अमन (शांती)!
(१) कोरोना महामारीला अजून एक वर्षही पुरे झाले नाही. पण संपूर्ण जगाला अशांत करणारे दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ ते १९४५ काळात एकूण सात वर्षे चालू होते. या महायुद्धाचा शेवट अत्यंत भयानक अशा विध्वंसाने झाला. दिनांक ६ अॉगष्ट, १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला व ते शहर बेचिराख केले. त्यानंतर तीन दिवसांनी दिनांक ९ अॉगष्ट, १९४५ रोजी जपानच्याच नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकून ते शहरही बेचिराख केले. या अणुस्फोटात लाखो माणसे मेली. या भयंकर अणुबॉम्बच्या विध्वंसक शक्तीचा धसका घेऊन जपानने दिनांक १५ अॉगष्ट १९४५ रोजी शरणागती पत्करली व दुसरे महायुद्ध समाप्त झाले. अशाप्रकारे मानवनिर्मित विध्वंसाने जगात शांतता प्रस्थापित झाली. पण त्यातून एक विचित्र बोध जगातील राजकारणी मंडळींनी घेतला आणि तो म्हणजे गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर हिंसा, विध्वसांच्या भीतीनेच जगात शांतता निर्माण होऊ शकते. मग जगात विनाशकारी अण्वस्त्रे निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा अजूनही चालूच आहे. यातून जग भीतीच्या प्रचंड दडपणाखाली जगतेय व ही भीती जगात निर्माण होणाऱ्या असंख्य रोगजंतू व विषाणू पेक्षाही फार मोठी आहे. म्हणजे जगाची शांती ही आता ना अर्थकारणी लोकांच्या हातात ना डॉक्टर, वकील, न्यायाधीशांच्या हातात! ती शांती आता आहे महत्वाकांक्षी राजकारणी लोकांच्या हातात! जगातील जनतेचे भवितव्य राजकारणी मंडळींच्याच हातात आहे याचा विसर पडू देता कामा नये.
(२) याच सत्यावर प्रकाश टाकीत जगातील शांततेसाठी राजकीय नेतेमंडळींची विनवणी करणारा १९६७ साली प्रदर्शित झालेला "अमन" हा जुना हिंदी चित्रपट मी काल झी क्लासिक टी.व्ही वाहिनीवर पाहिला. यात एक भारतीय डॉक्टर जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावरील अणुबॉम्बच्या अणुकिरणांमुळे जपानी बंधू भगिनींना झालेले वेदनादायी आजार बरे करण्यासाठी जपानला जाऊन खूप धैर्याने वैद्यकीय सेवा देतो व तिथेच मृत्यूमुखी पडतो. असेच एक भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस १९३८ साली झालेल्या चीन व जपान युद्धात चीनमध्ये तिथल्या रूग्णांवर इलाज करण्यासाठी गेले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे भारतीय डॉक्टरांनी चीन व जपान या दोन्ही देशांना स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन वैद्यकीय सेवा पुरवली. पण जोपर्यंत जगातील राजकारणी मंडळी जगातील विध्वंसक शस्त्रात्रे नष्ट करून युद्धखोरीला कायम विश्राम देत अहिंसेचा मार्ग स्वीकारत नाहीत तोपर्यंत या डॉक्टर मंडळीच्या प्रयत्नांना अर्थ उरणार नाही व जगात अमन (शांती) प्रस्थापित होणार नाही.
-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०