बुद्धीचे झाले खोबरे!
आपण जर फक्त भारतातील व भारतासंबंधीच बातम्या वाचत असाल तर ते चुकीचे आहे कारण भारत हा जगाचा एक भाग आहे आणि जग मोठे आहे. तसेच केवळ एखाद्या धर्मात जन्माला आलात म्हणून फक्त त्याच धर्माची माहिती घेत असाल तर ते संकुचितपणाचे लक्षण होय. कारण जगात अनेक धर्म आहेत व जगाचा परमेश्वर व त्या परमेश्वराचा निसर्ग जगासाठी एकच आहे.
आज दिनांक ४ डिसेंबर, २०२३ च्या लोकमत दैनिकात पान क्रमांक २ वर जगभर या सदरात बेडमेट मिळेल? ही टोरांटो शहरातील एका तरूणीची पोस्ट वाचली आणि माझ्या बुद्धीचे खोबरे झाले. त्या शहरात महागाई खूप वाढलीय म्हणून या तरूणीने तिच्या बेडचा एक कोपरा भाड्याने द्यायचाय अर्थात तिला बेडमेट हवीय (हवाय नव्हे) म्हणून तिने जाहिरात दिलीय. आतापर्यंत 'सोलमेट' म्हणजे मनाला मन जुळणारा मित्र किंवा मैत्रीण हा शब्द ऐकला होता. खरं तर सोलमेट ही संकल्पना वैचारिक मैत्रीशी निगडीत आहे. जग भावनेवर नाही तर बुद्धीवर चालते. हवा ही श्वसनासाठी आवश्यक असली तरी नुसत्या हवेवर जगता येत नाही. त्यासाठी जड पाणी व अन्न हे हवे असते. मी भावनेचा संबंध हलक्या हवेशी जोडतो व बुद्धीचा संबंध जड अन्न, पाण्याशी जोडतो. दोन किंवा अधिक व्यक्तींचे बौद्धिक विचारच जर जुळत नसतील तर त्यांच्यात भावनिक जवळीक काय निर्माण होणार?
सोलमेट ठीक पण 'बेडमेट' हा काय प्रकार आहे? टोरांटो शहरातील या तरूणीच्या जाहिरातीमुळे मला तो कळला. काय भन्नाट कल्पना आहे या तरूणीची! भाड्याची बेडमेट हवीय म्हणे तिला तिचा बेड भाड्याने शेअर करण्यासाठी! आज ही टोरांटो बातमी वाचताना मला बी.काॕम. च्या अभ्यासक्रमात शिकलेले अर्थशास्त्र आठवले. मानवी इच्छा अमर्यादित आहेत पण त्यांचे समाधान करणारी साधने जगात मर्यादित आहेत हेच ते वास्तव अर्थशास्त्रात शिकलो. मग साधनांची आंतरमानवी स्पर्धा हा भाग आलाच व या स्पर्धेचे नियमन करणारा कायदाही आला.
किती प्रचंड मोठी लोकसंख्या वाढवून ठेवलीय मनुष्य प्राण्याने या पृथ्वीवर! मनुष्य म्हणे अतिशय बुद्धिमान प्राणी. कसला बुद्धिमान? त्याला साधे अर्थशास्त्र कळत नाही आणि विकासाच्या गप्पा मारतोय. विकासी उद्योगात निर्माण झालेली विषारी रसायने, घाण, कचरा, सांडपाणी सरळ शुद्ध पाण्याच्या नद्यांत सोडून देतोय आणि नद्यांना गटारे बनवतोय. वर कहर हा की या गटारी नद्यांचे किनारे सुशोभित करतोय स्वतःच्या करमणूकीसाठी. याच गटारी नद्यांत तो परमेश्वराचे निर्माल्य सोडून देतोय. काय म्हणावे या मानवी बुद्धीला! परमेश्वर खरंच कपाळावर हात मारून बसला असेल का त्याची निर्मिती असलेल्या माणसाची ही बुद्धी बघून? बेडमेट वाचून माझ्या बुद्धीचे मात्र खोबरे झाले!
-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१२.२०२३