https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

वकिलीतून निवृत्त झालो हो!

वकिलीतून निवृत्त झालो हो!

काही माणसे गर्विष्ठ, वर्चस्ववादी असतात तशीच काही राष्ट्रेही. शीत युद्धात सोव्हिएट रशिया अमेरिकाला भारी पडू लागली म्हणून अमेरिकेने रशियाविरूद्ध चीनला वापरून घेतले. अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री किसिंजर हे जितके बुद्धिमान तितके कुटील व निर्दयीही. आणि मग चीनने अमेरिकन मैत्रीचा फायदा उठवून पूर्वीच्या बलवान रशियाची जागा घेतली तेंव्हा मात्र वर्चस्ववादी अमेरिकेला चांगलेच झोंबले व तिला आता भारताला जवळ करावे असे वाटू लागले. भारताला चीनविरूद्ध वापरून घेण्याची अमेरिकेची ही कुटील चाल तर नव्हे ना? अहो, मी शेवटी वकील आहे ना म्हणून ही रास्त शंका. भारताने अशा कुटील कारस्थानी अमेरिकेपासून सावध रहायला हवे. मानवी स्वभाव  मुळातच हा असा महास्वार्थी, कुटील व कारस्थानी आहे. त्या स्वभावाला परमेश्वराचे अध्यात्म व धर्म विरूद्ध अधर्म यातील संघर्षाचे तत्वज्ञान सांगणारे धर्मग्रंथ काय ताळ्यावर आणणार? यावर उपाय म्हणून लकडीशिवाय मकडी वळत नाही या न्यायाने अधर्माला (अन्यायी वर्तन) शिक्षेची भीती दाखवणारा कायदा बुद्धिमान माणसांनी बनवला आणि त्यासाठी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले. पण हे कायद्याचे राज्य शेवटी चालवतेय कोण तर महास्वार्थी, कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी न्याययंत्रणा निर्माण केली गेली तरी ती या कुटील, कारस्थानी राजकीय मंडळी बरोबर किती संघर्ष करीत राहणार? तिलाही तिच्या मर्यादा आहेतच ना! या असल्या कुटील कारस्थानी जगात माझ्यासारख्या सरळमार्गी, प्रामाणिक वकिलाची काय डाळ शिजणार?अमेरिका कशी इतर राष्ट्रांना वापरून घेते तसेच मला म्हणजे माझ्या स्वकष्टार्जित ज्ञानाला श्रीमंतांनी चांगलेच वापरून घेतले. माझी वकिली कसली तर कमी फी मध्ये स्वतःचे शोषण करून घेत श्रीमंतांना कायद्याच्या ज्ञानाची मदत करून श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याची वकिली. मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक गरीब वकील. मी गरिबांची कसली वकिली करणार? माझीच खायची पंचाईत आणि गरिबांकडून फी ची अपेक्षा करून माझी वकिली किती आणि कशी चालणार? मग वापरू दिले श्रीमंतांना काही दिवस माझ्या त्या मौल्यवान ज्ञानाला. आता मात्र या चालू लोकांचा उबग आला. म्हणून काय केले तर दिली वकिली सोडून म्हणजे वकिलीतून निवृत्त झालो हो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ३.१२.२०२३

मै दिये की ऐसी बाती

मै दिये की ऐसी बाती, जल ना सकी जो बुझ भी ना पाती, आ मिल मेरे जीवन साथी, आजा रे परदेसी! १९५८ च्या मधुमती चित्रपटातील या गाण्यात वैजयंती माला स्वतःला अशा वातीची उपमा देत आहे की ती जळूही शकत नाही व विझूही शकत नाही. अर्थात या वातीला जळून ज्योत होण्याची मनोमन इच्छा आहे. पण या वातीला पेटवून तिची मंद ज्योत बनवणारा अग्नी कुठे आहे, ते चैतन्य कुठे आहे? त्या अग्नीची, त्या चैतन्याची तिला आस आहे. जगात अशा भक्कम आधारासाठी व्याकूळ असलेली बरीच निराधार माणसे जगत आहेत. -©ॲड.बी.एस.मोरे, अर्थ संवादी 

साद प्रतिसाद!

व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे, पण?

सर्वांनाच स्वतःच्या लिखाणातून किंवा वक्तृत्वातून मनातले विचार व्यक्त करता येत नाहीत कारण लेखन व वक्तृत्व ही कला आहे. ती सर्वांना साध्य असलीच पाहिजे हा माझा विचार चुकीचा. व्हॉटसॲप हे समाजमाध्यम असले तरी ते तसे वैयक्तिक संवादाचे माध्यम आहे. यु ट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादी माध्यमे ही विशाल सार्वजनिक संवादासाठी असलेली समाजमाध्यमे होत. अशा संवादात वैयक्तिक संवाद खूपच कमी असतो. पूर्वी व्हॉटसॲप नव्हते तेंव्हा माणसे फोन करून प्रत्यक्ष संवाद साधायची जो वैयक्तिक स्वरूपाचा असायचा. व्यावहारिक संबंधात सुद्धा प्रत्यक्ष फोनाफोनी व्हायची.

व्हॉटसॲप संपर्कात असलेल्या माझ्या नातेवाईक व मित्रमंडळींनी माझ्यासारखे स्वतंत्र लिखाण करून त्यांची स्वनिर्मितीच मला शेअर करावी, इतरांचे विचार, व्हिडिओ मला शेअर करू नयेत कारण ते इतर माध्यमातून फिरत असतात हा माझा विचार मुळातच चुकीचा व म्हणून माझी चूक मान्य करून तो विचार मी मागे घेत आहे. याबाबतीत मी माझ्या एका बहिणीचे उदाहरण देतो. ती मला म्हणते "दादा, मला तुझ्यासारखे लिहिता येत नसले तरी तू जे लिहितो ते मी वाचते व ते मला समजते. मग ती मला अधूनमधून प्रत्यक्ष फोन करून बोलते किंवा काही सेकंदाच्या तिच्या आवाजात ध्वनीफिती बनवून मला व्हॉटसॲप वर पाठवून माझ्या व्हॉटसॲप लेखनावर थोडक्यात प्रतिसाद देते. ही तिची पद्धत मला खूप आवडते. इतर काही नातेवाईक व मित्रमंडळी सुद्धा अधूनमधून थोडक्यात लिहून प्रतिसाद देत असतात. काही मंडळी बराच काळ नुसत्याच दोन निळ्या पाठवून देतात. त्यांचा हा विचित्र प्रतिसाद मी काही दिवस सहन करतो व नंतर मात्र त्यांना सरळ ब्लॉक करून टाकतो.

माझे एवढेच म्हणणे आहे की, जर तुम्हाला माझ्यासारखे लिखाणातून, व्हिडिओतून व्यक्त होता येत नसेल तर इतरांचे चांगले विचार, चांगले व्हिडिओ मला जरूर पाठवा. त्यातून तुम्हाला मला काय सांगायचे आहे हे मी समजून घेईन व त्यावर माझी योग्य प्रतिक्रियाही देईन. पण असे इतरांचे लेख, व्हिडिओ मोठे असले तर मला लगेच प्रतिक्रिया देता येणार नाही. तरीही उगाच दिसला व्हिडिओ आणि पाठवला असे व्हायला नको. तुम्हाला तुमच्या मनातील विचार, भावना ज्यातून व्यक्त करायच्या आहेत तेवढेच साहित्य पाठवा. केवळ विविध माध्यमांतून माहितीचा महापूर ओसंडून वाहतोय म्हणून त्यातून सहज हाताशी येईल ते उचलून काहीतरी पाठवायचे म्हणून उगाच पाठवू नका. ही वैयक्तिक संवादाची पद्धत नव्हे. थोडक्यात काय तर व्हॉटसॲप हे संवादाचे चांगले माध्यम आहे पण सुसंवाद घडण्यासाठी दोन्ही बाजूंनी योग्य साद, प्रतिसाद हवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २.१२.२०२३

हिंदू धर्म एकता!

हिंदू धर्म किती हिंदू धर्मियांना कळलाय व कळतोय? हिंदू नुसते नावाला बहुसंख्य आहेत भारतात पण हिंदू धर्माच्या मूळ वैज्ञानिक स्वरूपाविषयी व सगुण निर्गुण परमेश्वराविषयी किती हिंदूंना खरे ज्ञान आहे? मूळ एकमेव परमेश्वर व नंतर मूळ देवदेवता, त्यांचा मूळ अर्थ बाजूला ठेवून बरेच हिंदू लोक काही बुवा, बाबांनाच परमेश्वराचे अवतार समजून त्यांची भक्ती करू लागले. नुसती अंधश्रद्धा आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही की कुठे एकवाक्यता नाही. कशी एकता राहणार हिंदू धर्मियांत? -©ॲड.बी.एस.मोरे

निसर्गधर्म व देवधर्म!

निसर्गधर्म व देवधर्म यात फरक हा की निसर्गधर्म हा निसर्गाच्या भौतिक नियमांचा व्यावहारिक भाग आहे जो भाग व्यावहारिक बुद्धीशी निगडित आहे, तर देवधर्म हा निसर्गाच्या मुळाशी परमेश्वर आहे या श्रद्धेवर आधारित असलेल्या देवभक्ती व देव प्रार्थनेचा आध्यात्मिक भाग आहे जो भाग आध्यात्मिक भावनेशी निगडीत आहे ज्याला भौतिक नियमांच्या काटेकोर बंधनात बांधता येत नाही, बुद्धी व भावना या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याने निसर्गधर्म व देवधर्म किंवा थोडक्यात विज्ञान व धर्म एकत्र आहेत! -©ॲड.बी.एस.मोरे

जय श्री हनुमान!

जय श्री हनुमान!

माझ्या पौराणिक माहिती प्रमाणे श्री हनुमान हा श्री महादेवाचा/शंकराचा अवतार तर श्रीराम व श्रीकृष्ण हे  श्रीविष्णूचे अवतार. रामायणात श्री हनुमान श्रीरामाचे भक्त (अर्थात शिवशंकरानेच केली श्रीविष्णूची भक्ती) म्हणून सतत दिसतात तर महाभारतात काही प्रसंगात भिमाचे गर्वहरण करताना व कौरव पांडव युद्धात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथ्य करीत असताना त्या रथावर श्रीहनुमान दिसतात. श्रीविष्णूचा अवतार श्री परशुराम यांचा क्षत्रिय विनाशाचा अधर्म रोखण्यासाठीही श्री हनुमान यांनी आपली शक्ती दाखवत परशुरामाला युद्धात हरवले व झाडाला बांधून ठेवले. म्हणजे श्रीविष्णूलाच शिवशंकराने हरवले. अधर्माविरूद्धची/अन्यायाविरूद्धची ही सतत चालणारी लढाई आहे. आधुनिक काळातील कायदा हाही अन्यायाविरूद्धचा धर्म आहे. असे म्हणतात की श्रीविष्णू व शिवशंकर या देवांचे व तसेच लक्ष्मी व पार्वती या देवतांचे अवतार त्यांचे अवतार कार्य संपले की संपुष्टात आले. पण शिवशंकराचा एकमेव अवतार श्रीहनुमान याचे अवतार कार्य संपले नाही कारण जगातून अधर्म/अन्याय संपूर्णपणे नष्ट झाला नाही. म्हणून वकील या भूमिकेत मी कायदा क्षेत्रात आहे अर्थात धर्म कार्यात आहे याचा मला अभिमान आहे. तसे तर न्यायाधीश, वकीलच नव्हे तर इतर सुद्धा म्हणजे पोलीस, प्रशासकीय अधिकारी, मंत्रीगण, लष्कर हे सर्वच धर्मकार्याचे अर्थात ईश्वर कार्याचे संरक्षक पुजारी आहेत हे त्यांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे. त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे अधर्म होय. अधर्म जास्त काळ टिकत नाही. अतिरेक केला तर मग आहेच शिवशंकराचा जागृत अवतार श्री हनुमान!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.१२.२०२३

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

पंढरपूरचा मातोश्री वृद्धाश्रम काय शिकवतो?

गोपाळपूर हा पंढरपूरचा एक भाग. या गोपाळपूरातील मातोश्री वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या संत तनपुरे महाराज यांची कृपा. संत तनपुरे महाराजांचा एक मठ पंढरपूर स्टेशन रोडवर एस.टी. स्टँडजवळ आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सत्य कथा म्हणजे अनुभवाची शिदोरी. इथे राहणाऱ्या ६५ वृद्ध स्त्री पुरूषांच्या कथा थोड्या वेगळ्या असल्या तरी या सर्व कथांना जोडणारा एकच समान धागा म्हणजे ही सर्व वृद्ध मंडळी निराधार आहेत. म्हणजे काहींना मुलेच नाहीत, काहींना मुले होती पण ती मेलीत व काहींची मुले आहेत पण त्यांना आईबाप जड झालेले म्हणजे ती असून नसून सारखीच, तर काहीजण मुलांना आपला म्हातारपणी त्रास नको म्हणून स्वतःच्या मर्जीने वृद्धाश्रमात आलेली. या वृद्धांत काही अशिक्षित तर काही उच्च शिक्षित मंडळी आहेता म्हणजे शिक्षणाचा व वृद्धाश्रम जवळ करण्याचा काही संबंध नाही हे वास्तव सांगणाऱ्या या कथा. या सर्वांच्या जीवन कथा नीट समजून घेतल्यावर मी ६७ वर्षाच्या माझ्या वृद्धापकाळी या निष्कर्षापत आलो की जी माणसे विवाहित आहेत, ज्यांना जीवनसाथीची सोबत आहे, मुलेबाळे आहेत व ती सर्व मुले आपुलकीने वृद्धापकाळी ज्यांची (वृद्ध आईवडिलांची) आपुलकीने काळजी घेत आहेत व अशा मायेच्या वातावरणात वृद्ध आईवडिलांचा मृत्यू आपल्या मुलाबाळांच्या जवळ रहात असताना होत आहे अशी सर्व माणसे आयुष्यात खूप यशस्वी, खूप सुखी समाधानी व खूप नशीबवान आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.११.२०२३