https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०

सोपान मोरे, माझा डॕशिंग बाप!

सोपान मोरे या डॕशिंग बापाचा मुलगा आहेस तू!

शिक्षण सातवी, बलभीम नागटिळक या मामाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील  साडे खेडेगावातून मुंबईत आणलेला मुलगा, मग व्हिक्टोरिया मिलमध्ये बदली कामगार म्हणून नोकरी, चौकस बुद्धीमत्ता, वृत्तपत्रीय वाचनातून परिसर अभ्यास, स्वतःच विकसित केलेली वक्तृत्व कला, मग राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगार पुढारी म्हणून नाव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर जवळून उठबस आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही पाठबळाशिवाय फक्त आणि फक्त स्वतःच्या हिंमतीवर, कर्तुत्वावर मिळवून एक आदरयुक्त दरारा निर्माण केलेला डॕशिंग माणूस म्हणजे माझा बाप सोपान मारूती मोरे! त्याच्या तालमीत तयार झालेला गडी आहेस रे तू. या माझ्या बापाने कोणाची पर्वा केली नाही. जे स्वतःला पटले तेच करीत पुढे गेला. ज्यांना हे जमले नाही ते मागे राहिले, माझ्या बापाला वचकून राहिले. बाहेरच्या माणसांना ओळखून त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेऊन थोडे लांबच राहिलेल्या माझ्या बापाने नातेवाईकांना सुद्धा हातभर लांब ठेवले व एकटा स्वतःच्या रूबाबात राहून स्वतःचा आब राखून जगला माझा बाप! मग भले त्याला नातेवाईक काहीही म्हणोत. कारण कामगार पुढारी म्हणून मिळविलेले स्थान हे बापाने स्वकर्तुत्वावर मिळविले होते. कोणा नेत्यांची हाजी हाजी केली नाही की कोणा नातेवाईकाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून चिडचिड केली नाही, मग का करावी कोणाची पर्वा! संसार केला आणि जमेल तेवढे माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, पण घरात कोणाचेच अतिरेकी लाड केले नाहीत. माझी आई (चंद्रभागा सोपान मोरे) ही ढवळस गावची पूर्ण अशिक्षित, अंगठे बहाद्दर स्त्री असल्याने माझ्या बापाला कामगारांचे पुढारीपण करताना बायकोकडून जो काही थोडाफार मानसिक आधार लागतो तो पण मिळाला नाही. पण ती बिच्चारी घरात तिच्या थोरल्या बहिणी बरोबर खाणावळ घालून संसारात कष्ट उपसत होती. माझ्या बापाला कौटुंबिक जिव्हाळा होता पण त्यात अतिरेकी भावनाप्रधानता नव्हती. स्वतःच्या कुटुंबाविषयी माझ्या बापाचे हे कडक धोरण, मग दुसऱ्या  नातेवाईकांचे तर विचारूच नका. माझ्या डॕशिंग बापाच्या ओळखी मोठ्या, मग त्या ओळखीचा फायदा करून घेण्यासाठी गुळाला मुंगळे जसे चिकटतात तसे हळूच चिकटलेले काही मुंगळे त्यांचा फायदा झाला की माझ्या बापाला टाटा करून गेले व विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरे काय! माझ्या बापाच्या याच खंबीला पावलावर पाऊल टाकून मी जगत आलोय. बापाचे क्षेत्र राजकीय तर कायद्याच्या उच्च शिक्षणामुळे माझे क्षेत्र वकिली! पण दोन्हीही क्षेत्रे ही सामाजिकच! माझ्या बापासारखाच माझा स्वभाव! मग कोणाची बॉसिंग मी काय सहन करून घेणार! डझनभर नोकऱ्या मी मिळविल्या पण बॉस लोकांची दादागिरी सहन झाली नाही की त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून देऊन त्यांना रामराम करीत सोडल्या.  घरात कोणीही वकील, न्यायाधीश नसताना किंवा इतर कोणत्याही मित्राचा, नातेवाईकांचा पाठिंबा नसताना हिंमतीने वकिलीत पडलो. बायको गावची बारावी शिकलेली मुलगी व गृहिणी. त्यात मुलगी झालेली. बायकोच्या नातेवाईकांनीही माझ्या या भलत्या धाडसामुळे (काहींनी याला खाता पंढरी अशी नावे ठेवली) मला त्यांच्यापासून हातभर लांब ठेवले. या  वकिलीत सगळीकडून प्रतिकूल परिस्थिती, सगळा अंधार! त्यातून हळूहळू शिकत गेलो व गेली ३२ वर्षे वकिलीत पाय घट्ट रोवून उभा आहे. खडतर परिश्रम घेतले पण अशिलांकडून फी कशी वसूल करायची याची अक्कल नाही. मग या कोर्टातून त्या कोर्टात वणवण व सतत पैशाची चणचण! पण तरीही कसाबसा संसार केला. एकुलत्या एक मुलीला एम.बी.ए. चे उच्च शिक्षण देण्यासाठी जमेल तेवढे आर्थिक पाठबळ व प्रोत्साहन दिले. तिनेही स्वकर्तुत्वावर ते उच्च शिक्षण घेऊन मग मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदाची नोकरी मिळवली. सांगायचे तात्पर्य काय, तर माझा फक्त सातवी शिकलेला डॕशिंग बाप, हिंमत करून वकील झालेला मी स्वतः व एम.बी.ए. चे शिक्षण घेऊन व्यवस्थापक झालेली माझी मुलगी ही प्रगतीची चढती कमान आहे. हे यश कोणतेही माध्यम छापून आणणार नाही कारण तिथे माझी जरा सुद्धा पोहोच नाही. पण गरजच काय मोठ्या माध्यमात जायची. समाज माध्यम आहे ना माझ्या जवळ माझे हे सत्य सांगण्यासाठी! अरे रूबाबात जग रे, भरपूर यश मिळवलेस तू आयुष्यात!

(माझ्या हयात नसलेल्या डॕशिंग बापाचा व माझ्या हयात नसलेल्या अशिक्षित पण अत्यंत प्रेमळ असलेल्या आईचा फोटो समोर ठेऊन स्वतःच स्वतःशी केलेले हे स्वगत आहे. माझ्या बापाला वडील म्हणण्याऐवजी मी या लेखात बाप म्हटलेय कारण तो बाप माणूस होता. एका फोटोत माझा बाप राष्ट्रीय नेते श्री. पी.ए. संगमा यांच्याबरोबर खळखळून हसताना जेंव्हा मी बघतो तेंव्हा उतार वयातही (६४) मला शक्ती मिळते).

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.

(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.

(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा  मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.

(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.

(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या  एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०


मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?

(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!

(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या  पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र  प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.

(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.

(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.

(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.

(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी  म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.

(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.

(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.

(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.

(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

विज्ञान व धर्म!

मानवी शरीर एक विज्ञान तर धर्म मानवी आत्मा!

निसर्गाचे विज्ञान काय आहे तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र. जीवशास्त्राचा मुख्य भाग आहे जैविक वासना. या तिन्ही शास्त्रांच्या वापरात भावनेला थारा नाही. तिथे लागते ती फक्त बुद्धी! म्हणजे विज्ञानात फक्त बुद्धीला महत्व आहे. या बुद्धीला तांत्रिक बुद्धी असे म्हणता येईल.

पण माणूस हा असा एकमेव प्राणी निसर्गातून निर्माण झाला आहे की तो फक्त विज्ञानावर जगू शकत नाही. त्याला निसर्गाच्या विज्ञानासोबत देवाचा धर्म लागतो. देवाचा धर्म काय आहे तर तो मानवी भावना व मानवी बुद्धी यांचे मिश्रण आहे. धार्मिक बुद्धी ही भावनिक बुद्धी असते जी तांत्रिक बुद्धीला आध्यात्मिक वळण देते. उदाहरणार्थ, स्त्री पुरूषातील लैंगिक वासनेचे समाधान करण्यासाठी तांत्रिक बुद्धी जेंव्हा पुढे सरसावते तेंव्हा धार्मिक बुद्धी तांत्रिक बुद्धीला स्वैराचार, बलात्कार करण्यापासून रोखते. ही गोष्ट मनुष्याला योग्य नाही असे बजावून त्यास प्रतिबंध करते.

मानवाने निसर्ग विज्ञानात सुशिक्षित होऊन विज्ञान व तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली आहे. पण त्याचबरोबर मानवाने देव धर्मात सुसंस्कृत होऊन धर्म व कायद्यातही खूप प्रगती केली आहे. धर्म हाच कायद्याचा मुख्य आधार आहे जो विज्ञानाला आध्यात्मिक वळण देतो. खरं तर धर्म हाच मनुष्याला जनावरांपासून वेगळा करतो. जे लोक निसर्गातील देवाचे अस्तित्व मान्य करीत नाहीत (नास्तिक लोक) त्यांनाही धर्माचा आधार घ्यावाच लागतो ज्याला ते मानव धर्म असे नाव देतात.

मनुष्याला भावना नसत्या व जनावरांप्रमाणे नुसत्या वासनाच असत्या तर जगात कोणताही धर्म व कायदा दिसला नसता. सगळी माणसे फक्त निसर्गाचे मूलभूत विज्ञान व त्यासंबंधीची तांत्रिक बुद्धी यावरच जनावरांचे जंगली जीवन जगली असती. ते जंगली जीवन नको असेल अर्थात मानव समाजात बळी तो कानपिळी या जंगली वैज्ञानिक नियमानुसार खून,बलात्कार, अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार यांचे थैमान नको असेल तर मानवाला विज्ञान व तंत्रज्ञानावर धर्म व कायद्याचे वर्चस्व अर्थात तांत्रिक बुद्धीवर धार्मिक बुद्धीचा कठोर वचक निर्माण करता आला पाहिजे व तोही कायमचा! कारण मानवी शरीर व मन निसर्ग विज्ञानाचा भाग असले तरी धर्म हा मानवी आत्मा आहे! थोडक्यात मानवी शरीर एक विज्ञान तर धर्म मानवी आत्मा!

-ॲड.बी.एस.मोरे©५.१२.२०२१

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कट्टरता अनैसर्गिक!

सामायिक साखळीत कट्टरतेला थारा नाही!

निसर्गातील विविधता मानव समाजात आलीय. निसर्गातील विविधतेत असलेले विशेष ज्ञान मिळवून त्या ज्ञानात प्रावीण्य मिळवून माणसे त्या त्या विषयातील तज्ज्ञ (स्पेशालिस्ट) होतात. या तज्ज्ञ मंडळीमुळे मानव समाजात विविधता निर्माण होते.

समाजात विविध प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीची विविधता व तिची विशेषतः निर्माण झाली आहे. विशिष्ट प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीशी विशेष भावनिक जवळीक निर्माण झाली की त्यातून जी विशेष जाणीव निर्माण होते तिला अस्मिता म्हणतात. अस्मिता माणसाला त्या अस्मितेशी चिकटून रहायला व तिच्याशी काटेकोर रहायला शिकवते. त्यातून मानव समाजात तुकड्या तुकड्यांची कट्टरता निर्माण होते. ही कट्टरता अस्मितेचा अभिमान नाही तर गर्व करायला शिकवते. ही गर्वाची भावना अस्मितेचा अहंकार फुलवते जो समाज एकतेसाठी घातक असतो.

निसर्गात विविधता व विशेषतः असली तरी त्या विशेषतेची कट्टरता आहे का हा अभ्यासाचा विषय आहे. निसर्ग हा सर्वसमावेशक आहे. तो कोणत्याही विशेष पदार्थाला व त्याच्या विशेष गुणधर्माला कट्टर होऊ देत नाही. या नैसर्गिक सत्यावर आधारित "शेरास सव्वाशेर" ही म्हण  निर्माण झाली आहे. निसर्गाने विविधतेला एकत्र ठेवण्यासाठी समरसतेची एक साखळी निर्माण केली आहे. विविधता म्हणजे असमानता. पण या असमानतेतच सामायिक साखळी निर्माण करून निसर्गाने अटीशर्तीची समता (समानता) निर्माण केली आहे. कायद्यापुढे सर्व समान याचा अर्थ निसर्गापुढे सर्व समान. सामायिक  साखळीत निसर्ग कोणाचीही कट्टरता चालू देत नाही.

विविधतेची अर्थात विशेषतेची एकजूट करणे म्हणजे विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशनचे) सामान्यीकरण (जनरलायझेशन) करणे. निसर्ग तेच करतोय व मानव समाजालाही तेच करावे लागतेय. सामान्यीकरणात विशेषतेला भाव असला तरी तिच्या कट्टरतेला थारा नसतो. तिथे शेरास सव्वाशेर ही व्यावहारिक म्हण प्रत्यक्षात कार्यरत असते. म्हणून तर कोणत्याही विशेष गोष्टीला अतिशय महत्व देणे किंवा तिच्याबद्दल एकदम काटेकोर (कट्टर) राहणे चूक!

एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट विषयात विशेष प्रावीण्य मिळवून त्या विषयात जरी तज्ज्ञ होऊ शकला तरी तो विविधतेने युक्त असलेल्या सर्व विषयात तज्ज्ञ होऊ शकत नाही. त्या अर्थाने मानव समाजातील सर्व व्यक्ती ज्ञान व कौशल्य यांच्या बाबतीत मरेपर्यंत सर्वसामान्य राहतात व सामान्य होऊन सामायिक साखळीला जोडल्या जातात. नैसर्गिकरीत्या सामायिक साखळीला असे जोडले गेल्यानंतर सर्व विषयातच नव्हे तर विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विषयाशी सुद्धा काटेकोर (कट्टर) राहण्याचा अट्टाहास करणे हे चुकीचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१२.२०२१

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

सुखाने संसार करा!

सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

मानवी लैंगिकता व पुनरूत्पादन या नैसर्गिक क्रिया. या क्रियेवर सामाजिक शिस्तीचे बंधन घालण्याच्या उद्देशाने निर्माण झाली ती विवाह संस्था. या विवाह संस्थेतील कौटुंबिक व्यवहार नियंत्रित करणारा कायदा तो विवाह कायदा. विवाह कायदा हा नागरी (सिव्हिल) कायदा होय. मानवी लैंगिकतेच्या अतिरेकावर कठोर बंधन घालणारे फौजदारी कायदे सुद्धा मानव समाजाने निर्माण केले आहेत. उदा. बलात्कार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायदा, मानवी तस्करी (जबरदस्तीने वेश्या व्यवसाय) कायदा इ.

विवाह बंधनात राहून संसार करणे हा जसा एक निर्मळ आनंद आहे तसे ते एक आव्हानही आहे कारण या बंधनात हक्क व कर्तव्ये यांच्यात समतोल साधण्याची कसरत नवरा व बायको दोघांनाही करावी लागते. ही कसरत ज्यांना नकोशी वाटते किंवा नीट जमत नाही ते विवाह बंधन तोडण्याच्या दिशेनेच विचार करून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एक वकील म्हणून घटस्फोट टाळण्याकडे मी नेहमीच प्रयत्नशील असतो. कारण घटस्फोट ही अत्यंत गंभीर परिस्थितीत निर्णय घेण्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, नवरा बायको पैकी कोणी मनोरूग्ण असणे, पुरूषाची नपुंसकता, नवरा बायको पैकी कोणी व्यभिचारी असणे, सासर कडून हुंड्यासाठी होणार छळ, स्त्रीला चूल व मूल या कामापुरतीच समजून पुरूष प्रधान सासरकडून स्त्रीला मिळणारी कनिष्ठ  वागणूक इत्यादी. माझा मुख्य मुद्दा किरकोळ कारणांवरून नवरा बायकोत होणाऱ्या भांडणा पुरता मर्यादित आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाणे, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे तिला तिच्या आईवडिलांनी म्हणणे, तसेच लग्न झाल्यावर मुलीने माहेरचे नाव सोडून देऊन नवऱ्याचे नाव व आडनाव लावणे ही पारंपरिक पद्धत आपल्याकडे अजून सुरूच आहे व ती बहुसंख्येने स्वीकारली गेली आहे.

प्रश्न हा आहे की मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेंव्हा ती आपल्या आईवडिलांना सोडून तर जात असतेच पण मोठ्या विश्वासाने आपले जीवन नवऱ्याला समर्पित करताना एकदम नवख्या घरात प्रवेश करीत असते. त्यामुळे तिला सुरूवातीला असुरक्षित वाटणे हे अगदी साहजिक आहे. त्यात जर सासरची मंडळी तिला स्वतःच्या मुलीसारखी वागणूक न देता परक्यासारखी वागणूक देऊ लागली तर संसार तणावपूर्ण होतो. अशावेळी नवऱ्या मुलाने स्वतःचे आईवडील, भाऊ, बहिणी व आपली बायको यांच्यात संतुलन साधायचे काम केले पाहिजे. ही गोष्ट खूप अवघड असते. खूप मोठे एकत्र कुटुंब असेल तर तिच्या आईवडिलांना सोडून संसार करायला आलेली मुलगी एकटी पडते. अशावेळी जर घाबरून तिने तिच्या आईवडिलांना फोन केले तर तिच्यावर संशय न घेता तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोणतेही आईवडील आपल्या मुलीचा संसार मोडावा असा प्रयत्न करणार नाहीत. तेंव्हा मुलीच्या संसारात मुलीची आई लुडबूड करून तिच्या संसारात आग लावते असा सर्वसाधारण  आरोप करणे चुकीचे आहे. मुलीच्या आईकडे बोट दाखवताना मुलाची आई अगदी गरीब गाय असते असा निष्कर्ष कोणी काढू नये. टाळी एका हाताने वाजत नसते. अशाही केसेस मी पाहिल्या आहेत की मुलगा जर एकुलता एक असेल तर अशा मुलाच्या आईला आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करते की काय अशी भीती वाटल्याने अशी सासू सुनेला जाच करीत राहते. अशावेळी आईलाही सोडता येत नाही व बायकोला घेऊन वेगळेही राहता येत नाही अशी मुलाची पंचाईत होऊन जाते. याला अवघड जागेचे दुखणे म्हणतात. काही वेळा नवरा बायकोच्या किरकोळ भांडणात मुलाचे आईवडील, नातेवाईक नाक खुपसतात तसे मुलीचे आईवडील, नातेवाईकही नाक खुपसतात. नवरा बायकोच्या भांडणात असे इतरांनी नाक खुपसल्याने प्रश्न अवघड होऊन बसतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे खरे आहे. कोणीही फक्त मुलीच्या आईवडिलांना किंवा फक्त मुलाच्या आईवडिलांना दोष देऊन मोकळे होऊ नये. पण शेवटी मुलगी ही तिच्या आईवडिलांना सोडून सासरच्या घरी संसार करायला आलेली असते. त्यामुळे सुरूवातीला तरी तिची बाजू कमकुवत असते हे विसरता कामा नये.

मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ एवढाच की लग्न करताना मुलाने व मुलीने नीट विचार करून लग्न करावे. एकदा लग्न केले की मग हे लग्न कायम टिकलेच पाहिजे हाच तो विचार असावा म्हणजे लग्नापूर्वी शिक्षण, आर्थिक पाया, दोन्ही कडील कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास, विचार करूनच लग्न करावे. दोघे नवरा बायको जर समविचारी, एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना समजून घेणारे असतील तर त्यांच्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू शकत नाही मग ते मुलाचे आईवडील असोत, मुलीचे आईवडील असोत की आणखी कोणी!

माझ्या वकिलीत वैवाहिक केसेस मध्ये मी जास्तीतजास्त संसार जोडण्याचेच प्रयत्न केले आहेत. मी नेहमी दोन्हीकडची माणसे एकत्र बोलावून दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोन्ही बाजूंना त्यांचे प्रश्न काय आहेत व त्यावर कायदा काय म्हणतो हे नीट समजावून सांगतो व मग समेट घडवून आणतो. ज्यांचे संसार मी जुळवले ती मंडळी अजूनही माझे नाव काढतात. एका केसमध्ये तर नवरा उद्योजक व बायको वकील होती. मी नवऱ्याचे वकीलपत्र स्वीकारले होते. तरी मी एका हॉटेलात नवरा व बायको दोघांना चहा प्यायला या, मला दोघांचे म्हणणे एकत्र ऐकायचे आहे असे सांगितले. तेंव्हा दोघांनी माझे म्हणणे ऐकले. त्या एकाच बैठकीत मी दोघांनाही त्यांच्या चुका समजावून सांगितल्या व आयुष्य खूप छोटे आहे, मस्त मजेत एकत्र संसार करा हे समजावून सांगितले. दोघांनाही ते मनापासून पटले. मग त्यांची घटस्फोटाची केस तडजोडीने मागे घेत असल्याचा अर्ज कोर्टात देऊन कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी दोघांत समेट घडवून आणला. आज ते दोघेही नवरा बायको आनंदात संसार करीत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा इंजिनियर झाला आहे व दोघेही नवरा बायको मला अधूनमधून फोन करून सांगतात की "सर, आमच्या मुलाचे लग्न जेंव्हा कधी ठरेल तेंव्हा आमच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद द्यायला तुम्हाला लग्न कुठेही असले तरी यावेच लागेल"! वकिलीतला हा आनंद मला जीवनाचे खूप मोठे समाधान देतो.

माझे पती व पत्नी दोघांनाही एवढेच सांगणे की विवाह, संसार, मुलांचे संगोपन हा अनुभव खरं तर स्वर्गसुख आहे. तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांचे आधार आहात. संसारातील किरकोळ भांडणे स्वतःच मिटवा. तुमच्या संसारात कोणालाही नाक खुपसू देऊ नका मग ते तुमचे आईवडील का असेनात! सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१