https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
बुधवार, २४ जानेवारी, २०२४
मराठा आरक्षण, माझी भूमिका!
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व विधीवत शब्दाचा अर्थ!
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून विधीवत शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला!
सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी अयोध्या येथील नवीन मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. कोणत्याही गोष्टीचा विचार मी कायद्याच्या दृष्टिकोनातून करतो. कायद्याची चौकट म्हणजे मर्यादेची चौकट आणि प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात मर्यादा पुरूषोत्तम. त्यामुळे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे हे एक जिज्ञासू वकील म्हणून ओघाओघाने आलेच. खरं तर या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून विधीवत या शब्दाचा अर्थ मला अधिक स्पष्ट झाला.
कायदा हा तीन गोष्टींनी बनतो. कल्याणकारी, मंगल निर्माणाचे विशिष्ट ध्येय हा कायद्याचा पाया असतो. या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी एक विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते ती दिशा किंवा चौकट हा कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा असतो. विशिष्ट धोरणात्मक चौकटीने एक विशिष्ट तात्विक/ तांत्रिक प्रक्रिया निश्चित केली जाते ती प्रक्रिया म्हणजे कायद्याचा प्रत्यक्ष विधी असतो. या तिन्ही गोष्टींचा मिळून कायदा बनतो. कायद्यानुसार सर्वकाही व्यवस्थित पार पडणे म्हणजे एखादे विशिष्ट कार्य विधीवत पार पडणे.
एखादी इमारत उभी करताना अशी इमारत उभारणे हे ध्येय असते. अशा इमारतीचा आराखडा ही इमारतीची धोरणात्मक दिशा किंवा चौकट असते. या आराखड्यानुसार इमारत बांधकाम तंत्रज्ञानाने इमारतीचे बांधकाम करणे ही अशा इमारतीची विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. इमारत निर्मितीचे ध्येय, इमारतीचा आराखडा व इमारतीचे बांधकाम या तिन्ही गोष्टी जुळून आल्या की अशी इमारत विधीवत बांधली गेली असे म्हणायचे.
अयोध्या येथील श्रीरामाच्या नवीन मंदिराचे बांधकाम असेच विधीवत पार पडले. या मंदिरात सोमवार, दिनांक २२ जानेवारी, २०२४ रोजी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली याचा अर्थ हाच की ती हिंदू धर्म शास्त्रानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. ईश्वर मूर्तीला मंदिरात स्थानापन्न करताना प्राणप्रतिष्ठेचा हिंदू धर्मशास्त्रीय विधी हा धार्मिक कायदाच आहे. या कायद्यात वर उल्लेखित तिन्ही गोष्टी येतात. त्या म्हणजे ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे ध्येय. या प्राणप्रतिष्ठेची म्हणजे ईश्वर मूर्तीच्या विधीवत स्थानापन्नतेची विशिष्ट दिशा/चौकट म्हणजे विशिष्ट शुभ मुहुर्त वगैरे. त्यानंतर त्या विशिष्ट चौकटीतील प्राणप्रतिष्ठेची विशिष्ट पद्धत/कायदेशीर प्रक्रिया म्हणजे मंत्रोपचार वगैरे. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे व्यवस्थित पार पडल्या की ईश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही विधीवत पार पडली असे म्हणायचे. अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशीच विधीवत पार पडली.
अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अशाप्रकारे विधीवत पार पडल्यावर आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यासाठी जमलेल्या मान्यवरांसमोर जे भाषण केले ते भाषण विधीवत या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगते. या भाषणाद्वारे पंतप्रधानांनी एक संकल्प सोडला. भारताचे नवनिर्माण (नया भारत) हाच तो संकल्प. पुढील एक हजार वर्षांत पवित्र म्हणजे मंगल, कल्याणकारी भारत व कणखर म्हणजे स्वसंरक्षणासाठी खंबीर व शस्त्रसज्ज भारत, अशा भारताची पायाभरणी आता करून त्या ध्येयाने पुढे वाटचाल करायची हा संकल्प, हे ध्येय हा नवीन भारत निर्माण करण्याच्या कायद्याचा पाया झाला. या ध्येयपूर्तीसाठी आता विशिष्ट धोरणात्मक दिशा किंवा चौकट आखली जाईल, निश्चित केली जाईल. तो असेल नवभारत निर्माण कायद्याचा गाभा किंवा मूलभूत ढाचा. या धोरणात्मक चौकटी अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाच्यात बसणारी जी प्रक्रिया राबवली जाईल ती असेल या नवभारताची विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया. अशाप्रकारे नवभारताच्या कायद्याचे तीन घटक, तीन गोष्टी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्येतील भाषणात थोडक्यात स्पष्ट केल्या.
विधीवत या शब्दाचा अर्थ श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या चिंतनातून मला वरील प्रमाणे अधिक स्पष्ट झाला.
-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१.२०२४
सोमवार, २२ जानेवारी, २०२४
जशास तसे तत्वज्ञान!
फेसबुकी मैत्री, थोडे सावधान!
समाजवाद!
समाजवादात बसवता येईल का भांडवलशाही व साम्यवादाची संमिश्र अर्थव्यवस्था?
संपूर्ण समाजाचा जगण्याचा अधिकार तोच समाजवाद! फक्त एकाच समूहाचा म्हणजे गटाचा असा जगण्याचा अधिकार समाजवाद होऊ शकत नाही. ती कंपूगिरी झाली. कंपूगिरी मक्तेदारी निर्माण करते. समाजवाद हा संपूर्ण समाजाला जगवण्याचा वाद! भांडवलशाही व साम्यवाद एकत्र नांदवायचा म्हणजे संमिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग समाजवादात अपेक्षित आहे. समाजवादात म्हणजे एकूणच समाज जगवण्याच्या वादात फक्त भांडवलशाही किंवा फक्त साम्यवाद हा एकसूरी, एककल्ली प्रयोग होय. हे माझे वैयक्तिक मत आहे. मतमतांतरे असू शकतात!
-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०
निसर्गापासून अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?
भानासाठी ज्ञान!
भानासाठी ज्ञान!
शिक्षण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणाचे व त्यात असलेल्या स्वतःचे ज्ञान. ज्ञान हे मर्यादेचे भान देते. शिक्षणातून मिळवलेले ज्ञान हे पैसे कमावण्याचे व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकत नाही. त्या ज्ञानात मिळवलेले विशेष प्रावीण्य, कौशल्य हे पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकते. असे कौशल्य विशिष्ट ज्ञानावर केलेल्या प्रयत्नातून, सरावातून प्राप्त होते. असा सराव म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकार असतो. पण ज्ञानाच्या अनेक शाखा असल्याने त्या प्रत्येक शाखेत सराव करून सर्व शाखांत प्रावीण्य मिळवता येत नाही. अर्थात ज्ञानाच्या खाणीतील सर्व हिऱ्यांना एकटा माणूस पैलू पाडू शकत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे. मुळात शिक्षण व ज्ञानाला पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल समजणेच चूक आहे. सर्व ज्ञान शाखांचे, क्षेत्रांचे थोडे थोडे जुजबी ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान जे सर्वांना असणे आवश्यक असते. हे सामान्य ज्ञान शालेय शिक्षणातून मिळते. या सामान्य ज्ञानाशिवाय माणसाला सामान्य भान येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला निदान इयत्ता दहावी पर्यंत तरी शिक्षण हे असलेच पाहिजे. एवढेही शिक्षण नसलेली माणसे राजकारणात यशस्वी होऊ शकतात पण कधी तर समाज बहुसंख्येने अशिक्षित असेल तर. बहुसंख्य जनता जर सुशिक्षित असेल तर अशिक्षित (म्हणजे कमीतकमी सामान्य ज्ञानाचे शालेय शिक्षण नसलेल्या) माणसांची राजकारणात डाळ शिजणार नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की मर्यादा भानासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण ते पैसा व सत्ता मिळविण्याचे भांडवल होऊ शकत नाही. मी अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण, नंतर बी.काॕम. चे पदवी शिक्षण, पुढे पदव्युत्तर कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षण व शेवटी कायद्याचे पदव्युत्तर एलएल.बी. शिक्षण एवढे उच्च शिक्षण घेतले. पण या एवढ्या ज्ञान पसाऱ्यातून मी उदरनिर्वाहासाठी वकिली व्यवसाय स्वीकारला व तो करताना कायदा ज्ञानाच्या विशाल सागरातील काही थेंबांवरच प्रभुत्व मिळवले, त्यात कौशल्य प्राप्त केले. ते कौशल्य माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या एक टक्का (१%) एवढेही नाही. अर्थात माझे एक टक्का ज्ञान एवढेच माझे पैसा कमावण्याचे भांडवल झाले. त्या भांडवलावर मी फक्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सामान्य गरजांपुरता थोडाच पैसा कमवू शकलो. ही झाली अर्थकारण क्षेत्राची गोष्ट. राजकारण क्षेत्रात मला गतीच नाही कारण त्या क्षेत्रात मला कौशल्य प्राप्त करता आले नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा मला गंधही नाही. ज्ञानाने माझ्यावर खूप उपकार केलेत. मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी जास्त उंच उड्या मारू नयेत याचे भान मला सतत याच ज्ञानाने दिले व मला भानावर ठेवले. थोडक्यात, मर्यादा भानासाठी ज्ञान हाच ज्ञानाचा मुख्य हेतू एवढेच मला या लेखातून सांगायचे आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, २२.१.२०२४