निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर/देव!
(१) निसर्ग कशाला म्हणायचे? निसर्गाची संपूर्ण व्याख्या काय? पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टी व ग्रह, ताऱ्यांसह असलेल्या विश्वाच्या संपूर्ण पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे का? विश्वाच्या पर्यावरणाचे मानवी मेंदूला आकलन होण्याच्या आतच माणूस मरतो. कारण मानवी आयुष्य खूप लहान आहे. नुसते लहानच नव्हे तर ते क्षणभंगुरही आहे. काही माणसांच्या वाट्याला ७० ते ८० वर्षांचे परिपक्व आयुष्यही येत नाही. आयुष्याचे पान ७० ते ८० वर्षांत पिकायच्या आतच काही माणसे विविध आजारांनी, खून किंवा आत्महत्येने किंवा अपघाताने मरतात. पण जी माणसे ७० ते ८० वयापर्यंत जगतात (अपवादात्मक बाब म्हणून काही थोडी माणसे आयुष्याची शंभरी सुद्धा गाठतात) त्यांना साधे पृथ्वीवरील पर्यावरण नीट लक्षात येत नाही मग त्यांना विश्वाचे पर्यावरण काय कळणार? याचा अर्थ हाच की पृथ्वीवर जन्मलेला कोणताही माणूस हा पूर्ण ज्ञानी होऊन मरत नाही.
(२) जर विश्वाच्या संपूर्ण पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे तर मग या निसर्गाचे ज्ञान हे अगाध आहे. नुसते पृथ्वीवरील सजीव, निर्जीव सृष्टीचे पर्यावरणच समजणे कठीण आहे मग विश्वाच्या पर्यावरणाची तर गोष्टच वेगळी! म्हणजे निसर्ग हा मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर आहे. पण हा निसर्ग असा कसा तयार झाला? त्याच्या मागे ईश्वर/देव म्हणून कोणती तरी अद्भुत शक्ती आहे का या प्रश्नावर माणसाचा मेंदू ठाम होऊ शकत नाही. मग नास्तिक देव नाही म्हणोत की आस्तिक देव आहे म्हणोत. पण माणसांना जसे आईबाप असतात तसा निसर्गात ईश्वर/देव आहे असे मानून चालले तर मग हा ईश्वर/देव आपल्या पृथ्वीवरच किती विविध रूपात व गुणांत अवतीर्ण झालाय याची गोळाबेरीज केली तरी डोके गरगर फिरायला लागते.
(३) पृथ्वीला लाभलेला सूर्य हा तारा तर चंद्र हा उपग्रह, पृथ्वीवरील हवा, पाणी, जमीन व त्यात असलेले विविध निर्जीव पदार्थ, या सर्वांवर जगणाऱ्या पृथ्वीवरील विविध वनस्पती, विविध पक्षी, प्राणी व माणसे! केवढी ही विविधता या पृथ्वीवर! या विविधतेतच राहणारा निसर्गातील ईश्वर/देव! या सर्व विविध गोष्टी या जणू त्या ईश्वराचेच विविध अवतार ही सुद्धा एक वेगळी कल्पना! म्हणजे देव सूर्य, चंद्रात आहे, देव हवा, पाणी, जमीन यात आहे, देव झाडांत आहे, देव फुलाफळांत आहे, देव पक्षांत आहे, देव प्राण्यांत आहे व देव माणसांतही आहे. मग अशी जर कल्पना करून चालायचे तर मग कशा कशाच्या व कोणा कोणाच्या म्हणून पाया पडायचे?
(४) पृथ्वीवर असलेल्या पर्यावरणात निर्जीव व सजीव पदार्थांची परिवर्तनशील चक्रे आहेत. उदाहरणार्थ, मानवी जीवनाचे जन्म, जीवन व मृत्यू हे चक्र! पृथ्वीवरील निसर्गाच्या विविधतेत माणसांची विविधता समाविष्ट आहे. सर्व माणसांसाठी माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीने बनविलेला कायदा जरी समान असला तरी माणसे पूर्णपणे समान नाहीत. त्यांच्यात कला व गुणांची, बौद्धिक सामर्थ्याची विविधता आहे. अशी ही विविध प्रकारची माणसे या पृथ्वीवर जन्मतात, जीवन जगतात, जगताना सृष्टीतील व त्यांच्याकडील विविधतेची खास देवाणघेवाण करतात व शेवटी मरतात. हे जीवन चक्र असेच पिढ्यानपिढ्या चालू आहे.
(५) मानवी मन फार वेगळे आहे. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा असतो. हे आव्हान पेलताना मनातील सदसद्विवेकबुद्धी मनुष्याच्या मदतीला धावून येते. पण मानवी सदसद्विवेकबुद्धी सगळ्या माणसांत सारखी असत नाही. याला ज्ञान व बौद्धिक सामर्थ्यात असलेला फरक या कारणांबरोबर पृथ्वीवरील प्रादेशिक विविधतेतील विषमता वगैरे सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे सर्व माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सामूहिक कायदा असणे आवश्यक ठरते. हा सामूहिक कायदा समाजाच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धी मधून निर्माण होतो. पण कायद्याची ही प्रक्रिया खूप कठीण आहे.
(६) आता प्रश्न निर्माण होतो की जर निसर्गाच्या विविधतेत विविध रूप, गुणांत ईश्वर वावरतोय तर मग तो मानव समाजाच्या सदसद्विवेकबुद्धी मधून तयार झालेल्या कायद्यातही असलाच पाहिजे. पण या कायद्याचे ज्ञान व समज किती जणांना असते? मग वकील व न्यायाधीशांना कायदा जास्त समजतो म्हणून त्यांनाच देव मानायचे का? असे अनेक प्रश्न निसर्गातील देव निर्माण करतो.
(७) महत्त्वाची गोष्ट हीही आहे की, प्रादेशिक विविधतेत प्रादेशिक विषमताही आहे. त्यामुळे निरनिराळ्या राष्ट्रांची प्रादेशिक संस्कृती सारखी नाही. या संस्कृतीत धर्म संस्कृती, देव संस्कृती, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती इत्यादी गोष्टी येतात. या सगळीकडे सारख्या नाहीत. आपण भारतीय भारतात जन्मलो, इथेच वाढलो म्हणून आपल्या मनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. पण समजा आपण इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, चीन या ठिकाणी जन्म घेऊन तिथेच वाढलो असतो तर आपले धर्म कोणते असते व आपले देव कोणते असते? आपण काय खाल्ले असते? चीनमध्ये जन्मलो असतो व तिथेच वाढलो असतो तर आपणही तिथल्या खाद्य संस्कृती प्रमाणे साप, पाली, उंदरे, झुरळे, कुत्री यासारखे प्राणी बिनधास्त खाल्ले असते का? हे प्रश्न आपल्या बुद्धीला पडले पाहिजेत. तरच आपल्याला निसर्ग, देव या संकल्पना नीट समजतील. एवढे मात्र खरे की निसर्गातील विविधतेमुळे (निसर्ग विविधा) निसर्गातील ईश्वर/देव मात्र अनाकलनीय झाला आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०
टीपः
माझे ज्ञान व माझा अनुभव यांच्याशी माझ्या मनातील सदसद्विवेकबुद्धीचा सतत चाललेला सुसंवाद म्हणजेच माझे सातत्यपूर्ण विचार! हा लेख या विचारांतूनच तयार झाला आहे. तो माझ्या वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीवर आधारित असल्याने तो सर्वांनाच पटेल असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की, त्यांना या लेखातील काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांचे योग्य ते परीक्षण करून योग्य कारणमीमांसेसह टीका करावी पण कुचेष्टेने हास्य किंवा रागाच्या तयार इमोजी वगैरे टाकून माझ्या लेखाची चेष्टा करू नये किंवा वाद घालू नयेत.