https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

पितृ पंधरवडा!

पितृ पंधरवडा व सर्वपित्री अमावास्याच्या मागे असलेल्या भावना जेंव्हा रडतात!

जेंव्हा पासून या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली तेंव्हा पासून विविध जीव या पृथ्वीवर सतत पुनरूत्पादन करून आपआपली पिढी जतन करण्याचा प्रयत्नात आहेत. निरनिराळ्या  वनस्पती, मानवेतर प्राणी व मनुष्य प्राणी हेच कार्य करून या पृथ्वीतलावर स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा खरं तर निसर्ग निर्मित प्रचंड मोठा छापखाना आहे. हे बोलायला, लिहायला सोपे आहे पण मनुष्याच्या  भावनिक मनाला हे सहन करणे कठीण आहे. जुनी पिढी मरते व नवीन पिढी जुन्याची जागा घेते हा या छापखान्याचा भाग! पण जुनी पिढी नष्ट होते तेंव्हा जुन्या पिढीतल्या लोकांचे उभे संसार नष्ट होतात, राहतात फक्त त्या संपलेल्या संसाराच्या आठवणी व त्याही काही काळच! सध्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष सुरू आहे. सालाबाद प्रमाणे आलेला हा पितृ श्राद्ध पंधरवडा! येत्या गुरूवारी १७ सप्टेंबर, २०२० सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी आपल्या मृत झालेल्या आईवडिलाची, आजीआजोबाची आठवण म्हणून त्यांच्या स्मृतीला नैवेद्य द्यायचा. भले हा नैवेद्य त्यांना पोहोचत नसेल, भले काही लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील पण या वार्षिक आठवण क्रियेमागे भावना आहेत हे विसरून कसे चालेल? का पुनरूत्पादन हा नैसर्गिक छापखाना आहे म्हणून या भावनांची चेष्टा करायची? मृत आईवडील, आजीआजोबा यांना दाखवलेला नैवेद्य कावळ्यानेच खाल्ला पाहिजे असे काही नसते. ही झाली अंधश्रद्धा. कोणाच्याही मुखात तो गेला तरी काही फरक पडत नाही. मी जेंव्हा माझ्या सद्याच्या ६४ वयात माझे आईवडील आठवतो तेंव्हा त्यांचा संपूर्ण संसार माझ्यापुढे उभा राहतो. त्यांच्या त्या संसारातील त्यांची ती धडपड, लगबग माझ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. काय भयंकर सत्य आहे या निसर्गाचे! माझे वडील अगोदर गेले तेंव्हाच त्यांचा तो संसार मोडला. मग आईही गेली आणि मग तो संसारच बघता बघता नष्ट झाला. आजीआजोबा यांचा संसारच काय त्यांचे चेहरेही मला नीट आठवत नाहीत. हा त्या निसर्गाचा खेळ! आता मी ६४ वयाचा तर माझी बायको ६० वयाची. आमची मुलगी मोठी होऊन तिच्या संसारात व्यस्त झालेली. पण आम्हा नवरा बायकोचा संसारही हळूहळू लयाला चालला आहे, तो एक दिवस माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या मृत्यूने संपणार आहे याची जाणीव झालीय. मध्येच हा दुष्ट कोरोना थयथयाट घालतोय. त्यामुळे वातावरण तसेही भयावह झालेय. पण भावना रडतात हो! या पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.९.२०२०

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

मनाचे सरकार!

सदसद्विवेकबुद्धी हेच मानवी मनातील सरकार!

निसर्ग निर्मित पर्यावरणीय परिस्थिती ही झाली  सर्वसाधारण गोष्ट व त्या परिस्थितीतील विशिष्ट वस्तुस्थिती ही झाली विशेष गोष्ट! उदाहरणार्थ कोरोनाची जागतिक साथ ही झाली निसर्गाची सर्वसाधारण गोष्ट तर आपल्या राज्य सरकारची कोरोना नियंत्रणासाठी चाललेली कायदेशीर धडपड ही झाली निसर्गातील आपल्या जवळ असलेल्या समाजाची विशेष गोष्ट! या दोन्ही गोष्टींना म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीला व विशेष वस्तुस्थितीला माणसाने योग्य नैसर्गिक प्रतिसाद कसा द्यायचा हे कोण ठरवणार तर एका बाजूने माणसाचे वैयक्तिक मन व दुसऱ्या बाजूने समाजाचे सामूहिक मन (समाजमन)! योग्य नैसर्गिक प्रतिसादातील योग्य हा शब्द महत्त्वाचा! याचे कारण म्हणजे योग्य काय व अयोग्य काय हा प्रश्न फक्त मनुष्याच्या मेंदूलाच पडतो. तो इतर प्राण्यांना पडत नाही. मनुष्य सोडून इतर प्राण्यांना योग्य तेच कळते. त्यांना अयोग्य हा शब्दच माहित नाही. मग हा प्रश्न फक्त मानवी मनालाच का पडावा? याचे कारण म्हणजे मानवी मनाला भौतिक वासनांबरोबर नैतिक भावनाही चिकटलेल्या आहेत. मानवी मनात असलेल्या प्रेम, करूणा, परोपकार इ. उदात्त भावना याच त्या नैतिक भावना होत. या भावनांना आध्यात्मिक भावना असेही म्हणता येईल. त्यासाठी मानवी मनात आत्मा असतो व त्या आत्म्याचा आतला आवाज म्हणजेच या नैतिक भावना अशीही कल्पना करता येईल. मानवी मनात मूलभूत भौतिक वासना व पूरक नैतिक भावना एकत्र निवास करतात. पण या वासना व भावनांचे गुणधर्म समान नाहीत. मग एकाच मनात असलेल्या या विविध गुणधर्मी वासना व भावनांत एकता (विविधतेत एकता) कशी निर्माण करायची? त्यासाठी मानवी मनात  असते सरकार! सदसद्विवेकबुद्धी हेच ते मानवी मनातील सरकार! हे सरकार भौतिक वासनांवर नैतिक भावनांचे संस्कार करीत त्या वासनांना पवित्र अर्थात सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय करते तर गोड शिरा या खाण्याच्या पदार्थाला आध्यात्मिक भावनेचा स्पर्श करून त्या नैसर्गिक पदार्थाला देवाचा प्रसाद करते. हे कर्म म्हणजे भौतिक निसर्ग व आध्यात्मिक देव यांना एक करण्याचे मोठे कर्म! हा कर्म प्रयोग म्हणजे कर्मकांड म्हणून काहीजण त्याला नावे ठेवतीलही. पण हे कर्मकांड वैज्ञानिक आहे व त्यात मानवी मनाची नैसर्गिक सहजता आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भौतिक वासना व नैतिक भावना यात ताळमेळ ठेवून त्यांच्यात संतुलन साधण्याचा मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी सतत प्रयत्न करीत असते. वासना व भावना यांच्यात ज्या बिंदूवर स्थिर होण्याचा हे मानवी मनातील सरकार प्रयत्न करते त्या मध्य बिंदूला आपण विवेक बिंदू असे म्हणूया! या मध्यवर्ती विवेक बिंदूवर स्थिर होऊन मनुष्याने वासना व भावना मिश्रित कर्म करणे म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाला योग्य प्रतिसाद देणे होय. पण इथेच पुन्हा गोची होते कारण समाजातील सर्व माणसांची मने व त्या मनातील त्यांचे मध्यवर्ती विवेक बिंदू सारखे नसतात. म्हणून मग योग्य काय व अयोग्य काय हा पुढे सामाजिक प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी मानव समाजाने मग संपूर्ण समाजमनाचे एक स्वतंत्र समाज सरकार निर्माण केले व त्या सरकारचा स्वतंत्र कायदा निर्माण केला. या कायद्यावर न्यायनिर्णय देण्यासाठी मग समाज सरकारचा भाग असलेली समाज न्यायालये निर्माण केली गेली. माझा स्वतःचा विवेक बिंदू हा दुसऱ्या माणसाच्या विवेक बिंदू पेक्षा श्रेष्ठ आहे असा समज जेंव्हा माणसाच्या मनात निर्माण होतो तेंव्हा त्या विवेक बिंदूला अहंकार चिकटलेला असतो. मग माणसा माणसांमधील अहंकारी विवेक बिंदू एकमेकांशी वाद घालीत बसतात. कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन हिंसक होतात. शेवटी हे विवेक बिंदूचे वाद समाज न्यायालयात न्याय निर्णयासाठी जातात. मग समाज न्यायालय समाज कायद्यावर बोट ठेवून स्वतःचा विवेक बिंदू (ज्याला न्याय बिंदू म्हणता येईल) वापरून अशा वादांवर न्याय निर्णय देते. खालच्या कोर्टाचा न्यायनिर्णय वाद घालणाऱ्या माणसांच्या विवेक बिंदूंना पटला नाही तर मग असमाधानी राहिलेला विवेक बिंदू हा वरच्या कोर्टात दाद मागतो. सगळ्यात शेवटी समाजाचे सर्वोच्च न्यायालय अंतिम न्याय निर्णय देते व मग अहंकारी विवेक बिंदूंच्या वादावर पडदा पडतो. केवढी भलीमोठी लांबलचक प्रक्रिया आहे ही विवेकी न्यायाची म्हणजेच योग्य या शब्दाची! सर्वांना समान फौजदारी कायदा आहे तसा सर्वांसाठी एकच समान नागरी कायदा असावा, वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असू नयेत अशी विविधतेत एकता साधू पाहणाऱ्या मानव समाजाची एक मागणी आहे. पण त्यासाठी सगळ्यांची सदसद्विवेकबुद्धी व सगळ्यांचा विवेक बिंदू एक व्हायला हवा. खरं तर सगळ्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी व तिचा विवेक बिंदू जर एक होण्यासाठी सर्वांनी आपल्या अहंकाराचा त्याग करण्याची गरज आहे. अशी नैसर्गिक जाणीव जेंव्हा सगळ्या माणसांच्या मनात निर्माण होईल तेंव्हा सर्वांचे विवेक बिंदू अहंकार मुक्त होतील व त्यातून माणसा माणसांतील अहंकारी वाद कमी होऊन समाज न्यायालयांना अशा वादग्रस्त केसेसची वाट बघत बसावे लागेल. असे झाले तर मग वकिलांना काम उरणार नाही. इतकेच नव्हे तर समाज सरकारचा भाग असलेल्या पोलीस व लष्करांची कामेही कमी होतील आणि शेवटी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकारणाला फाटे फुटणार नाहीत!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.९.२०२०

समाज माध्यमावरील बदनामीकारक पोस्टस!

वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्टस लिहू नका किंवा शेअर करू नका!

वैयक्तिक चारित्र्य मग ते एखाद्या सेलिब्रिटी कलाकाराचे, खेळाडूचे किंवा राजकारणी व्यक्तीचे असो की सर्वसामान्य व्यक्तीचे असो, ते सार्वजनिक तमाशाचा भाग बनू नये. इतर माध्यमांएवढे समाज माध्यमांवर म्हणावे तसे सरकारी नियंत्रण नाही. त्यामुळे होते काय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाविरूद्ध काहीही गरळ ओकण्यास सदैव तयार असते. नेटिजन्सची खास आचार संहिता असावी काय व तिचे नियमन माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार सरकारने कसे करावे हा वेगळा विषय आहे. पण समाज माध्यमावरील तुमच्या  लिखाणातून किंवा तुम्ही शेअर केलेल्या पोस्टस मधून जर कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊन त्या व्यक्तीची जाहीर बदनामी होत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या विरोधी फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला व दिवाणी अब्रू नुकसानभरपाईचा दावा दोन्हीही कोर्टात दाखल करण्याचा हक्क आहे. ही बाब समाज माध्यमावर सक्रिय असलेल्या सर्वांनीच नीट लक्षात ठेवावी. "आ बैल मुझे मार" करणे कृपया टाळावे. समाजमाध्यमावर फिरणाऱ्या  लेखाखाली लेखक म्हणून कोणाचे तरी नाव टाकले म्हणून तो लेख त्याच व्यक्तीने लिहिला हे ठामपणे सांगता येत नाही. कारण असे नाव म्हणजे हस्तलिखित किंवा डिजिटल सही नव्हे. अशावेळी तो लेख मुळात कोणत्या फेसबुक किंवा इतर समाज माध्यम खात्यावरून प्रसिद्ध झाला त्या उगमस्थानाचा शोध घेतला पाहिजे व असा लेख शेअर करताना खाली टीप म्हणून ते उगमस्थान लिहिले पाहिजे. पण खरं म्हणजे मुळात वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्टस शेअर करूच नयेत. अशा प्रकारच्या शेअरिंग मधून पोस्टस शेअर करणारी व्यक्ती अडचणीत येऊ शकते. सद्या तर काय सेलिब्रिटी लोकांच्या भानगडीत नाक खुपसण्याची सर्वच माध्यमांत चढाओढ लागली आहे. राजकारणी नेते मंडळी  यातून कशी सुटतील? मग राजकीय वातावरण तापते. त्यातून हिंसक हाणामाऱ्या सुद्धा होऊ शकतात. हे सगळं आपल्याला सहज टाळता येऊ शकते. त्यासाठी आपण सूज्ञपणे विचार केला पाहिजे. वैयक्तिक बदनामीकारक पोस्टस न लिहिणे किंवा शेअर न करणे हा पळपुटेपणा आहे की सूज्ञपणा आहे याचा तुम्हीच विचार करा!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.९.२०२०


गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

जैविक साखळी!

जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक!

प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उदात्त भावना निसर्गाने फक्त आंतर मानवी संबंधातच का बऱ्या निर्माण केल्या असाव्यात? माणूस हा पर्यावरणातील जैविक साखळीत अगदी वरच्या टोकावर उत्क्रांत झाल्याने असेल का असे? कारण इतर जैविक साखळीत जीवो जीवस्य जीवनम व बळी तो कानपिळी हाच निसर्गाचा कठोर नियम आहे. ही जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
निसर्गाची नवलसाखळी व वन्यजीव सुरक्षा हे दिनांक ५.९.२०२० च्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेले दोन लेख.

करोना देवी अंधश्रद्धा!

केवढी मोठी ही अंधश्रद्धा!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका शहरात चक्क करोना देवीची स्थापना केली. जगातील शास्त्रज्ञ करोना विषाणूवर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि इथे काही जण चक्क करोना देवी स्थापन करून तिची अंधभक्ती करायला लोकांना उद्युक्त करीत आहेत! बापरे, केवढी मोठी ही अंधश्रद्धा!

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
लोकसत्ता वृत्तपत्र बातमी दिनांक ३.९.२०२०

पर्यावरण फ्रेंडली गणेश मूर्ती!

याचसाठी का केला होता अट्टाहास?

धर्म संस्कृती व निसर्गाचे पर्यावरण यात संतुलन  साधता आले पाहिजे. प्लास्टर अॉफ पॕरिसच्या गणेश मूर्त्या पाण्यात नीट न विरघळल्याने तिथे जलप्रदूषण होऊन पाण्यातील प्राणवायू कमी होतो व पाण्यातील जीवसृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते असे निसर्गाचे विज्ञान सांगते. त्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे शाडूच्या गणेश मूर्त्या! पण हा पर्याय टाळला जातो. मग प्लास्टर अॉफ पॕरिस च्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याची कल्पना पुढे आली. विसर्जनानंतर प्लास्टर अॉफ पॕरिसचा कृत्रिम तलावांतील साचलेला गाळ जर पुन्हा खाडीच्या पाण्यात टाकायचा असेल तर मग कृत्रिम तलावांचा उपयोग काय? गणेश मूर्त्यांचे विसर्जन सरळ खाडीच्या पाण्यातच करायला मग हरकत का? हे असे झाले की, लोकांना ओला कचरा, सुका कचरा दोन वेगवेगळ्या डस्टबिन्स मध्ये जमा करायला सांगायचे व नंतर पालिकेच्या घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर किंवा समुद्रात टाकायचा. मग हा व्यर्थ खटाटोप कशासाठी? याचसाठी का केला होता अट्टाहास?

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
लोकसत्ता वृत्तपत्रातील बातम्या दिनांक १ व ३ सप्टेंबर, २०२०

वेळ व शक्ती वाया चालली!

वेळ व शक्ती वाया चालली!

या फेसबुकवर मित्र असलेल्या मंडळींपैकी किती जण हाय प्रोफाईल श्रीमंत जीवन जगत आहात? मला वाटते आपण बहुतेक जण गरीब व मध्यमवर्गीय आहोत. आपल्या पैकी कोणाचा सेलिब्रिटी लोकांकडे असतो तसा ३००० चौ. फुटांएवढा किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचा  आलिशान बंगला, फ्लॅट व त्यासोबत तेवढेच मोठे कार्यालय मुंबईत आहे काय? आपण त्या लोकांएवढ्या चैनी करीत आहोत का? तसेच आपण त्यांच्या सारखे करमणूक नावाची चैन असलेल्या उद्योगधंद्यात सतत व्यस्त राहून लाखो, करोडो रूपये कमवत आहोत का? मला वाटते आपल्यापैकी कोणीच एवढे मोठे नाही आहोत. मग आपण का बरे या लोकांचे तथाकथित मोठे विषय उगाच चघळत बसलो आहोत? आपल्याला गेले पाच ते सहा महिने घरात कोरोना लॉकडाऊनने अडकवून ठेवले आहे. आपली रोजीरोटी सद्या पूर्ण बंद आहे. आपल्यापैकी काही माणसे घरी बसून कामधंदा नसल्याने तणावाने जग सोडून गेली आहेत. आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या या अत्यावश्यक विषयांना ही मोठी माणसे किती महत्व देतात? मग आपण त्यांच्या विषयांना एवढे महत्व का देत आहोत? आपण का बरे प्रभावित होत आहोत त्यांच्या विषयांनी? त्यांची तथाकथित मोठी कर्मे त्यांना तसलीच फळे देत असतील तर आपण आपल्यासाठी त्रासदायक असलेली ती फळे का चिवडीत बसलो आहोत? याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांवर, कानांवर याच बातम्यांनी मिडियाकडून सतत होत असलेला वर्षाव! बघा बाबांनो, नीट विचार करा या गोष्टीचा की आपण आपला वेळ व आपली शक्ती या आपल्यासाठी त्रासदायक व निरर्थक असलेल्या गोष्टींवर वाया तर घालवत नाही आहोत ना?

-ॲड.बी.एस.मोरे©१०.९.२०२०