https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

स्थिर जीवन, शांत जीवन!

आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) होणे म्हणजे काय?

आयुष्य स्थिर नाही कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्य स्थिर नाही म्हणून मनही स्थिर नाही. तरीही माणूस स्थिर आयुष्याची व  स्थिर मनाची अपेक्षा करतो. त्यात त्याची चूक नसली तरी स्थिरता ही खूप कठीण गोष्ट आहे.

अज्ञानामुळे माणूस बौद्धिक दृष्ट्या अपंग होतो. बौद्धिक दृष्ट्या अपंग असलेला माणूस मानसिक दृष्ट्या अस्थिर होतो. म्हणून तो शाळा, काॕलेजातून शिक्षण घेऊन व पुढे  त्या ज्ञानाची अनुभव, सरावातून उजळणी करीत राहून आयुष्यात  शैक्षणिक स्थिरत्व आणण्याचा सतत प्रयत्न करतो. पण जगाचे ज्ञान भांडार एवढे मोठे आहे की मनुष्याने त्याच्या छोट्या आयुष्यात मिळवलेले तुटपुंजे ज्ञान आकाराने प्रचंड मोठ्या असलेल्या ज्ञानसागरात क्षुल्लकच राहते. त्यामुळे माणसाला शैक्षणिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही.

नुसते शैक्षणिक स्थिरत्व पुरेसे नसते. माणसाला आर्थिक स्थिरत्वही हवे असते. म्हणून माणूस नोकरी, उद्योग धंदा, व्यवसाय यात सातत्यपूर्ण स्थिरत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याला त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थिरत्व लाभावे. पण समाजात गरीब व श्रीमंत यातील आर्थिक दरी एवढी मोठी आहे की कितीही उच्च शिक्षण घेतले तरी गरिबांना पिढीजात श्रीमंतांएवढे आर्थिक स्थिरत्व आयुष्यभर लाभत नाही. काही माणसांना तर मरेपर्यंत कष्ट करीत रहावे लागते, मग ते कष्ट शारीरिक असो की बौद्धिक.

शैक्षणिक व आर्थिक स्थिरत्वानंतर माणूस कौटुंबिक स्थिरत्वासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी विवाह करून स्वतःचा जीवनसाथी, मुले यांचे छोटेसे कुटुंब बनवतो. पण काही जणांना हे कौटुंबिक स्थिरत्व लाभत नाही. काहींचे घटस्फोट होतात तर काहींची मुले वाया जातात.

सामान्य माणसाला सर्वसाधारणपणे आयुष्यात शैक्षणिक, आर्थिक व कौटुंबिक स्थिरत्व लाभले की तो खूश, सुखी समाधानी होतो. मोठ्या  भांडवलदार व राजकारणी मंडळींची गोष्टच निराळी. त्यांचे आर्थिक व राजकीय स्थैर्य वेगळे असते कारण त्यांची महत्वाकांक्षाही मोठी असते. पण भरपूर संपत्तीतून व राजकीय सत्तेतून त्यांना खरंच आयुष्यात स्थिरत्व व शांती लाभते का हा संशोधनाचा विषय आहे.

काही माणसे देवाधर्माच्या नादी लागून जीवनात आध्यात्मिक शांती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यातून खरंच परमेश्वर सापडतो का व आध्यात्मिक शांती लाभते का हाही संशोधनाचा विषय आहे.

घरातील वस्तू जिथल्या तिथे, नीट नेटक्या ठेवण्याचीही सवय काहींना असते. मी माझी कायद्याची व इतर पुस्तके, तसेच मला विशेष वाटलेली वृत्तपत्रांतील कात्रणे घरात ठराविक जागेवर नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांचे माझ्या मृत्यूनंतर काय होणार? ती बहुतेक रद्दीत जातील. कारण माझी बौद्धिक आवड व घरातील मंडळीची बौद्धिक आवड एकसारखी नाही. अर्थात माझ्या या संकलनाला स्थिरता नाही. जगाच्या प्रचंड मोठ्या ज्ञानभांडारात माझे हे ज्ञानभांडार फारच किरकोळ आहे.

तात्पर्य काय, तर माणूस त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर (सेटल) व्हायला बघतो, पण तो खरंच सेटल होतो का?

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.११.२०२३, कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

FROM HELL TO HEAVEN!

JOURNEY FROM HELL TO HEAVEN ON EARTH!

The Law for human beings is very big challenge from Nature for creating heaven on earth in the midst of hell all around on earth as evolved by Nature and also created by man on earth planet.

The forest life based on rule of survival of fittest is Nature oriented primary hell.

The black economy based on uncivilized and immoral way of human living such as prostitution, gambling etc. & underworld violence arising out of competition to control black economy is man oriented secondary hell.

The heaven is civilized & moral way of human living such as matrimonial sex & family life, lawful industry, trade and commerce etc. and lawful government for regulating such civilized way of human living. This heaven is all time challenge before human mind. The journey from hell to heaven on earth via man is very challenging journey and it still continues as journey because man has not fully succeeded in establishing heaven on earth out of hell on earth.

-©Adv.B.S.More,22.11.2023

दया कर, मदत कर!

दया कर, मदत कर?

निसर्ग हा पालनपोषणाचा पाळणा आहे तसा तो खडतर आव्हानांचा डोंगर आहे. हा पाळणा व डोंगर ही निसर्गातील सर्वोच्च शक्तीची अर्थात परमात्म्याची/परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून निसर्गालाच परमेश्वर मानणे चुकीचे!

इतर सजीव, निर्जीव पदार्थांप्रमाणे माणसे हीही परमेश्वराची लेकरे आहेत. या लेकरांना त्यांच्या माता पित्यांच्या माध्यमातून परमेश्वर काही काळ चमच्याने दूध भरवून आयते जगवतो. पण नंतर मात्र या लेकरांनी आईवडिलांवर कायम अवलंबून राहणे किंवा आयते खात बसणे हे परमेश्वराला बिलकुल मंजूर नाही.

आईवडिलांचा आयता घास खाऊन मोठ्या झालेल्या लेकरांनी स्वतःच्या ताकदीवर आव्हानांचा डोंगर पार करायला किंवा आकाशात उंच भरारी घ्यायला शिकावे लागते. ही नैसर्गिक ताकद परमेश्वराने प्रत्येक लेकराला दिली आहे. त्यात निसर्ग रचनेप्रमाणे कमीजास्त प्रमाण असू शकते. पण जगण्याची व लढण्याची ताकद परमेश्वराने प्रत्येकाला दिली आहे हे मात्र खरे!

सगळ्याचा आईवडिलांना आपली मुले स्वबळावर आव्हानांंचा डोंगर पार करताना किंवा आकाशात उंच भरारी घेताना आवडतात. त्यांना आपली लेकरे पुन्हा पुन्हा रडत घरी परत आलेली व घरात रडत बसलेली आवडत नाहीत. आदर म्हणून त्यांनी आईवडिलांच्या पाया पडून बाहेर पडणे वेगळे व सारखे सारखे त्यांचे रडगाणे आईवडिलांपुढे गात बसणे वेगळे. परमेश्वर तर नश्वर देहाच्या आईवडिलांचाही अनंत काळचा सर्वोच्च आईबाप. त्याला त्याच्या लेकरांनी सारखे त्याच्यापुढे येऊन "दया कर, मदत कर" अशी प्रार्थना करणे कसे बरे आवडेल? त्याला आदरयुक्त नमस्कार करणे वेगळे व त्याच्यापुढे प्रार्थनेतून रडगाणे गाणे वेगळे!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.११.२०२३

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

भूमिका, भौतिक व आध्यात्मिकही!

भूमिका, भौतिक व आध्यात्मिकही!

निसर्गाकडे नुसत्या भौतिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे किंवा नुसत्या आध्यात्मिक दृष्टीनेच बघायचे व वागायचे की दोन्हीच्या संमिश्र दृष्टीने बघायचे व वागायचे हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. मी मात्र परमेश्वर नामक निर्मिका शिवाय निसर्ग नामक निर्मिती नाही अशा तार्किक विचाराने निसर्गाच्या बुडाशी परमेश्वर आहे असे मानतो (मानतो असे म्हणतो कारण निसर्गाच्या बुडाशी असलेल्या सर्वोच्च शक्तीचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व मला वैज्ञानिक पुराव्याने सप्रमाण सिद्ध करता येत नाही).

माझ्या तर्कातला परमेश्वर मला निसर्गात व निसर्गाचाच एक भाग असलेल्या मानव समाजात विविध रूपांत व विविध गुणधर्मी क्रियांत दिसतो. तसाच तो निरनिराळ्या धर्मांनी वर्णिलेल्या विविध रूपांतही दिसतो. पण परमेश्वराची ही विविध रूपे आठवत, आळवत, त्याच्या विविध रूपांच्या विविध जपमाळा ओढत बसायचे की या सगळ्या रूपांत एकाच परमेश्वराला बघायचे हाही ज्याच्या त्याच्या बुद्धीचा व भावनेचा प्रश्न. त्याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यात कोणी लुडबूड करणे टाळावे.

निसर्गात व मानव समाजात संतुलन साधण्याच्या निसर्गातील सर्वोच्च शक्तीच्या (परमेश्वराच्या) अनेक पद्धती आहेत. त्यावर बौद्धिक विचारमंथन तरी किती करायचे? जंगलात तृणभक्षी प्राण्यांना हिंस्त्र मांसभक्षी प्राणी क्रूरपणे शिकार करून खातात हीही निसर्गातील त्या परमेश्वराची बळी तो कानपिळी या  जंगली नियमावर आधारित जंगलात संतुलन साधण्याची पद्धत आहे.

पण मनुष्य प्राण्याला परमेश्वराने उदात्त भावना व श्रेष्ठ बुद्धी दिल्याने मानव जगतात हा जंगली नियम अंमलात आणणे अमानवी होय. मनुष्य म्हणून आयुष्य जगताना दोन प्रमुख पर्याय परमेश्वराने मनुष्याच्या बौद्धिक विचारांसाठी ठेवले आहेत. ते म्हणजे सुज्ञ, समंजस, विवेकी (रॕशनल) वैचारिक धोरणाने चांगल्या आर्थिक सहकार्यातून शांततामय सहजीवन (पिसफुल कोएक्झीस्टंस) स्वीकारायचे की आर्थिक, राजकीय  दोन्ही स्तरावर प्रचंड मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तारवादी, आक्रमक, अविवेकी, हुकूमशाही वैचारिक धोरणाने जंगलातील "बळी तो कानपिळी" हा कनिष्ठ नियम स्वीकारून राजकीय संघर्षातून  विध्वंसक भूमिका घेत अशांत जीवन जगायचे, हे दोन्ही पर्याय मानवापुढे आहेत. मानव समाजाच्या माध्यमातून निसर्गात व समाजात संतुलन साधण्याची परमेश्वराची उच्च पातळीवरील हीही एक पद्धत आहे. सुसंस्कृत मानव समाजाकडून परमेश्वराच्या या पद्धतीचा सुज्ञपणे विचार केला जाऊन शांततामय सहजीवनाचा श्रेष्ठ पर्याय स्वीकारला गेलाय. पण या चांगल्या निर्णयात खोडा घालणारे काही विघ्नसंतोषी लोक असतात व त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुसंस्कृत समाज कायद्याला पार पाडावे लागते. हे काम चोखपणे पार पाडण्यासाठी मानव समाजातील कायदा रक्षक आस्तिक बनून परमेश्वराचे नाव घेतील किंवा परमेश्वराचे अस्तित्व नाकारून नास्तिक बनून परमेश्वराचे नाव घेणारही नाहीत. ते स्वातंत्र्य त्या सर्वोच्च निर्मिक शक्तीने मानवाला दिले आहे.

मी मात्र परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून निसर्गाकडे व त्याचाच भाग असलेल्या मानव समाजाकडे व त्यातील घटनांकडे, घडामोडींकडे परमेश्वराची लीला म्हणून बघतो व याच लीलेचा भाग म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेला माझ्या बौद्धिक कुवतीनुसार व वैयक्तिक ताकदीनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ती भूमिका पार पाडताना परमेश्वर हा माझा आधार, सोबती, सांगाती असा आध्यात्मिक विचार करतो. तसा विचार करताना या जगातील प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याची बौद्धिक कुवत व प्रत्येक प्रश्न सोडविण्याची ताकद माझ्याकडे नाही हे वास्तव स्वीकारून बऱ्याच गोष्टी जगावर व जगाचा कर्ता व करविता असलेल्या परमेश्वरावर टाकून/सोडून मोकळा होतो. छोट्या गोष्टी मोठ्या करण्याचा व मोठ्या गोष्टी छोट्या करण्याचा जेंव्हा जेंव्हा माझ्या मनाला मोह होतो तेंव्हा तेंव्हा त्यातून सावरण्यासाठी मी माझ्या  बुद्धीची सांगड परमेश्वराच्या सोबत,  आधाराशी घालतो. माझी भूमिका अशाप्रकारे भौतिक आहे तशी ती आध्यात्मिकही आहे. निसर्गात अधूनमधून नैसर्गिक आपत्ती येत असतात तशा मानव समाजातही अधूनमधून विकृत, समाज विघातक व विध्वंसक घटना घडतच असतात. पण केवळ त्यावरून निसर्गातील परमेश्वराचे अस्तित्व नाकारायचे हे मला मान्य नाही. कारण या वाईट, भीतीदायक घडामोडी, घटना कायम नसतात. त्या तात्पुरत्या असतात. सर्वोच्च परमेश्वरी शक्तीकडून पुन्हा संतुलन साधले जाते अशी माझी वैयक्तिक आध्यात्मिक श्रद्धा आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.११.२०२३

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

नुसते शिक्षण ही पाॕवर नव्हे!

नुसते शिक्षण ही पाॕवर नव्हे!

बौद्धिक हुशारीवर उच्च शिक्षण घेता येईलही पण त्या उच्च शिक्षणाला साजेल अशा मोठ्या कामांचा सराव  करण्याची संधी जर अशा सुशिक्षित माणसाला सातत्याने मिळाली नाही तर त्याचे उच्च शिक्षण वाया जाऊ शकते. उच्च शिक्षणाचा सातत्यपूर्ण सराव होण्यासाठी त्या शिक्षणाला योग्य अशा उच्च दर्जाच्या मोठ्या कामांची सातत्यपूर्ण संधी मिळणे आवश्यक असते. उच्च शिक्षणाला मोठे आर्थिक व राजकीय पाठबळ मिळाले तर अशा शिक्षणाचे सोने व्हायला वेळ लागत नाही. नाहीतर अशा शिक्षणाची माती होऊ शकते. मग डोक्यात सतत मोठ्या कामांचे विचार पण हातात मात्र छोटी कामे या वास्तवाशी जुळवून घेता घेता ती छोटी कामेही नीट होत नाहीत व मग छोटी कामेच मोठ्या कामांसारखी करण्याचे मंत्रचळी वेड मनाला लागू शकते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.११.२०२३

उत्साह, शक्ती, शांती!

उत्साह, शक्ती, शांती!

स्वतःच स्वतःवर लादून घेतलेल्या कृत्रिम गोष्टी उतार वयात टाळण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामध्ये मानव जगतातले अव्यावहारिक, निरर्थक, बिनकामाचे, निरूपयोगी, उपद्रवी संबंध कमी करणे हेही आले. पण निसर्गाने शरीर, मनावर लादलेल्या काही नैसर्गिक गोष्टी अशा आहेत की त्या दुर्लक्षित करून टाळता येत नाहीत. त्या पार पाडण्यासाठी मला निसर्गातील सर्वोच्च शक्तीकडून म्हणजे परमेश्वराकडून मर्यादित का असेना पण उत्साह, शक्ती व शांती हवीय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.११.२०२३

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

निरागस मुलगी!

निरागस मुलगी!

डिलाईल रोड महाराष्ट्र हायस्कूल मैदानाशेजारील करी रोड स्टेशनकडे जाणारी डिलाईल रोडची फूटपाथ. एक साधारण १६ वर्षे वयाची एक निरागस मुलगी छोट्या टेबलावर  घरगुती भाजी पोळी विकत उभी. बहुतेक इयत्ता दहावीत असावी. "मुली, काय काय आहे तुझ्याकडे", मी. "काका, चवळीची सुकी भाजी, राजमाची पातळ भाजी व चपाती आहे, आज मला यायला थोडा उशीरच झाला", ती मुलगी. "अगं, पण मला मच्छी हवी होती, आता मला त्या शेजारच्या महागड्या हॉटेलात जावे लागेल मच्छी घ्यायला आणि तुझ्याकडे मस्त घरगुती मच्छी स्वस्तात मिळेल म्हणून आलो इथे", मी. "काका, हो ते हॉटेल महाग आहे पण तुम्ही बुधवारी या, इथे स्वस्तात छान मच्छी मिळेल, त्या हॉटेलात १३० रूपयात मिळणारा तळलेला बांगडा त्यापेक्षाही छान घरगुती पद्धतीचा माझ्याकडे ५० रूपयात मिळेल, पण आज शाकाहारी भाजी, चपाती घेऊन जा", ती. "बरं, पण मला ती सुकी चवळीची भाजी नको, पातळ राजमाची भाजी दे, चपात्या घरी बायकोने करून ठेवल्यात, ती भाजी केवढ्याला?", मी. "काका, २० रू.". मी तिच्याकडून फक्त २० रूपयाची राजमाची पातळ भाजी घेतली व निरोप घ्यायला लागलो तेंव्हा ती म्हणाली "काका, बुधवारी या, मच्छी मिळेल". हो म्हणून मी तिचा निरोप घेतला.

आता तुम्ही म्हणाल की, हा अनुभव  तर सगळ्यांनाच येतो मग तो लिहून का सांगितला? सांगितला कारण यात मुद्दा दृष्टिकोनाचा व छोट्या गोष्टींतही मोठा आनंद घेण्याचा आहे. त्या मुलीची निरागसता व प्रामाणिकपणा मला भावला. असे संभाषण करायला मला आवडते. पण त्यासाठी अशा सरळ मनाची, निरागस स्वभावाची, प्रामाणिक माणसे मिळणे दुर्मिळ झालेय. किती श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व किती पोपटपंची राजकारणी असे सरळ मिळतील? मला संभाषणासाठी ढोंगी, खोटी माणसे आवडत नाहीत तर माझ्या या लेखातील सरळसाध्या मुलीसारखी माणसे संभाषणासाठी आवडतात म्हणून हा अनुभव शेअर केला.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.११.२०२३