाळ ओढत मी बसणार नाही.

मी हा असा आहे. माझा बापही असाच होता. आमचे हे असले विचार कोणाला पटावेत अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही. आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व गुणांचा काही फायदा वाटला तर त्याचा योग्य मोबदला देऊन जवळ या नाहीतर आमचा रस्ता वेगळा, तुमचा रस्ता वेगळा. लग्ने जमवताना मात्र सावधान कारण मुलीला माझ्यासारखा रोखठोक नवरा योगायोगाने मिळू शकतो आणि मग पटवून घेता आले नाही तर सोडून जावे लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), १३.३.२०२४

रविवार, १० मार्च, २०२४

बाळूचे लग्न!

बाळूचे लग्न!

बरोबर ३९ वर्षापूर्वी १९८५ सालच्या याच मार्च महिन्यात बाळूचे (माझे) लग्न जमविण्यासाठी काकांनी (माझ्या वडिलांनी) जावईबापू श्री. बी.एन.पवार यांना (आमचे गोव्याचे भाऊजी) गळ घातली. मग आमच्या गोव्याच्या भाऊजींनी त्यांच्या नाते संबंधातील (बहुतेक बिरूताई पवार, पुणे) कुर्डुवाडीचे स्थळ माझ्यासाठी शोधले. याच महिन्यात १९८५ साली माझे वडील (काका) व गोव्याचे भाऊजी माझ्या होणाऱ्या बायकोला (मुलीला) बघण्यासाठी कुर्डुवाडीला गेले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात (एप्रिल १९८५) मी व पंढरपूरची माझी ताई (भामाताई) मुलीला बघण्यासाठी कुर्डुवाडी येथे गेलो. मी माझ्या होणाऱ्या बायकोला (जी १९८५ ते २०२४ हा ३९ वर्षाचा एवढा मोठा दीर्घकाळ अर्धांगिनी बनून माझ्याशी संसार करीत आहे) एक दोन प्रश्न पाहुणे मंडळींसमोर विचारून लगेच तिला पसंत केली व मुंबईला परत आल्यावर आईवडील व गोव्याच्या भाऊजींमार्फत माझा तिकडे होकार कळविला. लगेच त्याच महिन्यात (एप्रिल १९८५) आलेल्या श्रीराम नवमीला माझी लग्नाची सुपारी फुटली व टिळा लावण्याचा कार्यक्रम पार पडला. मग पुढील महिनाभर (मे १९८५) लगीनघाई आणि ३१ मे १९८५ रोजी भामाताईच्या दारात पंढरपूरला माझे लग्न व्यवस्थित पार पडले.

संसारात भांड्याला भांडे लागतेच त्यात काही नवल नाही. तशी आम्हा पती पत्नीतही क्षुल्लक कारणांवरून भांडणे झाली. पण तरीही संसार मजेत झाला. त्या भांडणांचीही मजा होती. आता उतार वयात आमच्या संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्याने आमची भांडणेच होत नाहीत. एकुलत्या एक मुलीचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन ती तिच्या सासरी आनंदात आहे. जीवन कृतार्थ झाले!

माझ्या या यशस्वी संसारासाठी मी माझे भाऊजी (बी.एन.पवार) यांना खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी केलेल्या प्रामाणिक, काळजीपूर्वक प्रयत्नांमुळेच मला माझी अर्धांगिनी मिळाली जिने मला माझ्या गरिबीत, खडतर प्रवासात कायम साथ दिली. दुसरे धन्यवाद माझे दुसरे भाऊजी म्हणजे पंढरपूरच्या भामाताईचे पती कै. विजय धोंडिबा मोरे यांना. माझे लग्न पंढरपूरला त्यांच्याच दारात झाले जरी लग्न अक्षता चंद्रभागा नदीकाठी असलेल्या द्वारकाधीश मंदिरात पडल्या. माझ्या लग्न पत्रिकेत श्री. बी.एन. पवार व श्री. विजय धोंडिबा मोरे या माझ्या दोन मेहुण्यांचीच नावे निमंत्रक म्हणून आहेत. आईवडील तर होतेच पाठीशी. पण ते आता हयात नाहीत.

अशी व्हायची पूर्वीची लग्ने. नाहीतर आता काय ती वधूवर सूचक मंडळे व लग्नाचा बाजार!

-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), ११.३.२०२४

ज्येष्ठांनी पुढे पुढे करू नये!

ज्येष्ठांनी उतार वयात पुढे पुढे करू नये!

माझ्या वडिलांच्या पुढारपणाचे खंदे समर्थक असलेल्या विनायक मामाचे काय झाले? जिवंत आहेत पण वय झाल्याने आता ते कालबाह्य झालेत. जमाना बदललाय आणि काळाची सूत्रे नवीन पिढीच्या हाती आलीत. मग जुन्या पिढीला कोण विचारेल? हे सर्वसामान्य ज्येष्ठांचे वास्तव आहे. मोठ्या राजकारणी व भांडवलदार मंडळींचे काय? त्यांचे तरूणपण जसे हटके असते तसे त्यांचे वृद्धत्व पण हटके असते. त्यांच्या ज्येष्ठत्वात सुद्धा वेगळाच रूबाब असतो. ही बडी माणसे निसर्गाने म्हातारी केली तरी समाजातून ती कालबाह्य होत नाहीत हे विशेष. सर्वसामान्य ज्येष्ठ लोकांसाठी आयुष्याच्या आठवणी चघळत बसण्यासाठी ज्येष्ठ कट्टा असतो. तिथे बसण्याशिवाय त्यांना पर्यायच नसतो. कारण त्यांच्या जुन्या आठवणींना कोणी विचारत नाही. तरूण पिढी तिच्याच विश्वात गुरफटलेली असते. तिला सामान्य ज्येष्ठांच्या सामान्य आठवणी व जुना अनुभव चालू काळात बिनकामाचा, बिनफायद्याचा वाटतो. यात त्यांचा तरी काय दोष म्हणा. त्यांना तरूण रक्ताचा जोश असतो. पण आपणही पुढे वृद्ध होणार आहोत याचा होश नसतो. पुढचे पुढे बघता येईल असा त्यांचा त्यांच्या वयाला साजेसा असा विचार असतो. जुन्या वस्तू, जुनी माणसे (मोठे राजकारणी व मोठे भांडवलदार सोडून) कालबाह्य होतात. हे वास्तव स्वीकारून ज्येष्ठ मंडळींनी तरूण पिढीच्या जास्त पुढे पुढे करू नये. त्यांना परिपक्व सल्ला देण्याचा तर कधी प्रयत्न करू नये. स्वतःचा आब राखून वृद्धत्व जगावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.३.२०२४

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

विज्ञानातले अध्यात्म!

विज्ञानातले अध्यात्म!

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान एकीकडे व परमेश्वर व परमेश्वराचे अध्यात्म दुसरीकडे या दोन गोष्टींचे विभाजन करून त्या विरोधाभासी कोणी व का केल्या हे कळायला मार्ग नाही.
काही स्वार्थी लोकांनी ज्याप्रमाणे मानव समाजाची विभागणी अनेक जातीपातीत केल्याचे दिसून येते तशीच काही स्वार्थी लोकांनी एकाच परमेश्वराची विभागणी अनेक देव धर्मांत केली असावी.

खरं तर परमेश्वर संकल्पना वैज्ञानिक आहे. त्यामागे कारण हेच की निसर्ग व निसर्गाचे विज्ञान हे विस्कळीत आहे. या विस्कळीत (विखुरलेल्या) निसर्गाला व त्याच्या विस्कळीत (विखुरलेल्या) विज्ञानाला एका सामाईक साखळीत जोडल्याचे दिसून येते. म्हणून निसर्ग व त्याचे विज्ञान विस्कळीत असले तरी ते सामाईक साखळीमुळे एकजिनसी (एकत्र जोडलेले) आहे हे कळते. यातूनच सगळ्या निसर्गाचा कर्ता करविता परमेश्वर (विश्वकेंद्री शक्ती) असावा ही संकल्पना निर्माण झाली असावी.

विस्कळीत निसर्गाला एकजिनसी करणारा परमेश्वर एकजीव आहे ही संकल्पना स्वीकारली की ती निव्वळ भावनिक न राहता वैज्ञानिक होते. त्यातून निसर्गाचे भौतिक क्रियाकर्म हे निव्वळ भौतिक न राहता ते आध्यात्मिक योगकर्म बनते. त्यातून भौतिक कर्मांना नुसती भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक शिस्तही लागते व इथेच निसर्ग व परमेश्वर आणि विज्ञान व अध्यात्म (परमेश्वराचा धर्म) एक होतात.

जर निसर्ग व परमेश्वर आणि विज्ञान व धर्म (अध्यात्म) या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर मग एकाच परमेश्वराचे अनेक देवधर्मात विभाजन करून विश्वकेंद्री शक्तीची अर्थात परमेश्वराची वेगळी धार्मिक रूपे व कर्मकांडे कोणी व का निर्माण केली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.३.२०२४

भयंकर अंधश्रद्धा!

आजच्या आधुनिक काळातही समाजात इतकी अंधश्रद्धा चालू आहे यावर विश्वास बसत नाही. पण कटू वास्तव तेच आहे. बदलापूरला जादूटोण्याच्या संशयावरून एका ७५ वर्षाच्या वृद्धाला निखाऱ्यांवर चालवण्याचा प्रकार अत्यंत अमानुष व लांच्छनास्पद होय. (वाचा बातमी लोकसत्ता दिनांक ८.३.२०२४). या असल्या अघोरी अंधश्रद्ध प्रकाराला आळा घालण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रामाणिक प्रयत्न तर अपुरे पडतच आहेत पण कायदाही अपुरा पडतोय. पण तरीही या असहाय्य वृद्धाला व त्याच्या पिडित मुलीला न्याय देण्यासाठी कोणता देव पुढे आला नाही तर कायदाच पुढे आला. पण याच कायद्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा होणे अजून बाकी आहे. या असल्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. हे सर्व अघोरी प्रकार व समाजातील भ्रष्टाचार, अत्याचार बघत देव शांत बसलाय दुसरे काय! - *ॲड.बी.एस.मोरे*