संसार सोपा नाही!
या बातमीतील परिस्थितीतून मी गेलोय. वकिली नीट चालत नव्हती. महिना ५०० रूपयावर सिनियर वकिलाच्या हाताखाली केसेसची बंडले व कायद्याची पुस्तके उचलत या कोर्टातून त्या कोर्टात फिरत होतो. गरीब कामगार कुटुंबात जन्म पण मोठ्या कष्टाने उच्च शिक्षण घेतले. आजूबाजूला नोकरी एके नोकरी करणाऱ्यांचा गोतावळा. वकिलीत कोणाचे मार्गदर्शन नाही की पाठिंबा. पण वकिली सोडायची नाही, नोकरी करायची नाही ही जिद्द. पत्नी गृहिणी व मुलगी शाळेत. व्यापारी असोसिएशनचा कायदा सल्लागार म्हणून दरमहा ५०० रूपये मानधन मिळू लागले म्हणून सिनियर वकिलाचे स्टायपेंड ५०० रूपये धरून महिना १००० रूपये वकिलीतून कमाई सुरू होती. तो काळ होता १९८८ ते १९९० चा. तरीही त्याकाळी महिना १००० रूपये कमाई म्हणजे भयंकर गरिबी. मुलीच्या शाळेची फी भरता येत नव्हती व संसाराच्या दैनंदिन खर्चासाठी उसनवारी करावी लागत होती. उसने घेतलेले पैसे वेळेवर फेडता आले नाही की कर्जदार मागे लागायचे. घरी शेती नाही की वडिलोपार्जित इस्टेट नाही. तरीही हिंमत सोडली नाही. वकिली चालूच ठेवली. कमी फी मध्ये माझ्या ज्ञानाचा वापर सुरूच होता. एवढे शिक्षण घेऊन हेच का फळ असे सारखे मनात येत होते. पण कित्येक वेळा उच्च शिक्षणाची अवहेलना व मानहानी सहन करून संसाराची जबाबदारी नेटाने पार पाडली. एकच मुलगी पण बापाचे कष्ट बघून कष्टाने शिकली. मोठ्या पगाराच्या उच्च पदाला पोहोचली. उच्च शिक्षित व उच्च पदस्थ तरूणाशी विवाह करून मोठ्या घरात संसारात स्थिर झाली. माझी व माझ्या पत्नीची आराधना सफल झाली. पतीने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले म्हणून विवाहित स्त्रीने दोन मुलींसह रेल्वेखाली आत्महत्या केली ही दिनांक २ डिसेंबर २०२३ च्या लोकसत्तेतील बातमी वाचली आणि मन हेलावून गेले. संसार सोपा नाही एवढेच मी म्हणेन!
-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३