निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!
(१) मानवी शरीराच्या शरीरग्रंथीतून जसे स्त्राव स्त्रवतात तसे मनाच्या कप्प्यातूनही वासना व भावनांचे रस स्त्रवतात. अर्थात मानवी शरीराचे जसे रसायनशास्त्र असते तसे मानवी मनाचेही रसायनशास्त्र असते. मनाचे रसायनशास्त्र हे मानवी मनाच्या वासना व भावना यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.
(२) साहित्य व कलेत नऊ रसांचे वर्णन केले आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या सकारात्मक भावना, अहंकार, तिरस्कार, क्रोध, सूड यासारख्या नकारात्मक भावना, लैंगिक आकर्षण, तहान, भूक, झोप यासारख्या मूळ भौतिक वासना यांच्या रसांनी मानवी मन तुडुंब भरलेले असते. या सकारात्मक व नकारात्मक भावना आणि मूलभूत भौतिक वासना यातून मनात नऊ रस तयार होतात ते खालीलप्रमाणे.
(क)शृंगार रसः लैंगिक आकर्षण/कामवासना
(ख)वीर रसः उत्साह, पराक्रम, शौर्य
(ग)करूण रसः शोक, वियोग, दुःख, संकट
(घ)हास्य रसः विसंगती, विडंबन, विनोद
(च)रौद्र रसः अतिशय क्रोध, चीड
(छ)भयानक रसः हिंस्त्रपणा, राक्षसी वृत्ती
(ज)बीभत्स रसः किळस, वीट, तिटकारा
(झ)अद्भुत रसः विस्मय, आश्चर्य
(ट)शांत रसः निसर्गशक्तीची/ईश्वराची भक्ती
(३) मानवी मनातील वरील नऊ रसांपैकी नववा जो शांत रस आहे त्याला भक्ती रस असेही म्हणता येईल. या भक्ती रसातूनच मानवी मन ईश्वर चिंतन करून शांती मिळविण्याचा प्रयत्न करते. हाच भक्ती रस मनुष्याला निसर्गात देव दर्शन घडवून आणतो. पण निसर्गातील देवाला माणसाने सतत भक्ती रसात बुडून रहावे असे बिलकुल वाटत नाही. तसे असते तर त्या देवाने इतर आठ रस निर्माणच केले नसते.
(४) नवग्रह, नवरंग, नवरस आणि आता देवीचा सुरू असलेला नवरात्रोत्सव यात नऊ हा अंक महत्त्वाचा! कला, साहित्यातील नवरस हे तर निसर्ग शक्तीचेच किंवा निसर्गातील ईश्वराचेच आविष्कार आहेत. मानवी मनाचे रसायनशास्त्र या आविष्काराचाच अभ्यास करते.
(५) वर लिहिलेले नवरस हा निसर्गाच्या विविध पदार्थांचा, विविध रूप व गुणांचा व त्यांच्या विविध वैशिष्ट्यांचा भाग आहे. हे नवरस त्यांची विशेषतः गाजवायला लागले की त्यांना त्यांच्या मर्यादेची आठवण करून देऊन त्यांना संतुलित करीत वठणीवर आणणारा निसर्गाचा सर्वव्यापी कठोर कायदा हाच निसर्गाचा सर्वोच्च हुकूम होय. या हुकूमाची अर्थात निसर्गाच्या सर्वव्यापी कठोर कायद्याची प्रॕक्टिस करणारा वकील हा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा व कणखर मनाचा असावा लागतो!
-ॲड.बी.एस.मोरे©२०.१०.२०२०