https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

मी तसा भित्राच!

मी तसा भित्राच!

पुरूषांनी घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकताना काळजी घ्यावी व शक्यतो असे फोटो टाकू नयेत याविषयी मी आज दोन पोस्टस फेसबुकवर लिहिल्या. त्यावर पाठिंबा व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या कमेंटस आल्याने माझ्या या दोन्ही पोस्टस स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरल्या. या दोन्ही पोस्टसमुळे मी मागासलेला, जुनाट विचाराचा आहे असाही समज निर्माण झाला. याविषयी मला एवढेच म्हणायचे आहे की, मला जे योग्य वाटले ते मी लिहिले. कोणत्याही स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा घालणे हा जर भित्रेपणा असेल तर तो मी माझ्यापुरता जरूर करणार व मी तसा भित्रा आहे असे जाहीरपणे लोकांना सांगणार. मग लोकच ठरवतील की माझ्याशी मैत्री करायची की नाही व केली असेल तर ती ठेवायची की नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

फेसबुकवर घरातील स्त्रियांचे फोटो?

#challenge
फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो पुरूषांनी शेअर करावेत की करू नयेत, एक आव्हान!

ज्या लोकांना आपल्या बायको, मुली, सूना, आया बहिणींचे फोटो फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर एक आव्हान व मर्दुमकी म्हणून बिनधास्त टाकायचेत त्यांनी ते खुशाल टाकावे. कोणी फेसबुक इनबॉक्स मध्ये काय केले हे बघण्यापेक्षा अशा व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी पटतायत का बुद्धीला ही गोष्ट महत्त्वाची. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हलकट टोळीच्या हनी ट्रॕपमध्ये मीही एकदा सापडलो. आता लोक म्हणतील काका पण चाबरट आहेत. मग कशाला मोठ्या गोष्टी करतात आणि लोकांना शहाणपण शिकवतात. पण मीही माणूस आहे. मी फसलो, चुकलो पण घाबरलो नाही. भले भले चुकतात त्यात माझे काय? चुकलो म्हणजे चुकलो? पण मी आता आदळाआपट करीत नाही तर माझ्या चुकीतून लोकांना सावध करतो. काय केले असेल त्या हनी ट्रॕप टोळीने! माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझे बायको बरोबरचे जे फोटो फेसबुकवर टाकले होते तेच मला व्हॉटसॲपवर पाठवून देऊन मला पैसे मागितले. मग मी ते संभाषण वगैरेचे स्क्रीन शॉटस घेऊन डोंबिवली पोलीस स्टेशन व ठाणे सायबर गुन्हे शाखेस लगेच ईमेलने लेखी तक्रार केली. आता ती टोळी मी त्यांच्या धमकीला जुमानले नाही म्हणून माझ्या बायकोच्या फोटोंचा कदाचित गैरवापरही करतील. मग विचार आला की बायकोचे फोटो फेसबुकवर टाकले नसते तर बरे झाले असते. मी नंतर माझ्या बायकोचे ते सगळे फोटो फेसबुकवरून डिलिट केले. माझ्या मुलीने तर मला सक्त ताकीद दिलीय की तिचे फोटो कधीही फेसबुक किंवा कोणत्याच समाज माध्यमावर टाकायचे नाहीत म्हणून. मुलगी एम.बी.ए. व मोठ्या कंपनीची व्यवस्थापक आहे. पण ती जेंव्हा मला हे सांगते तेंव्हा ती मागासलेल्या विचाराची झाली का? फेसबुकवर काही नासके आंबे घुसले आहेत. एक नासका आंबा खरंच आंब्याची अख्खी करंडी नासवतो. विषाची परीक्षा का घ्या? तरीही जर कोणाला आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकण्यात कौतुक वाटत असेल तर त्यांनी घरातील त्या स्त्रियांची परवानगी घेऊन खुशाल टाकावेत. पण तत्पूर्वी फेसबुकवर अशाही गोष्टी चालतात याचीही त्यांना कल्पना द्यावी. बाकी आपण सूज्ञ आहातच!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

#कपलचॕलेंज!

#challenge 
तुमची बायको दाखवा,
तुमची सुंदर मुलगी दाखवा,
अशा रिकाम्या परंतु #भविष्यात_घातक_ठरू_शकणाऱ्या_चॅलेंजस चा महापूर सध्या FB वर पहायला मिळतो आहे.#आपलं_प्रदर्शन_जगात_जाते_कृपया हे आपण टाळले पाहिजे F.B वर चांगले लोक जेवढे  आहेत तेवढे  वाईट आहेत हॅकर्स आहेत 
FB वरून मुलींचे व स्त्रियांचे फोटो घेऊन घाणेरड्या पेजेस वर टाकण्याचे नीच प्रकार सातत्याने होत असताना, असले प्रकार होत आहे. आणि यात सुशिक्षित म्हणवणारे  लोकच दिसून येतात..

आपल्या घरातील लक्ष्मी, स्त्रिया प्रदर्शनाची वस्तू आहेत का? 
उद्या आपल्या घरातील स्त्रीच्या फोटो सह चुकीची पोस्ट दिसली तर दोष कुणाला द्यायचा..?
याचा ही विचार करायला हवा...
 
अशी रिकामे आव्हाने घेऊन काय दाखविले जाते..??

आव्हान स्वीकारायचे तर,
स्वच्छतेचे, 
कोरोना विरुद्ध लढण्याचे,
या अवघड काळात अन्न, वस्त्र वाटपाचे
किमान चार विद्यार्थ्यांना वही पुस्तक देण्याचे घ्यायला हवे....

कृपया जरा तरी विचार करा....

(फेसबुक वरून साभार)

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

देव भौतिक आहे!

निसर्गातला देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे!

(१) मानवी शरीर हे जर भौतिक आहे तर मग निसर्गाची रचना व व्यवस्थाही ही सुद्धा भौतिक मानण्याशिवाय पर्याय नाही. याच तर्काने मानवी शरीराचा राजा (मेंदू) हा जर भौतिक तर मग निसर्गाचा राजा (देव) हा सुद्धा भौतिक आहे असेच मानावे लागेल. तसे भौतिक आहे म्हणून तर मानवी मेंदू हा निसर्गातून दोन मुख्य भौतिक गोष्टी वसूल करण्यात सतत व्यस्त आहे. त्या म्हणजे भौतिक सुखाचे आर्थिक लाभ आणि भौतिक शांतीची राजकीय सुरक्षितता!

(२) कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळण्यासाठी जर देवापुढे प्रार्थना केली जात असेल तर अशी प्रार्थना ही राजकीय सुरक्षिततेतून भौतिक शांती मिळावी म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय व अशा मुक्तीसोबत अर्थचक्र चालू होऊन भौतिक गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाची सोय व्हावी अशी अपेक्षा देवाकडून करीत तशी प्रार्थना जर देवापुढे केली जात असेल तर तीही आर्थिक लाभातून भौतिक सुख मिळावे म्हणून केलेली स्वार्थी प्रार्थना होय. आता या दोन्ही प्रार्थनेमध्ये जर मनुष्याचा भौतिक स्वार्थ दडला आहे तर मग अशा देव प्रार्थनेत कोणती आध्यात्मिकता आहे? भौतिक सुख व शांतीचा ध्यास असलेली देव प्रार्थना ही कदापि आध्यात्मिक होऊ शकत नाही.

(३) भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसे अशी आहेत की त्यांना प्रेम, करूणा यासारख्या भावनांचा ओलावा देत (या ओल्या भावनांना हृदय असे संबोधण्यात येते) दिवाणी (सिव्हिल) बुद्धीचा (शांत डोक्याचा) हळूवार, हलका धक्का देत त्यांच्याबरोबर आर्थिक सुखाची देवाणघेवाण करावी लागते अर्थात असे आर्थिक व्यवहार करावे लागतात. पण अशा आर्थिक व्यवहारांत केवळ माणुसकीचा भावनिक ओलावा (हृदय) दडलाय म्हणून असे व्यवहार हे आध्यात्मिक होऊ शकत नाहीत. ते भौतिकच होत! त्यांना फार तर कोमल भौतिक आर्थिक व्यवहार म्हणता येईल.

(४) पण भौतिक सृष्टीतील मानव समाजात काही माणसांना माणुसकीचा ओलावाच कळत नाही. त्यांची वृत्ती हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे जंगली झालेली असते. उदा. खून, बलात्कार यासारखे गुन्हे करण्यात पटाईत झालेले सराईत गुन्हेगार. अशा गुन्हेगारांना दिवाणी (सिव्हिल) स्वरूपाचा आर्थिक व्यवहार काय कळणार? अशा जंगली  लोकांना फौजदारी (क्रिमिनल) बुद्धीचा (तापट डोक्याचा) जड हातोडा जोरात मारूनच चांगले  वठणीवर आणावे लागते. असे व्यवहार कठोर भौतिक राजकीय व्यवहार होत.

(५) निसर्गातील भौतिक देवाने निर्माण केलेली निसर्गाची भौतिक रचना व भौतिक व्यवस्था आध्यात्मिक नसून ती भौतिक आहे कारण तो देवच (निसर्गराजा) भौतिक आहे! नावे बदलून अर्थात भौतिकतेला आध्यात्मिकता चिकटवून मनुष्य जर मानसिक समाधान मिळवू पहात असेल तर ते समाधान खोटे आहे. हा प्रकारच मुळी सत्यापासून फारकत घेऊन आभासात जगण्याचा प्रकार होय. मनुष्याच्या आभासी आध्यात्मिकतेत भौतिक सुख व शांतीसाठी चालणारी त्याची धडपड आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

(६) निसर्ग व भौतिकता यांना एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत. पण तरीही निर्जीव पदार्थांची भौतिकता, अर्धसजीव वनस्पतींची भौतिकता, मानवेतर सजीव पक्षी, प्राण्यांची भौतिकता व पर्यावरणाच्या सर्वोच्च पातळीवर उत्क्रांत झालेल्या मनुष्याची भौतिकता यात फरक आहे. मानवी भौतिकता ही मानवेतर सजीवांप्रमाणे फक्त वासनांध भौतिकता नव्हे. कारण मनुष्याच्या मूळ भौतिक वासनांना प्रेम, करूणा यासारख्या पूरक अशा कोमल, नैतिक भावना चिकटलेल्या आहेत. या पूरक नैतिक भावनांचे नामकरण आध्यात्मिक भावना असे केल्याने त्यांना चिकटलेली मूळ भौतिक वासना नष्ट होत नाही. त्यामुळे असे नामकरण करणे चुकीचे होय. अर्थात मानवी मनातील नैतिक भावना या सुद्धा भौतिकच होत हे विसरता कामा नये.

(७) निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा व्यवस्थापक आणि नियंत्रक असल्याशिवाय म्हणजे निसर्गात देव असल्याशिवाय हे भौतिक जग आपोआप निर्माण होऊच शकत नाही व ते आपोआप चालूच शकणार नाही असे माझे तार्किक मत असल्याने निसर्गात देव आहे या मतावर मी ठाम आहे. पण निसर्गातला हा देव (निसर्गराजा) आध्यात्मिक नसून भौतिक आहे असेही माझे वैयक्तिक मत आहे. ते मत आहे त्यामुळे इतर लोक त्याच्याशी सहमत होतीलच असे नाही. कारण मतमतांतरे असू शकतात.

-ॲड.बी.एस.मोरे©२३.९.२०२०

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

मुगल बादशहा औरंगजेब १७०७ ते १६१८ असे एकूण ८८ वर्षे आयुष्य जगला तर छत्रपती  शिवाजी महाराज हे १६३० ते ते १६८० म्हणजे फक्त ५० वर्षे आयुष्य जगले. औरंगजेबाच्या आयुष्याची लांबी जास्त पण जगण्याची उंची खूप कमी. याउलट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याची लांबी खूपच कमी म्हणजे फक्त ५० वर्षे (१६३०-१६८०) पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानत! तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पण फक्त ६४ वर्षे जगले (१८९१-१९५६) म्हणजे त्यांच्या आयुष्याची लांबी तशी कमीच पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण डॉ.आंबेडकर यांना महामानव मानत! अर्थात माणूस किती वर्षे जगला याला महत्व नाही तर तो कसा जगला याला महत्व आहे. आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्नाच्या तोंडून या संदर्भात एक अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडलेय "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये"! मनुष्य जीवन खूप अनमोल आहे. त्या जीवनाचे मनुष्याने सार्थक केले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

आत्म्याचे परमात्म्याशी मिलन!

निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची, पण तरीही आत्म्याचे परमात्म्याशी मिलन शक्य!

(१) निसर्ग म्हणजे तरी काय? विश्वातील ग्रह, ताऱ्यांचा समुच्चय (अवकाश) व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या विविध सजीव व निर्जीव पदार्थांचा समुच्चय (सृष्टी) यांची गोळाबेरीज अर्थात संपूर्ण अवकाश व संपूर्ण सृष्टी व या अवकाश व सृष्टीची रचना व व्यवस्था अर्थात संपूर्ण विश्व व सृष्टीचे पर्यावरण असा निसर्गाचा अर्थ घेता येईल.

(२) अशा या निसर्गाची रचना व व्यवस्था फार गुंतागुंतीची आहे. पण ती अनाकलनीय आहे असेही म्हणता येणार नाही. कारण विज्ञानाने अर्थात मानवी बुद्धीच्या संशोधनातून मानवाला प्राप्त झालेल्या ज्ञानाने निसर्ग रचनेचे व निसर्ग व्यवस्थेचे गूढ बऱ्याच अंशी उघड केले आहे. पण विज्ञानाने निसर्गातील सगळ्याच गोष्टी उघड केलेल्या नाहीत. निसर्गात अजून बरीच गुपिते दडली आहेत. ती गुपिते उलघडण्याच्या मार्गावर विज्ञानाचा खडतर व लांबचा प्रवास चालू आहे.

(३) हेही खरे आहे की, विज्ञानाला आतापर्यंत गवसलेले निसर्गाचे सत्य हे अचंबित करून टाकणारे आहे. निसर्गातील आश्चर्ये बघून नुसते कौतुकच वाटत नाही तर आश्चर्यचकित व्हायला होते. कौतुक व आश्चर्य यांचे मिश्र भाव निर्माण करणाऱ्या निसर्गाच्या या सत्यात स्वर्गसुखाचा आनंद आहे तशा नरकयातनांचे दुःखही आहे. स्वर्गसुखाचा आनंद देणाऱ्या सहज व सुंदर आर्थिक देवाणघेवाणीच्या कोमल बागा आहेत तशी नरकयातनांचे दुःख देणारी काटेरी जंगले सुद्धा आहेत.

(४) या काटेरी जंगलातूनच सहज, सुंदर अशा आर्थिक देवाणघेवाणीचा मार्ग जात असल्याने अर्थात नरकातून स्वर्गाचा मार्ग जात असल्याने सुख देणाऱ्या स्वर्गाच्या वाटेवरील जंगली काटे दूर करण्याचे आव्हान म्हणजे संकटातून सुटका करून घेण्याचे राजकीय आव्हान यशस्वीपणे  पेलल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. म्हणजेच खडतर राजकारणाशिवाय सहज आनंद देणारे अर्थकारण नाही असा याचा सरळसाधा अर्थ!

(५) मनुष्य जीवनाचे अर्थकारण हे गुलाबाच्या  फुलाप्रमाणे कोमल आहे तर मनुष्य जीवनाचे राजकारण हे त्या फुलाला चिकटलेल्या काट्यां प्रमाणे कठोर आहे. निसर्गाचे हे दुहेरी सत्य अनुभवताना मानवी मनाला निसर्गातील देव आठवला नाही तर नवलच! मग या अदृश्य देवाची आध्यात्मिक भक्ती करताना मानवी मन दोन गोष्टी करते. एक म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद दिल्याबद्दल देवाचे आर्थिक आभार मानणे व दोन म्हणजे नरकयातनांचे दुःख सहन होत नाही म्हणून या यातनांतून अर्थात स्वर्गाच्या आर्थिक मार्गावरील संकटांच्या आव्हानातून सुटका होण्यासाठी देवाची राजकीय प्रार्थना करणे.

(६) म्हणजे देवाची मानवी भक्ती आध्यात्मिक असत नाही तर ती स्वार्थी, भौतिक, आर्थिक व राजकीय असते. सद्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून मुक्तता करून घेण्यासाठी जर मनुष्य   देव प्रार्थना करेल तर ती भौतिक-राजकीय प्रार्थना असेल. अशाप्रकारे निसर्गाची भौतिकता हीच मनुष्याला देवाची आध्यात्मिकता शिकवते असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत वैयक्तिक असल्याने त्यावर कृपया धार्मिक वादविवाद नकोत!

(७) आता पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग निसर्गात देव आहे हे मान्य करायचे की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मी मनुष्याच्या शरीर रचनेचे उदाहरण समोर ठेवतो. आपले शरीर अनेक मांस पेशींचा समुच्चय असलेल्या अनेक मांसल अवयवांनी बनलेले आहे. या बहु अवयवी शरीराच्या इमारतीला हाडांचा आधार आहे. म्हणजे हाडांच्या सांगाड्यावर आपल्या शरीराची इमारत उभी आहे. आता या शरीर इमारतीचा राजा कोण तर आपला मेंदू! याच तर्काने गुंतागुंतीच्या मानवी शरीराला जर मेंदू नावाचा राजा आहे तर मग गुंतागुंतीच्या निसर्ग शरीराला देव नावाचा राजा का असू नये? हा देव राजाच निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा नियंत्रक किंवा व्यवस्थापक असे का मानू नये? केवळ हा निसर्गराजा (देव) दिसत नाही म्हणून?

(८) याच वैज्ञानिक तर्काने मी निसर्गात देवाचे अस्तित्व मानतो. पण शरीराच्या राजाचे अर्थात मेंदूचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येते तसे निसर्गाच्या राजाचे अर्थात देवाचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येत नाही हे खरे आहे. पण जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुराव्याने सिद्ध करता येत नाहीत. पण त्या नसतातच असे नसते. केवळ पुरावा नाही म्हणून संशयाचा फायदा देऊन कोर्टातून निर्दोष सुटलेले आरोपी हे गुन्हेगार नसतातच असे ठामपणे म्हणता येईल का? मग नास्तिक लोक केवळ पुराव्याचे तुणतुणे वाजवीत निसर्गात देव नाहीच असे ठामपणे कसे म्हणू शकतात? माझी देवाविषयीची आस्तिकता ही अशी वैज्ञानिक तर्कावर आधारित आहे व हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून त्याला कोणी कचराकुंडीत टाकून देईल तर तो त्याचा निर्णय असेल. माझ्या या वैज्ञानिक तर्काला कोणी कचराकुंडी दाखवली म्हणून मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी वैज्ञानिक आस्तिक आहे.

(९) आपल्या शरीराची रचना व व्यवस्था जशी गुंतागुंतीची आहे तशीच निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीर व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना आपल्या मेंदूला किती त्रास होतो याचा अनुभव आपण प्रत्येकजण पदोपदी घेत असतो. मेंदू आपल्या शरीर अवयवांचे नियंत्रण करू शकतो कारण हे अवयव त्यांच्या ठिकाणी नीट कार्य करीत असतात म्हणून! पण शरीराचे बहुतेक अवयव नीट काम करेनासे झाले म्हणजे जर आपल्या शरीराला बहुअवयव बिघाडाचा मोठा आजार (मल्टिपल अॉर्गन डिसअॉर्डर) झाला तर आपल्या मेंदूची स्थिती काय होईल? याला शारीरिक आणीबाणी म्हणतात.

(१०) देशाच्या निरनिराळ्या राज्यांत व देशाच्या नागरिकांत योग्य समन्वय राहिला नाही की मग देशातही अराजक निर्माण होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा कस लागतो. याच न्यायाने निसर्गाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना निसर्गाच्या राजाचा म्हणजे देवाचा कस लागत असेल का? जर आपल्या शरीराच्या बहुतेक अवयवांचे नटबोल्टस सैल झाले तर ते घट्ट करायला आपला मेंदू कुठेकुठे म्हणून धावेल? तो एकाग्र मनाने, एकचित्ताने कार्य करू शकेल का? आपल्या मेंदूची ही एवढी अवघड स्थिती तर देवाची स्थिती काय असेल?

(११) मला एवढे कळते की, मनुष्य जीवन अनमोल आहे. त्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर भौतिक वासना,आध्यात्मिक भावना व दोन्हीत संतुलन ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी या तिन्हीचे मिश्रण असलेला मानवी मेंदू जो मानवी शरीराचा राजा आहे तो म्हणजेच मानवी आत्मा व निसर्गाचा राजा म्हणजे देव तो म्हणजे  परमात्मा यांचे म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे मिलन हे मनुष्याच्या जिवंतपणीच शक्य आहे, मनुष्य मेल्यावर नाही. मनुष्य मरतो म्हणजेच त्याचा मेंदू मरतो. मनुष्य मेल्यावर जर त्याचा आत्माच शिल्लक रहात नाही तर त्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन कसे शक्य आहे? म्हणून जिवंतपणीच मनुष्याने त्याचे माणूसपण जपले पाहिजे. आत्मा (स्वतःचा मेंदू) व परमात्मा (निसर्गाचा मेंदू) यांच्यातील समन्वयाचा अर्थात  मिलनाचा अनुभव घेत हे माणूसपण जपणे सर्व माणसांना शक्य आहे असे मला वाटते.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

सापाची भीती!

सापाचा प्रत्यक्ष अनुभव!

साप म्हटला की भीती ही वाटतेच. १९७६-७७ सालची ही घटना आहे. मी पोदार कॉलेजच्या एन.एस.एस. कँप साठी ठाणे जिल्ह्यातील बऱ्हाणपूर गावातील आदिवासी पाड्यावर गेलो होतो तेंव्हा मला अचानक संडास लागली होती. तिथल्या आदिवासीने एक छोटे चिनपाट पाणी भरून दिले व लांब तिकडे जाऊन संडास करायला सांगितले. आजूबाजूला भातशेती होती. मी दोन मोठ्या दगडांवर माझे पाय ठेऊन संडासला बसलो. तर काही वेळाने एक भलामोठा साप (या पोस्टसोबत असलेल्या प्रतिमेत दिसतोय ना अगदी तसाच व तेवढा मोठा साप) बरोबर माझ्या खालून सरपटत आला आणि माझ्या समोरच्या भातशेतीच्या गवतात गुडूप झाला. तो साप खाली आणि मी बरोबर त्या सापाच्या वर दोन दगडांवर पाय ठेऊन बसलेलो. जरा जरी हललो असतो तर माझ्या ढुंगणालाच तो साप कडकडून चावला असता. तो प्रसंग, तो थरार मी आयुष्यभर विसरू शकत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०