ढ पण चालू विद्यार्थी?
काही हुशार मुले ही जरा जास्तच हुशार असतात. ती ढ मुलांबरोबर संगनमत करून ढ मुलांच्या ऐवजी त्यांच्या वतीने स्वतःच परीक्षा देतात आणि ढ मुलांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याला प्रोक्झी तोतयेगिरी म्हणता येईल. अशी प्रकरणे आमच्या काळातही घडत होती व वर्तमान काळातही अशा बातम्या माध्यमातून येत असतात. ही अशी तोतयेगिरी हुशार विद्यार्थी ढ मुलांच्या मैत्रीसाठी किंवा त्यांच्या प्रेमापोटी करीत नाहीत तर अशा ढ मुलांकडून मिळणाऱ्या पैशासाठी करतात. अशाप्रकारे गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशासाठी हे अती हुशार विद्यार्थी नुसत्या विद्या देवतेशीच गद्दारी करीत नाही तर अशा गैरव्यवहारात पैशाचा गैरवापर करून लक्ष्मी देवतेचाही अपमान करतात. लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. त्यामुळे ती याप्रकारच्या अप्रामाणिक विद्यार्थ्यांना कायम साथ देईलच असे नसते. पण विद्या देवता मात्र बौद्धिक मेहनतीचा आळस करणाऱ्या या ढ विद्यार्थ्यांना कायम लांबच ठेवते. तोतयेगिरी करणारे अती हुशार विद्यार्थीही कायद्याच्या कचाट्यात कधीतरी सापडतातच. एकवेळ लक्ष्मी देवता या ढ विद्यार्थ्यांना काही काळ जवळ करेल पण विद्या देवता मात्र अशा ढ विद्यार्थ्यांना तिच्याजवळ जराही फिरकू देत नाही. पण काही ढ मुले पुढे त्यांच्या चालूगिरीमुळे आयुष्यात नुसता भरपूर पैसाच नाही तर इतर बरेच काही मिळवतात व स्वतःला यशस्वी म्हणवून घेत समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात आणि विशेष म्हणजे समाजही अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांचा उदो उदो करण्यात कमीपणा मानत नाही. पण कोणता समाज? ज्या समाजात अप्रामाणिक व भ्रष्ट लोकांचा भरणा जास्त असतो अशाच समाजात अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांची चलती असते. पण तसे तर दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणारा दुधवालाही भरपूर पैसे मिळवून समाजात निर्लज्जपणे राहतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३