निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे!
निसर्ग रचित साचेबंद विज्ञानाच्या मुळाशी देव (परमेश्वर) मुळापासून आहे की मनुष्यानेच स्वतःच्या विचारातून किंवा अनाकलनीय नैसर्गिक अनुभवातून परमेश्वर व त्याचे अध्यात्म जीवनात आणले हा वादग्रस्त मुद्दा आहे. याच वादावर मनुष्य समाजातील आस्तिकवाद व नास्तिकवाद आधारित आहे. पण मूलभूत प्रश्न हा आहे की परमेश्वरच जर सगळे निर्णय घेत असेल तर मग मनुष्याच्या बुद्धीचे व त्या बुद्धीच्या नैसर्गिक निर्णयक्षमतेचे मनुष्याने काय करायचे? मनुष्याच्या बौद्धिक निर्णयक्षमतेने निसर्गाच्या मूलभूत भौतिक रचनेत बरीच लुडबूड करून अर्थात निसर्गाच्या या मूळ रचनेत बऱ्याच कृत्रिम काड्या घालून या रचनेची मुळापासून वाट लावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे व या उपद्रवी काड्यांमुळे मानवी जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य झाल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. मानवी जीवनात कल्याणकारी अर्थकारण व रक्षणकारी राजकारण हे मूलभूत आधार खांब आहेत. शिक्षण व ज्ञानकारण हा आधार खांब सुद्धा अर्थकारण व राजकारण या दोन मुख्य आधार खांबांशी निगडीत आहे. शिक्षणातून ज्ञान का घ्यायचे तर अर्थकारणी व राजकारणी व्यावहारिक जीवन नीट जगता यावे म्हणून. पण अर्थकारणातील व राजकारणातील व्यवहाराचे वास्तव काय आहे? राहिलीय का नैतिकता, राहिलाय का देव (परमेश्वर) या मूलभूत व्यवहारात? उत्तर नाही असेच आहे. या व्यवहारात खरंच देवाचे (परमेश्वराचे) अधिष्ठान असते तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण (सॉरी गुन्हेगारीचे राजकीयीकरण) झालेच नसते. तरीही परमेश्वरावर श्रद्धा असणारा सर्वसामान्य माणूस त्याची आध्यात्मिक भक्ती, प्रार्थना करीत या भयानक वास्तवाला कलियुग म्हणत या युगाचा अंत करण्यासाठी परमेश्वर कधीतरी अवतार घेईल म्हणून त्याच्याकडे पिढ्यानपिढ्या आशेने डोळे लावून बसलाय. मुळात आपण ज्या घरात राहतोय त्या घरालाच अशी आग लागलेली असताना आपण आगीने वेढलेल्या अशा घरात परमेश्वराची आध्यात्मिक कामना, भक्ती करीत शांतीची मोक्षप्राप्ती मिळवू शकतो का हा मूलभूत प्रश्न आहे. निसर्गाचे वैज्ञानिक धर्मकारण वेगळे आणि परमेश्वराचे आध्यात्मिक धर्मकारण वेगळे, दोन्हीचा कुठेही ताळमेळ नाही. पण तरीही देवश्रद्ध माणूस निसर्ग विज्ञानाची आव्हाने हिंमतीने पेलण्यासाठी देवाच्या अध्यात्माचा आधार घेतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४